एके दिवशी एक पुरुष रुग्ण ‘मला मॅडमनाच भेटायचंय’ म्हणून आला. दिसायला नीटनेटका. मध्यमवर्गीय. त्याच्याविषयी शंका येण्याचं काही कारणच नव्हतं. साहजिकच डॉक्टर मॅडमनं त्याला डिस्पेन्सरीच्या आत बोलावलं. तिच्याबरोबर तिची सिस्टरही होतीच. त्याला तपासायला सुरुवात केली नि.. शिसारीच आली तिला..
एम.एस.जनरल सर्जरी या शाखेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर स्त्रिया संख्येने बऱ्याच कमी असतात. पूर्वी तर सर्जरी (शल्यचिकित्सालयशास्त्र), ऑर्थोपेडिक (अस्थिरोगशास्त्र) या शाखांना स्त्री डॉक्टर्स अजिबात जात नसत, पण अलीकडे मात्र या पुरुषीवर्चस्व असलेल्या शाखांमध्ये अभ्यास करणाऱ्या स्त्री डॉक्टरांचे प्रमाण जगातील सर्व देशांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे.
स्त्री सर्जन म्हणून प्रॅक्टिस करताना सुरुवातीपासूनच एक अनुभव लक्षात आला तो म्हणजे स्त्री रुग्ण लगेच स्त्री डॉक्टरकडे ओढल्या जातात. स्त्रियांना तब्येतीच्या तक्रारी विशेषत: अवघड जागेची दुखणी, पोटाचे विकार, स्तनांचे आजार वगरे गोष्टी सांगायला, दाखवायला पुरुष डॉक्टरकडे जायचा संकोच वाटतो; पण स्त्री डॉक्टरकडे मोकळेपणा वाटतो. ही मानसिकता स्त्रियांइतकी पुरुषांमध्ये आढळली नाही तरी सर्वसाधारणपणे मूळव्याध, हíनया, हायड्रोसिल या आजारांसाठी पुरुषरुग्णही पुरुष डॉक्टरला दाखवणंच जास्त पसंत करतात. यात वावगं वाटण्यासारखं काहीच नाही, पण माझ्या एका सर्जन मत्रिणीला तिच्या प्रॅक्टिसच्या पहिल्याच वर्षी एक विचित्र अनुभव आला.
एम. एस. पास झाल्या झाल्या ती एका छोटय़ा शहरात राहाण्यासाठी गेली, साहजिकच तिने प्रॅक्टिसही तिथे सुरू केली. तिचा नवरा आणि दीर दोघेही वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेतलेले. नवरा तर तिच्या प्रमाणेच सर्जन. एके दिवशी एक पुरुषरुग्ण ‘मला मॅडमनाच भेटायचंय’ म्हणून आला. दिसायला नीटनेटका. मध्यमवर्गीय. त्याच्याविषयी शंका येण्याचं काही कारणच नव्हतं. साहजिकच त्याला डिस्पेन्सरीच्या आत बोलावलं. तिच्याबरोबर तिची सिस्टरही होतीच. तिने त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर त्याला हायड्रोसिलचा (पुरुषी अंडकोषात झालेले पाणी) त्रास असल्याचे त्याने सांगितले. तिने त्याला तपासून पाहिलं. तिला कुठेही हायड्रोसिल लागेना. तिने ताबडतोब त्याला हायड्रोसिल नसल्याचे सांगितलेदेखील, पण त्याचं आपलं एकच पालुपद, ‘नाही मॅडम. एक बाजू मोठीच वाटते.’ तिने मनातल्या मनात तो ‘मानसिक रुग्ण’ असल्याचे लेबल लावून त्याला टेबलवरून खाली उतरायला सांगितलं. त्याच्या समाधानाकरिता काहीतरी गोळ्या लिहून देऊन त्याला पाठवून दिले. तिला वाटलं की आता सर्जननेच हायड्रोसिल नसल्याचे सांगितल्यावर तरी तो विषय तो डोक्यातून काढून टाकेल. पण छे, पंधरा दिवसांनंतर पुन्हा तीच व्यक्ती त्याच तक्रारी घेऊन तिच्यापुढे उभी! तुम्हालाच दाखवायचंय म्हणत. तिला आश्चर्य वाटलं. तिचा नवरा -एक पुरुष सर्जन त्याच वेळी तिथे उपलब्ध असताना हा पेशंट ‘मॅडमनाच दाखवायचं आहे’, असं का म्हणतोय. थोडय़ाशा नाराजीनेच तिने सिस्टरच्या उपस्थितीत त्याला पडद्यामागे टेबलवर झोपायला सांगितलं. पुन्हा तपासायला लागल्यावर तिच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तिने त्याला तपासायला हात लावल्यावर त्याला आतून खूपच बरं वाटतं आहे.. त्याचं मन, शरीर उद्दीपित होत आहे. त्याच्या शरीरात बदल होत असल्याचे त्याक्षणी तिने ताडलं. तेव्हा मात्र तिला शिसारीच आली. आपण डॉक्टर आहोत यापेक्षा आपण स्त्री आहोत, याचा फायदा घेतला जातोय या विचाराने ती अस्वस्थ झाली. तिने खणखणीत आवाजात त्याला खाली उतरायला सांगितलं आणि पुन्हा एकदा त्याला हायड्रोसिल नसल्याचं सांगितलं. वर हेही सांगितलं की परत दाखवायला येण्याची गरज नाही.
पण या घटनेने तिला खूप अस्वस्थ केलं. तिने ती सारी घटना नवऱ्याच्या कानावर घातली. दोनच तर महिने झाले होते ते दोघे एकत्र राहायला लागून- त्याआधी तर ती एम. एस. करताना दुसऱ्याच शहरात होती. इथला अनुभव घेणं सुरू होतं. पुढे एखादा महिना गेला असेल मध्ये. पुन्हा तोच रुग्ण आणि पुन्हा मॅडमना दाखविण्याचा हट्ट धरून दवाखान्यात हजर. तेव्हा मात्र तिने त्याला स्पष्ट बजावलं, ‘‘तुमचा काय त्रास आहे तो तुम्ही आज सरांनाच दाखवा. मी तर तुम्हाला कधीच सांगितलं आहे तुम्हाला हायड्रोसिल नाही. मी तपासणार नाही,’’ तिने स्पष्टपणे सांगितले. त्यावर लोचटासारखं तो म्हणाला, ‘‘आज शेवटचं तपासून सांगा ना प्लीज. मला खरंच एक बाजू सारखी मोठी वाटते. प्लीज मॅडम. मी पुन्हा नाही येणार.’’ असं म्हणून तो गयावया करायला लागला. तेव्हा नाइलाजाने तिने त्याला आत घेतलं. तपासल्यासारखं केलं. तर पुन्हा त्याच्या डोळ्याला तेच भाव दिसू लागले तेव्हा मात्र तिने ताबडतोब त्याला खाली उतरवलं आणि मनोमन निश्चय केला या माणसाला यापुढे मी अजिबात तपासणार नाही. काय व्हायचं ते भांडण होऊ दे हॉस्पिटलमध्ये. मी याला हाकलणार आता आला तर. हात धुऊन ती खुर्चीत बसली आणि तिने त्याला सुनावले, ‘‘यापुढे मला दाखवायला यायचं नाही. तुम्हाला तीच तीच गोष्ट सांगून कळत नसेल तर मानसोपचारतज्ज्ञाकडे जा. या कारणासाठी आलात तर दारातही उभं करणार नाही मी तुम्हाला.’’ तिची ही धमकी एकून तो निर्लज्ज माणूस गेला एकदाचा.
पण शोकांतिका पुढेच होती..
तिने बोलता बोलता ही गोष्ट नवऱ्याला व दिराला सांगितली व त्याला पुन्हा न तपासण्याचा तिचा निर्णय ऐकवला. तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, ‘‘अगं, तुला काय फरक पडतो त्याला काय वाटतं त्याचा. जोपर्यंत तुझी कन्सिल्टग फी भरून तो तुला दाखवतो आहे व तुला काही वावगं करीत नाही. तोपर्यंत तुझं काय जातं त्याला तपासायला?’’
तिचा संताप संताप झाला ‘‘तो पुन्हा आल्यास आम्ही त्याचा चांगला समाचार घेऊ. तू त्याला बिनधास्तपणे नाही सांग, अशी दिलासा देणारी प्रतिक्रिया का नाही आली त्यांच्याकडून, प्रत्यक्ष नवऱ्याकडूनही, या विचाराने ती अस्वस्थ झाली. कमाल म्हणजे त्या दिवसानंतरसुद्धा तो विकृत माणूस पुन्हा तिच्याकडे येत राहिलाच. पण तिने बाहेरच्या सर्व स्टाफला पटवून पढवून ठेवल्यामुळे मॅडम या आजाराचे पेशंट बघतच नाहीत, असे उत्तर तीन-चार वेळा ऐकल्यावर तो येइनासा झाला.
या घटनेला बरीच वर्षे झाली तरी ती घटना आजही तितकीच ठसठशीत मनात अडकून राहिली आहे. नाइलाजास्तव एकच विचार येतो मनात, डॉक्टरांनासुद्धा?
‘डॉक्टर मॅडमच हव्यात तपासायला’
एके दिवशी एक पुरुष रुग्ण ‘मला मॅडमनाच भेटायचंय’ म्हणून आला. दिसायला नीटनेटका. मध्यमवर्गीय. त्याच्याविषयी शंका येण्याचं काही कारणच नव्हतं. साहजिकच डॉक्टर मॅडमनं त्याला डिस्पेन्सरीच्या आत बोलावलं. तिच्याबरोबर तिची सिस्टरही होतीच. त्याला तपासायला सुरुवात केली नि.. शिसारीच आली तिला..
आणखी वाचा
First published on: 19-01-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female doctor male patient exam