बाळ घरात की पाळणाघरात?
नोकरी करणाऱ्या पालकांनी बाळाला पाळणाघरात ठेवताना किंवा सांभाळणाऱ्या कुणा अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन करताना दक्ष असायलाच हवं. मोठय़ा शाळांमध्ये घडतं त्याप्रमाणे एखादं आक्रमक, दांडगट मूल आपल्या लाजाळू बाळाला त्रास देऊ शकतं. त्याला आणायला आई-बाबा गेले की ओठ काढून, हुंदके देऊन रडणारं बाळ आपल्यावर गुदरलेल्या अन्यायाचा निषेधच जणू नोंदवत असतं. अशा वेळी त्याला जवळ घेऊन त्याच्या नकारात्मक भावनांचा निचरा होऊ देणं गरजेचं असतं.
एकत्र कुटुंब म्हणजे नांदतं गोकुळ. आजी, आजोबा, काका, काकू, आत्या, निरनिराळ्या वयाची अनेक मुलं यांनी ते घर भरलेलं असे. त्यातच ‘आजोळ’ नावाची अत्यंत गोड संस्थाही असायची. अशा सर्व लहानथोर माणसांत आपलं बाळ लहानाचं मोठं कधी झालं हे आई-वडिलांनाच कळत नसे. आता हे सगळंच इतिहासजमा झालं आहे. नोकरी-धंद्यानिमित्त घर सोडून परगावी किंवा परदेशी राहणाऱ्या आजच्या आई-बाबांना ‘बाळ वाढवायचं कसं?’ ही एक समस्या ठरते आहे.
घरातच किंवा अगदी जवळच आजी-आजोबा आहेत; ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम आणि मानसिकदृष्टय़ा उत्सुक आहेत आणि कुणाच्या मदतीने का होईना, नातवंडांना आनंदानं सांभाळताहेत, ही आदर्श स्थिती झाली. पण हे नेहमीच शक्य असतं असं नाही. बाळंतपणानंतर काही महिने ‘ब्रेक’ घेतला तरी एक वेळ अशी येतेच, की आई-बाबांना पूर्ण वेळ कामावर रुजू व्हावं लागतं. तेव्हा त्यांच्यापुढे तीन पर्याय उरतात. एक- बाळाकडे लक्ष देणारी पूर्ण वेळ घरात राहणारी किंवा ८-१० तासांसाठी येणारी स्त्री, दुसरा- बाळाला जवळपासच्या घरगुती पाळणाघरात दाखल करणे आणि तिसरा- व्यावसायिक पद्धतीने स्वतंत्र मोठय़ा जागेत विविध वयोगटातल्या मुलांना सांभाळणारं शिशु-संगोपन केंद्र (डे-केअर सेंटर).
आपल्याच घरात बाई असण्याचे खूप फायदे आहेत. तिचं पूर्ण लक्ष बाळावर राहणार आहे. त्याचं खाणं-पिणं, स्वच्छता, झोप, खेळ हे सगळं ती घरच्या व्यक्तीप्रमाणे बघणार आहे. इतर मुलांशी संपर्क नसल्यानं बाळाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. आपल्या ओळखीच्या वातावरणात बदल होत नसल्यानं बाळाला सुरक्षित वाटणार आहे. तसेच रोज ठराविक वेळेला त्याला तयार करून त्याच्या सामानासकट पाळणाघरात सोडणं आणि घेऊन येणं ही यातायातही आई-बाबांना करावी लागणार नाही. शिवाय बाळ झोपलेलं असतं तेव्हा त्या बाईंकडून काही घरगुती कामं करून घेण्याचीसुद्धा सोय असू शकते.
मात्र या सगळ्याला अनेक ‘पण आणि परंतु’ लागलेले आहेत. ही बाई ‘आखूड शिंगी बहुदुधी गाईसारखी’ हवी कामसू, विश्वासार्ह, स्वच्छ, निरोगी, बाळाचं सगळं प्रेमानं करणारी पाहिजे. आई-बाबा घरी आल्यावर तिने संपूर्ण दिवसाचा बाळाचा रिपोर्ट द्यायला पाहिजे. नियमित, वेळेवर येणारी, न सांगता दांडय़ा न मारणारी अशीच ती हवी. अचानक काही समस्या झाली तर चटकन फोन करणारी, शेजाऱ्यांची मदत घेणारी, प्रसंगी बाळाला रिक्षात घालून त्याच्या डॉक्टरकडे घेऊन जाण्याइतकी तत्पर आणि प्रसंगावधानी अशी ती पाहिजे. अशी सर्वगुणसंपन्न ‘बाई’पूर्वजन्मीच्या पुण्याईवरच एखाद्याला मिळणार, नाही का? कोवळ्या आई-बाबांनो, कितीही अडचणीत सापडले असाल तरी आपल्यापुढे कामासाठी आलेली बाई पूर्ण मुलाखत घेतल्याखेरीज, पूर्वीचा अनुभव आणि संदर्भ तपासून पाहिल्याखेरीज नोकरीवर ठेवू नका. यासाठी बाळाचा जन्म झाल्यावर चांगल्या व्यक्तीचा शोध लवकरच सुरू करा, म्हणजे आपली रजा चालू असतानाच तिची सवय करता येईल. याबाबतीत आपल्या मित्रमैत्रिणींच्या वर्तुळात चौकशी आधीपासूनच करणं महत्त्वाचं ठरतं. बाळाच्या दृष्टीने ती कुटुंबातला एक सदस्य अशीच असते. तशीच वागणूक तिला द्या. बाळाला तिचा खूप लळा लागतो, याबद्दल तुम्हाला मत्सर वाटण्याचं कारण नाही. आई-बाबांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बाळाच्या प्राथमिक गरजा जरी घरात ठेवलेल्या या बाईंनी भागवल्या तरी त्याच्या बौद्धिक वाढीची बांधीलकी मात्र आई-बाबांचीच असते, हे लक्षात घ्या. इतर नोकरांप्रमाणे त्या बाईंनााही वेळप्रसंगी सुट्टी पाहिजे असते. त्या वेळी पर्यायी व्यवस्था काय करायची, हा विचार आधीपासून करून ठेवा. बहुतेक वेळा तुमच्यापैकी एकाला रजा घेऊन घरी थांबावं लागेल.
दुसरा उपाय घरगुती पाळणाघर. ही संस्था आपल्याकडे खूप लोकप्रिय आहे. बहुधा घराच्या जवळ असल्याने जाण्यायेण्याचा त्रास कमी. लहान मुलांची आवड आणि घरातलीच एक स्वतंत्र खोली किंवा चक्क गॅरेज या भांडवलावर सुरू केलेला, गृहिणींना काही उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय असतो. संचालिका बहुधा ओळखीची असते. मात्र मदतनीस म्हणून काम करणाऱ्या बायकांची स्वच्छता, आरोग्य, पाळणाघर कितपत प्रशस्त, हवेशीर आहे; मुलाला वरणभात किंवा इतर खाऊ देत असल्यास त्याचा दर्जा कसा आहे, हे तपासून पाहा. पाळणाघरातील बाळाच्या झोपण्याची व्यवस्था, शू-शी किती वेळा पाहणार, कपडे बदलणार, याची चौकशी केलीच पाहिजे. एखाद्या वेळी बाळाला आणायला उशीर झाला तर काय करतात, पाळणाघरातलं मूल आजारी पडलं, ताप आला, तर काय करतात, हे विचारलं पाहिजे. आपलं बाळ आजारी असेल तर त्याला पाळणाघरात पाठवू नये, हे पथ्य आई-बाबांनीसुद्धा पाळलं पाहिजे.
अशा घरगुती पाळणाघरात सुविधा तुलनेनं कमी असतात आणि संचालिकासुद्धा प्रशिक्षित असतेच असे नाही, या गोष्टी लक्षात घ्याव्यात. त्यासाठी बाळाला सोडताना आणि आणायला जाताना तिथंच थोडा वेळ रेंगाळून पाळणाघराचं काम कसं चालतं, एकंदर मुलांना हाताळण्याची पद्धत काय आहे, हे बघितलं पाहिजे. संचालिकेशी मैत्री करा. तिला शक्य तेव्हा मदत करण्याची तयारी दाखवा. पाळणाघरातल्या सेविका आणि मुलं यांच्यामध्ये शरीर भाषेतून (बॉडी लँग्वेज) एक संवाद घडत असतो. मुलांना तिथं आपलेपणा वाटतो का, हे त्यावरूनच कळतं.
मोठय़ा व्यावसायिक केंद्रात जागा मोठी असते. केंद्राच्या आत आणि बाहेर अंगणातही वेगवेगळ्या वयोगटांतल्या मुलांना योग्य असे अनेक खेळ असतात. मुलांवर लक्ष ठेवायला प्रशिक्षित सेविका आणि ताई असतात. स्वच्छता, अन्नाचा दर्जा, प्रथमोपचाराची व्यवस्था हे सगळं मान्यताप्राप्त- प्रमाणित असावं असा नियम आहे. या संस्था रीतसर नोंदणी केलेल्या असतात आणि संचालिका बहुधा बालसंगोपनातली पदवीधारक असते. जवळच्या मोठय़ा शाळेला अशी शिशुसंगोपन केंद्रं्र संलग्न असू शकतात हा मोठाच फायदा आहे. इथं शिशू आणि कुमारवयीन मुलांचा समवयस्क मुलांशी संपर्क झाल्याने आपोआपच त्यांना एकमेकांशी जुळवून घेण्याचं, वाटून घेण्याचं शिक्षण मिळतं. मित्र कसे जोडावेत याचं ज्ञान मिळतं. नवनवे खेळ, गाणी, गोष्टी यातून बुद्धिमत्तेला अनमोल उत्तेजना मिळते. पाळणाघरातली मुलं घरी राहणाऱ्या मुलांच्या तुलनेत लवकर बोलायला लागतात, त्यांची शब्दसंपत्ती जास्त असते. ती आपल्या हातानं खायला शिकतात. अधिकारी व्यक्तीचं ऐकणं म्हणजेच ‘सामाजिक शिस्त’ हा नवा पैलू विकसित होतो. आत्मकेंद्रितता कमी होते. अशा पाळणाघरांचे फायदे जास्त दिसले तरी समस्यासुद्धा आहेतच. एकतर त्यामध्ये खर्च भरपूर येतो. सर्वसामान्यांना न परवडेल एवढी फी असते. जंतुसंसर्गाची शक्यता जास्त असते. आपलं बाळ इतरांशी जुळवून घेण्यात मागे पडल्यास ते किरकिरं, दु:खीकष्टी बनण्याची शक्यता असते. मोठय़ा शाळांमध्ये घडतं त्याप्रमाणे एखादं आक्रमक, दांडगट मूल आपल्या लाजाळू बाळाला त्रास देऊ शकतं. बाळाला काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या तरी स्वीकाराव्या लागतात. या सगळ्याची नोंद बाळाचा मेंदू घेत असतो. त्याला आणायला आई-बाबा गेले की ओठ काढून, हुंदके देऊन रडणारं बाळ आपल्यावर गुदरलेल्या अन्यायाचा निषेधच जणू नोंदवत असतं. अशा वेळी त्याला जवळ घेऊन त्याच्या नकारात्मक भावनांचा निचरा होऊ देणं गरजेचं असतं. आपल्याकडे अशा प्रकारची व्यावसायिक पद्धतीने चालवली जाणारी मोठी डे-केअर सेंटर्स तुलनेने कमी आहेत. पण ही परिस्थिती हळूहळू बदलते आहे.
एकंदरीत या प्रत्येक व्यवस्थेमध्ये काही चांगल्या, तर काही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी आहेत. सुरुवातीच्या काही महिन्यांत आजी-आजोबांचं सुरक्षाकवच बाळाला लाभलं तरी त्याच्या विकासाच्या एका टप्प्यावर बाह्य़ जगाशी त्याची ओळख करून द्यावीच लागते. ‘आपल्या घरची नैवेद्याची दुधाची वाटी जगाच्या गाभाऱ्यात नेऊन ओतावी लागते’ असं बहुधा ज्येष्ठ लेखक रवींद्र पिंग्यांनी लिहिलं आहे; त्याची आठवण इथं येते.
व्यवस्था कोणतीही असो, सामान्यपणे बाळाचं वजन वाढत असेल, ते आनंदी-खेळकर असेल, नवीन नवीन गोष्टी करून दाखवत असेल तर ती व्यवस्था उत्तम आहे, असं समजायला हरकत नाही.
drlilyjoshi@gmail.com

Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका