‘आला मेसेज, केला फॉरवर्ड’ हा सावनी गोडबोले यांचा समुपदेशनवजा लेख ( ८ नोव्हेंबर) फारच भावला. ‘या हृदयातले त्या हृदयात पोचविण्याची खरी ताकद मुखावाटे बाहेर पडणाऱ्या शब्दात असते’ हे आजच्या फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या जमान्यात कुणाला सांगितले तर हसण्यावरी नेले जाईल. ज्याच्यापाशी स्मार्ट फोन
– सूर्यकांत भोसले, मुलुंड
‘विहिणीची पंगत’
आज परिस्थिती खूप बदलते आहे. मुलींच्या शिक्षणामुळे वधूपक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कित्येकदा त्या अवास्तव असतात. मुलाकडची मंडळी आईसुद्धा सुशिक्षित नोकरी करणारी असते. त्यामुळे त्यांनाही सामाजिक भान असते म्हणूनच दोन्ही घरातले संबंध खेळीमेळीचेही असतात. अर्थात व्यक्ती म्हणून दुसऱ्याचा आदर करणंही आवश्यक असतं. पण पूर्वीच्या रूढी जशा योग्य नव्हत्या, तशाच आजच्या बदललेल्या पद्धतीही सर्वार्थाने योग्य म्हणता येत नाहीत.
आमच्या लाडक्या मुलीला सांभाळा, अशी विनवणी करण्याची वेळ आज मुलीच्या आईवर येत नाही, त्याचबरोबर दशमोग्रह असलेला जावई आज सासूसासऱ्यांना मुलासारखा भासतो हेही तितकंसं खरं आहे. पण ‘हो सुने घरासारखी’ अशा किती सुना घरासारख्या होतात? हा प्रश्न व्यक्तिसापेक्ष आहेच. पण सरासरी उत्तर नकारात्मक असेल, कोणत्याही मुलीच्या आईला आपल्याला मुलीला सासरी त्रास होईल का याची बिलकूल काळजी नसते. ही मुलगी आपल्या मतांशी ठाम राहून अत्यंत मोकळेपणाने पहिल्यापासून नव्या घरी वावरते. घरातली माणसंही तिच्या रुळण्याला मदत करतात. बदललेल्या काळात ‘माझ्या मुलीला त्रास दिलात तर याद राख’ असा प्रेमळ दम जावयाला देऊन मुलीची पाठवणी करणाऱ्या आया आणि समोरच्याने हात वर केला तर हात तोडून हातात द्यायचा, असं मी मुलीला शिकवलंय असं अभिमानाने आपल्या मुलींच्या घरच्या माणसांसमोर सांगणाऱ्या आया आढळत असताना ‘विहिणीची पंगत’ हा एक विरोधाभासच म्हणावा लागेल.
– साधना ताम्हणे, मुंबई</strong>
तळागाळातील रत्नांचा शोध
‘चतुरंग’च्या आजी-आजोबांसाठी या विशेष पानात ‘वयाला वळसा’ घालून अव्याहत कार्य करणारे वृद्धजन, त्यांच्या समवयस्क वृद्धजनांसाठी मोलाचा संदेश याद्वारे मोलाची माहिती मिळते. याच सदरातील ‘झिजणे कणकण’ या लेखातील ९५ वर्षे वयाचे श्री. रा. त्र्यं. ऊर्फ तात्या कर्वे ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्गाला संस्कृतचे अध्यापन करतात. ९७ वर्षे वयाच्या विदुषी डॉ. लीला गोखले १९४१ ला एम.डी.चे वैद्यकीय शिक्षण घेऊन आपला व्यवसाय सांभाळत विविध विषयांत पारंगत आहेत. त्यांनी सादर केलेला स्त्रियांच्या आजारावरील शोधनिबंध कौतुकास पात्र आहे. वयाची ७५ वर्षे उलटलेले ‘प्रकाश पणतीचा’मधील डॉ. एन. के. ठाकरे हे सुविद्य व सधन घराण्यातले, स्वत: महान गणिती असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना गणित विषयांत पीएच.डी.साठी मार्गदर्शन केलेले आहे. हे विद्वान गृहस्थ मोरणे या गावी विद्यार्थीवर्गासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा आपली स्थावर व जंगम संपत्ती देऊन उभी करून ते तेथे अध्यापनाचे काम करतात. ही तीन उदाहरणे वानगीदाखल दिलेली आहेत. असे हे प्रेरणास्रोत असलेले मोती शोधून ते सर्वापुढे ठेवण्याचे कार्य संपदा वागळे व ‘मदतीचा हात’ सदरातून माधुरी ताम्हणे करीत आहेत. त्या दोघींचे हे लेखनकार्य अव्याहत राहो, यातून वृद्धांना उमेदीचा प्रेरक प्रकाश मिळावा ही सदिच्छा!
– सुमित्रा गुर्जर, डोंबिवली
‘क्रौर्याची परिसीमा’
‘आजही सीता अग्निपरीक्षा देतेच आहे’ हा चारुशीला कुलकर्णी यांचा १ नोव्हेंबरचा लेख वाचला आणि सुन्न व्हायला झाले. ‘जात नाही ती जात’ असे म्हटले जाते, पण जातीचे भयंकर रूप आणि त्यात पोळली जाते ती स्त्री. आज आपण विज्ञानयुगात जगतो आहोत. देशाला घटना आहे, न्यायनिवाडय़ासाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय आहे, मग या जातपंचायती, खाप पंचायती इतक्या भयंकर शिक्षा कोणत्या अधिकाराने देतात? त्याही फक्त स्त्रियांना. न्यायालये त्यांना जाब विचारू शकत नाहीत? कौमार्य परीक्षा, चिखलाची भाकरी खाणे, दंडाची प्रचंड रक्कम घेणे अशा भयंकर शिक्षा दिल्या जातात. जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वानी यात लक्ष दिले पाहिजे. आज २१ व्या शतकात कुठे चाललो आहोत आपण? मुळात कोणत्याही जातपंचायतींना शिक्षा करण्याचा अधिकारच नाही. तीस वर्षांपूर्वी हा अध्यादेश निघाला होता, मात्र अद्यापही त्याचे कायद्यात रूपांतर झालेले नाही. पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलो, की असा अध्यादेश आहे हेच त्यांना माहीत नाही. अशाच एका केससंदर्भात आम्ही मुंबईतील एका पोलीस स्टेशनला गेलो होतो. पण सुदैवाने पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी योग्य सहकार्य केल्यामुळे या केसकडे जागरूकतेने पाहिले गेले व भयंकर शिक्षेतून त्या मुलीची सुटका झाली.
– अलका चाफेकर, गोरेगाव