‘‘साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी सरकारी रुग्णालयाच्या भिंतीलगत आदिवासी पाडय़ातले, खेडय़ापाडय़ातले रुग्णाचे नातलग मुक्काम ठोकायचे. तीन दगडांची चूल मांडून जेवण बनवायचे. कधी तेल आहे तर मीठ नाही. मीठ आहे तर पीठ नाही अशी दैना! एक मुलगा जागोजागच्या पिठाच्या गिरणीतून सांडलेलं पीठ गोळा करायचा आणि त्यांना नेऊन द्यायचा. इथल्या नळावर बरेच वेळा पेठ जिल्हा वगैरे ठिकाणाहून आलेले आदिवासी कांद्याबरोबर नागलीची शिळीपाकी भाकरी खायचे. त्यावर गटागटा पाणी प्यायचे. त्यांची ही अवस्था पाहून यांच्यासाठी अन्नाची सोय करायला हवी या उद्देशाने  नाशिक येथील ज्येष्ठ नागरिक संघाने ‘अन्नपूर्णा’ योजना सुरू केली. त्यात आणि नंतर ‘मनोहर रुग्ण सेवा केंद्र’ सामील झाले. आज येथील शेकडो रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाची पाकिटं पुरवली जातात. ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केलेली ही चळवळ इतरांसाठीही आदर्शवत आहे.

जव्हार इथला एक आदिवासी पाडा. कुडाच्या झोपडीत राहणारे आदिवासी. सभोवती अठरा विश्व दारिद्रय़. राजेंद्र जोशी आणि इला जोशी भर उन्हात वस्तीवस्तीवर फिरून त्यांना धान्य, औषधं यांचं वाटप करण्यासाठी फिरतायत.. एवढय़ात एक काळा कृश मुलगा धावत त्यांच्यापाशी येतो. त्यांचा हात धरतो आणि प्रेमाने विचारतो, ‘वळखलं मला? मी निगल्या जोशी.’ ते क्षणभर गोंधळतात. तो सांगतो, ‘माजा बाप शिविलात व्हता. तवा रोज तुमी मला जेऊ घालायचा.’ जोडप्याच्या लक्षात येतं. नाशिक इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातलगांना जेवणाचं वाटप करायला ते जायचे. तिथल्या एका रुग्णाचा हा मुलगा! मुलगा हट्ट करून त्यांना प्रेमाने आपल्या झोपडीत नेतो. घरात सगळी भांडी उपडी, रिकामी. तो एका मुलाला दूरच्या वस्तीवर पिटाळतो. घोटभर दूध आणवून त्याचा चहा करतो. त्यांना आग्रहाने पाजतो. कल्हडमधल्या त्या चहाला अमृताची चव असते!

नाशिक इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नाशिकजवळचे आदिवासी पाडे, ग्रामीण वस्त्या इथून मोठय़ा संख्येने रुग्ण भरती होतात. त्यांच्यासोबत आलेले त्यांचे नातलग तिथेच मुक्काम करतात. गाठीशी असलेल्या चार पैशांतून ते वडापाव खातात. तेवढेही पैसे नसतील तर आपल्या नातलग रुग्णाने टाकलेलं अन्न खाऊन भूक भागवतात. पण आज हे चित्र पालटलंय. नाशिक इथल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रेरणेने या नातलगांसाठी ‘अन्नदान’ योजना सुरू झाली आहे. अन्नदानाच्या या कार्याची सुरुवात योगायोगाने झाली. नाशिक ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव के.पी. भालेराव जुन्या आठवणी जागवतात. ‘‘साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी या सरकारी रुग्णालयाच्या भिंतीलगत आदिवासी पाडय़ातले, खेडय़ापाडय़ातले रुग्णाचे नातलग मुक्काम ठोकायचे. ते दिवसरात्र इथेच राहायचे. तीन दगडांची चूल मांडायचे. झाडाच्या वाळक्या फांद्या, काटक्या जाळून जेवण बनावायचे. जेवण कसलं हो? तेल आहे तर मीठ नाही. मीठ आहे तर पीठ नाही अशी दैना! रमेश जाधव नावाचा एक मुलगा जागोजागच्या पिठाच्या गिरणीतून सांडलेलं पीठ गोळा करायचा आणि त्यांना नेऊन द्यायचा. हे सगळं पाहून आमचा जीव गलबलला.’’ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव तांबे सांगू लागतात. ‘‘इथल्या नळावर बरेच वेळा पेठ जिल्हा वगैरे ठिकाणाहून आलेले आदिवासी कांद्याबरोबर नागलीची शिळीपाकी भाकरी खायचे. त्यावर गटागटा पाणी प्यायचे. ते पाहून आमच्या डोळय़ात पाणी यायचं. यांच्यासाठी अन्नाची सोय करावी असं वाटू लागलं.’’ दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीद्वारे संचालित ‘मनोहर रुग्ण सेवा केंद्र’ही या कार्यात सहभागी झाले. एक से भले दो या न्यायाने ही सर्व मंडळी तेव्हापासून आजपर्यंत एकदिलाने ही ‘अन्नपूर्णा’ योजना यशस्वीपणे राबवत आहेत. रोज दुपारचे बारा वाजले की सिव्हिल हॉस्पिटलच्या दारातल्या झाडाखालच्या कट्टय़ावर डबे घेऊन येणाऱ्यांची वर्दळ सुरू होते. मोठमोठय़ा थैल्यांमधून व्यवस्थित बांधलेली पोळीभाजी व खिचडीची पाकिटे एकत्र केली जातात. नाशिक शहरातल्या वेगवेगळय़ा भागातल्या डबे संकलन केंद्रांमधून ही सर्व पाकिटं गोळा केलेली असतात. ज्येष्ठ नागरिक संघ व मनोहर रुग्ण सेवा केंद्राचे कार्यकर्ते वॉर्डावॉर्डात ही पाकिटं घेऊन फिरतात. रुग्णाबरोबर असलेल्या नातलगाची आस्थेने चौकशी करतात. मळलेल्या कपडय़ातले, रखरखीत केसांचे हे वाडय़ा-वस्त्यांवरचे नातलग अचूक ओळखून त्यांच्या हातात ही अन्नाची पाकिटे दिली जातात. अन्न देत असतानाच ते रुग्णाची चौकशी करतात. त्यांना धीर देतात. त्यांना गरज पडल्यास औषधं व कपडेसुद्धा पुरवतात. रक्ताच्या बाटल्यांची सोय करतात. वेळ पडल्यास रुग्णालयातून गावी पाठवण्याची व्यवस्थासुद्धा करतात. रोज आळीपाळीने दहा ते बारा कार्यकर्ते स्वत:ची कामे सांभाळून विनामूल्य ही सेवा करतात.
राजेंद्र जोशी सुरुवातीचे दिवस आठवत सांगू लागतात, ‘आम्ही हे काम सुरू करण्यापूर्वी आधी खूप दिवस या सरकारी रुग्णालयातून फिरलो. सर्वेक्षण केलं. सिव्हिल सर्जनना भेटलो आणि मगच हे काम सुरू केलं. भालेराव सांगतात, ‘सुरुवातीला आडगावचे एक गृहस्थ पाच रुपयांत भाजी-पोळी, वरणभात देत असत. त्यांच्या गाडीवरून आम्ही हे अन्न घेत असू. आमचे अनेक सदस्य त्यासाठी पैशांची सोय करत. पण पुढे लगतचे रिक्षावाले, ट्रक ड्रायव्हर तिथे गर्दी करू लागले आणि मग आम्हाला जेवण मिळेनासं झालं. पुढे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्वसाधारण सभेत हा विषय आम्ही मांडला व घरोघरच्या गृहिणींना किमान एका तरी माणसाचा डबा द्यावा अशी सूचना देण्यात आली.’’ इला जोशी म्हणतात, ‘या सूचनेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आम्हाला असं वाटत होतं की हे अन्न घरच्या गृहिणीने बनवलं तर ती त्यांत आपला जीव ओतते. ते प्रेमाने शिजवते. तिच्या घरचा पुरुष तो डबा घेऊन केंद्रावर येतो. एकूणच संपूर्ण कुटुंब या कामांत मनापासून गुंततं आणि त्या अन्नाला अमृताची चव येते. त्यामुळे ते अन्न खाणाराही तृप्त होतो. पुढे निवृत्तिधारक ज्येष्ठ, विविध आस्थापनांतील लोकं स्वेच्छेने या कार्यात सामील झाले.’’
अर्थात त्यासाठी काही कडक नियम केले गेलेत. सर्वच केंद्रांत दुपारी बारापूर्वी जेवण पोहोचलं पाहिजे. ते प्लॅस्टिकच्या पिशवीत व्यवस्थित बांधलेलं असावं. अन्न ताजंच हवं. तसंच त्यात विविधता हवी. चार पोळय़ा, सुकी भाजी, पिठलं, चटणी, लोणचं असं स्वीकारलं जातं. अनुभव असा की हळूहळू या अन्नपूर्णा योजनेची माहिती मिळताच लोकं स्वत:हून वाढदिवस, लग्नसमारंभ, वर्षश्राद्ध, दशक्रिया विधी या निमित्ताने इथे अन्नदान  करू लागले. दहा डब्यांपासून सुरू झालेली ही सेवा शेकडो लोकांना डबे पुरवू लागली तरी आजही ती अपुरी पडते. अशावेळी कार्यकर्ते आठवणीने ज्याला आदल्या दिवशी अन्नाचं पाकीट मिळालेलं नसतं, त्याला दुसऱ्या दिवशी प्राधान्य देतात व लोकांचा दुवा घेतात.
ज्येष्ठ नागरिक संघाचे ओळखपत्र मिळवून देणे हे एक काम आहे. केंद्रावर ६० वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र नेण्यास येतात. त्यांना ‘अन्नपूर्णा’ योजनेबद्दल कळताच ते स्वेच्छेने ५० रुपये, १०० रुपये देतात. ही अल्प मदतसुद्धा रुग्णांच्या नातलगांसाठी बहुमोल ठरते. ही रक्कम विकास माकुणे व विद्या माकुणे गोळा करतात व त्यातून सुंदर नारायण मंदिरासमोरील खाजगी ट्रस्टच्या मेसमधून अन्न बनवून ते रुग्णांना पुरवले जाते. ही सेवा देत असताना विकास माकुणे व त्यांच्या सहकारी भगिनी प्रत्येक रुग्णाच्या नातलगाकडे जाऊन ‘तुला डबा हवा का, तू जेवलास का’ अशी प्रेमाने चौकशी करतात. रुग्णासोबतच्या स्त्रियांना कोणतीही अडचण भासल्यास ती या स्त्रियांच्या कानांवर घालतात व त्यासुद्धा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. आज अनेक संस्था स्वेच्छेने यात सहभागी होत असल्याने, अनेक कार्यकर्ते आवर्जून त्यासाठी वेळ काढत असल्याने हा उपक्रम दिवसेंदिवस व्यापक होत चालला आहे.
अर्थात कधीमधी या उपक्रमाला गालबोट लागण्याची वेळ येते. रुग्णाला पैसे देऊन सोबत करणारा एखादा गरजू नसणारा माणूस अन्नाचं पाकीट मागून घेतो. त्यामुळे रुग्णाच्या गरजू नातलगावर उपाशी राहण्याची वेळ येते. ‘पण असे क्वचितच घडते.’ रुग्णांना अन्नाची पाकिटे देण्यासाठी जड पिशव्या घेऊन चार-चार जिने चढून, उतरून आलेले विकास माकुणे क्षणभर विसावतात व सांगू लागतात. ‘या ठिकाणी येणारे बहुतेक रुग्ण अत्यंत दुर्गम भागातल्या वस्त्यांमधले गरीब लोकं असतात. ते पंधरा-पंधरा किलोमीटर पायी चालत येतात. त्यांना अंगावर पांघरायला कपडा नसतो. पायांत पायताण नसतं. उन्हातान्हात अनवाणी चालत येताना ते खांद्यावर त्याच्या कोंबडय़ा, बकऱ्या घेऊन येतात. बुधवारच्या बाजारात ते विकून त्यातून औषधं घेतात. पावसाळय़ात भातशेती, नागली पिकवली की वर्षभर त्यांची पोटं उपाशी! इथे त्यांच्या जवळच्या नातलगाला भरती केलं की त्यांची पोटं उपाशी! पण आज ‘अन्नपूर्णा’ योजनेमुळे ही माणसं दोन घास जेवतात.
रुग्णाची सेवा करण्याचं त्यातून त्यांना बळ येतं. म्हणूनच बारा वाजले की ते आमची चातकासारखी वाट बघतात. दोन पाय व एक हात गमावलेला एक मुलगा आणि त्याची आई आमचं स्वागत इतकं प्रसन्न हसून करायची की आमच्या डोळय़ांत पाणीच यायचं! आम्ही आज त्यांची भूक भागवत असलो तरी आमची इच्छा आहे की त्यांनी अन्नासाठी लाचार होऊ नये. उलट उद्या दोन पैसे मिळवले तर त्यांनी इतरांसाठी आपल्या घासातला घास द्यावा, इतकच!’  
अन्नपूर्णा योजनेसाठी आर्थिक वा अन्य मदत करायची असेल ते यांना संपर्क साधू शकतात.
-उत्तमराव तांबे-०९३७१५२१२७०, विकास माकुणे- ०९४२२०४८३२८
द्वारा : सिव्हिल हॉस्पिटल, ओपीडी गेटसमोरील प्रतीक्षालय.
 त्र्यंबक रोड, नाशिक.

Story img Loader