चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे हजारो पलू आहेत. आत्मविश्वास, विचारीपणा, गांभीर्य, सर्जनशीलता या सगळय़ांचे संस्कार आपल्यावर होत राहतील यासाठी प्रयत्न करायचा. संस्कार शिकवता येत नाहीत. ते नेणिवेत असतात. सवयी, शिष्टाचार शिकवता येतात ते जाणिवेत असतात.
लहानपणी म्हणजे आठवी-नववीत असताना एका वक्तृत्व स्पध्रेसाठी ‘चारित्र्य संवर्धन हेच खरे शिक्षण’ असा विषय होता. त्याचा अर्थ तेव्हा मला कळलाच नव्हता. आता मला कळतं ते असं की, झाडाची पानं आणि मुळं यांचा जो संबंध आहे तोच चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व यांचा आहे. व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्व बाहय़ गोष्टी. आपण दिसतो कसे, इतरांशी वागतो कसे, बोलतो कसे, आपली कामं आपण तत्परतेनं करतो का? ती आनंदानं करतो का? आपलं इतर माणसांशी नातं कसं असतं? आपण बोलतो तसं वागतो का? हा सर्व झाला वरच्या पानांचा पिसारा. हा पिसारा अर्थातच सुंदर दिसतो, पण तो जोडलेला असतो ‘मुळांशी’. मुळांनी झाडाच्या खोडाला किंवा पानांपर्यंत पाणी दिलं नाही, तर हा पिसारा आकर्षक कसा दिसेल? माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं सौंदर्य ही मुळं ठरवतात. माणसाच्या मनातली शांती, प्रेम, समाधान, विचार, प्रगल्भता त्यांचं व्यक्तिमत्त्व ठरवतात. शिवाय एक अस्वस्थताही मनात असावी लागते. या अस्वस्थतेला कुणी तरी दैवी म्हटलं आहे. ती माणसाला आकार देत असते. कलावंत, शास्त्रज्ञ, साहित्यिक आणि सर्वच सर्जनशील माणसांच्या मनात ही अस्वस्थता कार्यरत असते.
एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना त्याला शारीरिक श्रमांची किती सवय आहे हे बघावंच असं वाटतं. विनोबा म्हणत, ‘‘व्यायामाने स्नायू तयार होतात, पण शारीरिक श्रमांनी नसा (नव्‍‌र्हज्) तयार होतात.’’ त्यामुळे सहनशक्ती वाढते, धीर वाढतो आणि समजही वाढते. एकदा आमच्या संस्थेत सुतारकाम चालू होते. मोठय़ा मुलांना आम्ही म्हटलं, तुम्ही छोटी स्टुलं रंगवणार का? ती आनंदानं हो म्हणाली. मात्र सुतारकाकांनी रंगवण्यापूर्वी स्टुलं घासायला सांगितली. दोन दिवस स्टुलं घासल्यावर मुलं म्हणाली, ‘‘बरं झालं आम्ही हे काम केलं. आता कळलं त्या काकांना किती त्रास होत असेल?’’ प्रत्यक्ष अनुभवातून दुसऱ्यांच्या कष्टांची ‘किंमत’ कळणं हे फार महत्त्वाचं आहे. माणसाला जमिनीवर आणणारा हा अनुभव आहे.
याबाबतीत कऱ्हाडच्या घळसासी सरांनी सांगितलेले दोन प्रसंग मला नेहमी आठवतात. एकदा त्यांनी नववीतल्या मुलींना म्हटलं, ‘‘उद्या आपण सहलीला जाऊ या. बरोबर भरपूर डबा, प्यायचं पाणी घ्या. उन्हाचे दिवस आहेत छत्र्या घ्या.’’ मुली सकाळीच जमल्या. सर त्यांना जवळच्या रोजगार हमीच्या कामावर पाझर तलावावर घेऊन गेले. तिथे त्यांनी पाहिलं, आपल्याच वयाच्या मुली उन्हात माती वाहतायत, घामानं भिजून जातायत. पाण्याचीही सोय नाही. आधी त्यांनी छत्र्या मिटल्या. सरांनी या मुली कशा रोज मजुरी मिळाली की पीठ, कांदे, तेल घेऊन घरी जातात, स्वयंपाक करतात ते सांगितलं. मुली म्हणाल्या, ‘‘आम्ही आज यांच्याबरोबर डबे खातो.’’ जेवणाच्या सुटीत मुलींनी जोडय़ा केल्या. त्या मुलींना आग्रहानं जेवण दिलं, गप्पा मारल्या आणि श्रमसंस्कार कायमचा मनावर कोरून परत आल्या.
संवेदनक्षमतेच्या संदर्भात आणखी एक प्रयोग सरांनी केला होता. त्या काळी वर्गात बेडूक कापून दाखवत असत आणि तास संपला, की तो बेडूक तिथेच कचरापेटीत टाकून जात. सर एकदा म्हणाले, ‘‘हा बेडूक वर्गात आला तेव्हा कसा होता?’’
‘‘छान टुणटुणीत होता. आमच्याकडे पाहात होता.’’
‘‘मग आपण त्याचं काय केलं?’’
‘‘त्याला मारलं.’’
‘‘कशासाठी?’’
‘‘आपल्याला विज्ञान शिकायचं होतं ना!’’
‘‘म्हणजे त्याने आपल्या ज्ञानासाठी त्याचा जीव गमावला.’’
‘‘हो.’’
‘‘मग त्याला आपण कचऱ्यात टाकायचं का?’’
‘‘नाही. आम्ही झाडाखाली खड्डा करतो, त्यात त्याला ठेवू या आणि वर सदाफुलीचं रोप लावू या. म्हणजे नेहमी त्याची आठवण येईल.’’ सरांना हेच हवं होतं, ते मुलांनीच सांगितलं. हे लक्षात आणून दिलं नसतं तर मुलांनाही जाणवलं नसतं!
अलीकडे आपल्या मुलांना धीर धरवत नाही. काही हवं असलं तर ते आत्ता, इथेच, ताबडतोब लागतं. थांबायची तयारी नसते. एक वडील मुलासाठी रोज संध्याकाळी येताना खाऊ आणत. तो लगेच त्याच्या हातात देत आणि सांगत, ‘‘स्वयंपाकघराच्या कपाटात ठेव. उद्या सकाळी खा.’’ मुलगा तसं करायचा आणि या एका गोष्टीने त्याला वाट पाहायला, धीर धरायला शिकवलं.
शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकास करणं हा मानला जातो. पालकांना आणि शिक्षकांना ही केवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे! हा विकास घडता-घडता मुलांचा आत्मविश्वासही वाढायला हवा, प्रगल्भताही अंगी निर्माण व्हायला हवी आणि मूल संपूर्ण स्वावलंबी व्हायला हवं.
शिकणाऱ्या, वाढणाऱ्या मुलाला अनेकदा रोपाची उपमा दिली जाते. शिक्षक किंवा पालक माळी असतात. माळी फुलं निर्माण करू शकत नाही. तो रोपाला नेमकं पाणी देऊ शकतो, उन्हापासून संरक्षण करू शकतो, खत घालू शकतो, रोप आपलं आपणच वाढतं आणि त्याला ज्या रंगाची, ज्या सुवासाची फुलं यायची तीच येतात. हे खत, पाणी, ऊन, सावली म्हणजे मुलाला आपण द्यायचे अनुभव असतात. हे लहानपणीच करावं लागतं. मोठी होतील तसतशी मुलं आपली आपलीच शिकत असतात. आपण त्यांना शिकवू लागलो, तर त्यांची शिकण्याची संधी आपण हिरावून घेतो असं होईल. जगणं आणि शिकणं या दोन वेगळय़ा गोष्टी नाहीतच. त्या एकत्रच असतात.
अशा जगण्या-शिकण्यातूनच माणसाच्या अंगी प्रश्न सोडवण्याची क्षमता निर्माण होते. प्रश्न समोर आला की, गोंधळून जाणारी माणसंही असतातच. एक प्रश्न असला तरी त्याला दहा उत्तरं असू शकतात हे माहीत हवं. त्यांच्यापर्यंत पोचण्याचे मार्ग कसे शोधायचे हे सुचायला हवं. मुलांच्या वाढीसाठी त्यांच्याभोवती विश्वासाचं, प्रेमाचं, मत्रीचं सुरक्षित वातावरण हवं. पालक, शिक्षकांचा स्वत:वर विश्वास असला तर ते मुलांनाही विश्वासानं वागवतील.
चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे हजारो पलू आहेत. किती म्हणून मोजत बसणार? आत्मविश्वास, समतोल, सच्चेपणा, साधेपणा, नम्रता,आनंदी वृत्ती, बुद्धिमत्ता, विचारीपणा, गांभीर्य, सर्जनशीलता या सगळय़ांचे संस्कार होत राहतील यासाठी प्रयत्न करायचा; पण संस्कार खरं म्हणजे शिकवता येत नाहीत. ते नेणिवेत असतात. सवयी, शिष्टाचार शिकवता येतात ते जाणिवेत असतात. जे काही शिकायचं त्याच्या भोवताली इतर शिकण्याजोगं खूप असतं ते महत्त्वाचं असतं. यासंबंधी एक सुंदर गोष्ट आहे-
एका तरुणाला तलवारबाजी शिकायची होती. त्याला कोणी तरी सांगितलं, समोरच्या डोंगरावर एक बाबा एकटेच राहतात. ते तलवार चालवायला शिकवतात. तू त्यांच्याकडे जा. तो त्या डोंगरावर गेला. बाबा बरेच वयस्कर होते. ते म्हणाले, ‘‘मी शिकवेन, पण एक अट आहे. तू रोज डोंगर उतरून जाऊन दोघांसाठी पाणी आणायचंस, लाकडं फोडायचीस, स्वयंपाक करायचास.’’ तरुण ‘हो’ म्हणाला. रोज सगळी कामं करू लागला, पण तलवार विद्या शिकवायचं लक्षण दिसेना. त्यानं धीर करून विचारलं, ‘‘तलवार कधी शिकवणार?’’
बाबा म्हणाले, ‘‘शिकवू लवकरच.’’ त्या दिवसापासून तो काम करत असला, स्वयंपाक करत असला, की बाबा हळूच मागून येत आणि त्याच्या पाठीवर काठीचा फटका मारून जात. तो हळूहळू सावध राहू लागला. काठीचे फटके आता त्याला चुकवता येऊ लागले. त्यानं परत विचारलं, ‘‘चार महिने झाले. मी सगळी कामं करतो आहे. तलवार कधी शिकायला सुरुवात करायची?’’ बाबा पुन्हा शांतपणे म्हणाले, ‘‘शिकवणार!’’ आणि आता तर त्यांनी कहरच केला. तरुण रात्री झोपला की ते येत आणि त्याच्यावर काठीने प्रहार करीत. हळूहळू त्याची झोपही सावध बनली. तो झोपेतले वारही चुकवू लागला. आता मात्र तो पुरता कंटाळला. पुन्हा विचारणार तेवढय़ात बाबा म्हणाले, ‘‘आज तुला सुट्टी. आज सगळी कामं मी करतो.’’ त्याला फार आनंद झाला. बाबांचा राग मनात साठला होताच. ते स्वयंपाक करत असताना तो मागून गेला आणि एक मोठा ओंडका त्यांच्या डोक्यात घालायचा प्रयत्न करणार इतक्यात हातातली पळी मागे फिरवून बाबांनी शिताफीने ओंडका उडवून लावला. तरुणाने बाबांचे पाय धरले. म्हणाला, ‘‘मला क्षमा करा. मी आज तुम्हाला मारून टाकणार होतो.’’ बाबा म्हणाले, ‘‘अरे, तलवार विद्या शिकायची तर अंगी पुरेसं बळ हवं म्हणून तुला पाणी भरणं, लाकडं फोडणं ही कामं सांगितली. नुसती तलवार चालवता येऊन काय उपयोग? दुसऱ्याचा वार चुकवता आला पाहिजे. म्हणून तुला दिवसा काठीचा प्रसाद दिला आणि झोपेतही सावध असावं लागतं म्हणून झोपेत काठीचा प्रहार करू लागलो. आता तुझी सर्व तयारी झाली आहे. उद्यापासून आठ दिवसांत तलवार शिकून तू इथून परत जाऊ शकशील.’’
आपलं शिक्षण असं दाही दिशांनी मुलांची तयारी करून घेत आहे का? केवळ बौद्धिक शिक्षण पुरेसं नाही. शिक्षणाची इतर अंगं लक्षात घेतली, तर मानसिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक शिक्षण देणं हे घरातही व्हायला हवं आणि शाळेतही.
शोभा भागवत -shobhabhagwat@gmail.com

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Story img Loader