‘फोटो सर्कल सोसायटी’मधल्या त्या काही जणी. एकत्रित येऊन त्यांनी छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं, ‘विद्युल्लता.’ समाजात विविध क्षेत्रांतल्या कर्तबगार स्त्रियांना स्वत:च्या ‘भाषेत’ दाद देणाऱ्या या छायाचित्रकार मैत्रिणींच्या छाया-प्रकाशाच्या अद्भुत माध्यमातल्या अनोख्या उपक्रमाविषयी..
नाशिकमधील ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या आवारातील मोकळ्या, ऐसपैस गॅलरीत ते छायाचित्र प्रदर्शन भरवलेले होते. ‘टुगेदर वुई प्रोग्रेस..’ या विश्वासाचा तो प्रत्यक्ष देखणा आविष्कार.  छायाचित्रण करणाऱ्या सगळ्या स्त्रिया आणि त्यांच्या सर्जनशील ‘तिसऱ्या डोळ्याने’ टिपलेली सर्व छायाचित्रेही स्त्रियांचीच. या छायाचित्रांमधील काही चेहरे खूप ओळखीचे, जवळचे. आरती अंकलीकर, मेधा पाटकर, अपर्णा पाध्ये, नसीमा हुरजूक, आनंदवनातील आमटे परिवार असे. तर काही चेहरे मात्र अनोळखी. पण ओळख-अनोळखीची सीमा ओलांडून त्या छायाचित्रात जाणवत होती ती त्या त्या सर्व स्त्रियांची कर्तबगारी. जगण्याला एका वेगळ्या दिशेने, ऊर्जेने भिडण्याचा निर्धार, निर्धारातील हे कणखर सौंदर्य नेमकेपणाने टिपणाऱ्या आणि छाया-प्रकाशाच्या अद्भुत माध्यमाद्वारे मांडणाऱ्या या प्रदर्शनाचे नाव होते ‘विद्युल्लता.’ समाजात विविध क्षेत्रांतल्या कर्तबगार स्त्रियांना स्वत:च्या ‘भाषेत’ दाद देणाऱ्या या छायाचित्रकार मैत्रिणींना सलाम ठोकला आणि गप्पा सुरू केल्या. सतेजा राजवाडे, जयदा निकाळे, स्वप्नाली मटकर, वेदवती पडवळ, प्रत्येकीचा व्यवसाय वेगळा पण ध्यास मात्र एकच, छायाचित्रण!
‘फोटो सर्कल सोसायटी’ ही गेल्या पंधरा वर्षांपासून छायाचित्रणाच्या क्षेत्रात गांभीर्याने काम करणारी ठाण्यातील एक संस्था, हौशी छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळवून देणे, छायाचित्रणविषयक कार्यशाळा आयोजित करणे आणि चर्चेसाठी-गप्पांसाठी अनेक नामवंत छायाचित्रकारांना आमंत्रित करणे असे विविध उपक्रम संस्था राबवते. संस्थेच्या सभासदांची काम करण्याची तळमळ आणि आस्था जाणवल्याने गोपाळ बोधे, अधिक शिरोडकर, उद्धव ठाकरे अशी या क्षेत्रातील दिग्गज मंडळी गप्पा मारायला येऊन गेली आहेत. पण या संस्थेचे महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे संस्थेच्या स्त्री सभासदांची असलेली भलीमोठी यादी. ‘टुगेदर वुई प्रोग्रेस’ असे मोठय़ा अभिमानाने सांगायचे पण व्यवहारात दुटप्पीपणा दाखवत स्त्रियांना उंबऱ्याबाहेर ठेवायचे हे संस्थेच्या पुरुष सभासदांना मान्य नव्हते. त्यामुळे चौदा वर्षांपूर्वी सतेजा राजवाडे ही व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर असलेली स्त्री आपला साधासा कॅमेरा घेऊन सदस्य होण्यासाठी संस्थेकडे आली, तेव्हा मोठय़ा आनंदाने तिचे या कुटुंबात स्वागत झाले. ‘स्त्रिया कितीही आणि काहीही शिकल्या तरी त्यांना तांत्रिकबुद्धी फारशी नसते. कॅमेऱ्यातील त्यांना फारसे कळत नाही,’ अशी पुरुषी शेरेबाजी ऐकून खट्टू झालेली सतेजा काही तरी करून दाखवण्याच्या इराद्याने आली. स्त्री छायाचित्रकारांच्या नजरेतून दिसणाऱ्या वेगळ्या दृष्टिकोनाचा या संस्थेत सन्मान केला जातो हे बघून मग अनेक स्त्रियांची पावले इकडे वळली. त्यात हौस म्हणून फोटो काढू इच्छिणाऱ्या जशा होत्या, तशाच या छंदातून व्यवसायाकडे जाऊ इच्छिणाऱ्या तरुण मुलीही होत्या.
छायाचित्रण हे क्षेत्र आजही पुरुषांचा पुष्कळ वरचष्मा असलेले. कारण व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून काम करताना अनेकदा तुमची शारीरिक आणि म्हणून मानसिक क्षमता पणाला लागते. छायाचित्र काढण्यासाठी वेळप्रसंगी गर्दीत घुसणे, कधी धक्काबुक्की सहन करणे, लग्नासारख्या समारंभात दिवसभर टिकून राहणे आणि टिकून राहत उत्तम कामगिरी करणे ही आव्हाने पेलणे सोपे नाही. पण ध्यास असेल, डोक्यात तेच वेड असेल, तर अशी आव्हानेही कशी सोपी होत जातात त्याचे उदाहरण म्हणून फोटो सोसायटीतील या स्त्रियांकडे बोट दाखवावे लागेल.
दर महिन्याला एकदा होणाऱ्या बैठकीतच जन्म झाला ‘विद्युल्लता’ या संकल्पनेचा. आपापल्या क्षेत्रात नवनवी आव्हाने पेलणाऱ्या, ती पेलता पेलता आपल्याबरोबर आणखी काही मैत्रिणींना पुढे नेणाऱ्या, त्यांना आधार देणाऱ्या, वाढत्या वयाचा धाक न जुमानता नव्या उमेदीने काही शिकणाऱ्या अशा अनेक स्त्रिया आपल्याला अनेकदा दिसतात. माध्यमातून भेटतात. त्यांची कर्तबगारी छायाचित्रांच्या माध्यमातून लोकांपुढे मांडावी अशी ही कल्पना. ती मांडताच सर्वानी उचलून धरली. एका निश्चित उद्दिष्टाने आणि दिशेने आता सर्वाना काम करायचे होते. पण ते सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास सगळ्यांनाच होता. कल्पना मांडल्यावर जबाबदाऱ्यांची वाटणी झाली. कारण केवळ छायाचित्र काढण्यापलीकडे, आधी आणि नंतर, अनेक गोष्टी पार पाडणे गरजेचे होते. छायाचित्रांसाठी निवडलेल्या मान्यवर महिलांचा तपशील मिळवणे गरज पडल्यास संदर्भासाठी अन्य छायाचित्रे निवडणे मग या सगळ्यांच्या वेळा घेणे, त्यानंतर प्रवास, काढलेल्या छायाचित्रांमधून योग्य ती निवडणे आणि त्यानंतर प्रदर्शनाची तयारी. प्रत्येक स्त्रीला आपला व्यवसाय – नोकरी आणि कुटुंब सांभाळून हे करायचे होते. त्यामुळे एकूणच ही तारेवरची कसरत होती. पण त्यातून जे उभे राहणार होते ते इतके सुंदर असेल, की त्यासाठी एवढय़ा कळा सोसायलाच हव्यात असे प्रत्येकीला वाटले आणि काम सुरू झाले.
अर्थात, ‘विद्युल्लता’ म्हणून केवळ प्रसिद्ध, कर्तबगार आणि मान्यवर स्त्रियांचीच निवड करावी असे मात्र यापैकी कोणाच्याच मनात नव्हते. जीवनसंघर्षांत आपले काम नेकीने आणि न थकता करणारी सर्वसामान्य स्त्रीही तिच्यातील ऊर्जेमुळे तेजस्वी दिसत असते. ते सुंदरपणही या छायाचित्रकार स्त्रियांनी टिपायचे ठरवले.
त्यामुळे ‘विद्युल्लता’ २०१२ मध्ये जशा सिंधूताई सपकाळ दिसतात, रेणू गावस्करांची छायाचित्रे दिसतात, तशी एखादी मासे विकणारी कोळीण, भाजीवाली, पोळ्या करणारी स्त्रीपण दिसते. प्रत्येक स्त्रीचे केवळ एकच छायाचित्र या प्रदर्शनात नसते. तिच्या कामाची, त्यातील कौशल्याची, कामात अंतर्भूत असलेल्या वस्तूची, परिसराची आणि त्यातील संघर्ष यशाची किमान ओळख तरी छायाचित्रे बघणाऱ्यांना व्हावी हा यामागचा हेतू असल्याने प्रत्येक स्त्री अशा विविध रूपांत आपल्याला भेटते. रूढार्थाने एखादी सुंदर नसणारी स्त्री जेव्हा तिला आवडणाऱ्या एखाद्या कामात तन-मनाने बुडालेली असते, तेव्हा तिच्या देहबोलीतून तो आनंद कसा झिरपतो हे बघणे हा या प्रदर्शनातील असीम आनंदाचा क्षण ठरतो!
गेल्या वर्षी प्रथमच भरवलेल्या प्रदर्शनाला ठाण्यातील रसिकांनी जी दाद दिली ती बघून या सगळ्या मैत्रिणींना खूप उमेद मिळाली. या प्रयत्नांचे वेगळेपण त्यांना नव्याने जाणवले. आणि मग त्या नव्याने कामाला लागल्या. विद्युल्लता २०१३ साठी पहिले प्रदर्शन अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी उभे केले. यंदा थेट आनंदवन, कुडाळ, अलिबाग असा प्रवास करीत त्यांनी आणखी २५-३० स्त्रियांना आपल्या कॅमेऱ्यातून टिपले. त्यात संपदा जोगळेकरसारखी बहुआयामी, नवनवे प्रयोग करण्यास उत्सुक अशी तरुण कलावती होती; तशाच आहेत वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या पण भगवद्गीता शिकणाऱ्या-शिकवणाऱ्या देव आजी, चॉकलेटचे देखणे बुके बनवणारी हाय प्रोफाइल उद्योजिका निकिता मल्होत्रा आणि पांढरे भुरभुरणारे केस आणि पदर खोचलेली साधीशी साडी नेसून हजारोंच्या जनसमुदायासमोर उभी मेधा पाटकर. या प्रत्येक स्त्रीमधील आंतरिक सौंदर्य टिपणारे तब्बल दीडशेपेक्षा अधिक पॅनल्स त्यांनी बनवले.
या प्रदर्शनाची दोन वैशिष्टय़े आहेत. पहिले, हे प्रदर्शन म्हणजे एक टीमवर्क आहे. पंधरा स्त्रियांनी एकत्र येऊन उभा केलेला प्रकल्प, हे स्पष्ट व्हावे यासाठी एकाही छायाचित्राखाली नाव नाही. प्रदर्शनाच्या अखेरच्या पॅनलवर या सर्व स्त्रियांचे फोटो आपल्याला बघायला मिळतात. आणि दुसरे वैशिष्टय़ म्हणजे या प्रदर्शनात ज्यांची छायाचित्रे आहेत त्यांची मोजकी पण आटोपशीर ओळख करून देणारा मजकूर प्रत्येक छायाचित्रासोबत आहे. जे लिहिण्यासाठी मेघा आघारकर यांनी या मैत्रिणींना मदत केली आहे.
गेल्या वर्षी फक्त ठाण्यापुरते झालेले हे प्रदर्शन यंदा नाशिकमधील छायाचित्रकार मिलिंद देशमुख यांच्या पुढाकारामुळे नाशिकमध्येही आले. पण यापुढे महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहरांत जाण्याचा या मैत्रिणींचा इरादा आहे आणि छायाचित्रांसाठी तर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जाण्याची स्वप्ने त्यांच्या डोळ्यात आहेत. कारण या अनुभवातून एक वेगळी, व्यापक जीवनदृष्टी आपल्याला मिळाली असे त्या सांगतात. आपल्या लहान-सहान गैरसोयीबद्दल कुरकुर करताना, जेव्हा चाकाच्या खुर्चीवर आयुष्य आनंदाने जगणारी आणि अनेकांना उभे करणारी नसीमा भेटते, तेव्हा आपली कुरकुर कशासाठी असा प्रश्न पडतो. समाजासाठीच जगणारी मेधा पाटकर, भामरागडच्या जंगलात जगणाऱ्या मंदाताई आमटे यांच्याबरोबर चार दिवस वावरताना मनातील काळोखी सांदी कोपरे उजळून निघाले.
फोटो सर्कल सोसायटीशी जोडल्या गेलेल्या चौघी स्त्रिया – अंजू मानसिंग, वेदवती पडवळ, संघामित्रा बेंडखळे आणि स्वप्नाली मटकर या पूर्णपणे छायाचित्रकार म्हणून किंवा त्याचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय करतात. वेदवती पडवळसारखी तरुणी भारतातील मोजक्या ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफर्स’पैकी एक. दर रविवारी ठाण्याजवळील थेऊरच्या जंगलात आणि महिना-दीड महिन्यातून एकदा वाघ, गेंडे, साप, हत्ती अशा मित्रांच्या सहवासात वावरणारी. युरोपमध्ये दर वर्षी ‘नॅशनल पार्क डे’ निमित्त भरणाऱ्या छायाचित्रप्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व करणारी. तर संघमित्रा ‘फूड फोटोग्राफी’ करणारी. जपानमधील आयटी क्षेत्रातील मोहमयी नोकरी सोडून भारतात आलेली स्वप्नाली केवळ छायाचित्रच काढत नाही तर त्याविषयी लिहिते, त्या विषयाला वाहिलेल्या अंकाचे संपादन करते. पण या चौघींखेरीज बाकीच्या मैत्रिणीही ‘विद्युल्लता’साठी आपली ऊर्जा, वेळ देतात. सतेजा राजवाडे, शांभवी कोल्हटकर, वेदिका भार्गवे, रेखा भिवंडीकर, मेघना शहा, आकृती माहिमकर, मीनल पाटील, जयदा निकाळे, नंदिनी बोरकर, गार्गी गिध, अनघा सांगेलकर.. नावे वेगळी आहेत पण कॅमेऱ्यामागे डोळा लावून प्रत्येक जण उभी राहते तेव्हा ती बाकी सगळे विसरते. कॅमेऱ्यापलीकडे उभी असलेली व्यक्ती आणि तिची सृष्टी तिला खुणावत असते. त्यातील सगळ्या सौंदर्याच्या छटांसह..
असे सौंदर्य टिपलेली छायाचित्रे संगणकाच्या पडद्यावर येतात आणि निवड करायची वेळ येते, तेव्हा पुन्हा सगळ्यांना आपल्या कामामागचे सूत्र आठवते. ‘टुगेदर वुई प्रोग्रेस’ आणि मग संजय नाईक, प्रवीण देशपांडे, हृदयनाथ कोळी, कुमार जयवंत अशी मंडळीही या कामात सहभागी होतात! छायाचित्रांमध्ये प्रकाश-छायेचे सुंदर संतुलन साधावे लागते हे शिकता-शिकता हेच संतुलन प्रत्यक्ष जगताना आचरणाऱ्या या मित्र-मैत्रिणींना सलामच करायला हवा.

Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagpur Crime News
Nagpur Crime : विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला अटक, मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
Story img Loader