न्या. रानडे यांच्या पाच पिढय़ांची, रानडे-विद्वांस-आपटे यांची ही पदवी परंपरा.
‘‘मुंबई विद्यापीठाचा पहिलाच दीक्षान्त समारंभ .. तारीख होती २८ एप्रिल १८६२. १८५७ साली स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या पहिल्यावहिल्या पदवी परीक्षेचे यशस्वी मानकरी पदवी घेणार होते. त्यावेळचे मुंबई इलाक्याचे गव्हर्नर.. विद्यापीठाचे कुलपती सर बार्टल फ्रियर यांनी आपल्या भाषणात पहिल्या आलेल्या स्नातकाचं विशेष कौतुक केलं आणि त्याच्या भावी उत्कर्षांबद्दल आशावादी असल्याचं नमूद केलं. १८६५ मध्ये त्याच बुद्धिमान स्नातकाला एम.ए. ची पदवी देताना आणि १८६६ मध्ये एलएल.बी. सन्मानपूर्वक प्रदान करताना सर बार्टल फ्रियर यांनी त्याच स्नातकाची विशेष प्रशंसा केली.’’ ‘पदवीधरांचे मुकुटमणी’ असे सार्थ नामाभिधान प्राप्त झालेल्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या चरित्रग्रंथात हे वर्णन वाचत असता साहजिकच मनात विचार आला, ‘अशी अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या या मुंबई विद्यापीठाच्या पहिल्यावहिल्या स्नातकाचा वारसा पुढे कुणी आणि कसा चालवला असेल? आणि या उत्तराचा मागोवा घेताना या पहिल्यावहिल्या पदवीधराच्या पाच पिढय़ांच्या पदवी परंपरेच्या परिवाराचा परिचय झाला.
न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानडे यांचे दत्तकपुत्र नारायण यांनी मुंबई विद्यापीठातून एम.बी.बी.एस.ची पदवी मिळवली आणि वैद्यकीय व्यवसायही केला. पण नारायण ऊर्फ नामू हे विनापत्य राहिले. न्या. रानडे यांचा पदवीचा वारसा पुढे चालवला तो त्यांचे जावई, म्हणजे मानसकन्या सखुताईंचे यजमान अॅड. बापूराव ऊर्फ श्रीनिवास वासुदेव विद्वांस यांनी आणि त्यांचे पुत्र प्रा. माधव (देवदत्त) श्रीनिवास विद्वांस यांच्या विस्तारलेल्या वंशवेलींनी. या कुटुंबात कुणीही केवळ एकाच पदवीवर समाधानी नाही. तर तिसरी, चौथी आणि पाचवी पिढी ही २-३ पदव्यांनी ‘मंडित’ आहे असंच म्हणावं लागेल.
रमाबाईंची मानसकन्या सखुबाईंसाठी सुविद्य आणि संस्कारी घराण्यातल्या वराची म्हणजे बापूराव विद्वांसांची निवड करण्यात आली. बापूराव हेही मुंबई विद्यापीठातून बी.ए., एलएल.बी झाले होते. ‘हिंदू लॉ’ या विषयात प्रथम आल्याबद्दल त्यांना पारितोषिक मिळालं होतं. हे घराणं उदारमतवादी होतं. बापूरावांचंही प्रार्थना समाजात येणं- जाणं होतं. रूढींविरुद्ध वागण्याचं धैर्य ते दैनंदिन आयुष्यातही दाखवत असत. वय वाढलेल्या मुलीचं लग्न करताना मुलीच्या आई-वडिलांनी प्रायश्चित म्हणून एक ‘व्रात्यस्तोम विधी’ करण्याची पद्धत होती. हा विधी करण्याचं बापूरावांनी आणि रमाबाईंनी साफ नाकारलं. एका संस्थानिकाच्या खटल्याची सुनावणी प्रीव्ही कौन्सिलपुढे होती. त्यासाठी बापूरावांचं लंडनला जाणं झालं. ते नेहमी सुटाबुटात वावरत. अतिशय बुद्धिमान, प्रेमळ अन् विचारांनी समानधर्म असणाऱ्या या जावयावर रमाबाईंनी पुत्रवत् प्रेम केलं. सखुबाईंचं अकाली निधन झाल्यावर तिच्या मुलालाही रमाबाईंनीच सांभाळलं.. शिकवलं.
या सखुबाई आणि बापूरावांचा मुलगा माधव. सखुबाईंच्या लग्नाआधीच न्यायमूर्ती रानडे यांचं निधन झालं होतं. आपल्यावर प्रेमाची पाखर घालणाऱ्या या दत्तक – पित्याचं नाव सखुबाईंनी आपल्या बाळाच्या कानात सांगितलं. पण रमाबाई त्याला कशी हाक मारणार म्हणून रमाबाईंनी या बाळाचं नाव ठेवलं देवदत्त. त्या तेवढय़ा देवदत्त म्हणत. देवदत्त (माधव) एक वर्षांचा असताना सखुबाई वारल्या आणि रमाबाईच त्याच्या आई झाल्या. आपले सामाजिक कार्याचे व्याप सांभाळूनही रमाबाईंनी या नातवाला गोष्टी सांगितल्या. अभ्यास घेतला. कष्टाची सवय केली आणि ज्ञानार्जनाची ओढ कायम राहील असे संस्कार केले. देवदत्तनं इंग्लिश संस्कृत अशा दोन बी.ए.च्या पदव्या ऑनर्ससहित मिळवल्या त्या मुंबई विद्यापीठातूनच. पण त्याचं हे यश पाहायला रमाबाई हयात नव्हत्या. देवदत्त ऊर्फ माधवराव विद्वांस यांनी एलएल.बी.ला उत्तम गुण मिळवले. भारतीय राज्यघटना आणि मिळकत कायदा यातले ते तज्ज्ञ समजले जात. काही र्वष पुण्यात वकिली करून नंतर मुंबईतल्या न्यू लॉ कॉलेजच्या स्थापनेपासून ते तिथेच अध्यापन करू लागले.
न्यायमूर्तीप्रमाणेच त्यांच्या या नातवाचा ओढा अध्यापनाकडे अधिक होता. प्रा. माधव विद्वांस यांनी इंग्रजी मराठीत कायदेविषयक लेखन केलं. कायद्याचा पदव्युत्तर परीक्षांचे परीक्षक, लॉ, फॅकल्टीचे सभासद म्हणून ते मुंबई विद्यापीठाशी जोडलेले राहिले. १९ व्या वर्षांपर्यंत त्यांनी रमाबाईंच्या सहवासात अनेक गोष्टी टिपल्या.. मनात साठवून ठेवल्या. रमाबाईंच्या कार्याची महती त्यांना ठाऊक होती. त्यामुळे रमाबाईंचं साधार, साक्षेपी आणि समग्र चरित्र लिहिणं हीच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानली. आणि त्या ग्रंथाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा पुरस्कारही मिळाला.
प्राध्यापक माधवरावांचा मुलगा रमाकांत हा इंजिनीअर तर अध्यापक सून शुभा दोघंही द्विपदवीधर. धाकटी मुलगी पद्मा ही गुणवंत शिक्षिका आणि अनेक कलांमध्ये प्रवीण तर तिचे पती डॉ. श्रीकृष्ण ठाकूर यांनी अतिशय लहान वयात पीएच. डी. मिळवली. या मुलांना, सुनांना घरात मोकळेपणाचं वातावरण अनुभवायला मिळालं. विज्ञान, कायदा आणि भाषांच्या प्रेमाचं बाळकडू मिळालं. याच वातावरणानं आम्हाला शिक्षणाची तहान लागली, हे मत आहे डॉ. वसुधा विद्वांस-आपटे. म्हणजे माधवरावांच्या मधल्या कन्येचं.
१९१३ साली रमाबाई रानडे यांनी स्त्रियांसाठी ‘फिमेल स्कूल’ची स्थापना केली. त्या वर्षांची आठवण म्हणून आणि रमाबाईंचं कर्तृत्व घराघरात पोहचवणाऱ्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेचं नाव देऊन प्रत्येक क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या स्त्रियांचा गौरव केला गेला. त्यातलीच एक गौरवमूर्ती म्हणजे, न्यायवैद्यकशास्त्रात महाराष्ट्रातही एकमेव स्त्री आणि डेप्युटी कॉरोनॉर म्हणून भारतातल्या पहिल्या स्त्री ठरलेल्या डॉ. वसुधा विष्णू आपटे. हा केवळ सहज घडलेला योगायोग नाही, तर तो संस्कारातून झिरपलेला आणि सजगपणे वाढवलेला ज्ञानार्जनाची आस टिकवून ठेवणारा वसा आहे.
डॉ. वसुधा यांनी आपले वडील माधवराव विद्वांस यांच्याकडून भाषाप्रेम, विज्ञाननिष्ठा, कायद्यावरचा विश्वास, कायद्याच्या अभ्यासाची चिकाटी घेतली, तर आपल्या आईच्या वडिलांप्रमाणे त्यांना डॉक्टर व्हायची इच्छा होती म्हणून त्या एम.बी.बी.एस. झाल्या. त्यांचे आजोबा डॉ. कुर्लेकर हे स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय सैन्यदलात डॉक्टर होते. त्यामुळे ‘शवविच्छेदन’ ‘शवचिकित्सा’ हे शब्द वसुधाताईंना नवीन नव्हते.
या वैद्यकीय ज्ञानाला कायद्याचं कोंदण हवंच. तर काम सोपं होतं, म्हणून त्यांनी एमडी (पॅथॉलॉजी) करून नंतर एलएल.बी. केलं. पुढे त्यांच्याच प्रयत्नांनी आपल्याकडे मुंबईत नायर रुग्णालयात ‘न्यायवैद्यकशास्त्र’ हा विषय सुरू करण्यात आला. आपल्याला जे कष्ट पडले ते इतरांना पडू नयेत एवढाच मर्यादित विचार यापाठी नव्हता तर जिथे शक्य होईल तिथे सामाजिक सुधारणा आणि विशेषकरून स्त्रियांना विस्तारित ज्ञान क्षेत्रात प्रवेश मिळवून देणं ही विचार परंपरा त्यांच्यात झिरपलेली होतीच. (इथे एक आठवण येते.. सेवासदनच्या स्थापनेनंतर रमाबाई रानडय़ांनी पुण्याच्या सिव्हिल सर्जनच्या मागे लागून ‘प्रसूतिशास्त्र आणि रुग्णपरिचर्या’ असा एक अभ्यासक्रम आखून तिथे १३ मुलींना प्रवेश मिळवून दिला. रानडे वाडय़ात त्यांची राहण्याची सोय केली.) डॉ. वसुधा आपटे यांनीही डॉक्टर्ससाठी छोटे कोर्सेस, शिबिरं आयोजित केलेली आहेत. स्वत: मार्गदर्शन केलं.
वसुधाताई सांगतात, ‘‘इतक्या वेगळ्या वाटेनं चालण्याचं धैर्य आणि आत्मिक बळ, जिद्द आणि चिकाटी हा माझा कौटुंबिक वारसाच आहे.’’
असंख्य पुरस्कार – मानसन्मानाच्या मानकरी असलेल्या वसुधाताईंनी आणखी एक गोष्ट आवर्जून सांगितली. ‘‘स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा जपणं.. जोडीदाराला सन्मानानं वागवणं, घरातला आनंद आणि शांती टिकवणं हे संस्कार न्यायमूर्तीच्या स्वभावाचेच. माझ्या आजोबा-वडिलांनीही तेच जपलं. वसुधाताईंचे पती श्री. विष्णू आपटे उच्चशिक्षित इंजिनीअर असून अनेक धरणं आणि पुलांच्या बांधणीत त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्या म्हणाल्या, आम्ही दोघांनी हा गुण आमच्या कृतीतून मुलांपुढे ठेवला. त्यामुळे आज त्यांच्या घरात उच्चशिक्षित सुनांना खूप आदर मिळत आहे.
डॉ. वसुधा-विष्णू यांची मुलं म्हणजे आपल्या लेखातली पाचवी पिढी – डॉ. विवेक आपटे. ते अद्ययावत तंत्रज्ञान वापरणारे डेंटिस्ट आहेत. तर त्यांची पत्नीही डॉक्टर आहे. वसुधाताईंचा दुसरा मुलगा वैभव अमेरिकेत आहे. तो इंजिनीअर तर त्याची पत्नी फिझिकल थेरपिस्ट. आणि सहावी पिढी पुढच्या वर्षभरात डॉक्टर होईल.
एका नामांकित विद्यापीठाचा पहिला पदवीधर अन् त्यांचा वारसा चालवणाऱ्या या पाच पिढय़ा. रमाबाई रानडय़ांनी माधवरावांच्या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्या व्याख्यानांचं एक छोटंसं संपादित पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘‘स्वत:ने उपदेशरूपी नंदादीप लावून ठेवला आहे. नंदादीपाची वात पुढे सारली तरी पुण्य मिळतं असं म्हणतात. या उपदेशरूपी नंदादीपाची वात पुढे सारण्याचं काम माझंच आहे.’’
रमाबाईंचं हे मनोगत केवळ त्या पुस्तकापुरतं नव्हे तर त्यांच्या सामाजिक कार्यासाठी शब्दश: खरं ठरलं, त्या उभयतांचं कार्य पुढे चालू राहिलं. त्यातलाच हा एक कौटुंबिक अंश .. पाच पिढय़ांची पदवीधरांची समृद्ध परंपरा!
vasantivartak@gmail.com
पाच पिढय़ांची पदवी परंपरा!
मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व कुटुंब रंगलंय... बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five generations tradition of degree