पालक आणि मुलं यांच्यातील स्वातंत्र्याबद्दलच्या कल्पना मुळातच भिन्न असल्याने दोघांमधले मतभेद वाढत्या वयानुसार तीव्र होत जातात. वर्तणुकीय स्वातंत्र्य देऊ करणं म्हणजे स्वतंत्र विचार करण्याची ताकद देणं होत नाही. कपडे, मित्र-मत्रिणी, खाणं-पिणं, शॉिपग याबद्दलचं स्वातंत्र्य हा स्वातंत्र्याचा फक्त ‘आभास’ आहे. स्वातंत्र्य ही दीर्घ काळ चालणारी खोल प्रक्रिया आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या निणर्याची जबाबदारी ही फक्त आपलीच असते ही जाणीव, हा विचारच मुला-मुलींमध्ये रुजवायचा राहून जातो.. प्रत्यक्ष स्वातंत्र्य आणि आभासी स्वातंत्र्य म्हणजे काय आणि मुलांच्या वाढीतलं स्वातंत्र्य कसं जपायला हवं यावरचा खास लेख.
‘मागच्या पिढीच्या माणसांना स्पर्शाचं इतकं वावडं का आहे, हे मला कधीच समजू शकलेलं नाही. स्त्री-पुरुषांमधल्या साध्याशा स्पर्शाकडेही सगळे ‘तसल्या’ नजरेने बघतात. का? आम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र असतो तेव्हा टाळ्या देतो, गळ्यात गळे घालतो, खूप आनंद किंवा दु:ख झालं तर गळाभेटही घेतो. आमचं हे अत्यंत सहज वागणं मोठय़ांना मात्र निर्लज्जपणाचं वाटतं. पण लिंगभेद विसरून आम्ही संवाद साधतो हे मात्र कुणालाही दिसत नाही. नावं ठेवायला मात्र सारेच पुढे.’  
– एफ.वाय.ला शिकणारी अनघा वैतागून सांगते. तर तिच्याच शेजारी बसलेला तिचा मित्र मंदार सांगतो, ‘‘कौमार्याचा मुद्दा आजही फक्त मुलींच्याच संदर्भात चर्चेला येतो. आम्हा मुलांची मतं कुणी विचारतच नाही. मुळातच मग तो मुलगा असो की मुलगी, त्याच्या-तिच्या शरीराशी सोबत कुणी करावी, कधी करावी, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.’’
-मंदारच्या मते, लग्न व्यवस्थेत मोठी उलथापालथ होण्याचं कारण मुळातच लग्न का करायचं, याचा गांभीर्याने विचार झालेला नसणं हेच आहे.
**
‘‘आई मला अजिबात मोकळं सोडत नाही. कुठे जातोयस? कशाला जातोयस? कधी येणार? बरोबर कोण? मी येऊ का सोडायला? नाहीतर आणायला येते? असले मला अडचणीत आणणारे अगणित प्रश्न ती सतत विचारत असते. अनेकदा हे प्रश्न माझ्या मित्र-मत्रिणींसमोर विचारते. मी आता सोळा वर्षांचा आहे. माझी काळजी मी घेऊ शकतो. पण तिला ते पटतच नाही. सतत माझ्यावर चेक. कशाला?’’
– पुण्यात राहणारा राहुल वैतागून एक दिवस सांगत होता. वयात आलेला आपला मुलगा बहकू नये किंवा त्याला वाईट संगत लागू नये ही आईची काळजी समजण्यासारखी असली तरी सोळा वर्षांच्या राहुलला तो जाच वाटत होता. शाळा संपेपर्यंत आईनं कधीच मोकळं सोडलं नाही; आता कॉलेजला गेल्यानंतर तरी मोकळीक मिळेल अशी राहुलला अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसं काही न घडल्यामुळे तो वैतागलेला होता.
**
‘‘मी प्रेमात पडले आहे. पण मुलाच्या नाही तर मुलीच्या. आणि मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. तिच्याशी लग्न करण्याचं स्वातंत्र्य मला नाही. असं का? हा प्रश्न विचारायची सोय नाही. माणूस म्हणून असलेल्या माझ्या स्वातंत्र्याचा कुणीही विचार करत नाही. त्याची आवश्यकता माझ्या कुटुंबाला किंवा समाजाला कुणालाही वाटत नाही.’’
बीड जिल्ह्य़ातल्या एका लहानशा गावातून आलेलं ते पत्र होतं. वीस-बावीस वर्षांची ती मुलगी लेसबियन होती. आपण चारचौघांसारखे नाही, आपला लंगिक कल निराळा आहे, आपण समिलगी आहोत हे मान्य करण्याचा मोकळेपणा तिच्याजवळ होता. तो तिच्या पत्रातून स्पष्टपणे व्यक्त होत होता. अडचण एवढीच होती की तिचा हा मोकळेपणा तिच्या आजूबाजूच्या कुणालाच मान्य नव्हता. आणि आता या विरोधाच्या गदारोळात आपल्या प्रेमाचं काय होणार, असा प्रश्न तिला पडलेला होता.
**
तेरा ते तेवीस या वयोगटातल्या तरुण-तरुणींशी संवाद साधताना मला भेटलेले हे काही तरुण चेहरे. खरं तर गेल्या पाच-सहा वर्षांत या वयोगटाबरोबर काम करत असताना आणि ‘तेरा ते तेवीस’ हे पुस्तक लिहीत असताना असे अगणित चेहरे मला भेटले होते. आजही भेटत आहेत. या तरुणाईशी संपर्क साधत असताना एका मुद्दय़ावर पुन्हा पुन्हा नजर वळते आणि तो म्हणजे स्वातंत्र्य.
‘‘आमची जनरेशन वाया गेलेली आहे, असं हल्ली सर्रास सगळे म्हणतात.. हो? पण म्हणजे नक्की काय? आम्ही प्रश्न विचारतो. पटलं नाही तर वाद घालतो. सगळे निर्णय स्वत: घ्यायला बघतो.. म्हणजे आम्ही बिघडलेलो आहोत का?’’ एका तरुण मुलीनं मला विचारलेला प्रश्न. आजच्या तरुण पिढीच्या स्वातंत्र्याच्या संकल्पना, पालकांची भूमिका आणि नेमके गोचीचे मुद्दे कोणते असतात, या मुद्दय़ांचा विचार करायला लावणारा हा प्रश्न.
वयात येण्याच्या टप्प्यात ज्याला मोठय़ांच्या भाषेत िशग फुटण्याच्या काळात स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय, असा प्रश्न सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच पडतो. पण ‘दोन अधिक दोन चार’ इतकं सोपं उत्तर या प्रश्नाचं देता येत नाही. असूही शकत नाही. मुळात व्यक्तिसापेक्ष असणाऱ्या या संकल्पनेला आपण सामाजिक नियमांची बंधनं घातलेली आहेत आणि काळानुरूप, जीवनशैलीच्या गरजांनुसार या नियमांमध्ये किंवा बंधनांमध्येही बदल करण्याची लवचिकता मात्र आपल्या सामाजिक चौकटीत दिसत नाही.
आजचं तारुण्य ‘स्वतंत्र’ आहे. त्यांच्या निर्णयाबाबत ते आग्रही असतात असं अनेकदा वाटतं पण परिस्थिती खरंच तशी आहे का? तारुण्य खरंच स्वतंत्र आहे का? त्यांना मिळणारं स्वातंत्र्य पेलण्याची मानसिक क्षमता आणि सामाजिक भान त्यांच्यात आलं आहे का? ते त्यांच्यात निर्माण व्हावं यासाठी कुटुंब व्यवस्थेत बदल होतायेत का? निदान त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य ही संकल्पना आपल्या मुलांच्या मनात रुजवण्यासाठी पालकांच्या पातळीवर विशेष प्रयत्न होतायेत का?
असे काही प्रश्न सतत समोर येत असतात.
कामाच्या निमित्ताने एका मध्यमवयीन महिलेला भेटले होते. गप्पांच्या ओघात त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही आमच्या मुलांना जाणीवपूर्णक संस्कार शिकवले आहेत. मला प्रश्न पडला, संस्कार ही शिकवण्याची गोष्ट आहे की अनुभवण्याची? मूल वाढत असताना त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, पालकांचा एकमेकांशी असणारा संवाद, घरातलं वातावरण, पालकांचं घरातलं आणि घराबाहेरचं वर्तन यातून त्या मुलापर्यंत पोचणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संदेश, त्यातून त्याचं विकसित होत जाणारं अनुभवविश्व यातून संस्कार झिरपत असतात. त्या मुला/मुलीच्या मनात साठत असतात. नियमावली बनवून आणि काही विशिष्ट गोष्टींच्या वर्तणुकीची सक्ती करणं म्हणजे संस्कार करणं अशी फारच उथळ कल्पना अनेक पालकांच्या मानत असल्याचं कामाच्या निमित्ताने पालकांशी संवाद साधत असताना अनेकदा जाणवून जातं.
जे संस्कारांचं तेच स्वातंत्र्याचंही !
आपल्या मुलांशी कसं वागावं, याबद्दलचा तात्त्विक आदर्शवाद आणि वास्तवात प्रसंगांना आणि समस्यांना तोंड देण्याची वेळ आल्यानंतर किंवा निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याच्या टप्प्यात पालक आल्यानंतरची त्यांची पालक म्हणून असणारी भूमिका यात जमीन-अस्मानाचा फरक होताना दिसतो. एरवी पालकांचे मुलांशी मत्रीपूर्ण संबंध असायला पाहिजेत, सुसंवाद असला पाहिजे, मुलांच्या स्पेसचा विचार पालकांनी केला पाहिजे असं सांगणारे पालक; त्यांच्या मुला-मुलींनी पालकांच्या चौकटीत न बसणारा किंवा त्यांना सामाजिक संदर्भात अडचणीत आणणारा निर्णय घेतला की लगेच ‘टिपिकल’ पालकांची कातडी पांघरून वावरायला लागतात.
कारण मुलं कितीही स्वतंत्र झाली तरी सरसकट त्यांचे निर्णय मान्य करणं, अनेकदा सोयीचं नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तसं मान्य केल्यामुळे कुटुंब रचनेतल्या पालकांच्या आणि मुलांच्या मूलभूत भूमिकांबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं.
आपल्याकडे दोन प्रकारची स्वातंत्र्यं घरांमध्ये दिसतात. एक आभासी स्वातंत्र्य; जे स्वातंत्र्य वरवरचं आहे. कपडे, वावर, दिसणं यांच्याशी निगडित आहे आणि दुसरं प्रत्यक्ष स्वातंत्र्य जे; विचारांचं, निर्णय घेण्याचं, त्यातल्या प्रक्रियेचं, ते विचार अथवा निर्णय वास्तवात आणण्याबद्दलचं आणि त्या निर्णयांचे
बरे-वाईट परिणाम स्वीकारण्याच्या जबाबदारीचं स्वातंत्र्य आहे.
बहुतेक घरांमध्ये या दोन स्वातंत्र्यांमध्ये गल्लत होताना दिसते. अनेकदा पालक त्यांच्याही नकळत प्रत्यक्ष स्वातंत्र्य देण्यापेक्षा आभासी स्वातंत्र्य देण्याकडे झुकलेले असतात. माझ्या पुस्तकाचं काम करत असताना अनेक घरांमधून मुलीनं कोणते कपडे घालावेत, मेकअप करावा की करू नये, डाएटिंग करावं की करू नये, तिच्या मोबाइलवर कुणाचे फोन येतात, त्याबद्दल तिने तिच्या आई-बाबांना सांगावे की सांगू नये, तिनं रात्री पार्टी करावी की करू नये.. तिनं घरी कधी यावं याबद्दल पालक आग्रही नसतात असं आढळून आलं. त्या मुलीला या किंवा अशा अनेक गोष्टींच्या संदर्भात स्वातंत्र्य दिलेलं असतं आणि त्याबद्दल ते अत्यंत अभिमानानं बोलत असतात. पण तीच मुलगी जेव्हा तिच्या आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या टप्प्यात येते. तेव्हा मात्र मुलांच्या स्वातंत्र्याचा विचार पालकांनी आखून दिलेल्या परिघातच केला पाहिजे, असा आग्रह निर्माण होतो. साहजिकच पाठोपाठच संघर्षांची ठिणगी पडते.
‘‘आम्ही मुलांना खाण्या-पिण्याचं, वावराचं, कपडय़ालत्त्याचं सगळ्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते कुठे जातात, काय करतात, कसे कपडे घालतात, त्यांची अफेअर्स याबद्दल आम्ही त्यांना कधीही काहीही विचारत नाही. मग त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय त्यांनी आम्हाला विचारून आणि आमच्या इच्छांनुसार घ्यायला काय हरकत आहे?’’
– अनेक पालक हा प्रश्न उपस्थित करतात. तर दुसरीकडे अनेक तरुण-तरुणींना प्रश्न पडलेला असतो की एरवी सगळ्या गोष्टींची मुभा देणारे आई-बाबा महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मुभा का देत नाहीत, तिथे उगीच ढवळाढवळ का करतात? किंवा त्यांच्या इच्छा का लादतात? त्यांनी दिलेले सल्ले मान्य केलेच पाहिजेत असा आग्रह का धरतात?
प्रत्यक्ष स्वातंत्र्य आणि आभासी स्वातंत्र्य यांचा सखोल विचार न झाल्यामुळे पालक आणि पाल्य या दोघांच्या टप्प्यात मूलभूत घोळ होतात.
वर्तणुकीय स्वातंत्र्य देऊ करणं म्हणजे स्वतंत्र विचार करण्याची ताकद देणं होत नाही. कपडे, मित्र-मत्रिणी, खाणं-पिणं, शॉिपग याबद्दलचं स्वातंत्र्य हा स्वातंत्र्याचा फक्त ‘आभास’ आहे. स्वातंत्र्य ही इतकी वरवरची गोष्ट नाही. प्रत्यक्ष स्वातंत्र्य ही दीर्घकाळ चालणारी आणि खोल प्रक्रिया आहे आणि वयाच्या, अनुभवाच्या प्रत्येक टप्प्यावर ती अधिकाधिक प्रगल्भ होत जाते. एखादा निर्णय कसा घ्यायला पाहिजे, तो घेत असताना त्या निर्णयाशी निगडित फायद्या-तोटय़ांचा विचार कसा करायला पाहिजे, आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे आपल्या निणर्याची जबाबदारी ही फक्त आपलीच असते ही जाणीव, हा विचारच अनेकदा मुला-मुलींमध्ये रुजवायचा राहून जातो.
कदाचित आभासी स्वातंत्र्य देणं ही तशी सोपी गोष्ट असते. कारण मूलभूत स्वातंत्र्याची कल्पना ही नेहमीच किचकट, गुंतागुंतीची आणि कुटुंबातल्या पालकांच्या ‘पॉवर प्ले’ ला तडा देणारी असते. त्यामुळे कळत-नकळतपणे आभासी स्वातंत्र्य दिलं जातं आणि स्वीकारणाराही त्याच ‘आभासी’ स्वातंत्र्याला व्यक्तिस्वातंत्र्य समजण्याची चूक करतो. आभासी स्वातंत्र्याला ‘स्वातंत्र्य’ समजण्याची गल्लत केलेली कुटुंबं जेव्हा प्रत्यक्ष स्वातंत्र्य देण्या-घेण्याच्या व्यवहाराशी येतात तेव्हा हादरून जातात. पालकांच्या भूमिकांमधला एरवीचा लवचिकपणा कमी होतो आणि मुलं-मुली बंडखोर होतात. त्यातून गुंते वाढत जातात. परिस्थिती अवघड टप्प्यांवर येऊन पोहोचते.
मूल जेव्हा मोठं होत असतं तेव्हा ते ज्याप्रमाणे भाषा शिकतं, गणित शिकतं, गाणी शिकतं, नाचायला-चित्र काढायला शिकतं. त्याच काळात ते स्वातंत्र्याची संकल्पनाही आपलीशी करत असतं. जन्माला आल्यापासून ते स्वतंत्र विचार करत असतं. आजूबाजूचा परिसर स्वत:च्या नजरेतून बघण्याची सवय त्याला असते. प्रत्येक अनुभव ते स्वत: घेत असतं. पण जसंजसं ते मोठं होत जातं, आजूबाजूचा परिसर, घटना स्वत:च्या नजरेतून बघण्याची सवय मोडत पालक पाल्याला स्वत:ची नजर देऊ बघत असतात. तारुण्यात पदार्पण करेपर्यंत कदाचित पाल्यही ती नजर कळत-नकळतपणे स्वीकारतो. पण तरुण झाल्यानंतर आणि स्वत:चं अनुभव विश्व अधिक मोकळंढाकळं झाल्यानंतर पालकांनी देऊ केलेली (किंवा लादलेली) नजर त्याला नको असते. त्याला त्याची स्वतंत्र नजर विकसित करण्याचा ध्यास लागलेला असतो.
पण आपलं मूल चुकेल, ठेचकळेल, पडेल या भीतीनं निराळी नजर विकसित करण्याचं स्वातंत्र्य द्यायला पालक घाबरतात, बिचकतात आणि मुलांना वाटतं आई-बाबा किती मागे लागतात. जराही मोकळीक देत नाहीत.
खरं तर यात चूक कुणाचीच नाही. आजच्या तरुणाईचं एक्स्पोजर हे फक्त कॉलेजपुरतं किंवा कॅन्टीनपुरतं मर्यादित नाही. इंटरनेटसारखं माध्यम हाताशी असल्यामुळे त्यांची जगाशी ओळख आहे. जगभरातलं तारुण्य काय आणि कशा प्रकारचा विचार करतं, स्वातंत्र्याच्या संकल्पना जगातल्या निरनिराळय़ा देशांमध्ये कशा स्वरूपाच्या आहेत हे त्यांना दिसतंय. त्यामुळे आपलं आयुष्य आपण कसं जगायचं याबद्दलच्या त्यांच्या स्वत:च्या कल्पना आहेत, त्या त्यांना राबवायच्या आहेत. तर दुसरीकडे पालक आíथक पातळीवर सतत धावणाऱ्या आधुनिक पालकांपकी आहेत. ज्यांच्या हाताशी पसा आहे पण तरीही त्यांच्या गरजा आणि स्वत:कडून असणाऱ्या आíथक अपेक्षा न संपणाऱ्या आहेत. आजूबाजूच्या असुरक्षिततेमुळे काहीसे बिचकलेले आणि मुलांना सुरक्षित करण्याच्या विचारानं झपाटलेले आहेत.
हा गुंता सोडवायचा असेल तर पालक आणि मुलांमध्ये जसा संवाद हवा त्याचप्रमाणे आपलं मूल हा आपला मालकीहक्क नाही, ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे,त्याच्या इच्छा-आकांक्षा-प्रेरणा-स्वप्न-जगण्याची रीत-जीवनशैली-अनुभवविश्व-भावविश्व सारं काही आपल्यापेक्षा निराळं आहे हे निव्वळ वैचारिक पातळीवर किंवा चच्रेपुरतं मान्य न करता वास्तवातही मान्य करायला हवं.
एकदा एक तरुण मुलगा गप्पांच्या ओघात म्हणाला होता, आम्हाला आमचे पालक आमच्या निर्णयप्रक्रियेत हवे आहेत, पण ‘हुकूमशहा’ म्हणून नाही तर ‘मार्गदर्शक’ म्हणून.
पालकांनी हे वेळीच ओळखलं तर बरं !

Story img Loader