घरातला कर्ता पुरुष वा नवरा जर दारूच्या व्यसनात अडकला तर त्याच्या पत्नीला, मुलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. स्वत:विषयी आणि आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल साशंक असलेली ही पत्नी त्रस्त होते, जीवनातला आनंद हरवून बसते, स्वत:च्या नशिबाला दोष देत राहाते. पण जेव्हा अशा अनेक जणी एकत्र येतात तेव्हा एकमेकांशी केलेल्या संवादातून, समुपदेशकांच्या मार्गदर्शनातून त्यांनाही जगण्याची नवी वाट सापडू शकते. १९९७ पासून अनेक स्त्रियांना अशीच यशाची वाट दाखविणाऱ्या ‘सहचरी’विषयी, व्यसनाधीनांच्या पत्नींच्या आधारगटाविषयी.
२९ ऑगस्ट १९८६ या दिवशी माझे आई-बाबा डॉ. अनिता व डॉ. अनिल अवचट यांनी पु. ल. देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’ची स्थापना केली. माझी आई मानसोपचारतज्ज्ञ म्हणून पुण्याच्या मनोरुग्णांसाठी काम करत होती. तरीही तिने कुठलेही व्यसनमुक्ती केंद्र बघितले नव्हते (महाराष्ट्रात तेव्हा असे केंद्र नव्हतेच). म्हणून तिने ठरवले की, ‘मुक्तांगण’मध्ये उपचार घेण्यासाठी जे लोक येतील, त्यांच्याकडून शिकून आपण इथली उपचारपद्धती तयार करू. त्यामुळे ‘मुक्तांगण’मधले उपचार परदेशातील केंद्राप्रमाणे नसून भारतीय संस्कृतीशी निगडित आहेत.
आपल्या संस्कृतीत कुटुंब व्यवस्था खूप महत्त्वाची आहे. घरातली व्यक्ती व्यसनाधीन असेल तर संपूर्ण कुटुंबालाच त्याचा त्रास होतो. म्हणून ‘मुक्तांगण’च्या उपचारांमध्ये रुग्णमित्रांच्या कुटुंबीयांनाही सहभागी करून घेतले जाते. सुरुवातीला माझ्या आईने इथे सगळ्या कुटुंबीयांसाठी एकत्रित समूहोपचार सुरू केले. नंतर लक्षात आले की व्यसनामुळे पती-पत्नीच्या वैवाहिक नात्यातही समस्या निर्माण होतात, म्हणून पती-पत्नीसाठी ‘सहजीवन’ सभा सुरू झाली. आजही या सभा ‘मुक्तांगण’मध्ये नियमितपणे होतात. या दोन्ही सभांमध्ये सुरुवातीला स्त्रिया मोकळेपणाने बोलत नसत. पण सभा संपल्यावर आईभोवती घोळका करून शंका विचारत एकमेकींशी गप्पा मारत. तेव्हाच स्त्रियांसाठी एखादा ग्रुप सुरू करावा, असं आईला वाटायला लागलं. तिच्या आजारपणामुळे ते तेव्हा शक्य झालं नाही.
मात्र तिच्या निधनानंतर, एक महिन्याने म्हणजे १० मार्च १९९७ ला ‘सहचरी’ गटाची स्थापना झाली. ‘सहचरी’ हा व्यसनाधीन लोकांच्या पत्नीचा आधारगट आहे. सुरुवातीला फक्त ‘मुक्तांगण’मध्ये या गटाच्या सभा होत. आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा स्त्रियांनी एकत्र येऊन हे गट स्थापन केलेत. माझी आत्या प्रफुल्ला मोहिते ही या सर्व गटांचे सुरेख व्यवस्थापन करते. ती स्वत: एक ‘सहचरी’ असल्यामुळे या सगळ्या अनुभवातून गेलेली आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या मैत्रिणींना ती चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते.
पतीच्या व्यसनाधीनतेमुळे त्रासलेली अशी एखादी मैत्रीण जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा आम्ही तिला आवर्जून सभेला थांबवून घेतो आणि एकाच मीटिंगनंतर ती खूप मोकळी होते. समुपदेशनाची अनेक सत्रं घेऊनही तिच्यात जेवढा फरक होणार नाही, तेवढा फक्त आधारगटाच्या एका बैठकीमुळे होतो. ‘सहचरी’च्या सभेचा फायदा म्हणजे, नुकत्याच झालेल्या एका सभेत मी मैत्रिणींना विचारला. तेव्हा नम्रता म्हणाली, ‘मला पूर्वी वाटायचं की व्यसनाचा प्रश्न फक्त माझ्याच घरात आहे, या विचारामुळे मला खूप निराश वाटायचं. पण बैठकींना आल्यावर, इतक्या मैत्रिणींना भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की, हा प्रश्न इतरांच्याही घरात आहे. इतक्या ‘समदु:खी’ मैत्रिणी मिळाल्यावर माझी निराशा कमी झाली.
यावर मीना म्हणाली, ‘इतके दिवस त्या गोष्टीची इतकी लाज वाटायची की कोणाशी आम्ही बोलायचोच नाही. त्यामुळे मनावरचं दडपण वाढत जायचं. आजही घरातली समस्या अजून सुरूच आहे. पण मी इथे येऊन ‘शेअर’ करते आणि मला बरं वाटतं.’
समीधा म्हणाली, ‘आमच्या अनेक शंकांना इथे एकमेकींच्या अनुभवातून उत्तरं मिळतात. इथे डॉक्टर, समुपदेशक असतात त्यांच्याशी आम्हाला बोलता येतं.’
कुठल्याही समस्येसाठी जेव्हा एखादा आधारगट सुरू होतो, तेव्हा समदु:खी लोक भेटणं, त्यांच्याशी ‘शेअर’ करून मोकळं वाटणं, आपल्या प्रश्नांची उत्तर मिळणं, असे अनेक फायदे होतात. त्यामुळे अशा गटांमुळे लोकांना ‘मानसिक आधार मिळतो. आपल्यावर जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा ‘माझ्याच बाबतीत का?’ असा प्रश्न आपल्या मनात येतो. या प्रश्नाला खरं तर काहीच उत्तर नाही, पण जेव्हा हा प्रश्न आपण स्वत:ला विचारत राहतो, तेव्हा आपली निराशा, हलबलता, स्वत:ची कीव अशा भावना वाढत जातात. संकटातून मार्ग काढायचा असेल, तर आपल्या समस्येचा स्वीकार करायची गरज असते. आधार गटात आपल्यासारख्या समस्येचा सामना करणाऱ्या लोकांना भेटल्यावर समस्येचा स्वीकार करायला मदत होते आणि नंतरच त्यातून त्या मार्ग काढू शकतात. घरात व्यसनाची समस्या असेल तर सर्व कुटुंबीयांच्या भावना खूप नकारात्मक असतात. ‘लग्नाआधी इतका प्यायचा नाही. पत्नीचा स्वभाव खूप चिडखोर आहे. तिच्याचमुळे तो पितो.’ अशा प्रकारे त्याच्या व्यसनासाठी बरेचदा कुटुंबीय पत्नीला दोष देतात. त्यामुळे तिच्या भावना जास्तच नकारात्मक होत जातात, म्हणून ‘सहचरी’ गटात भावनांविषयी चर्चा केली जाते.
एका सभेत सरिता या पहिल्यांदाच आलेल्या मैत्रिणीने नवरा पिऊन घरी आला की, तिची खूप चिडचिड होते, ती आरडाओरडाही करते याविषयी सांगितले. गेली दोन-तीन र्वष नियमितपणे येणारी मैत्रीण नंदा म्हणाली, ‘नवरा दारू पिऊन घरी येतो, तेव्हा आपली चिडचिड होणे स्वाभाविकच आहे. पण त्या वेळेला खरं तर आपण शांत राहाणं आवश्यक आहे.’ सरिताने विचारलं, ‘पण गप्प कसं राहायचं? तो कसंही वागतो, काहीही बोलतो, ते मी ऐकून घेऊ?’
नंदाने शांतपणे समजावून सांगितलं, ‘तो प्यायलेला असताना त्याच्या मेंदूवर दारूचा ताबा असतो. त्या वेळी आपण काहीही सांगून उपयोग होत नाही. आपण आरडाओरडा केला तर तोही चिडतो. शिवीगाळ, तोडफोड इतकंच नाही तर मारहाणही करू शकतो. मुलांवर तर या भांडणाचा दुष्परिणाम होतो. आपण शांत राहिलो तर तो थोडा वेळ भडकवायचा प्रयत्न करेल, पण आपल्या बाजूने काही प्रतिसाद नसेल तर तो गप्प बसेल आणि झोपून जाईल. आपण गप्प राहिलो तरच पुढचे दुष्परिणाम टळू शकतील.’
चित्रा म्हणाली, ‘तू गरीब बिचारी आहेस म्हणून गप्प बसू नकोस, तर ‘बाय चॉइस’ गप्प बस.
आमची एक जुनी मैत्रीण नेहमी सांगते की, नवरा पिऊन आल्यावर माझी चिडचिड व्हायची. मी आरडाओरडा करायचे. शेजारी म्हणत, नवरा प्यायलाय, पण बायकोलाच चढलेली दिसतेय! आपण दारू पीत नाही, आपलं वागणं दारू पिणाऱ्यासारखं नाही तर नॉर्मल व्यक्तीसारखं असलं पाहिजे, असं ‘सहचरी’मध्ये नेहमीच सांगितलं जातं.
आमचे मित्र, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी सहचरी मैत्रिणींना सांगतात, ‘आपल्या भावनांचा रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्या व्यक्तीच्या हातात द्यायचा नाही तर स्वत:च्याच हाती ठेवायचा आहे.’
रागाप्रमाणेच आमच्या या सहचरींना निराशा (डिप्रेशन), ताण-तणाव (टेन्शन, एन्झायटी) याही भावनांशी सामना सतत करावा लागतो. हा माणूस कधी व्यसन सोडेल याची आशाच वाटत नाही. समाजाची लाज वाटते, लोकांमध्ये मिसळत नाहीत. सतत भविष्याची चिंता वाटते. ‘सहचरी’ गटात येऊन, बोलून इतरांचे अनुभव ऐकून यात बदल व्हायला लागतो. ‘लोकांची लाज बाळगू नका. त्यांची मदत घ्या,’ हे नेहमी सांगितलं जातं. निराशा, ताण कमी करण्यासाठी त्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. शरीर व्यवस्थित असेल तरच मन शांत राहू शकतं. त्यामुळे व्यायाम, आहार वगैरे गोष्टींवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावलं जातं.
एका मीटिंगमध्ये एक मैत्रीण स्वत:च्या निराशेबद्दल सांगत होती. शेवटी ती ०म्हणाली, ‘जर मला मुलं नसती ना, तर मी स्वत:ला कधीच संपवलं असतं..’ इतर मैत्रिणींनी तिला धीर दिला. एक मैत्रीण म्हणाली, ‘अगं म्हणजे तुला ही दोन गोड मुलं आहेत ही किती चांगली गोष्ट आहे ना? आता आपल्या ग्रुपच्या पद्धतीप्रमाणे तुझ्या आयुष्यात काय चांगलं आहे, त्यांची आपण यादी करू.’ सर्वाच्या मदतीने तिने चांगल्या गोष्टींची यादी तयार केल्यावर तिच्या लक्षात आलं की, माझा पती व्यसन करतो ही जरी एक वाईट गोष्ट माझ्याबाबतीत असली तरी या अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा आहेतच.
बाबा- डॉ. अनिल अवचट जेव्हा एखादी मैत्रीण खूप नकारात्मक विचार करते तेव्हा तिला सांगतो, ‘नकारात्मक विचार व्हायरससारखे असतात. ते मनात घुसले तर लगेच काढून टाकले पाहिजेत. त्या विचारांना सकारात्मक विचारांनी उत्तर द्या.’ नियमितपणे ‘सहचरी’ गटात येऊन आज आमच्या शेकडो मैत्रिणी खंबीरपणे स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. ज्यांना नोकरीची गरज आहे, त्यांच्यासाठी एक मोठा ‘सहचरी प्रकल्प’ मुक्तांगणच्या आवारात आहे. कॅटरिंगचे काम चालवले जाते. अशा आनंदी सहचरी बघताना मी, बाबा, आत्या.. आम्हा सर्वानाच समाधान वाटते. ‘सहचरी’ एक व्यासपीठ आहे, स्वत:ला घडविण्याचे. ‘सहचरी’ हा एक विसावा आहे, थकले मन मोकळे करण्याचा. सहचरी एक आधार आहे, एकटेपण संपविण्याचा. हा आधारवड असाच पसरत जावो, सावली देण्यासाठी.
व्यसनाधीनांच्या पत्नींसाठी
घरातला कर्ता पुरुष वा नवरा जर दारूच्या व्यसनात अडकला तर त्याच्या पत्नीला, मुलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. स्वत:विषयी आणि आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल साशंक असलेली ही पत्नी त्रस्त होते,
आणखी वाचा
First published on: 05-04-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For spouse of an alcoholic addicted husband