१९७५ ला आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्ष जाहीर झाले. त्या काळात आपल्या देशात वेगवेगळ्या स्तरांवर आंदोलने, चळवळी सुरू होत्या. त्यात स्त्रियाही मोठ्या प्रमाणावर सहभागी होत होत्या. या घोषणेनंतर माध्यमांमध्ये ‘स्त्रीमुक्ती’ हा शब्द वापरला जाऊ लागला. स्त्रीस्वातंत्र्याशी जोडलेल्या या संकल्पनेवर भाष्य करणारा लेख…

मागील लेखाच्या शीर्षकात ‘स्त्रीमुक्तीची बीजे’ हा शब्द आला आहे. या संवाद यात्रेत अनेकदा स्त्रीमुक्ती शब्द येणार आहे. आपल्या सगळ्यांसह स्त्रीमुक्ती संकल्पनेचा शोध घ्यावा असं वाटलं. हा माणसाच्या मुक्तीचाच प्रवास आहे.

१९७५च्या स्त्री वर्षाच्या घोषणेनंतर आपल्या देशात माध्यमांमध्ये ‘स्त्रीमुक्ती’ हा शब्द यायला लागला. गेल्या ५० वर्षांत स्त्री चळवळीने देशाच्या कानाकोपऱ्यात स्त्रीमुक्तीची संकल्पना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तशी ती दृश्य आणि अदृश्य स्वरूपात पोहोचलीही. आपल्या प्रत्येकाच्या घरात, आजूबाजूला स्त्रीमुक्तीचे वारे वाहत आहेत. ते अनेकदा लक्षात येतात, तर कधी येत नाहीत. हे वारे अंगाला लागू द्यायचेच नाहीत असे काही लोक ठरवतात. स्त्रीमुक्ती शब्दाचे वावडे असल्याने ‘स्त्रीशक्ती’ शब्द वापरतात. त्यांच्याही घरात हे वारे कळत-नकळत शिरतात. त्यांना स्पर्श करत राहतात.

स्त्रीमुक्ती पाश्चात्त्य फॅड आहे, पुरुषांच्या विरोधी आहे असा तद्दन खोटा प्रचार कुजबुज गँग सतत करत असते. स्त्रीमुक्तीवाल्या बाया म्हणून हिणवलेही जाते. स्त्रीमुक्तीवाल्या बाया घर फोडतात अशीही चर्चा पसरवली जाते. तरीही स्त्रीमुक्ती रुजत जाते. स्त्रीमध्ये असतो तसाच चिवटपणा, टिकून राहण्याचा, संघर्ष करण्याचा गुण स्त्रीमुक्ती संकल्पनेतही आहे. साऱ्या अफवांना, अपप्रचाराला पुरून स्त्रीमुक्ती आपला अवकाश विस्तारत जाते.

‘मुक्ती’ ही अस्सल भारतीय तशीच वैश्विक संकल्पना आहे. बऱ्याच वेळा मुक्तीची कल्पना आध्यात्मिक पातळीवर, मृत्यूनंतर मोक्ष अर्थाने वापरली जाते. सर्वच प्रस्थापित धर्मांनी धार्मिक, आध्यात्मिक मोक्षाचा, मुक्तीचा अधिकार स्त्रियांना नाकारला आहे. हाच पितृसत्तेचा पाया आहे. त्याविरुद्ध स्त्रियांनी संघर्षही केला आहे. त्यातून स्त्रियांच्या भौतिक जीवनातील मुक्तीची वाट तयार झाली.

‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी…’ म्हणणाऱ्या संत जनाबाईंनी आपल्या मुक्तीची वाट स्वत:च शोधली. ‘पग घुंगरु बांधे मीरा नाची रे’ म्हणत घुंगट काढून पायात घुंगर बांधणाऱ्या संत मीराबाईंनी राजघराण्याच्या सर्व मर्यादा तोडल्या. स्त्रियांनाही पुरुषांइतकाच वैराग्याचा अधिकार आहे, असं जाहीर करत लिंगायत संत अक्कमहादेवींनी वस्त्रत्याग करून परमेश्वराचा शोध घेतानाच वचन स्वरूपात काव्यनिर्मिती केली. ‘मैने धारण किया अपनी धारणा को, और आकाश पाताल का भेद जान लिया’ असं स्वत:च्या जागृतीविषयी लिहिणारी काश्मीरची संत लल्लेश्वरी अशा सगळ्याच स्त्रीसंत स्त्रीमुक्तीची प्रेरणा आहेत. आपल्या जीवनाचे निर्णय त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे घेतले. त्यासाठी बदनामी, छळ सहन केला.

जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर महावीर वर्धमानांनी इ. स. पू. सहाव्या शतकात म्हणजे २५०० वर्षांपूर्वी जैन धर्मात स्त्रियांना दीक्षा दिली. त्याच्या काळी १४ हजार संन्यासी पुरुष आणि १६ हजार संन्यासी स्त्रिया होत्या. स्त्री-पुरुष समतेचा आग्रह धरणारा शिष्य आनंदाशी झालेल्या चर्चेनंतर तथागत गौतम बुद्धांनी स्त्रियांना धम्मात प्रवेश दिला. दोघांना समान दर्जा दिला. संसाराच्या जाचातून मुक्ती मिळावी म्हणूनच स्त्रियांनी बौद्ध, जैन धर्म, भक्ती, वारकरी, लिंगायत मार्ग स्वीकारला.

बौद्ध धम्मात प्रवेश केलेल्या स्त्रियांना ‘थेरी’ (ज्ञानी स्त्री) आणि थेरीनी रचलेल्या रचनांना ‘थेरीगाथा’ (बौद्ध ग्रंथ) म्हणतात. स्त्रीची संसारात होणारी घुसमट, तिच्या वेदना आणि बंडखोरीचे कथन या रचनांमध्ये आहे. सर्वच स्त्री संतांच्या रचना स्त्रियांच्या मुक्तीच्या गाथा आहेत.

स्त्रीमुक्तीची संकल्पना स्त्रीस्वातंत्र्याशी जोडलेली आहे. ‘मला माझ्या मर्जीप्रमाणे कधीच जगता येणार नाही का?’ हा प्रश्न मला आजवर अनेक स्त्रियांनी विचारला आहे. उत्तर देताना माझं हृदय विदीर्ण झालं आहे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ हा मंत्र भारतीय जनतेला दिला. ‘स्वातंत्र्य हा स्त्रियांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.’ हीच स्त्रीमुक्तीची भूमिका आहे.

मुलींनी शिकायचे किती?, नोकरी करायची की नाही? लग्न कधी, केव्हा, कोणाशी करायचे? किंवा करायचे नाही? मुलं किती केव्हा होऊ द्यायची? वा होऊ द्यायची नाहीत, लग्नानंतर पंजाबी ड्रेस, जीन्स वापरायची की नाही? लग्नानंतर नाव कोणतं लावायचं? माहेरच्या लोकांशी किती, कसे संबंध ठेवायचे? असे कितीतरी निर्णय बहुतांश स्त्रियांना आजही आपल्या मनाप्रमाणे घेता येत नाहीत. काही इस्लामिक राष्ट्रांत तर स्त्रियांना स्वत:चे नाव नसते. कुटुंबप्रमुख पुरुषाची नातेवाईक हीच त्यांची ओळख असते.

‘भारतीय संविधान’ आणि ‘स्त्रीमुक्तीची विचारधारा’ जुळणारी आहे. संविधानाचे कलम १४, १५, १९, २१ आणि २५ स्त्रीमुक्तीचीच आधार आणि मूल्य आहेत. स्त्री म्हणून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठीचे संवैधानिक हत्यार आहे.

प्रश्न स्त्रियांच्या समाजातील दुय्यमत्वाचा आहे. सत्ता, संपती, प्रतिष्ठेत बरोबरीचा हिस्सा नसणे म्हणजे दुय्यम नागरिक असणे. ‘नको देवी नको दासी, समान स्थान हवे आम्हासी’, असे म्हणत स्त्री चळवळीने कायम दुय्यमत्वाविरुद्ध संघर्ष केला. देवी, दासी, स्त्रीशक्ती म्हणणारे स्त्रियांच्या समाजातील समान स्थानाला विरोध करणारे आहेत. बाईने चूल, मूल, घर, संसार नीट सांभाळावा, स्वधर्मीयांची संख्या वाढवण्यासाठी अधिक मुलं जन्माला घाला असे सांगणारे आहेत. पितृसत्तेचे, पुरुषप्रधानतेचे वाहक आहेत.

भारतात जात व्यवस्थेने स्त्रियांभोवती गुलामगिरीचा पिंजरा उभा केला आहे. जातीच्या तटबंदीमध्ये अडकलेली विवाहसंस्था अनेक वेळा स्त्रीचे जगणे मुश्कील करते. आजही स्त्रियांना अबला म्हणणारे, मर्दानगी कल्पनेचे समर्थन करणारे लोक भेटतात. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि द्रविड चळवळीचे नेते रामस्वामी पेरियार यांनी स्त्रीला अबला म्हणणाऱ्या व्यवस्थेचा धिक्कार केला. ‘सेकंड सेक्स’ पुस्तकाच्या स्त्रीवादी लेखिका सिमोन दि बोव्हा यांच्या मते, ‘स्त्री जन्माला येत नाही ती घडवली जाते.’ सबळ माणूस म्हणून जन्माला आलेल्या मुलींना संस्कार, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती आणि धार्मिक, कौटुंबिक बंधने दुबळं बनवतात.

भारतात १८व्या शतकापासून स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पुरुष समाजसुधारकांकडून आवाज उठवला गेला. महात्मा फुले, राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, बेहरामजी मलबारी, गोपाळ गणेश आगरकर, सर बद्रुद्दीन तय्यबजी, महर्षी कर्वे, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी कितीतरी नावे घेता येतील. समाजसुधारकांच्या भूमिकेमुळे स्त्रीमुक्ती विचारांना सामर्थ्य मिळाले. पुढील चळवळींसाठी जनमानस तयार झाले.

प्रश्न स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आहे. काल १४ फेब्रुवारीला जगभर व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. ‘प्रेमदिन’ म्हणून हा दिवस ओळखला जातो. आपल्या देशात प्रेमदिनाला विरोधाच्या मोहिमा राबवल्या जातात. भारतीय समाजात स्त्री-पुरुष दोघांनाही जोडीदार निवडीचे, प्रेम करण्याचे स्वातंत्र्य नाही. धर्म, जातींच्या बंधनात विवाहसंस्था बंदिस्त आहे. प्रौढ व्यक्तीला आपल्या मर्जीप्रमाणे, पसंतीनुसार जोडीदार निवडण्याचा नैसर्गिक न्यायाचा आणि संवैधानिक हक्क आहे. त्यात धर्म, कायदा, सरकार, पोलीस, न्यायालय कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. लव्ह जिहाद, धर्मांतर प्रतिबंधक कायदे संविधान आणि मानवी हक्कांच्या विरोधातील आहेत. नुकत्याच उत्तराखंड राज्यात संमत झालेल्या समान नागरी कायद्यात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या कायद्याने मान्य केलेल्या व्यवस्थेवर निर्बंध आणण्यात आले. हे कायदे संविधानाने व्यक्तीला दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारे आहेत.

सर्वोच्च न्यायालयात एका डॉक्टर मुलीच्या आंतरधर्मीय विवाहासंबंधी दाखल प्रकरणात २०१८ मधील निर्णय तरुण-तरुणीचा प्रेम करण्याचा, जोडीदार निवडीचा हक्क आणि स्वातंत्र्य मान्य करणारा आहे. न्यायमूर्तींनी या मुलीला विचारले, ‘‘ What do you want? तुला काय हवे?’’ तिने उत्तर दिले, ‘‘ I want my freedom, मला माझे स्वातंत्र्य हवे आहे.’’ न्यायालयाने, आपल्या मर्जीप्रमाणे विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या जीवनात हस्तक्षेप करण्याचा कोणालाच अधिकार नाही, असे सरकारला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.

स्त्रीमुक्तीची फळे सामान्य स्त्रियांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे. ही अविरत चालणारी चळवळ आहे. काळानुरूप बदलत्या परिस्थितीनुसार व्याप्तीही वाढते आहे. शिक्षणाची संधी, समान कामाला समान वेतन मिळणे, बाळंतपणाची रजा मिळणे, मतदानाचा अधिकार, राजकारणातील प्रतिनिधित्व, जाचक धार्मिक रूढी, बंधनापासून मुक्तता, वैवाहिक आणि इतर कायद्यांचे संरक्षण असे कितीतरी फायदे स्त्रीमुक्ती चळवळीमुळे स्त्रियांना मिळाले, मात्र बहुसंख्य स्त्रियांना याचे फारसे भान नाही.

क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या कार्ल मार्क्सने म्हटले की, ‘मुक्ती म्हणजे मानवी जगाची आणि मानवी नात्याची पुनर्स्थापना असते. स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांना विरोध नाही. पुरुषांची मर्दानगी, कल्पना आणि स्त्रियांमधील न्यूनगंडाची भावना स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही जीवनातील आनंद मुक्तपणे घेऊ देत नाही. स्त्रीमुक्तीचा प्रश्न केवळ स्त्रियांचा नाही. समस्त मानवी समाजाच्या मुक्तीचा आहे. स्त्रियांच्या मुक्तीत पुरुषांचीही मुक्ती सामावलेली आहे. स्त्री-पुरुष सहजीवनाचा खरा आनंद बरोबरीच्या नात्यात आहे. परस्परांना मित्र मानण्यात आहे. मानवमुक्तीच्या प्रवासातील स्त्रीमुक्ती महत्त्वाचा टप्पा आहे.

२३ डिसेंबर १९३६ रोजी ‘ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स’ला दिलेल्या संदेशात महात्मा गांधींनी म्हटले, ‘‘जेव्हा स्त्रिया मुक्त होतील तेव्हा जगातील सर्वच सर्वहारा समूह मुक्त होतील. स्त्रीमुक्तीचा लढा हा सर्वच शोषित वर्गाचा लढा आहे. हा सर्वंकष समतेचा, मानवमुक्तीचा संघर्ष आहे. स्त्रियांमध्ये आपले म्हणणे मांडण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे, त्याचबरोबर समाजातील उपेक्षितांच्या बाजूने बोलण्याची क्षमता निर्माण होण्यातूनच या लढ्याचे उद्दिष्ट गाठता येईल.’’

स्त्रीमुक्तीचा विचार आपल्या समाजाने किती स्वीकारला या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची सहज कसोटी आहे. कुटुंबातील स्त्रीचं स्थान किती उंचावले? घरात मुली, स्त्रियांना कशी वागणूक मिळते? सार्वजनिक जीवनात स्त्रिया, मुली निर्भयपणे फिरू शकतात का? आपल्या कुटुंबातील स्त्रियांच्या नावावर संपती आहे का? स्त्रिया, मुलींबाबत बोलताना अवहेलनात्मक, अपमानकारक भाषा वापरली जाते का? आपण प्रत्येकाने हा शोध घ्यायचा आहे. हा शोध म्हणजेच स्त्रीमुक्तीचा, स्त्री-पुरुष समानतेचा, मानवमुक्तीचा प्रवास आहे.

advnishashiurkar@gmail.com

Story img Loader