नाशिकमधील ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या आवारातील मोकळ्या, ऐसपैस गॅलरीत ते छायाचित्र प्रदर्शन भरवलेले होते. ‘टुगेदर वुई प्रोग्रेस..’ या विश्वासाचा तो प्रत्यक्ष देखणा आविष्कार. छायाचित्रण करणाऱ्या सगळ्या स्त्रिया आणि त्यांच्या सर्जनशील ‘तिसऱ्या डोळ्याने’ टिपलेली सर्व छायाचित्रेही स्त्रियांचीच. या छायाचित्रांमधील काही चेहरे खूप ओळखीचे, जवळचे. आरती अंकलीकर, मेधा पाटकर, अपर्णा पाध्ये, नसीमा हुरजूक, आनंदवनातील आमटे परिवार असे. तर काही चेहरे मात्र अनोळखी. पण ओळख-अनोळखीची सीमा ओलांडून त्या छायाचित्रात जाणवत होती ती त्या त्या सर्व स्त्रियांची कर्तबगारी. जगण्याला एका वेगळ्या दिशेने, ऊर्जेने भिडण्याचा निर्धार, निर्धारातील हे कणखर सौंदर्य नेमकेपणाने टिपणाऱ्या आणि छाया-प्रकाशाच्या अद्भुत माध्यमाद्वारे मांडणाऱ्या या प्रदर्शनाचे नाव होते ‘विद्युल्लता.’ समाजात विविध क्षेत्रांतल्या कर्तबगार स्त्रियांना स्वत:च्या ‘भाषेत’ दाद देणाऱ्या या छायाचित्रकार मैत्रिणींना सलाम ठोकला आणि गप्पा सुरू केल्या. सतेजा राजवाडे, जयदा निकाळे, स्वप्नाली मटकर, वेदवती पडवळ, प्रत्येकीचा व्यवसाय वेगळा पण ध्यास मात्र एकच, छायाचित्रण!
छायाचित्रण हे क्षेत्र आजही पुरुषांचा पुष्कळ वरचष्मा असलेले. कारण व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून काम करताना अनेकदा तुमची शारीरिक आणि म्हणून मानसिक क्षमता पणाला लागते. छायाचित्र काढण्यासाठी वेळप्रसंगी गर्दीत घुसणे, कधी धक्काबुक्की सहन करणे, लग्नासारख्या समारंभात दिवसभर टिकून राहणे आणि टिकून राहत उत्तम कामगिरी करणे ही आव्हाने पेलणे सोपे नाही. पण ध्यास असेल, डोक्यात तेच वेड असेल, तर अशी आव्हानेही कशी सोपी होत जातात त्याचे उदाहरण म्हणून फोटो सोसायटीतील या स्त्रियांकडे बोट दाखवावे लागेल.
अर्थात, ‘विद्युल्लता’ म्हणून केवळ प्रसिद्ध, कर्तबगार आणि मान्यवर स्त्रियांचीच निवड करावी असे मात्र यापैकी कोणाच्याच मनात नव्हते. जीवनसंघर्षांत आपले काम नेकीने आणि न थकता करणारी सर्वसामान्य स्त्रीही तिच्यातील ऊर्जेमुळे तेजस्वी दिसत असते. ते सुंदरपणही या छायाचित्रकार स्त्रियांनी टिपायचे ठरवले.
त्यामुळे ‘विद्युल्लता’ २०१२ मध्ये जशा सिंधूताई सपकाळ दिसतात, रेणू गावस्करांची छायाचित्रे दिसतात, तशी एखादी मासे विकणारी कोळीण, भाजीवाली, पोळ्या करणारी स्त्रीपण दिसते. प्रत्येक स्त्रीचे केवळ एकच छायाचित्र या प्रदर्शनात नसते. तिच्या कामाची, त्यातील कौशल्याची, कामात अंतर्भूत असलेल्या वस्तूची, परिसराची आणि त्यातील संघर्ष यशाची किमान ओळख तरी छायाचित्रे बघणाऱ्यांना व्हावी हा यामागचा हेतू असल्याने प्रत्येक स्त्री अशा विविध रूपांत आपल्याला भेटते. रूढार्थाने एखादी सुंदर नसणारी स्त्री जेव्हा तिला आवडणाऱ्या एखाद्या कामात तन-मनाने बुडालेली असते, तेव्हा तिच्या देहबोलीतून तो आनंद कसा झिरपतो हे बघणे हा या प्रदर्शनातील असीम आनंदाचा क्षण ठरतो!
गेल्या वर्षी प्रथमच भरवलेल्या प्रदर्शनाला ठाण्यातील रसिकांनी जी दाद दिली ती बघून या सगळ्या मैत्रिणींना खूप उमेद मिळाली. या प्रयत्नांचे वेगळेपण त्यांना नव्याने जाणवले. आणि मग त्या नव्याने कामाला लागल्या. विद्युल्लता २०१३ साठी पहिले प्रदर्शन अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी उभे केले. यंदा थेट आनंदवन, कुडाळ, अलिबाग असा प्रवास करीत त्यांनी आणखी २५-३० स्त्रियांना आपल्या कॅमेऱ्यातून टिपले. त्यात संपदा जोगळेकरसारखी बहुआयामी, नवनवे प्रयोग करण्यास उत्सुक अशी तरुण कलावती होती; तशाच आहेत वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या पण भगवद्गीता शिकणाऱ्या-शिकवणाऱ्या देव आजी, चॉकलेटचे देखणे बुके बनवणारी हाय प्रोफाइल उद्योजिका निकिता मल्होत्रा आणि पांढरे भुरभुरणारे केस आणि पदर खोचलेली साधीशी साडी नेसून हजारोंच्या जनसमुदायासमोर उभी मेधा पाटकर. या प्रत्येक स्त्रीमधील आंतरिक सौंदर्य टिपणारे तब्बल दीडशेपेक्षा अधिक पॅनल्स त्यांनी बनवले.
या प्रदर्शनाची दोन वैशिष्टय़े आहेत. पहिले, हे प्रदर्शन म्हणजे एक टीमवर्क आहे. पंधरा स्त्रियांनी एकत्र येऊन उभा केलेला प्रकल्प, हे स्पष्ट व्हावे यासाठी एकाही छायाचित्राखाली नाव नाही. प्रदर्शनाच्या अखेरच्या पॅनलवर या सर्व स्त्रियांचे फोटो आपल्याला बघायला मिळतात. आणि दुसरे वैशिष्टय़ म्हणजे या प्रदर्शनात ज्यांची छायाचित्रे आहेत त्यांची मोजकी पण आटोपशीर ओळख करून देणारा मजकूर प्रत्येक छायाचित्रासोबत आहे. जे लिहिण्यासाठी मेघा आघारकर यांनी या मैत्रिणींना मदत केली आहे.
गेल्या वर्षी फक्त ठाण्यापुरते झालेले हे प्रदर्शन यंदा नाशिकमधील छायाचित्रकार मिलिंद देशमुख यांच्या पुढाकारामुळे नाशिकमध्येही आले. पण यापुढे महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहरांत जाण्याचा या मैत्रिणींचा इरादा आहे आणि छायाचित्रांसाठी तर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जाण्याची स्वप्ने त्यांच्या डोळ्यात आहेत. कारण या अनुभवातून एक वेगळी, व्यापक जीवनदृष्टी आपल्याला मिळाली असे त्या सांगतात. आपल्या लहान-सहान गैरसोयीबद्दल कुरकुर करताना, जेव्हा चाकाच्या खुर्चीवर आयुष्य आनंदाने जगणारी आणि अनेकांना उभे करणारी नसीमा भेटते, तेव्हा आपली कुरकुर कशासाठी असा प्रश्न पडतो. समाजासाठीच जगणारी मेधा पाटकर, भामरागडच्या जंगलात जगणाऱ्या मंदाताई आमटे यांच्याबरोबर चार दिवस वावरताना मनातील काळोखी सांदी कोपरे उजळून निघाले.
फोटो सर्कल सोसायटीशी जोडल्या गेलेल्या चौघी स्त्रिया – अंजू मानसिंग, वेदवती पडवळ, संघामित्रा बेंडखळे आणि स्वप्नाली मटकर या पूर्णपणे छायाचित्रकार म्हणून किंवा त्याचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय करतात. वेदवती पडवळसारखी तरुणी भारतातील मोजक्या ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफर्स’पैकी एक. दर रविवारी ठाण्याजवळील थेऊरच्या जंगलात आणि महिना-दीड महिन्यातून एकदा वाघ, गेंडे, साप, हत्ती अशा मित्रांच्या सहवासात वावरणारी. युरोपमध्ये दर वर्षी ‘नॅशनल पार्क डे’ निमित्त भरणाऱ्या छायाचित्रप्रदर्शनात
असे सौंदर्य टिपलेली छायाचित्रे संगणकाच्या पडद्यावर येतात आणि निवड करायची वेळ येते, तेव्हा पुन्हा सगळ्यांना आपल्या कामामागचे सूत्र आठवते. ‘टुगेदर वुई प्रोग्रेस’ आणि मग संजय नाईक, प्रवीण देशपांडे, हृदयनाथ कोळी, कुमार जयवंत अशी मंडळीही या कामात सहभागी होतात! छायाचित्रांमध्ये प्रकाश-छायेचे सुंदर संतुलन साधावे लागते हे शिकता-शिकता हेच संतुलन प्रत्यक्ष जगताना आचरणाऱ्या या मित्र-मैत्रिणींना सलामच करायला हवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा