नीता भिसे

नोळखी मुलूख… अनोळखी माणसं… सियालदहवरून ट्रेन पकडली. बंगालमधल्या तालुक्याच्या गावात कोलकातावरून जायचंय. सातला गाडीत बसलोय, नऊला तर पोहोचणार त्यात काय एवढं, असं वाटून मी आपली बिनधास्त बसलेली असते. वाटेतल्या स्थानकांवर माणसं भराभरा उतरत जातात. भाषा कळत नसल्याने मीसुद्धा एका स्थानकावर उतरते. गावाचं नाव माझ्या तोंडून ऐकल्यावर,‘‘हे नाही, हे नाही. पुढे आहे तुमचं गाव…’’ असं ती माणसं सांगतात तेव्हा मी पटकन गाडीत चढते. सात वाजताच मिट्ट काळोख पडलेला… गाडीत आता चारदोनच माणसे उरलेली. जरा वेळाने सहज नजर फिरवली तर माझ्याशिवाय एक भिकारी, एक वेडी बाई आणि मी. आता मात्र भीती दाटायला लागते… दूर कोपऱ्यात एक माणूस दिसतो. ते पोलीसदादा असतात. त्यांना मोडकंतोडकं हिंदी येत असतं. ते म्हणतात, ‘‘आपको इतनी रात को सफर नही करना चाहिए, ये आपका देस नही है…’’ मी मुंबईच्या सवयीने चढले गाडीत, असं सांगितल्यावर पोलीसदादा सर्व सहकार्य करतात. कृष्णनगरला उतरल्यावर स्टेशन मास्तरच्या हवाली मला करतात. तिथं मी ज्या घरची पाहुणी म्हणून गेलेली असते ती माणसं मला घ्यायला आलेली असतात. बंगालच्या साहित्य-संस्कृती-संगीताच्या प्रेमात असलेली मी जवळची मैत्रीण, संयोगितासह तिच्या सासरी-सासूकडे कृष्णनगरला काही दिवस आलेलो असतो. कोलकाताला मंदिरा सेन यांच्या ‘स्त्री पब्लिकेशन’च्या ऑफिसमधल्या मुलींबरोबर बडा बाजार, रवींद्र भवनमधला सांस्कृतिक कार्यक्रम, मेट्रोतून प्रवास वगैरे सगळं अनुभवून मग ती परतीची गाडी पकडलेली असते. निर्जन काळोखातून धावणारी ट्रेन आठवताना मला लहानपणापासूनचे सर्व भीतीचे प्रसंग आठवत राहातात…

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
career animal love
चौकट मोडताना : प्राणिप्रेमाची धास्ती
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

भीती ही माणसाच्या तीन प्राथमिक भावनांपैकी एक आहे. ही प्रत्येकाला कधी ना कधी वाटलेलीच असते. प्रेम, राग, आणि भीती या भावना प्रत्येकाच्या आयुष्यात अपरिहार्यपणे आपलं अस्तित्व दाखवत असतातच. माझ्या लहानपणची एक भीती म्हणजे मला वारंवार पडणाऱ्या स्वप्नातून डोकावणारा तो भितीदायक प्रसंग. त्या दिवशी पुण्यातल्या ‘हाऊसिंग बोर्डा’तल्या कॉलनीतलं गणेश विसर्जन होतं. येरवड्याच्या मुळा नदीजवळ सगळे जण जमलेले. अचानक कॉलनीतला बिरजू पाय घसरून त्या नदीत वाहून गेला. त्यानंतर कित्येक दिवस बिरजूची आई कॉलनीतल्या नळावर डोकं आपटत पाण्याला ‘कोसताना’ दिसायची. त्या दिवशीचा कॉलनीतला गणपती हातात घेतलेला लंगडा माणूस आणि पाण्यात वाहून जाणारा बिरजू यांचं स्वप्न कित्येक वर्षं पडायचं मला…

हेही वाचा >>> इतिश्री : उंच भरारी घेण्यासाठी…

अर्थात इतर भलत्यासलत्या भीतीचा पगडा कधी नव्हताच, मात्र तत्त्ववादी वडिलांच्या आचरणाचा पगडा इतका होता की, त्याच्या परिघाबाहेर जाऊन काही चुकेल का, असा भीतिलंबक मनात कायम फिरत असायचा. बालपणी सगळ्यांच्याच घरात या संस्कारांचा पगडाबिगडा असतोच असतो. रंगीत चित्रांची पुस्तकं वाटून मेंढपाळाची गाणी शिकवणारी माणसं हे तुझे विचार बदलवतील, तुलाच बदलवतील, अशी भीती काहीजण घालायचे. पुढे एका साहित्यवेड्या धर्मगुरूंच्या हाताखाली काम केलं तेव्हा लहानपणाच्या या आठवणीचं मला हसू यायचं.

लहानपणी ‘भित्र्या’ आणि ‘रडक्या’ मुलींना नंतरच्या आयुष्यात मी अतिशय आत्मविश्वासानं जगताना पाहिलंय. याचं एक कारण मला असं वाटतं की, किशोरवयात एक ध्येय डोक्यात असतं. त्या आवडीच्या गोष्टींना चिकटून बसताना, भीतीला शिरकाव करायला वावच राहात नसावा. आपण एक छोटीशी का होईना नोकरी मिळवून आवडीच्या क्षेत्रात काम करावं, या विचारानं एका मध्यरात्री साडेतीन-चार वाजता मी एका महानगरात उतरते. जिनं प्रेमानं बोलावलेलं असतं, त्या जोडलेल्या मावशीकडे जाताना मला काडीची भीती वाटली नव्हती. मानगुटीवर बसलेली स्वत:च्या पायावर उभं राहण्याची इच्छा, हेच या ‘भीती न वाटण्याचं’ कारण असेल का?

अर्थात अशी भीती कधी वाटलीच नाही असं नाही. अनोळखी प्रदेशात प्रवास करताना मात्र कधी एकदाचं सुरक्षित स्थळी पोहोचतोय असं वाटतंच. प्रवासात कधी शेजारच्या सीटवर मुद्दाम बाईलाच बसवून घेणं असेल किंवा समजा कुणी पुरुष बसलाच शेजारी तर दोघांमध्ये कसले कसले अडथळे ठेवणं असेल, हे साळींदराच्या काट्यासारखंच प्रतिक्षिप्त वागणं मुलींच्या, बाईच्या वृत्तीला अगदी चिकटलेलं असावं.

निरनिराळ्या चळवळी किंवा सांस्कृतिक गटांमध्ये मिसळल्यानंतर मात्र एक खुला मोकळेपणा वाटू लागतो, तो मला नंतरच्या काळात मिळाला. पण, सुरक्षिततेच्या कारणास्तव वाटणारी भीतीश्रृंखला कायमच स्त्रियांच्या मनाभोवती फेर धरत असते, अशा काळात वेळोवेळी अत्यंत सुविद्या, संवेदनशील आणि बुद्धिमान मैत्रिणींनी माझी पाठराखण केली. याच काळात, एका स्त्रीविषयक दिवाळी अंकात माझी कविता प्रसिद्धझालेली होती.

आपण जेव्हा बाई, मुलगी असतो तेव्हा

बघतात लोक आपल्याला वर-खाली

मारतात वेलांट्या, नजरेने

घेतात अंदाज…

त्यांच्याकडे असतात शिक्के वेगळेवेगळे

आपल्या असण्यावरनं… आपल्या दिसण्यावरनं

या सर्वांची जाणीव मुठीत गच्च

पकडून वावरावं लागतं बाईला!

मी आजूबाजूच्या स्त्रियांमधील ही भीती कायम न्याहाळत असते. मुकाटपणे अन्याय सहन करणाऱ्या किंवा संघर्ष करत निरनिराळ्या समर प्रसंगांना तोंड देणाऱ्या स्त्रियांना ती त्रास देणारी व्यक्ती समोर आली, तर आत्मविश्वास पूर्णत: खचेल किंवा मनातली ऊर्जा शून्यावर येईल की काय इतकी भीती वाटत असते. स्त्रियांना वाटणारी ही भीती प्रसंगी बोलून न दाखवल्यामुळे त्याचं आजारात रूपांतर होतं, हे तर सर्वश्रुतच आहेच. बऱ्याचदा न्यायालयाच्या आवारात मी अनेक स्त्रियांच्या कर्मकहाण्या ऐकल्या आहेत. मात्र याच जीवघेण्या वर्तुळात आपल्याला जगायचं आहे. या भीतीपोटी अनेक गोष्टी त्या तशाच मनात दाबून ठेवतात. कारण त्या जर बाहेर आल्या तर त्यांचंच हर प्रकारे खच्चीकरणासाठी केलं जाणार हे त्यांना माहीत असतं. आणि हे पदोपदी अनुभवल्यानंतर बाईला वाटतं की, हे तर आपल्यावरचं ‘स्लो पॉयझनिंग’ आहे.

त्याच्या विरुद्ध आधुनिक विचारसरणी आणि अलीकडची मुक्त विचारसरणी यात निर्भीडपणे जगणाऱ्या स्त्रिया हे सुखद चिन्ह आहेच. आपल्या अंतर्मनातल्या हिशोबांशी आपण प्रामाणिक असू तर जगात कशाला कुणाला घाबरायचं, भीतीचा चोळामोळा करून उंच आकाशात त्याचा पंतग उडवायचा, हे अनेकजणी आता शिकल्या आहेत. निरनिराळ्या प्रसंगी अनेक स्त्रिया सर्कशीतल्या सारखं भीतीच्या पेटत्या ज्वाळेच्या गोलातूनच सुखरूप बाहेर उडी मारताना दिसतात. जिवावरच्या, अब्रूच्या, आर्थिक कोंडीच्या प्रसंगातून बाहेर पडताना कमालीच्या हतबल झालेल्या अनेक स्त्रियाही दिसतात, पण त्या भीतीतून फिनिक्स पक्ष्यासारखी ऊर्जा घेऊन भरारी घेणाऱ्या या स्त्रियांची संख्या अल्प आहे, पण आहे. मनातली समाजाने लादलेली भीती आकाशात भिरकावून देऊन त्याचंच इंदधनुष्य बनवणाऱ्या स्त्रिया मी पाहिल्यात!

बऱ्याचदा आपण धीटपणाच्या ‘हुशारक्या’ मारत असलो, तरी स्त्रियांना कुठे एकटं राहायचा प्रसंग आला तर त्यांना वाटणारे भयकंप हे येथून तेथून सारखेच असतात. कामानिमित्त केरळला जाताना मन हरखलेलं असतं… पोलादपूर-खेड ते केरळ प्रवास करताना खिडकीतून दिसणारी एकेक फ्रेम निसर्गचिंतन, निसर्गपूजा करवते… केरळमधल्या एका गावात वयोवृद्ध क्लाराआंटी मला घ्यायला आलेली असते. तिच्याबरोबर राहून चार दिवस निसर्गाबरोबर ‘आरोग्य पर्यटन’ करताना ही एवढी वयस्कर बाई इतकी निर्भीडपणाने भारतभर फिरतेय, तर आपण निदान मंगळूर-भटकळ तरी पाहू. म्हणून मी मंगलोरला येते. भावाच्या सरकारी अधिकारी मित्राने राहण्याची उत्तम सोय केलेली असते. आजूबाजूला ‘एक्झिक्युटिव्ह’ मुली कामानिमित्त राहिलेल्या असतात. आदबशीर वागणारी माणसं असूनही मी रात्रभर टक्क जागी. मनात रामरक्षा! एकटं परक्या ठिकाणी धीटपणे राहणाऱ्या धन्य त्या क्लाराअंटी!

पर्यावरण चळवळीतील माझी एक मैत्रीण, मोना. मी त्या मैत्रिणीच्या घरात बसून तिला विचारलं होतं, ‘‘तू या निर्जन डोंगरावर कित्येक वर्षं एकटी राहतेयस. सोबतीला काही कुत्री आणि तुझ्या गायी. तुला भीती नाही वाटली कधी?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘माझ्या विचारसरणीशी मी प्रामाणिक आहे. मी कुठल्या प्रकारचं आयुष्य जगायचं, हे मीच ठरवलेलं आहे. मग जगाला घाबरायचं काय कारण? ज्या निसर्गाच्या सान्निध्यात मी ४० वर्षंराहाते आहे तोच निसर्ग, तोच चंद्र, सूर्य, तारे माझं वेळोवेळी रक्षण करत असतात.’’

भीतीच्या जाणिवेचे परस्पर विरोधी प्रसंग मात्र कुणालाही बुचकळ्यात टाकतील असे. लहानपणापासून मला आकाश पाळण्याची भीती वाटायची, अजूनही सरकत्या जिन्याची मला भीती वाटते. पण जिथे थ्रिल असेल, जिथे अन्यायाला वाचा फोडायची असेल किंवा एखाद्या विषयाचा वेध घ्यायचा असेल, तिथे अनोळखी ठिकाणांना भेट देतांना भीती वाटली नाही. परवाच एका मानसशास्त्राच्या पुस्तकात माइया पडताळण्याला किंवा अन्वयार्थाला दुजोरा मिळाला की, उत्कंठा, ध्येय आणि संकटावर मात यांचा रेटा प्रबळ असतो. तेव्हा भीती वाटत नाही. मनाचा कोपरा न् कोपरा त्या ध्येय प्रवासात अडथळ्यांची शर्यत जिंकण्याच्या जाणिवेने व्यापलेला असतो. म्हणजे भीती या भावनेला आत शिरायला जागाच नसते, पण सर्वकाळ थोडंच ध्येय आणि स्वप्नांच्या मागे धावायचं असतं?

एक प्रसंग आठवतोय, स्मृतिभ्रंशाने आजारी वडिलांना आम्ही जिवापाड जपत होतो. एकदा घरात ते झोपलेत म्हणून मी दुधाची पिशवी आणायला खाली उतरले आणि वर आले तो काय, ते खाली उतरून गेले होते. इकडेतिकडे कुठंच दिसेनात. भीतीने माझं पाणी पाणी झालं. जवळच राहणारे चंदिगडमधून नुकतेच आलेले एका मोठ्या हॉटेलचे मॅनेजर पटकन गाडी काढून माझ्या मदतीला धावले. आम्ही रस्त्यावरून त्यांना शोधत सुटलो. वेण्णा लेककडे जाणाऱ्या रस्त्यावर निसर्गाचा आनंद घेत ते मजेत चालत होते. त्यांना पाहून माझा बांध फुटला. निसर्गावर त्यांचं जिवापाड प्रेम होतं. तोच निसर्ग त्यांचं रक्षण करत होता. या प्रसंगी आपल्या नसानसांतून भीती रक्तदाबासारखी कशी वाहत असते, याचा मी अनुभव घेतला होता.

या सर्व भीतीदायक गोष्टी बऱ्यापैकी सौम्य वाटाव्या, अशी भीती मनात नोंदली गेली आहे. ही भीती एखाद्या डोहावर घट्ट दाट काळीमा पसरावा तशी आहे. ती आहे, आपल्या अत्यंत जवळच्या माणसाला दुरावण्याची भीती. रुग्णालयातले दिवस आठवत राहातात… सर्वांच्या थोड्याफार सारख्याच कथा… अभ्यासात, वागण्यात, परिपक्वतेत, परोपकारात अव्वल असणारं एखादं माणूस आपल्या कुटुंबात असतं, असं माणूस एखाद्या आजाराशी झुंज देत असतं. इतर भावंडं, नातेवाईक तो बरा व्हावा यासाठी जिवापाड धडपड करत असतात. डॉक्टरांच्या दिलासादायक भेटी होत असतात. या भेटीच्या दरम्यान कातर भीतीचा लंबक इकडून तिकडे हलत असतो. आज या माणसाची काळजी, उद्या दुसऱ्या माणसाच्या जगण्याची अनिश्चितता. या भीतीबरोबर इतर रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर काढलेले ते दिवस! ज्या माणसाला भरभरून जगायचं आहे तो अवघ्या कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जाणारा माणूस आजाराशी झुंज देत असतो. रुग्णालयातील वातावरण काळजाचे टवके उडवत असतं. आपल्या माणसाला आवडणारे रागदारीचे सूर ऐकू आले, जुनी हिंदी गाणी ऐकू आली, क्रिकेट कॉमेंट्री ऐकू आली, याच्यासारखा चहा कुणालाच करता येत नाही, असं त्यांचं कौतुक ऐकू आलं तरी काळजात चरचरतं, परिचारिका-डॉक्टरांच्या चर्चा मनाची सालपटं काढत असतात. डॉक्टर्स प्रयत्नांची प्रत्यंचा खेचत असतात. कोणीही किती धीर दिला तरी मन दुभंगून जात असतं. अशा व्यक्तीच्या जगण्याच्या अनिश्चतेतची जाणीव म्हणजेच परमोच्च भीती. ही भीती आपल्या आशेच्या किरणांना पाण्यात बुडवून जाते. राग, लोभ, दु:खाच्या पलीकडची शून्य, बधिर जाणीव देते. या जाणिवेचा स्पर्श गोठवणारा असतो.

आपलं धाकटं भावंड गमावण्याची भीती, मला भीतीचं विराट स्वरूप दाखवणारी वाटली. कृष्णाने अर्जुनाला आपलं विराट स्वरूप दाखवलं होतं म्हणतात, पण अशा भीतीच्या वेळी सामान्य माणसाला कोणतंही तत्त्वज्ञान उभारी देऊ शकत नसतं. माझं पूर्वीचं आयुष्य आणि या अनुभवांनंतरचं आयुष्य यात ही भीती दगडी रेघ मारून गेली…

Story img Loader