देव मानावा का ? कुळाचार जपावे का? का हा ज्याचा त्याचा प्रश्न. पूर्वीचे सणसमारंभ, रीतीभाती, परंपरा या त्या काळच्या समाजाला एक बांधीव स्वरूप देण्यासाठी पूर्वजांनी निर्माण केल्या. प्रत्येकामागे निश्चित असा वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्वजांनी ठेवला असणारच, परंतु तो दृष्टिकोन नंतरच्या पिढय़ांना फारसा कुणी शिकवला नाही. रीतीभाती, परंपरांना पापपुण्याच्या कल्पना चिकटवून समाजाला फक्त धाक दाखवला गेला. तो धाक पिढय़ान्पिढय़ा ‘पोसलाही’ गेला. मग एखादा पुरुष, एखादी स्त्री तो वैज्ञानिक दृष्टिकोन शोधायला गेली तर समूहाबाहेर टाकली जाऊ लागली.. आजच्या बदलत्या काळात यात बदल नको का व्हायला की आपण आजही पारंपरिक विचारांचाच पिंगा घालत राहणार?
डॉक्टर होता होता लग्नाला झालेला उशीर तिच्या जरा पथ्यावरच पडला होता. कारण ‘टेस्ट टय़ूब बेबी’वरचा पेपर जरा वेळ काढूनच लिहायचा होता, पण दरम्यान लग्न झालं. त्याचा कैफ उतरतोय तोच हॉस्पिटलला रुजू होण्याचा दिवसही उगवला. त्यालाही पंधरा दिवस झालेच. आजची केसही जरा दमछाक करणारीच होती. बाळबाळंतीण सुखरूप सुटले हा परमोच्च आनंद होता. त्या आनंदातच घरात पाऊल टाकले.. प्रचंड भूक लागली होती. सासूबाईंनी रोखलंच.. ‘‘आज बराच उशीर झाला ना?’
‘हो ना.. जरा अवघड केस होती.. पण सुटलो सगळे,’ असं म्हणत तिनं वाढून घ्यायला सुरुवात केली.. सासूबाईसमोर बसून गप्पा मारायला लागल्या..
‘मंगळागौरीचं काय करूया, वेळ मिळेल ना!’
‘करायलाच हवी का’ हा मनातला विचार गिळून ती म्हणाली, ‘बघूया, आत्ताच जॉइन झालेय ना लगेच रजा टाकता येणार नाही, पण पाहू..’
‘पाहू नको.. नक्की ठरवू! अगं.. कराव्या लागतात या गोष्टी.. काम काय रोजचंच आहे. त्यातूनच वेळ काढायचा.. जरा सगळय़ांचीच हौसमौज.’ तिनं चमकून वर पाहिलं. पुढचं जेवण बेचव वाटायला लागलं. इतक्या वेळचा क्षीण एकदम जास्तच वाटायला लागला. ती उठलीच.. हात धुऊन सासूबाईंना म्हणाली, ‘पडते जरा.. सहा वाजता राऊंड आहे.’
रीतीभाती, कर्मकांड यांची सरमिसळ करून संस्कृतीच्या आवरणात घट्ट बांधलेले भलेमोठे गुंतवडे तिच्या डोळय़ांसमोर नाचायला लागले आणि तिची झोप उडाली. आपण सध्याच्या सीरिअलमधली रोजच्या रोज घरात भरजरी साडी नेसलेली, अंगभर दागिने घालणारी एक सून आहोत, असं तिला क्षणभर वाटून गेलं..
आणखी एक प्राध्यापक. केमिस्ट्रीची.. या वर्षी रिझल्ट मनासारखा लागला नाही म्हणून प्रिन्सिपॉलसाहेबांनी सकाळीच भलंमोठं ‘प्रवचन’ दिलेलं.. मुख्यत: तिलाच! संध्याकाळी घरी आली ती काही तरी ठरवूनच. गेले ६ महिने काहींना काही घरात समारंभ निघाल्यानं बऱ्याच रजा झाल्या होत्या. सासूबाईंचे टोमणे नकोत म्हणून कुतरओढ करून दोन्ही आघाडय़ा सांभाळताना आजारी पडायची वेळ आलेली होती. घरात पाऊल टाकलं आणि सासूबाई कडाडल्या, ‘अगं, काल वन्संची ओटी भरायची राहूनच गेली की?’ तिला समजेना एकदम असं काय आभाळ कोसळलं ते. त्या तोच विषय रेटत म्हणाल्या, ‘आता याच्याही चर्चा होतील.. तिच्या सासूबाई.. जाऊबाई.. तू नाही का लक्षात ठेवायचंस? असं कसं विसरलीस..’ तिनं डोक्याला हात लावलाच.. म्हणजे गेले सहा महिने काही ना काही कर्मकांडातून झालेले कष्ट, आपल्या प्रोफेसरकीचा उद्धार आणि आलेलं नैराश्य.. याचं फलित कुठूनही सकारात्मक न निघता या एका ‘ओटी’ प्रकरणामुळे अगदी गाळातच निघालं म्हणायचं.. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल.. याला घाबरा, त्याला घाबरा असं करत करत सगळं रेटत राहायचं. हे असं किती दिवस? एवढं करून समाधान नाहीच. काही तरी फुसकट राहतंच..’ तिचं तोंड एकदम कडवटच होऊन गेलं.
या दोघींची अवस्था पाहून नुकत्याच एका प्रसंगाची आठवण झाली.. एका लग्नासाठी जमलो होते. अर्थ माहीत नसलेले काही विधी यथासांग चालले होते. नवरा-नवरी कंटाळून गेले होते. औक्षणाची वेळ आली. मुलीच्या आईनं औक्षण करायला घेतलं, तेवढय़ात एक ज्येष्ठ बाई मोठय़ानं म्हणाल्या, ‘अहो, तबकात खडय़ाची अंगठी नको. साधी ठेवा.’ मग सूचनांचा भडिमार सुरू.. ‘सुपारी, अंगठी उजवीकडून की डावीकडून? आधी हळद की आधी कुंकू? सूचना करणारा एक कंपूच तयार होता.. ओटीच्या नारळाचं तोंड कुठे? पायावर आधी दूध की पाणी.. एक ना अनेक..
हे पाहताना विचार आला, यातल्या एकाला तरी हे सगळं का आणि कशासाठी करायचं हे माहीत आहे का? आगाऊपणे एकीला विचारलंही, तिनं कसानुसा चेहरा केल्यावर मग दुसरीला विचारायची हिंमत झालीच नाही. रीतीभाती-लग्नकार्यातले विधी, कधीही एकमत न होणाऱ्या व्रतवैकल्यातल्या गोष्टी आणि सर्वात शेवटी चाललेली कर्मकांडं, सध्याच्या काळात या सगळय़ाला आलेलं उत्सवी स्वरूप.. हे सगळं प्रचंड गोंधळात टाकणारं आहे. बरं हे सारं यथासांग करणारी मंडळी आपापल्या सोयीप्रमाणे ती कर्मकांडं बदलत राहतात. आणि समोरच्याला मात्र त्यातला अट्टहास समजावून (धमकावून )सांगतात.
आत्ताच्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये नोकरीच्या तऱ्हाही बदलत्या आहेत. डॉक्टर, इंजिनीयर, वकिली टी.व्ही., रेडिओ, पत्रकारिता, अगदी कन्स्ट्रक्शन, विविध छोटे-मोठे उद्योग, वेळी-अवेळी तुमची उपस्थिती आवश्यक असणाऱ्या या गोष्टी आहेत. एका पिढीमागेही ‘नोकरी करणं’ म्हणजे सकाळी दहा ते पाच असंच होतं. परंतु झपाटय़ानं बदलणाऱ्या या जगात नोकरीचे प्रकारही झपाटय़ानं बदलतायत. मग आपणही यामागच्या मळलेल्या वाटा आता बदलायला हव्यात, असं वारंवार वाटतं. या सगळय़ा रीतीभाती, सण-समारंभ, व्रतवैकल्य, उपास-तापास अगदी पूर्वीच्या पद्धतीने अगदी तसेच्या तसेच केले तरच आपली संस्कृती टिकून राहील, असं खरंच आहे का? मुलगा व्हावा म्हणून एकीच्या सासूने तिला कडक सोमवार पाळायला सांगितले होते. इतके कडक की तब्येतीवर परिणाम होऊन तिला बिछानाच पकडावा लागला. चांगला नवरा मिळावा, चांगलं घर मिळावं, मुलगा व्हावा, धनधान्य, वैभव मिळावं म्हणून व्रतवैकल्य करणं आणि कडक उपास करणं हे आजही कित्येक आई आणि सासू यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं आहे. आणि ते केले नाहीत तर त्यांना ते ते मिळणारच नाही, अशी सोयीस्कर समजूत घालून आजही अनेक तरुणींवर ते लादलं जातंय.
अनेकदा तर त्यांचं थोतांडही माजवलं जातंय. आमच्या ओळखीत एक ७० वर्षांचे आजोबा आहेत. अंघोळ झाली की शेवटचा तांब्याभर पाणी त्यांच्या पत्नीनं त्यांच्या अंगावर घालायचं, असा वर्षांनुर्वषाचा रिवाज. ‘अहो या,’ अशी पतीची हाक ऐकली की त्या आजी बाथरूममध्ये जातात आणि त्यांच्या अंगावर तांब्याभर पाणी टाकतात आणि अंगावरून निथळलेलं पाणी ‘तीर्थ’ म्हणून प्राशन करतात. ना त्यांनी कधी प्रश्न विचारला ना त्यांना कधी उत्तर अपेक्षित धरलं.
संस्कृती टिकवण्यासाठी सुसंस्कृत विचारसरणी आवश्यक आहे. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांमध्ये सुसंवाद असणं आणि सोयीप्रमाणं आपल्या कुटुंबाची रचना ठेवणं हे जास्त आवश्यक आहे. अन्यथा सण-समारंभांमध्ये उत्सवी स्वरूप, पैशाचा देखावा हे प्रामुख्यानं दिसतं. एकानं केलं की इतरांमध्ये तसं करण्याची स्पर्धा जास्त दिसते. ‘लग्न’ या प्रकारात तर सध्या साधेपणा म्हणजे कोणतं तरी पाप असण्यासारखं पिसाटासारखे खर्च होताना दिसतात. पूर्वीच्या मंगळागौरीच्या खेळातला ‘पिंगा’ हा खेळ आठवतो. तिथल्या तिथेच सारखं घुमत राहायचं! रीतीभाती, अंधश्रद्धा, अंधविश्वास यांना आपलं आपणच आम्ही बांधून घेतलं आहे. आणि तिथेच घुमतोय सारखे.. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई पिंगा.. कुणी डोळसपणानं पुढे जात असेल तर त्याला टोमणे मारून मारून मागे ओढायचं आणि घ्यायचं या खेळात पुन्हा घुमायला. आणि आसुरी आनंदानं पुन्हा त्या दिशाहीन, परंपरांचा पिंगा घालायला लावायचं. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई पिंगा..
पूर्वीचे सण-समारंभ, रीतीभाती, परंपरा या त्या काळच्या समाजाला एक बांधीव स्वरूप देण्यासाठी पूर्वजांनी निर्माण केल्या. कुठे तरी शिस्तीनं देवाच्या का होईना, पण धाकाने माणसानं मर्यादेबाहेर कृती करू नये म्हणून ही एक रचना होती.. रीतीभाती, परंपरा, प्रत्येक सण-समारंभ यांच्यामागे निश्चित असा वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्वजांनी ठेवला असणार हे मला पटतं. त्यामध्ये निसर्गाचा, आहाराचा स्त्री पुरुष शरीररचनेचा विचार केलेलाच आहे. म्हणजे संक्रातीला तिळगूळ खाणं (थंडीत) पाडव्याचे, दिवाळीचे, खास पदार्थ, डोहाळ जेवणासाठी हिरवी साडी (हिरव्या रंगाचा वापर).. हे सगळं पूर्वजांनी विचारपूर्वक केलेलंच असणार. परंतु आम्हाला त्याबद्दलचा वैज्ञानिक दृष्टिकोन कुणीही दिला नाही. त्या रीतीभाती, परंपरांना पाप-पुण्याच्या कल्पना चिकटवून समाजाला फक्त धाक दाखवला गेला. तो धाक पिढय़ान्पिढय़ा ‘पोसलाही’ गेला. मग एखादा पुरुष एखादी स्त्री तो वैज्ञानिक दृष्टिकोन शोधायला गेली तर समूहाबाहेर टाकली जाऊ लागली. कारण प्रत्येकच रूढी-परंपरामागे वैज्ञानिक कारण असतंच असं नाही. मंगळागौरीची कहाणी, साधुवाण्याची गोष्ट कितीही विश्वास ठेवायचा म्हटलं तरी पटू शकत नाही, हेही माझ्यासाठी निखळ सत्यच.
एकविसाव्या शतकातल्या शिक्षणानं स्त्रिया निराळा विचार करायला लागल्या आहेत. त्यांना अनेक रूढी-परंपरांबद्दल प्रश्न पडू लागले आहेत, त्यामागची कारणं शोधताना ‘रॅशनल थिंकिंगच्या दिशेनं कृतीही घडतेय.. पण घरातील अनेक ज्येष्ठांच्या ते पचनी पडत नाही आणि इथंच खरी ठिणगी पडतेय..
आत्ताच्या अनेक स्त्रिया मोठमोठय़ा पदांवर नोकऱ्या करतात, त्यांना देवाधर्माच्या, सणा-समारंभाच्या अनेक गोष्टी आवडतातही. हौसेनं कष्टांत वेळात वेळ काढून त्या ते सगळं पार पाडतातही. परंतु एखादे वेळी सण-समारंभ आणि त्यांच्या कामाची गरज याचा ताळमेळ जुळत नाही. मग तडफड, चिडचिड, नाराजी आणि मग तिला ‘कशाचं काहीच नाही’ हे शिक्के मारणं.. अशा वेळी घरातल्या सर्वानी मोठय़ा मनानं तिचे व्यवहार समजून घ्यावेत असं वाटतं. तिची कामाची तऱ्हा, तिच्या नोकरीचा प्रकार, जाण्या-येण्याची साधनं, त्यासाठी लागणारा वेळ हे जरूर विचारात घ्यायला हवं! माझ्या माहितीत एक कुटुंब आहे. खरोखरच सर्वानीच त्यांचा आदर्श घ्यावा. श्रीमंत, एकत्र कुटुंब. सगळे कुळाचार, परंपरा कसोशीनं पाळतात. घरातली सून कुटुंब न्यायालयात वकील म्हणून काम करते. आता तिथलं काम म्हणजे मुख्यत: घटस्फोट, पोटगी आदी हळवे विषय असलेलं काम. घरातले कुळाचार, धार्मिक समारंभ, गौरी, गणपती, नवरात्र हे सण बरेच दिवस चालणारे. तिचं कामही तसंच.. यांचा कसा मेळ बसवायचा? परंतु तिच्या सासूबाईंनी तिला पूर्णपणे मोकळीक दिलेली आहे. जमेल तितकं, जमेल तेव्हा आणि जमेल तसंच कर, हा त्यांचा दृष्टिकोन तिला तिचं काम निर्विघ्नपणे करू देतो. त्यामुळे तीही उत्साहाने काही गोष्टी करतेच. कुठेही वादावादी, मानसिक ओढाताण, चिडचिड हे त्यांच्या घरात नाहीच.. यात सासूबाईचा मोलाचा सहभाग असतो.
अशा वेळी बदलता काळ आणि रूढी-परंपरा यांचा संघर्ष घडूच शकत नाही. याउलट माझ्या एका विद्यार्थिनीचं उदाहरण. इंजिनीअर मुलगी! लग्नानंतर सगळं सांभाळून उच्चशिक्षितत झाली.. साहजिकच खूप चांगली जबाबदारीची, पगाराची नोकरी लागली. तिचंही सासर एकत्र कुटुंबाचं. त्यांच्या घरातले कुळाचार म्हणजे अगदी टोकाचे. आत्ताच्या काळातही ‘त्या’ दिवसात बाजूला बसणं वगैरे गोष्टी यथासांग चालू.. तिनंही ते कुठलाही विरोध न करता पाळलंही. परंतु लग्नाला काही र्वष झाल्यानंतर, नोकरीत मानाची जागा मिळाल्यानंतर, काळानुसार तिच्याही विचारसरणीत बऱ्यापैकी बदल घडत गेले. पूर्वीच्या, आत्तापर्यंत केलेल्या गोष्टी खटकायला लागल्या. बोचायला लागल्या. तिचं स्वत:च्या आत डोकावणं आणि बाहेरच्या जगातला, घरातला वावर हा कुठे तरी एकमेकांना टक्कर द्यायला लागला. एक दिवस मला वैतागानं म्हणाली, ‘बाई.. माणसं लग्न का करतात?’ एक प्रकारचं नैराश्य, आणि उद्वेग तिच्या स्वरात होता.. तिचं खरं दु:ख निराळंच होतं. ती म्हणाली, ‘आता या काळात घरात हे असं ‘बाजूला’ बसणं मला भयंकर वाटतं. स्वत:ची किळस वाटते. अगदी त्या दिवसांत देवाजवळ जाणं आपोआपच टाळतोच की आपण.. पण हे असं? ऑफिसचं कुणी किंवा मित्रमैत्रिणी आल्या त्या दिवसांत मला भेटायला की माझी तारांबळ उडते. मग सुरू होते लपवाछपवी.. त्यानंतरचे सासूबाईंचे अर्थपूर्ण कटाक्ष.., ऑफिसमधल्या लोकांची सहेतून नजरा-नजर.. हे सगळं संतापजनक वाटतं. वाटतं, भिरकारून द्यावं सगळं आणि मुक्तपणे जगावं. बरं, या कारणासाठी लगेच काही घटस्फोट वगैरे कुणी घेत नाही. मग काय? सोसत राहायचं, कुढत राहायचं आणि शेवटी सपशेल माघार घेत रेटत राहायचं’.. हे सांगताना अगदी हमसून हमसून रडत होती. मी तिला विचारलं, ‘मी यात काही करू शकते का?’ त्यावर ती म्हणाली, ‘बाई यात दुसऱ्यानं काही करण्यासारखं नाहीच मुळी.. माणसानं स्वत:मध्येच परिवर्तन घडवून आणावं लागेल. मी प्रयत्न करून पाहिला. पण.. ’ मला तिची कीव आली.. रोजच्या जगण्यात ती रोज रोज ठुसठुसणारी कुसळं कशी बाहेर काढायची? काहीच उपाय नाही का?
सणावारांबद्दल असं सांगितलं जातं की अमुक निमित्तानं लोक जमतात, तमुक निमित्तानं माणसं भेटतात.. सगळय़ांच्या भेटी होतात. पण ती सगळी निमित्त धर्माशी निगडित, धार्मिक असणं हे शंभर वर्षांपूर्वी ठीक होतं. नव्हे योग्यच होते, पण आता तर या काळात साध्या कारणांनीसुद्धा सारखी गेट टुगेदर होत असतात. साठी, पंचाहत्तरीचे कार्यक्रम, वाढदिवस, प्रमोशनच्या पाटर्य़ा अगदी मुलगा-मुलगी अमेरिकेला जायला निघाली म्हणून पाटर्य़ा- तेव्हा ‘एकमेकांच्या भेटी होणं’ ही पूर्वीसारखी अगदी दुर्मीळ गोष्ट नाही राहिलीये. मग त्याला रूढी-परंपरांची कारणं का जोडायची?
काळाप्रमाणे विचार बदलतात.. ते बदलायलाच हवेत. परिवर्तन हे घडायलाच हवं, ते तसं घडतंही.. परंतु रूढींबद्दल ते परिवर्तन फार संथपणे घडतंय असं वाटते. काळाप्रमाणे पिढय़ाही बदलतात. आताची तरुण पिढी ही अत्यंत निराळय़ा जंजाळात अडकली आहे असं वाटतं. इंटरनेट आणि त्यापासून निर्माण झालेली त्यांची व्हच्र्युअल सृष्टी आणि प्रत्यक्षातले कुटुंबातले कुळाचार यांचा मेळ घालताना त्यांना जड जातंय आणि त्यातून ती जास्त दुबळी होते आहे, असं वाटतं. आपण गुढीपाडवा, दिवाळी, दसरा आदी महत्त्वाचे सण साजरे करत असतोच, पण इतर गोष्टीतला, त्यातल्या अवडंबराचा, अमुक गोष्ट अमुक पद्धतीनेच हा अट्टहास कशासाठी?
त्यामुळे असं वाटतं, ज्यांचा विश्वास असेल त्यांनी जरूर सगळय़ा गोष्टी कराव्यात. परंतु दुसऱ्यावर त्याची बळजबरी नसावी. कारण रूढी-परंपरा, देवावर विश्वास ही गोष्ट कायमच दोन भिन्न मतांची आहे. समाजात सरळ सरळ दोन तट आहेत त्याबद्दल! तेव्हा केवळ या गोष्टीमुळे- कौटुंबिक, सामाजिक वातावरण गढूळलेलं राहणार नाही, याची काळजी समाजातल्या, कुटुंबातल्या प्रत्येकानं घेतली पाहिजे. सामाजिक स्वास्थ्यासाठी काही रूढी आवश्यकही आहेत, पण कालबाह्य़ रूढींबद्दल पुनर्विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.

Story img Loader