२६ जानेवारी १९३० रोजी पंडित नेहरूंनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. तेव्हापासून १९४२ सालापर्यंतच्या बारा वर्षांच्या काळात अनेकजण हुतात्मा झाले होते. त्यांचे हौतात्म्य त्यांना शोभेल, अशा पद्धतीने साजरे करणे आवश्यक होते. पुण्याच्या येरवडा तुरुंगातल्या दहा-बारा ‘चळवळ्या’ तरुणींनी ब्रिटिश सरकारचे डोळे पांढरे करायचे ठरवले. त्यासाठी दिवस ठरवला, २६ जानेवारी १९४३..
आजच्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्रलढय़ातली ही रोमांचक कहाणी.
तो दिवस होता, २६ जानेवारी १९४३..
तत्पूर्वी, १९४२ चे ‘चले जाव’चे आंदोलन चालू होते. चालू होते म्हणण्यापेक्षा पेटलेलेच होते. या आंदोलनात तरुण-तरुणींची संख्या अगणित होती. स्त्रियांसाठी राखीव तुरुंगही भरून गेले होते इतके की काही मुलींना व्हरांडय़ातही राहावे लागत होते. तरुण आया आपल्या मुलांसह तुरुंगात गेल्याची नोंद आहे इतकंच नाही तर कोल्हापूर, ठाणे येथील तुरुंगात मुलांचा जन्मही झाला होता. सर्व कारागृहातून सर्व राजबंदी मिळून राष्ट्रीय दिवस साजरे करीत. त्यांच्या अद्भुत स्वातंत्र्यदिनाची कथा आहे २६ जानेवारी १९४३ या दिवशीच्या झेंडारोहणाची. स्थळ आहे येरवडा (पुणे जिल्हा) कारागृहातील महिलांची बरॅक.
२६ जानेवारीला कोणता कार्यक्रम करायचा याचा विचारविनिमय करण्यासाठी ज्येष्ठ राजबंदिनींनी सर्वाना बोलावले. तरुण मुलींच्या जथ्याला लहान मुलींचा गट म्हणत. या गटात अतिगडबड करणाऱ्या दहा-बारा जणी होत्या. ज्येष्ठ राजबंदिनीत प्रेमाताई कंटक, मणिबेन पटेल, लक्ष्मीबाई ठुसे यांचा पुढाकार असे. त्या सर्व स्वत:ला संपूर्ण गांधीवादी म्हणवत. कारागृहात महात्मा गांधींच्या आश्रमासारखाच त्यांचा दिनक्रम असे. त्यांच्या मते, २६ जानेवारी या दिवशी आश्रम भजनावलीतील भजनाचा अखंड कार्यक्रम, त्याचप्रमाणे अखंड चरखा चालविणे हा कार्यक्रम असावा. कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने व्हावी व संध्याकाळी सायंफेरीने कार्यक्रम संपवावा. या नेत्या व ज्येष्ठ स्त्रियांच्या मताला विरोध करणे कुणालाही सोपे नव्हते. गडबड करणाऱ्या दहा मुलींच्या गटाला बजावण्यात आले की ‘हाच कार्यक्रम व असाच होईल. कारण बहुतेक सर्वाचीच त्याला मान्यता आहे आणि शिवाय तुम्हाला तुमचा काही वेगळा आणखी काही कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही तो अवश्य करा. पण आमचे त्याला साहाय्य असणार नाही.’
त्या गडबड करणाऱ्या गटाने मग आपल्या मनाप्रमाणे कार्यक्रम करायचा चंगच बांधला. संध्याकाळी या आठ-दहा मुली एकत्र बसून चर्चा करू लागल्या. २६ जानेवारी या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव काँग्रेस अधिवेशनात मांडला होता. तो एकमताने पारित झाला होता. १९३० च्या जानेवारीपासून हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभर पाळला जावा, असा गांधीजींचा आदेश होता. त्याप्रमाणे तो १९४२ पर्यंत पाळला जात होता. सभा, मिरवणुका जल्लोषात निघत. त्यावर ब्रिटिश सरकारकडून अश्रुधूर, गोळीबार, लाठीमार होई. दरवर्षी म्हणजे १९३० ते १९४२ या एक तपाच्या काळात अनेक लोक हुतात्मा झाले होते. त्यांचे हौतात्म्य असे नुसते भजने गाऊन व चरखा फिरवून व त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, असा गळा काढून साजरे करण्यापेक्षा त्यांना शोभेल अशाच पद्धतीने करणे आवश्यक आहे. ज्यांनी स्वातंत्र्याकरिता बलिदान केले त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय शांती मिळेलच कशी? ते आत्मे अशांतच राहणार आहेत. त्यांच्या आत्म्याला, ‘आपले काम पुढे चालले आहे हे पाहून बरे वाटायला हवे म्हणून स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम हा ब्रिटिशांचे डोळे पांढरे करण्यासारखा झाला पाहिजे,’ असे या युवती गटाला वाटले. चर्चा करता करता एक म्हणाली, ‘आपण येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वाराच्या शिखरावर तिरंगा फडकवूया.’ ही कल्पना मागचा-पुढचा काहीही विचार न करता सर्व गटाने उचलून धरली. सगळय़ा अगदी भारावून गेल्या. उत्तेजित झाल्या. त्या सरळसोट उंचच्या उंच भिंतीवर चढून जाणे कितपत शक्य आहे, हा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. त्याच वेळी ‘गाऊ त्यांनी आरती’ ही कविता सर्वाच्या तोंडी होती. त्यातील एक ओळ-
‘वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती। मन्मना नाही क्षिती।।’ या मुलींच्या मनात हाच विचार असावा. ज्यांना ‘डेअर डेव्हिल’ म्हणावे अशा दोन मुली या गटात होत्या. इंदू भट (पुढे इंदू केळकर या नावाने समाजवादी चळवळीत अग्रेसर लोहियावादी) व गोवा मुक्तिसंग्रामातील १२ वर्षे शिक्षा झालेली सिंधू देशपांडे या दोघी कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षांला शिकत असलेल्या १७-१८ वर्षांच्या युवती. दोघींच्याही कोशात ‘भय’ हा शब्दच नव्हता. भिंतीवर कसे चढायचे याची योजना सुशीला गरुड नावाच्या पुण्याच्याच मुलीने तयार केली. चौघींनी गुडघ्यावर घोडा करीत बसायचे. त्यांच्यावर तिघींनी चढून जायचे व त्यांच्या पाठीवर पाय देऊन दोघींनी वर चढायचे. या दोघींच्या हातात झेंडा व त्याला फडकविण्याची सर्व साधने द्यायची व त्या दोघींनी झेंडा वर जाऊन फडकवावा हा बेत सर्वानुमते ठरला. आता झेंडा कुठून आणायचा, हा प्रश्न आला. त्यावर उपाय म्हणून तीन रंगांतील साडय़ा मिळवाव्यात व त्यांचे पट्टे काढून झेंडा हाताने शिवावा असे ठरले. पांढऱ्या साडय़ांना तोटा नव्हता. शांती धूत म्हणाली, की तिच्याकडे हिरवीगार साडी आहे. मी पट्टा कापून देते. दोन-चार दिवसांपूर्वीच एक सत्याग्रही मुंबईहून आली होती. तिच्या अंगावर केसरी साडी होती. तिला गाठले. झेंडा अडकवण्यासाठी शिरीष वृक्षाची फांदी तोडून ती गुळगुळीत करण्याचे काम काहींनी केले. झेंडा शिवून तयार झाला. त्यावर कोळशाने चरख्याचे चित्र काढले. झेंडा तर तयार झाला. पण कारागृहाच्या भिंतींवर चढावे कसे? कोणी? केव्हा? झेंडा फडकविण्यासाठी मेट्रनच्या ऑफिसवरून जेलच्या प्रवेशद्वारावरील दिव्याच्या खांबावर झेंडा लावल्याशिवाय तो लावण्याचा उद्देश सफल होणार नव्हता. तिथे पोहोचायचे म्हणजे जेलच्या भिंतीवर चढून जाणे, हा एकच मार्ग होता. पण भिंती तर गुळगुळीत, त्यावर चढणार कसे? शिरीषाचे झाड हे त्यातल्या त्यात जवळचे होते. पण झाडाच्या फांद्यांवरून भिंतींच्या तटावर उडी मारणे तितकेसे सोपे नव्हते. इतक्यात पुण्याची सुशीला गरुड म्हणाली. आपण मानवी मनोरा करूया का? मागचा-पुढचा विचार न करता ही सूचना मान्य झाली.
मानवी मनोरा करण्याची माहिती एकीलाही नव्हती. पण त्यातल्या तिघी-चौघी जणी योगासने करीत असत. त्या म्हणाल्या, की आपण तळात चौघींचे कडे करू. त्यावर तिघी चढतील. तिघींच्या खांद्यावर दोघींनी चढायचे व झेंडय़ाचे साहित्य त्यांच्याच हातात असेल व त्यांनी झेंडा काठीत अडकवून काठी विजेच्या खांबाला बांधायची व झेंडा फडकवून खाली उतरायचे. योजना तयार झाल्या. प्रत्येक स्तरावर कोणी कोणी उभे राहायचे हेही ठरले. साधे अगदी भातुकलीतले नाटुकले असले तरी त्याचा सराव व रंगीत तालीम करावी लागते, पण या थरारनाटय़ाच्या नशिबी सराव-तालीम वगैरे नव्हतेच. दहाही जणींना आपल्या या योजनेची माहिती या कानाची त्या कानाला मिळू नये याची खबरदारी घ्यायची होती. होणार होता तो पहिला व शेवटचा प्रयोग.
२५ जानेवारी रोजी रात्री अखंड सूतकताई सुरू झाली. दुसऱ्या बाजूला अखंड भजन सुरू झाले. या योजनेची सूत्रधार वत्सला (डॉ. वत्सला आपटे, सोलापूर) रात्री ११ वाजता सूतकताईला बसली. इंदू भट भजनाच्या गटात जाऊन बसली. तिने एकटीने दोन-तीन भजने म्हटली. रात्री १२ वाजून गेल्यावर दहा जणींनी शिरीषाच्या झाडाखाली जमायचे होते. कारण रात्री गस्त घालणारी जमादारीणबाई बारा वाजता तिथून भिंतीला वळसा घालून निघून जात असे. तिची दुसरी फेरी बरीच उशिरा असते, हे यापूर्वीच तिच्या जाण्या-येण्यावर पाळत ठेवून लक्षात घेतले होते. जमादारीण गेली हे पाहिले व मुली निर्धास्त झाल्या. सर्वानी साडीचा काचा मारला होता. ही पद्धत सेवादलात होती. त्यात प्रथम परकराचा काचा व त्यावर साडी दोन्ही पायांवर गुंडाळून घेऊन मग उरलेल्या भागाचा पदर घेऊन तो खोचून ठेवला जाई. हे नेसण दोन पायांवर नेसलेल्या धोतरासारखे दिसे. धोतराचा पदर घेत नाही. या साडीचा पदर घेते इतकेच. ज्या खेळाडू मुलींना खेळात भाग घेताना पँट-शर्ट घालायची परवानगी नसे त्या मुली खेळताना अशीच साडी नेसत. त्याला त्या वेळी पाचवारीचे नऊवारी नेसण असे म्हणत. वत्सलाने एकटीनेच पँट-शर्ट घातला होता. इंदू केळकरने गडद तपकिरी रंगाची साडी नेसली होती. इंदू उंच असल्यामुळे तिघींच्या पाठीवरून सरळ छपरावर गेली. तिच्याबरोबर वर चढणे वत्सलाला जमेना. ती बुटकी होती ना! इंदूने तिला ओढून वर घेतले. सिंधूने त्यांच्या हातात झेंडा दिला. त्या दोघी दबक्या पावलांनी मुख्य दरवाजाकडे गेल्या व जेलच्या तटाच्या भिंतीजवळ पोहोचल्या. दिव्याच्या खांबापर्यंत पोहोचल्या, पण त्याच वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी आपल्याला पाहू नये याची खबरदारी घेत होत्या. पोलिसांनी गोळय़ा घालण्याची किंवा मरणाची भीती नव्हती. झेंडा लागण्याची काळजी होती. दिव्याच्या खांबाजवळ पोहोचल्या तेव्हा खांब तारांच्या वेटोळय़ात बंदिस्त होता. वायरला हात लागला व आतून वीजप्रवाह सुरू असेल तर संपलेच सगळे. माघार घेणार तर ती इंदू कसली! इंदू वत्सलाला म्हणाली, ‘मी वायरला हात लावते, मी चिकटले तर तू झेंडा चढव.’
इंदूने हात लावला खांबाला पण काहीच झाले नाही. आनंदाने त्या वेडावून गेल्या. खांबावर झेंडा हाताने धरला आणि त्यांच्या लक्षात आले, की खांबावर झेंडा बांधण्यासाठी दोरी नाही. इंदूने आपल्या परकरातील नाडी ओढून काढली. साडीची गाठ मारून कंबर परकरासहित घट्ट बांधली. जमादारीण येण्याआधी सर्व काम उरकले पाहिजे होते. बाकीच्या आठ मुली आपापल्या बराकीत जाऊन झोपेचे सोंग घेऊन पडल्या होत्या. परकराच्या नाडीने झेंडा व्यवस्थित बांधला. छपराच्या खांबाला धरून घसरत घसरत खाली उतरताना एक कौल खाली पडून फुटले. ते उचलून बाजूला टाकण्याचेही सुचले नाही. दोघींना बराकीत जाऊन अष्टकन्यांना झेंडा फडकविल्याची बातमी सांगून झोपायचे होते. सकाळच्या प्रभातफेरीत गेटच्या वर पाहिले. तिरंगा डौलात फडकत होता. मुलींना आकाश ठेंगणे झाले. आता इतरेजन हा झेंडा केव्हा पाहतात असे त्यांना झाले होते. जानेवारीतील पुण्याच्या थंडीत फक्त हे स्वातंत्र्यसैनिक प्रभातफेऱ्या काढून आवारात फिरत. बाकी कुणी नाही.
जेलच्या गवळय़ाने प्रथम तो झेंडा पाहिला. तो त्याने मेट्रनला दाखविला. ती गडबडून गेली. जेलर आला. बायका इतक्या उंच चढून झेंडा लावूच शकणार नाहीत, असे तो ठामपणे म्हणू लागला. प्रेमा कंटक या कडव्या गांधीवादी होत्या. त्यांनी ते फुटके कौल जेलरला दाखविले. इंदू व सिंधूसारख्या मुलीच हे कृत्य करू शकतात असेही सुचविले. इंदू व सिंधू यांना कोठडीत बंद करून ठेवले गेले. ही शिक्षा आठ दिवसांकरिता होती. वास्तविक सिंधू तीन मुलींच्या गटात होती. वर गेली होती ती वत्सला. त्यामुळे वत्सलाने सिंधू नसून आपण झेंडा लावायला गेलो होतो, हे जेलरला सांगायचे ठरविले. झेंडा लावणे हे किती धोक्याचे काम होते व ते या १७-१८ वर्षांच्या मुलींनी अगदी बिनबोभाट केले, याबद्दल स्वातंत्र्यसैनिक स्त्री-पुरुषांचा आनंद गगनात मावत नव्हता. झेंडा इंदू-सिंधूनीच लावलाय हे सिद्ध न होताही त्यांना ८ दिवसांची कोठडी फर्मावली म्हणून सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी अन्न सत्याग्रह सुरू केला. त्याला यश आले. इंदू-सिंधूना सोडण्यात आले. तोपर्यंत दुपार टळत आली होती. पोलिसांनी शिडी लावून वर चढून झेंडा उतरविला. हा २६ जानेवारी १९४३ चा ‘स्वातंत्र्य दिन’ भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर आहे. या अद्भुत स्वातंत्र्य दिनाची ही कहाणी आपल्याला प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी स्फूर्ती देईल यात शंका नाही.
(आज इंदू भट, सुशीला गरुड हयात नाहीत. सिंधू देशपांडेंना गोवा मुक्तिसंग्रामात १२ वर्षांची शिक्षा झाली होती. गोवा स्वतंत्र झाल्यामुळे त्या तीन वर्षांनी सुटल्या. सध्या त्या खराडी (पुणे) इथल्या वृद्धाश्रमात आहेत. वत्सला आपटे या डॉक्टर होऊन सध्या सोलापूरला राहतात.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flag hoisting ceremony in yerwada jail 26 january
Show comments