प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com
फॅशन उद्योगानं आपल्या नकळत आपल्या जगण्याचा कितीतरी मोठा भाग व्यापला आहे. अतिप्रचंड जागतिक आर्थिक उलाढाल असलेलं आणि स्त्रिया याच प्रमुख ग्राहकवर्ग असलेलं हे क्षेत्र. फॅशन क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण मोठं असूनही यातील बलाढय़ उद्योगसमूहांच्या उच्च पदांवर असलेल्या स्त्रियांची संख्या मात्र कमीच आहे. एकीकडे ही स्थिती असताना अनेक स्त्रियांनी या क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडून आपला एक वेगळा दृष्टिकोन या उद्योगात समाविष्ट करण्याचा प्रयत्न के ला आहे. फॅ शनला नव्या आयामांची ओळख करून देणाऱ्या अशा काही स्त्रियांविषयी..
गेले ८-९ महिने घरी राहिल्यावर माझी मैत्रीण सुप्रियाला प्रवासाची संधी चालून आली. दरवर्षी किमान एक परदेशी आणि किमान दोन भारतातील ठिकाणं बघायला जाणारच ही. ‘वाँडरलस्ट’ म्हणतात ना, तशी. एवढय़ा दिवसांच्या टाळेबंदीनंतर बाहेर पडायला मिळतंय म्हणून भलतीच खूश होती. तिनं मला फोन लावला. ‘‘चल!’’ ती उत्साहात म्हणाली.
मॉल्ससुद्धा सुरू झाली होती. तिला तिच्या दौऱ्यासाठी काही कपडे विकत घ्यायचे होते. कपडे खरेदीसाठी माझा उत्साह फारतर अर्धा तास टिकू शकतो. शक्य झालं तर स्वत:साठी कपडेही कोणी दुसऱ्यानं विकत आणले तर मला आवडेलच, पण परवडणार मात्र नाही. केवळ आणि केवळ म्हणून मी स्वत: खरेदी करायला जाऊ लागले आहे. ‘स्वस्त, सुंदर, टिकाऊ’ हे माझं ब्रिदवाक्य. पण सुप्रिया तशी नाही. सध्या कोणत्या ब्रँडचे, कशा प्रकारचे कपडे ‘इन’ आहेत हे तिला नेमकं माहीत असतं. कुठे कसं जावं, आपल्याला साधारण कशा प्रकारचा पोषाख चांगला दिसतो, तेही तिला माहीत असतं. ज्याला ‘फॅशन अंॅंड ब्रँड काँशियस’ म्हणू ना, तशी ती! अशा अनेक सुप्रियांच्या निवडीवर परिणाम करणारी ही अब्जावधींची उलाढाल असणारी ‘फॅशन इंडस्ट्री’.
काही तज्ज्ञांच्या मतानुसार या उद्योगामध्ये जगभरात एका वर्षांत चौदा लाख कोटी डॉलर्सची उलाढाल दरवर्षी होते. हो, दरवर्षी! अशिया खंडात या बाजारपेठेचा आवाका प्रचंड वाढतो आहे आणि भारतात या बाजारपेठेचा जवळजवळ २० टक्के भाग येतो असं म्हटलं जातं. फॅशन इंडस्ट्री म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर फक्त रँपवर चालणाऱ्या मॉडेल्स, त्यांचे आपल्याला कधीही न घालता येणारे असे कपडे आणि ते कपडे तयार करणारे डिझायनर्स हे येतं. पण हा उद्योग केवळ मॉडेल्स आणि डिझायनर्सपुरताच मर्यादित नाही. यामध्ये अनेक शिंपी, कारागीर, छायाचित्रकार, पत्रकार आणि अशा अनेक लोकांचा समावेश आहे, की जे कधी आपल्यासमोर येणारही नाहीत.
माणसानं जेव्हा कपडे घालायला सुरुवात केली तेव्हापासूनच फॅशनला सुरुवात झाली असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. पण कोण्या एखाद्या डिझायनरनं आपलं ‘लेबल’ लावून तयार कपडे विकण्याची सुरुवात साधारण एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात झाली. त्याच्या आधी कापड आणून प्रत्येकाच्या मापानुसार कपडे हे शिंप्याकडूनच शिवून घेतले जायचे. फ्रान्समधल्या अमीर उमरावांमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून शिवणकाम करणाऱ्या कोण्या एका खास स्त्रीकडून कपडे शिवणं सुरू झालं. ते बघून मग त्यासारखे कपडे अनेक ठिकाणी दिसू लागले. १७९२ पर्यंत फ्रान्सची राणी मारी अंतुआनेत हिच्या पोशाखांची पद्धत ही त्या काळच्या शिलाईकामावर खूप प्रभाव टाकायची. ती आणि तिच्यासाठी शिलाई करणारी रोझ बर्टीन या तिच्या सलॉनमध्ये तिच्या पोशाखांवर तासन्तास काम करत असायच्या. असं म्हणतात की तिचे पोशाख हे दिसायला तर चांगले असायचेच पण ज्या खास बैठकांसाठी ती विशेष पेहराव करायची, त्यामागे काही खास हेतू असायचा. फ्रें च राज्यक्रांतीनंतर फ्रान्समधली राजेशाही संपुष्टात आली. मारी अंतुआनेतचा शिरच्छेद करण्यात आला. तिच्यासाठी शिलाई करणाऱ्या रोझनं लंडनमध्ये आश्रय घेतला. पण पॅरिसची ओळख जगाचं ‘फॅशन कॅपिटल’ अर्थात फॅ शनची राजधानी म्हणून तयार झाली ती तेव्हापासूनच. एकोणिसाव्या शतकात युरोपात आणि चीनमध्येही स्त्रीच्या शरीराला त्या-त्या काळात ज्या प्रकारच्या पोषाखाची चलती आहे, त्याच्या आकारात बसवण्याचा आटापिटा सुरू झाला. यातून कं बर आणि पोट आवळून ते बारीक दिसेल असे कॉर्सेट्स आणि पावलं घट्ट बांधून ती लहान करणारे बूट जन्माला आले.
‘द कौन्सिल ऑफ फॅशन डिझायनर्स ऑफ अमेरिका’नं (सीएफडीए) २०१६ मध्ये युरोप आणि अमेरिकेतील या क्षेत्राचा आढावा घेतला. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार या उद्योगात तयार होणाऱ्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक वस्तूंचा ग्राहकवर्ग हा स्त्रियांचा आहे. फॅशन या विषयाचं शिक्षण घेण्यामध्ये स्त्रियांची संख्या खूपच मोठी दिसते. ‘न्यूयॉर्क फॅशन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये शिक्षण घेणाऱ्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण ८५ टक्क्यांपेक्षा खाली कधीही गेलं नाही. पण इतर क्षेत्रांत दिसतं त्याप्रमाणेच, ग्राहकवर्ग स्त्रियांचा असूनही उच्च पदांवर स्त्रियांचं प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. २०१५ मध्ये ‘बिझनेस ऑफ फॅशन’ नावाने एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये ५० सर्वात बलाढय़ अशा या व्यवसायात असलेल्या उद्योगसमूहांमध्ये उच्च पदांवर स्त्रियांचा सहभाग, वेतनातील फरक अशी आकडेवारी गोळा करण्यात आली. यात असं लक्षात आलं, की या ५० उद्योगसमूहांपैकी केवळ ७ समूहांच्या सर्वोच्च पदांवर स्त्रिया आहेत.
स्त्रियांच्या पेहरावात मोठा बदल झाला तो पहिल्या महायुद्धादरम्यान. घरातल्या पुरुषांना सैन्यात जाणं भाग पडल्यामुळे स्त्रिया अर्थार्जनासाठी बाहेर पडू लागल्या. त्या वेळचा स्त्रियांचा पोषाख हा बाहेर जाऊन काम करण्यासाठी योग्य नव्हता. यामुळे युरोपात बाहेर वावरायला योग्य असे कपडे तयार व्हायला लागले. यामध्ये पायघोळ झग्यांच्या जागी गुडघ्यापर्यंत स्कर्ट आला, बाह्य़ांचा आकार आणि घोळ कमी झाला. अर्थात अंतर्वस्त्रंही बदलली. जीवघेणं कॉर्सेट जाऊन अधिक सुटसुटीत बनली. रंगीबेरंगी कपडय़ांचा वापर कमी होऊन एकाच आणि शक्यतो गडद रंगांचे कपडे वापरायची पद्धत सुरू झाली. कपडय़ांबरोबर केशभूषांमध्येही बराच फरक पडला. भारतातही सलवार कमीजचा इतका प्रचार होण्याचं कारण होतं स्वातंत्र्यलढा. थॉमस वेबर या लेखकानं गांधी, गांधीवाद आणि गांधीवादी या विषयावर विस्तृत लिखाण केलं आहे. सत्याग्रहात स्त्रियांच्या सहभागाबद्दल लिहिताना त्यांनी सलवार-कमीजचं वर्णन ‘सत्याग्रहींचा अधिकृत पोषाख’ असं केलं आहे.
पहिल्या महायुद्धानंतर स्त्रियांसाठी मोकळेढाकळे, सहज घालता येण्याजोगे पोशाख तयार केले ते कोको शनेल या फ्रे ंच डिझायनरनं. १८८३ च्या स्युमुर, फ्रान्समध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या गाब्रिएला बॉनहर शनेल हिचं बालपण इतरांच्यापेक्षा वेगळं होतं. तिच्या वयाच्या १२ व्या वर्षी आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी तिला अनाथाश्रमात सोडलं. छोटय़ा गाब्रिएलाला तिथल्या नन्सनी लहानाचं मोठं केलं. त्यांनीच तिला शिवणकामाचे धडे दिले. या धडय़ांनी पुढे तिचं आयुष्य घडवलं. तरुणपणी तिनं अनेक ठिकाणी गायिकेचं काम स्वीकारलं. तिथे ती वेगवेगळ्या क्लब्जमध्ये गात असे. तिथेच तिचं नाव ‘कोको’ पडलं. वयाच्या विसाव्या वर्षी कोकोनं तिच्या धनाढय़ मित्रपरिवाराच्या मदतीनं स्वत:चं दुकान थाटलं. सुरुवातीला त्यांनी केवळ हॅट्स विकायला ठेवल्या आणि हळूहळू स्त्रियांच्या इतर पोषाखांकडे आपला मोर्चा वळवला. पहिल्याच काही वर्षांंत त्यांनी ३-४ ठिकाणी स्वतंत्र दुकानं उघडली होती. १९२० मध्ये होजिअरी या कापडाच्या प्रकारापासून त्यांनी तयार केलेला ड्रेस भलताच यशस्वी झाला. हे कापड आधी केवळ अंतर्वस्त्रांसाठी वापरलं जायचं. पण कोको यांनी फ्रान्सच्या थंडीशी सामना करायला हे कापड वापरलं आणि लोकांच्या ते भलतंच पसंतीस पडलं. त्यानंतर त्यांनी परफ्यूम्सही तयार केले. ‘शनेल नं. ५’ हे त्यांचं परफ्यूम आजही अनेकांना हवंहवंसं वाटतं. कोको कायम म्हणत, की चैन म्हणून घेतलेले पोषाख हे आरामदायी असायलाच हवेत. गैरसोयीच्या कपडय़ांमध्ये चैन ती कसली! परदेशात पूर्वी केवळ दुखवटय़ाच्या वेळी घातल्या जाणाऱ्या काळ्या पोशाखाला त्यांनी नवं रूप दिलं. आजही हा त्यांचा ‘लिटिल ब्लॅक ड्रेस’ अनेक पाश्चिमात्य स्त्रियांसाठी आपल्या संग्रही हवाच, असा एक प्रकार आहे. ‘टाइम’ मासिकानं कोको शनेल यांचं नाव शतकातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नोंदवलं आहे. या यादीतल्या त्या एकमेव फॅशन डिझायनर आहेत.
कोणी कधी काय पोशाख केला, याच्या पलीकडे जाऊन त्या क्षेत्रामध्ये आपलं प्रचंड प्रभावक्षेत्र निर्माण करणाऱ्या ७१ वर्षांंच्या अॅना विंतूर. १९८८ पासून ‘व्होग’च्या संपादक असलेल्या विंतूर यांनी त्यांच्या कार्यकाळात या मासिकाचा चेहरामोहराच बदलून टाकला. या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवीन डिझायनर्सना संधी दिली आहे. जगभरात चालू असणारे कोणते ट्रेंड्स लोकांच्या पसंतीला उतरतील याची त्यांना चांगली जाण होती. याबरोबरच कोणत्या प्रकारच्या पोशाखांना, स्टाइल्सना प्रोत्साहन द्यावं याचीही सूत्रं जणू त्यांच्या हातात आहेत. ‘व्होग’ मासिकात एखादी गोष्ट आली म्हणजे त्याला मान्यताच मिळाली असं समजलं जातं. दरवर्षी हे मासिक न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन संग्रहालयासाठी निधी उभा करण्याच्या उद्देशानं ‘मेट गाला’चं आयोजनही करतं. या कार्यक्रमात जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आपली उपस्थिती नोंदवतात. फॅशन जगतात या कार्यक्रमाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे.
कोणत्याही गोष्टीची छबी लोकांच्या मनात पक्की करून ठेवण्यासाठी आणि त्याचं रूपांतर मग लोकांच्या निवडीमध्ये होण्यासाठी छायाचित्रं महत्त्वाची भूमिका पार पाडतात. फॅशनचं जग अशा छायाचित्रकारांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. या छायाचित्रकारांमध्ये अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे अॅनी लिबोवित्स. लिबोवित्स या खरंतर ‘पोट्र्रेट फोटोग्राफर’. त्यांनी ‘व्होग’ मासिकाच्या मुखपृष्ठासाठी अनेक छायाचित्रं दिली आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये ‘व्होग’च्या ‘कव्हर’वरील सिमॉन बाईल्स या अमेरिकन जिम्नॅस्टचा फोटो खूपच गाजला. त्यावर अनेकांनी टीकाही केली. काही वर्षांंपूर्वी ‘व्हॅनिटी फेअर’ मासिकाच्या मुखपृष्ठावरील टेनिसपटू सेरेना विल्यम्सचं छायाचित्र खूप गाजलं. सेरेनाला जेव्हा ती गरोदर असल्याचं कळलं, तेव्हा ती ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ सामन्यांसाठी तयारी करत होती. ती जेव्हा ही स्पर्धा जिंकली, तेव्हा आपण गरोदर असल्याचं तिनं जाहीर केलं. या घटनेला अजरामर करण्यासाठी काढलेलं तिचं न्यूड पोट्र्रेट खूपच बोलकं होतं.
फॅशन उद्योगावर टीका होते ती स्त्रियांच्या मनात स्वत:च्या शरीराबद्दल न्यूनगंडाची भावना जागृत करण्याबद्दल किंवा सौंदर्याच्या नाहक कल्पना बिंबवण्याबद्दल. एखाद्या आदर्श मापामध्ये बसवण्याची धडपड न करता भारतात सर्व मापांमध्ये कपडे तयार करण्याची सुरुवात डिझायनर अनिता डोंगरे यांनी केली. मुळात एखाद्या पोशाखात तुम्ही कसे दिसता, हे तपासण्यापेक्षा तुम्ही तो परिधान केल्यावर तुम्हाला कसं वाटतं हे महत्त्वाचं असतं. एखाद्या कपडय़ात तुम्ही मासिकातील मॉडेलप्रमाणे दिसण्यापेक्षा त्यात तुमचं व्यक्तिमत्त्व उठून दिसणं गरजेचं आहे, असं त्या म्हणतात. अशाच विचारानं मसाबा गुप्ता हिनं तिचा ‘हाऊस ऑफ मसाबा’ हा ब्रँड सुरू केला आहे. फॅशन उद्योगावर लोकांची उपभोगी वृत्ती वाढीस लावण्याबद्दलही टीका केली जाते. त्याला उत्तर म्हणून सध्या अनेक ब्रँडस् टाकाऊ कापडापासून तयार केलेले कपडे बाजारात आणत आहेत.
काही वर्षांंपूर्वी मी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता तेव्हा मला रितू बेरी या डिझायनरनं लिहिलेलं एक पुस्तक भेट मिळालं होतं, ‘१०१ वेज टू लूक युवर बेस्ट’ या नावाचं. तुमच्याकडे एक निळी जीन्स आणि एक पांढरा शर्ट हे हवंच, त्याबरोबर काही प्लेन ड्रेसही हवेत, म्हणजे प्रसंगानुरूप तुम्ही ते ‘स्टाइल’ म्हणून, ‘मिक्स मॅच’ म्हणून वापरू शकता. अशा काही ‘टिप्स’ देणाऱ्या या पुस्तकातलं एक वाक्य मला फार आवडलं. त्यात रितू बेरी म्हणतात, की तुम्ही कितीही चांगले, उंची कपडे, दागिने घातले, तरी जोपर्यंत तुम्ही जसे आहात तसे दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही कधीच चांगल्या दिसू शकणार नाही!
वैचारिक, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्याइतकंच एखादीचं कपडे निवडीचं, ‘स्टाइल’चं, ती स्टाइल नाकारण्याचं स्वातंत्र्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. दुसऱ्या कोणासारखं दिसण्यापेक्षा आपलं स्वत:चं व्यक्तित्व खुलवेल तीच आपली फॅशन!