डॉ. स्मिता लेले
dr.smita.lele@gmail.com
आपल्या आयुष्यातील चटकदार खाणे काढून टाकले आणि समजा अशी जादूची गोळी तयार केली, जी घेतली की दिवसभरासाठी आपल्याला लागणारी ऊर्जा, जीवनसत्त्वं आणि उष्मांक मिळणार आहेत, तर काय होईल? सगळं मिळूनही जीवन नीरसच होईल.. मग काय आणि कसं आणि किती खावं? खाण्याचे दोन प्रकार पाडता येतील. श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे योग्य ते खाणं आणि प्रेयस म्हणजे जे आपल्याला प्रिय आहे, ते खाणं. सध्याची जी विचारसरणी आहे ती म्हणजे ‘अन्न हेच औषध’! आहार आणि विहार जर योग्य असतील तर आजारी पडण्याची वेळच येणार नाही, कसं ते जाणून घेऊ ‘जीवन विज्ञान’ या सदरातून दर पंधरवडय़ाने.
विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. विश्वाविषयीचे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या गरजेतून माणसाने विज्ञान निर्माण केले. त्यानेच माणसाला विज्ञानवादी बनवले. मात्र चंगळवाद हाही अलीकडच्या काळातला अनेकांच्या जगण्याचा भाग झाला आहे. त्या सुखप्राप्तीसाठी अनेक जण नवनवीन गोष्टींचा शोध घेत असतात. मात्र या गोष्टी करताना जर आपण शास्त्रीय दृष्टिकोन ठेवला तर आपले आयुष्य अधिक आनंदी होऊ शकते. म्हणूनच अपण जर आपल्या मनाची कवाडे उघडली तर आपल्याला ‘जुनं ते सोनं’ आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील सुवर्णमध्य काढता येईल आणि या सुवर्णमध्यातून उत्तम दिनक्रम तसेच उत्तम जीवनशैली निर्माण करता येईल. यालाच आपण ‘जीवन विज्ञान’ म्हणू शकतो.
कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत असताना त्यात तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. दोन रसायनांची एकमेकांसोबत होणारी क्रिया, ती क्रिया घडवून आणणारी कारणे (संप्रेरकं) आणि तिसरा भाग म्हणजे घडलेल्या क्रियेमुळे तयार होणारे उत्पादन (किंवा परिणाम). कारणे बदलली तर परिणाम बदलतो. आता हीच गोष्ट समजून घेण्यासाठी आताचेच उदाहरण घेऊ. हा लेख कुणी तरी लिहिलाय, कुणी तरी वाचतंय आणि ते लिहिलेलं आत्मसात केलं जातंय. क्रिया, अभिक्रिया आणि परिणाम हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक आहे. तसंच आपलं खाद्यविज्ञानाचंही आहे. आहारशास्त्रात सांगितल्याप्रमाणे एखाद्यासाठी जे अन्न उपयुक्त आहे ते दुसऱ्या सजीवासाठी कदाचित हानीकारक असू शकतं, किंबहुना Neutraceutica (न्यूट्रॅस्युटिका) ही आत्ताची जी विचारसरणी आहे ती म्हणजे ‘अन्न हेच औषध’! म्हणजेच योग्य आहार घेतलात तर औषध घ्यायची गरजच पडणार नाही.
मुळात आहार आणि विहार जर योग्य असतील तर आजारी पडण्याची वेळच येणार नाही. आजच्या ‘डायटिंग’ विचारसरणीच्या काळात पडणारा यक्षप्रश्न म्हणजे कोणत्या भाज्या खाव्यात? चांगल्या त्वचेसाठी कोणती फळे खावीत? सुदृढ शरीरासाठी कोणती प्रथिने खावीत? त्याची उत्तरे मिळवण्यासाठी कोण काय खातो, कधी खातो, किती खातो व कसे खातो याची माहितीदेखील आवश्यक आहे. समजा आपल्या आयुष्यातील चटकदार खाणे काढून टाकले आणि जादूची गोळी तयार केली, जी घेतली की दिवसभरासाठी आपल्याला लागणारी ऊर्जा, जीवनसत्त्वं आणि उष्मांक मिळणार आहेत, तर आपले जीवन किती नीरस होईल.. खाण्याचे दोन प्रकार पाडता येतील. श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे योग्य ते खाणं आणि प्रेयस म्हणजे जे आपल्याला प्रिय आहे, ते खाणं. आणि साधारण असा समज आहे, की जे आपल्याला आवडतं, जे प्रेयस असतं, ते ‘जंक फूड’ असतं. म्हणजे ते चांगलं नसतं. जे आपल्याला आवडतं, ते चटकदार, चविष्ट, मसालेदार, तेला-तुपाने भरपूर, साखरेने भरपूर असं असतं. आणि सर्वसाधारणपणे ‘खाऊ नका’च्या यादीमध्ये या अशा आपल्या आवडत्या पदार्थाचं पहिलं नाव असतं. त्याचाच दुसरा भाग, म्हणजे जे श्रेयस अन्न आहे, ते म्हणजे सूप, उकडलेलं, बेचव आणि फक्त लहान मुलांनी, वृद्ध लोकांनी, आजारी पडल्यावर खाण्याचं अन्न. हा खरा गैरसमज आहे. अनेकदा आपण चविष्ट आणि श्रेयस असं अन्न एकत्र करू शकतो. किंवा काही वेळा आपण दिवसभरात खाताना एकदा श्रेयस आणि एकदा प्रेयस असं करूनही आपल्या आरोग्याचा तोल सांभाळू शकतो.
मात्र त्यासाठी ‘पारंपरिक शहाणपण’ गरजेचं आहे. बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी आणि भौगोलिक परिस्थितीत, वातावरणात, खाण्याची जी पद्धत आहे ती सर्वसाधारणपणे तिथली हवा, तिथे पिकणारे पदार्थ, तिथल्या लोकांचा वंश आणि तिथल्या जीवनपद्धतींशी सुसंगत असतं. संक्रांत जवळ आलीय. तिळगूळ खा किंवा गुळाची पोळी खा, हे जे महाराष्ट्रातील संक्रांतीशी निगडित पदार्थ आहेत, ते थंडीत ‘उष्ण’ खावे म्हणून आहेत. ते तसे खायला हवेत.
आपला रोजचा आहार तयार होतो आपल्या स्वयंपाकघरात. स्वयंपाकघर हे आजही गृहिणींचे कार्यक्षेत्र मानले जाते. नोकरी करणारी स्त्रीसुद्धा मदतीसाठी नोकर असले तरी घरात बनविल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाविषयी जागरूक असते. इथेसुद्धा जीवन विज्ञानाचा अभ्यास केला तर ऊर्जेची बचत करणे, अन्नाचा सकसपणा टिकविणे, आधुनिक उपकरणांचा सुयोग्य वापर करणे हे सगळे शक्य होते. प्रेशर कुकरचा वापर कसा करावा? शिट्टय़ा का व किती घ्याव्यात? त्यामागेसुद्धा विज्ञान आहेच. तो नीट माहीत असणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी घरातली स्त्री ही पूर्णवेळ गृहिणी असल्याने ती कितीही वेळ लावून अगदी निगुतीने स्वयंपाक करत असे, मात्र आता घडय़ाळ्याच्या काटय़ावर चालणाऱ्या ‘करिअर’ करणाऱ्या गृहिणीला असा चारीठाव स्वयंपाक करणे शक्य नसते. सगळ्यांचा आहार तिला सांभाळायचा असतो तसंच सण, परंपराही पाळायच्या असतात. अशा वेळी तिच्यासमोर काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, सणाच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करायचा असल्यास तो आपल्या आजीच्या पद्धतीने चार ते पाच तास लावून करावा की बाजारातील वाळवलेल्या (डीहायड्रेटेड) पुरणात पाणी घालून शिजवून पोळ्या कराव्यात? की थेट बाजारातून तयार पुरणपोळ्या विकत आणाव्यात? यात आरोग्यदायी काय, याचाही विचार तिनेच नाही तर घरातल्या सगळ्यांनीच करायला हवा आहे.
अशाच आपल्या जगण्यातील काही सामान्य प्रश्नांना वैज्ञानिक पुराव्याचा तसेच सिद्धांताचा आधार घेऊन सोडवण्याचा प्रयत्न या सदरातून मी करणार आहे. या सदरातून तुम्हा सर्व वाचकांना एक दृष्टिकोण देण्याचा प्रयत्न करणार आहे. दृष्टिकोण म्हणजेच त्या त्या विषयाचा सर्वागीण विचार करण्यास शिकवणार आहे. तुम्ही जसजसे उंचावर जाल तसतसा तुम्हाला तोच परिसर अधिक मोठा दिसतो, त्या पद्धतीचा.
‘अन्न, वस्त्र, निवारा’ या मानवाच्या
मूलभूत गरजा असल्यामुळे या सदरात पहिले काही लेख अर्थातच, अन्नासंबंधी असतील. उदा. आहार आणि विहार, श्रेयस आणि प्रेयस आहार, उष्ण आणि शीत पदार्थ, फूड अॅलर्जी अर्थात अन्नपदार्थाचा इन्टॉलरन्स, प्रीबायोटिक अन्नपदार्थ, खायचे रंग कितपत योग्य, ओव्हनमधले पदार्थ कितपत सुरक्षित आदी विषय स्वयंपाकघरातील विज्ञानाचा भाग असणार आहेत.
विज्ञानाच्या क्षेत्रात मी गेली चाळीस वर्षे कार्यरत आहे. या कारकीर्दीत आलेले अनुभव, त्यातून हाती घेतलेल्या प्रकल्पांमधून मला उमजत तसेच समजत गेलेलं विज्ञान, या सर्वाची चर्चा आपण ‘जीवन विज्ञान’ या सदरातून करणार आहोत.
तेव्हा नवीन वर्षांच्या आरोग्यदायी शुभेच्छा.
डॉ. स्मिता लेले हे नाव वैज्ञानिक म्हणून महाराष्ट्राच्या परिचयाचे आहे. १९७७ मध्ये ‘यूडीसीटी’मधून केमिकल इंजिनीअर झाल्यानंतर ‘हिंदुस्तान लिव्हर’मध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या स्त्री अभियंता आहेत. स्वयंपाकघरात विज्ञान, करिअर निवड व नियोजन यावर त्यांनी दूरदर्शन, रेडिओवर व्याख्याने दिली असून या विषयावरची त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. याशिवाय या विषयावर त्यांनी चित्रफितींची निर्मितीही केली आहे. त्यांनी लिहिलेले १२५ पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत, मास्टर्स व डॉक्टरेट करणाऱ्या शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या नावे २ पेटंट्स असून २०१६ मध्ये ‘उंच माझा झोका’ हा
‘झी मराठी’तर्फे दिला जाणारा सन्मान त्यांना मिळाला आहे. सध्या स्मिता लेले ‘रसायन तंत्रज्ञान संस्था मराठवाडा केंद्रा’च्या पहिल्या स्त्री संचालक म्हणून कार्यरत आहेत.