स्वयंपाकघर म्हणजे स्त्रीचा हळवा कोपरा. तिच्या साऱ्या सुखदु:खांचं एकजीवीकरण जिथे होतं ते घराचं केंद्रस्थान. लहानपणापासून अगदी वार्धक्यापर्यंत कुठल्या न् कुठल्या प्रकारे स्त्रीचं या स्वयंपाकघराशी नातं असतंच. याच सर्व जाणिवांचं प्रगटीकरण करणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त धीरुबेन पटेल यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांनी अनुवादित केलेल्या ‘किचन पोएम्स्’ या काव्यसंग्रहाविषयी.
‘केवढी मजा असायची तेव्हा
स्वयंपाकघरातच बसायचं जमिनीवर मांडी ठोकून
हसायचं, खिदळायचं, बडबड करायची..
..धूसर होत चालल्या आहेत आठवणी..
तरीही लपेटून आहेत, आयुष्याला
तलम धाग्यांच्या कोळ्याच्या जाळ्यासारख्या
आईचं ते हसू
अजून रेंगाळत राहिलंय त्या विरळ धाग्यांमध्ये’
असा कौटुंबिक सुखाच्या जरतारी आठवणीत गुंफलेला, तरीही संयत उदास सूर व्यक्त करणं असो, की नर्मविनोदी आणि मिस्कील अनुभव व्यक्त करणाऱ्या या ओळी – ‘नाही आवडत मला कुणी माझ्या स्वयंपाकघरात आलेलं
ती मदतही नको नि ती शेरेबाजीही नको..
..माझं स्वयंपाकघर फक्त माझ्यासाठी
मी आटपत असताना
नो घुसखोरी..इन माय किचन’..
अशी स्वामित्व हक्काची जाणीव करून देणारं कडवं असो, ते व्यक्त करण्यासाठी आधार घेतला गेला आहे तो स्वयंपाकघराचा, तोही कवितांच्या माध्यमातून. स्त्रीचं स्वयंपाकघर म्हणजे प्रत्येक स्त्रीचा हळवा कोपरा असतो. तोच मध्यभागी ठेवून तयार झाला आहे एक संपूर्ण शंभर कवितांचा संग्रह ‘किचन पोएम्स्’. साहित्य अकादमीसारखा भारतीय पातळीवरील मानाचा पुरस्कार लाभलेल्या धीरुबेन पटेल या प्रतिभासंपन्न कवयित्रीच्या या इंग्रजी भाषेतील शंभर कविता तितक्याच सहजतेने मराठीत आणल्या आहेत ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांनी.
स्त्री, स्वयंपाक आणि स्वयंपाकघर हे या कवितासंग्रहाचे निमित्त आहे. तो एक परिप्रेक्ष आहे. त्या परिप्रेक्षातून दिसणारे हे स्त्रीचे जीवनदर्शन आहे. त्यात बहिरंगाबरोबर तिचे अंतरंगही आलेले आहे. यात तिच्या विविध अनुभवांची, संवेदनांची, नात्यांची, घटनाप्रसंगांची रमणीय गुंफण आहे. तिच्या भावजीवनाशी निगडित अशा विविध रंगच्छटांचा हा काव्यमय गोफ आहे. तिच्या विविध अवस्थांतरांच्या अनुषंगाने स्त्री मनाचा एक संपूर्ण स्पेक्ट्रमच इथे कवितांच्या निमित्ताने हळुवारपणे उलगडला आहे. म्हणूनच धीरुबेन यांच्या अस्सल रसिक नजरेने आणि जातिवंत प्रतिभेने आपसाला केलेला विषय ‘किचन पोएम्स्’मधून वाचताना हे ओळखीचे, नेहमीचे, आवडीचे जग किती काव्यमय आहे याची जाणीव होत जाते. एखाद्या सुग्रणीने एखादा पदार्थ सहजच करावा आणि तो चविष्ट व्हावा अशी सहजता या सगळ्या अनुवादित कवितांमध्ये भरून राहिली आहे आणि म्हणूनच,
‘यातून घेतलं थोडं काही नि घेतलं थोडंसं त्यातूनही
खरं तर तंद्रीत होते विचारांच्या..
..तर त्यांनी कृती विचारली,
पदार्थाचं नाव विचारलं
मी बाई काय सांगणार..
बस्, थोडंसं हे अन् थोडंसं ते..’
असा उत्तम कलाकृती सहजगत्या निर्माण झाल्याचा भास निर्माण करणारा ‘किचन पोएम्स्’चा निरासक्त भाव तिच्या या मराठी अनुवादातही भरून राहिला आहे.
‘किचन पोएम्स्’मधून स्त्री-जाणिवा प्रकट झाल्या असल्या तरी रूढ अर्थाने ही स्त्रीवादी कविता नाही. शिवाय इथे कोणताही पक्ष, झेंडा, रंग नाही. आहे ते स्त्रीच्या अवतीभवतीच्या जगाचे निरीक्षण, भावदर्शन आणि मतप्रदर्शन, तेही हसतखेळत, जाता जाता केलेले. यातील कवितांना खास हलकाफुलका, नर्मविनोदी, मिस्कील स्पर्श आहे. उदा. तयार डबाबंद पदार्थ हे गृहिणीचा वेळ वाचवतात हे खरं, पण त्यामुळे एक गडबड होते.
‘.. पण ही शर्यत
माझ्या हातांमधलं कौशल्य पुरतं नष्ट करते
समाधानही ओरबाडून घेते माझ्या मनाचं’
अशी चुटपुटही व्यक्त होते. या संग्रहातील काही कवितांमधून एक कालसुसंगत सूत्र गोवत स्त्रीचा सगळा जीवनप्रवास रेखाटता येतो. अर्थात स्त्री-जीवनातील अवस्थांतराचा हा निव्वळ पद्यरूपातील आढावा वा रूक्ष लेखाजोखा नाही, तर इथे जिवंत, स्पंदनशील असा रसरसता जीवनानुभव आहे. उदा. सुरुवातीच्या कवितेत बालपणीची सुखद आठवण आहे.
‘आम्ही तिच्या घरी गेलो
साधंसं छोटंसं घर
घराच्या मध्यभागी स्वयंपाकघर
सगळं कसं आनंदी आणि हसरं
आई काही तरी करण्यात गुंतली होती..
डोळ्यात एक चमक तिच्या नि गाल जरासे लाल झालेले
किणकिणत्या आवाजात खोटंखोटं रागावली आम्हांला
मग ठेवलं पुढय़ात काही तरी ताजंताजं खायला
अर्थात चहाही आलाच’
पुढे वाढीच्या वयात भूक अनावर झाल्याने अपरात्री स्वयंपाकघरावर टाकलेला छापा आणि त्या वेळच्या स्वयंपाकघराचे गूढगहिरं रूप आहे. मग यथावकाश प्रेमात पडल्यावर स्वप्नीच्या राजकुमाराने विचारलेला, ‘‘स्वयंपाक येतो ना तुला?’’ हा वरकरणी हसत हसत विचारलेला प्रश्न आणि त्याबरोबर उडालेली भंबेरी आहे. मुलाबाळांच्या सहलीसाठी तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करून दमलेली आई, भाजीवाल्याशी घासाघीस करून स्वस्तात भाजी मिळवण्याचा पराक्रम करणारी व त्यामुळे आनंदून जाणारी संसारदक्ष गृहिणी, आपल्या छोटुकल्याला मधल्या वेळच्या डब्यासाठी रोज नवा वेगळा खाऊ देणारी वात्सल्यमय आई, रांगत्या बाळाला स्पेशल फूड करून भरवणारी आई, घरात सूनबाई आल्यानंतर आपल्या स्वयंपाकघराच्या अधिसत्तेत तिला वाटा न देणारी सासू, वाढत्या वयाच्या मोठय़ा लेकाचे शिगोशिग भरलेली भांडी रिकामी करणं आणि नंतर त्याने चवींबाबत केलेल्या तक्रारी कौतुकाने सांगणारी प्रेमळ आई, वयात आलेल्या लेकीचं डायटिंगचं वाढतं फॅड समजून घेणारी समंजस माता, घरातल्या आजारी व्यक्तीसाठी काळजीपूर्वक पथ्याचं खाणं बनवणारी मायाळू आई, लाडक्या लेकीच्या मत्रिणींनी सुट्टीत स्वयंपाकघरावर केलेला हल्ला आणि नंतरचा पसारा न आवरताच त्यांनी काढलेला पळ कौतुकाने सांगणारी आई, अशा घरगुती नात्यांत गुरफटलेल्या विविध स्त्रीची अनेक सुखचित्रे ‘किचन पोएम्स’ रेखाटते.
या कवितांचा आवाका मोठा आहे. त्यात नात्यांच्या प्रगटीकरणाबरोबरच संस्कृतिदर्शनही घडते. सण-वार परंपरापालन, रीतिरिवाज या स्त्री-जीवनाशी निगडित बाबीही त्यातून सहजीच आल्या आहेत, तर कधी मंद निखाऱ्यात घातलेल्या कणसांच्या खरपूस वासाने घमघमलेल्या स्वयंपाकघरात चिल्ल्यापिल्ल्यांचा गोड गोंगाट आणि त्यांचे लुकलुकणारे डोळे नाहीत, म्हणून वाटणारी खंत आहे. कधी सुट्टीत इटालियन, मेक्सिकन, चायनीज असे सगळ्या प्रकारचे जेवण जेवल्यानंतर घरच्या साध्या आमटीभाताच्या चवीची थोरवी आली आहे. कधी शेतावर काम करणाऱ्या नवऱ्यासाठी शिदोरी घेऊन जाणारी नवोढा आहे, तर कधी शेतात उंधियोदिनानिमित्ताने जमलेल्या सगळ्यांचा मोकळ्या आकाशाखाली झालेला संवाद आणि त्यांच्या रंगलेल्या गप्पा-गाणी यांच्यासह साजरा होणारा अन्नब्रह्माचा उत्सव आहे. कधी घरातले सगळे गच्चीवर पतंगाच्या काटाकाटीत गर्क असताना थोडय़ा थोडय़ा वेळाने त्यांना सुंदर चवीचे गरमागरम पदार्थ करून पाठवणारी हौशी गृहिणी आहे. या सगळ्यांत अनुस्यूत असणारे अस्सल भारतीय मूल्य आणि त्यांचे संस्कृतीशी असलेले घट्ट नाते पाहता या सगळ्या कवितांना आपल्याही आठवणींचे स्मृतीरम्य संदर्भ मिळत राहतात आणि कविता अधिकाधिक आपली वाटू लागते.
कोणत्याही घराचं स्वयंपाकघर हे इतर खोल्यांप्रमाणे सामान्य नाही, ते घराचा मूलाधार, केंद्रस्थान आहे याची जाणीव देणाऱ्या यातील काही कविता खास आहेत.
‘ज्याच्याभोवती निर्माण होतो समाज
समाज म्हणजे, सुसंस्कारांचं अधिष्ठान
सुसंस्कारांमुळेच निर्माण होते एक प्रबळ संस्कृती
संस्कृतीमुळे समाजविकास
आम्हांला अत्यंत अभिमान असतो आमच्या संस्कृतीचा’
स्वयंपाकघरातील स्त्रीही साक्षात अन्नपूर्णा रूपाने वावरते, सगळ्या कुटुंबाची काळजी घेते, सांभाळ करते हा भावही यात आलेला आहे. तसेच कोणताही पदार्थ उत्तम होण्यासाठी नुसती सामग्री महत्त्वाची नसून त्यासाठी मनात काठोकाठ प्रेम असले पाहिजे हा भावही इथे आलेला आहे. तसेच स्वयंपाक ही एक निर्मिती असून चित्रकार, शिल्पकारादी अनुभवतात त्या प्रकारचा नवनिर्मितीचा थरार त्यातही आहे हे इथे आवर्जून सांगितले आहे.
एक व्यक्ती म्हणून असलेले स्वातंत्र्य आपणच जपायचे आहे याचे भान देणाऱ्या काही कविता इथे आहेत. तिला स्वयंपाकाचं काम मनापासून जरी आवडत असलं तरी,
‘मात्र हुकूम नाही करायचे तुम्ही मला
सगळ्यांनी एकत्र राहायचं आपण
प्रगती करायची आपापल्या क्षेत्रात
असंही म्हणायला ती कचरत नाही. समानतेच्या या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून वावरताना तिचे स्त्रीत्व कधी फुलतेही, पण बरेचदा ते कोमेजतेही. रोजच्या धबडग्यात बरेचदा तिची स्वप्नं विरून गेलेली असतात. यामुळे कधी तिला स्वयंपाकघर हा एक प्रकारचा तुरुंगच वाटतो, मग तो कितीही उजेड असलेला, प्रशस्त आणि छान असला तरी! म्हणूनच इथे एकाकी स्वयंपाकघराला निळेशार पडदे लावण्याचा मनोदय बोलून दाखवला गेला आहे आणि मग,
‘पांढरे पक्षी चितारणार आहे
त्यांच्यावर पंख फैलावलेले..’
हे पक्षी वाऱ्याच्या झुळकीसरशी पंख फडफडतील आणि पडदे जीर्णशीर्ण होऊन नाहीसे होईपर्यंत तिची सोबत करतील हा भाव आला आहे.
आजच्या अनेक आधुनिक, सुशिक्षित, पुरोगामी विचारांच्या स्त्रीसाठी दैनंदिन घरकाम हे कंटाळवाणे तसेच घरात अडकवणारे वाटते ही वस्तुस्थिती आहे. त्याचीही दखल ही कविता घेते. स्वयंपाकघर सांभाळणारी घरगुती गृहिणी म्हणजे ‘बावळट बाई’ असा एक साधारण समज असतो. एका कवितेत या कल्पनेने छेद दिला गेला आहे.
‘तर महाशय,
गरसमज आहे तो तुमचा
मला अगदी व्यवस्थित जाणीव असते
माझ्या जगाभोवती
उलटसुलट वाहणाऱ्या नि उसळणाऱ्याही प्रवाहांची’
याशिवाय तिला जागतिक राजकारण, उद्योगधंदे, पीकपाणी, आंतराराष्ट्रीय व्यापार, तद्नुषंगिक तडजोडी, भारतीय रुपयाचे अवमूल्यन वा त्याचा वधारणारा भाव, जगभरातील लढाया, हवामानातील बदल व त्याचे परिणाम यांसारख्या बाबींचे अद्ययावत ज्ञान आहे, कारण या सगळ्याचा परिणाम शेवटी तिच्या स्वयंपाकघरावर होणार असतो हे सांगून या स्वयंपाकघराचे माणसाच्या जीवनात असणारे महत्त्व आणि त्याचे मध्यवर्ती स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
रसरशीत जीवनसन्मुखता आणि आनंदी मनमोकळेपणा हा या कवितांचा वृत्तिविशेष आहे. खिडकीच्या कट्टय़ावर ठेवलेल्या तुळशीजवळ असलेल्या कोिथबीर, पुदिना, कढीिलब या स्वयंपाकाशी निगडित असलेल्या वनस्पतींच्या कुंडय़ांच्या योगाने स्वयंपाकाबरोबरच तिचे भावजीवनही रसरशीत, स्वादिष्ट होऊन जाते. कधी स्वयंपाकघर म्हणजे रंगदंगल होऊन जाते. रंगीबेरंगी भाज्या तिची नजरबंदीच करून टाकतात. कधी पहिली हिरवी कैरी नजरेला पडते आणि या कैरीबाईंच्या हिरवाईने स्वयंपाकघर उजळून निघते, तिच्या दशावतारापेक्षा अधिक अवतारात अवतरणाऱ्या पाककृती, त्यांचे आंबट-गोड स्वाद मनात फेर धरू लागतात. कधी प्रवासातून घरी परतल्यावर पातेली, सतेली, तवे, कढया, डबे, बरण्या, ताटं नि वाटय़ा या तिच्या आवडीच्या नेहमीच्या वस्तूंना जिथल्या तिथं बघून तिला होणारा आनंद आहे.
एखाद्या कसबी चित्रकाराने मोजक्याच रेषांनी एखादं चित्र साधावं तशा प्रकारची मोजक्याच शब्दांनी रंगविलेली आठवणींची क्षणचित्रेही इथे फार बहारदार उतरली आहेत. उदा. उंधियोदिन म्हणजे हिवाळी वातावरणाला, मोकळ्या आभाळाखालच्या शेतातील रंगगंधनादाला मनातल्या उत्फुल्लतेने दिलेली सलामीच. ही आनंदपर्वणी तशाच खेळकर शब्दशैलीतून जीवनानंद घेऊन कवितारूपाने अवतरली आहे. उदा.
‘सगळेजण बसलेले असतात भोवती गोल धरून
गप्पा मारतात, गाणी म्हणतात
यथावकाश हंडी पुकारते,
‘होऽ गयाऽऽ!’
उतरवायची हंडी विस्तवावरून
थांबायचं, जराशी निवेपर्यंत
एकदा का उघडलं झाकण
ऐकायला येणारच सर्वाचा, ‘आ: हाहाऽ!’
डोंगरी मुलखातील स्वयंपाकघरापासून शाही मुदपाकखान्यापर्यंत आणि अंतराळातील स्वयंपाकघरापासून जगन्नाथाच्या भोजनालयापर्यंतच्या स्वयंपाकघरांची विविधता ही कविता कवेत घेते. मुलांच्या वसतिगृहातील स्वयंपाकघर, सामुदायिक स्वयंपाकघर तसेच पवित्र तीर्थक्षेत्री लाखो भाविकांसाठी भोजन बनविणारी, एका रात्रीत उभारलेली स्वयंपाकघरंही इथे आलीत. प्रसादाच्या पवित्र भोजनापासून शिळासप्तमीच्या शिळ्या अन्नापर्यंतच्या अन्नब्रह्माचा परामर्श ही कविता घेते. सुजातेच्या अन्नामुळे मरणासन्न बुद्धाला जीवदान मिळाले आणि आपल्याला बुद्ध. ही अन्नाची महतीही ती सांगते. आमटी-भाजीत मीठ घालताना तिला दांडीयात्रा आठवते आणि
‘सामान्य माणसाचा
सागरलाटांपर्यंत पोचून, मीठ मिळविण्याचा हक्क
अबाधित राहावा यासाठी त्यानं लाठीमार सोसला होता
कारावास भोगला होता’
अशी महात्मा गांधींची आठवणही काढते.
अशी ही रसपूर्ण कविता चांगलाच रुचिपालट घडविते. पदार्थाचा दरवळ खिडकी ओलांडून बाहेर जावा आणि त्याने खवय्यांना साद घालावी तसे इथे झाले आहे. आशयाच्या बाबतीत तर त्या स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडून बाहेरच्या जगात कुठल्या कुठे गेल्या आहेतच, पण भाषिक खिडकी उघडूनही त्या मराठी रसिकांच्या मनात या संग्रहाच्या निमित्ताने डोकावत आहेत.
अखेरीस विचार अनुवादाचा. मुळात अनुवाद म्हणजे भाषांतर नव्हे. वेगळ्या भाषेतून प्रकटलेल्या मूळ कलाकृतीतील मर्म समजून घेऊन, आधी ते आपलेसे करून, स्वत:मध्ये मुरवून मग पुन्हा आपल्या मातृभाषेतून त्याची पुनíनर्मिती घडवावी लागते. स्वत: उत्तम कवयित्री असणाऱ्या उषा मेहता यांनी ही कामगिरी उत्तम रीतीने पार पाडली आहे. दैनंदिन वापरातील साधी सोपी प्रत्ययकारी भाषा हे तिचे बलस्थान आहे. मूळ इंग्रजी ‘किचन पोएम्स्’चे प्रस्तावनाकार, ‘रॉयटर’चे संपादक पीटर डी ओनील यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे धीरुबेन यांच्या शब्दांत केवढा तरी खजिना लपला आहे. आता तो मराठी रसिकांसाठी या संग्रहाच्या निमित्ताने खुला झाला आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे या शंभर कविता म्हणजे स्वयंपाकघर आणि त्यात तयार होणाऱ्या अन्नब्रह्माचा उत्सवच आहे.
मूळ इंग्रजी ‘किचन पोएम्स’चे प्रकाशक आणि विख्यात गुजराती साहित्यिक श्री. सुरेश दलाल यांनी मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे या कवितांमधील ‘युनिव्हर्सल अपील’मुळे काव्यजगतासाठी ही अनमोल भेट असणार आहे हे नि:संशय. नुकत्याच जर्मन भाषेत अनुवादित झालेल्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन ‘मौज’ने त्यांच्या नावलौकिकाला साजेशा दर्जाने केले आहे.
स्वयंपाकघर आत्तापर्यंत अनेक कवयित्रींच्या काव्यांतून फक्त डोकावत होतं. या संग्रहामुळे असं म्हणता येईल की, स्वयंपाकघरातूनच काव्य डोकावताना दिसत आहे. एका स्वयंपाकघराचे हे नानाविध कंगोरे कविताचा रसास्वाद वाढवतात एवढं नक्की.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा