कुटुंबं छोटी होत गेली तसे रक्ताचे नातेवाईकही कमी होत गेले. पण तरीही माणसाला माणूस हवाच असतो. तो मायेचा ओलावा, मैत्रीचं नातं वेगवेगळ्या पद्धतीने जोपासलं गेलंच. कोणी थंडीपावसात पहाटेपासून दुधाचा रतीब घालणाऱ्याला ‘गरम चहाचा’ कप देऊन त्याच्या मनात प्रेम निर्माण करतात तर कोणी अशिक्षित कामवालीला आपल्या स्कूटरवर मागे बसवून तिच्या आर्थिक, व्यावहारिक कामांत तिच्या ‘मागे’ नव्हे ‘पुढे’ राहतात. नर्मदामैयावरील श्रद्धेने परिक्रमावासींना प्रेमाने, आग्रहाने आपल्या घासातला घास काढून देणारे ‘हात’ नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना भेटतातच. उत्तराखंडातील आपद्ग्रस्तांना जिवावर उदार होऊन मदत करणारे, काळजीने, मायेने पुढे येणारी ही सगळी ‘आपलीच’ माणसं. रक्ताच्या नात्यापलीकडे जात, मैत्रीचा परीघ विस्तारत, नाती जोपासली जातात.. प्रेमाची गंगा अशीच वाहत जाते..
प्रत्येक व्यक्ती जन्माला येते तीचमुळी नवीन नात्यांना जन्म देत. मायेच्या प्रेमाच्या धाग्यांनी या रक्ताच्या नात्यांचा गोफ विणला जातो. आपुलकीच्या सोनेरी धाग्यांनी त्यात रंग भरले जातात. जगण्याची ऊर्जा त्यातून मिळत राहते. परंतु बदलत्या सामाजिक वातावरणामुळे ‘हम दो हमारा एक’ अशी कुटुंबरचना निर्माण झाली. प्राप्त परिस्थितीत ‘सख्खी’ नातीच राहिली नाहीत. अशा वेळी मग चुलत, मावस, आते, मामे नात्यातील ‘सख्य’ जपण्याचे प्रयत्न चालू होतात. ती नाती सांभाळण्याचे, संपन्न करण्याचे वेध लागतात. ते सफलही होतात. पण दोन नात्यांतील भौगोलिक अंतर आणि ‘वेळ नाही’ ही वास्तवता याचं गुणोत्तर जमत नाही. त्यामुळे ‘सहवासाची’ बाकी उरते. या नात्यातली ऊब पुरेशी वाटत नाही, पोट भरत नाही. जेवढी मिळते त्याचा आनंद नक्कीच घेतला जातो. त्याच्या बरोबरच इतर अनेक वाटा खुणावू लागतात, सहजतेने निर्माण होतात, ओळखीचे बंध गुंफले जातात. रक्ताच्या नात्यांप्रमाणेच किंवा कधी कधी त्याच्या पेक्षाही जास्त ही मानलेली नाती, व्यक्तीची प्रेम करण्याची, करवून घेण्याची गरज भागवतात. मदतीचा हात, आधारासाठी खांदा, व्यक्त होण्यासाठी जागा, आनंदाची वाटेकरी होत ‘आपल्या’ माणसाची भूमिका उत्तम निभावतात, अशी वेगवेगळी नाती जवळ येत जीवन समृद्ध करतात. मैत्रीचा नवा अर्थ उलगडत जातो.
या नऊ-दहा वर्षांच्या चिमुरडीचंच बघा ना! एकुलती एक, घरात इन मिन तीन माणसं. प्रत्येक गोष्ट ‘शेअर’ करायला सख्खी शेजारीण मैत्रीण आहेच. तरीसुद्धा काही दिवसांपूर्वी मुलाखतीसाठी आलेल्या दूरच्या नात्यातल्या ‘ताईशी’ ती त्यांच्या घरी राहायला आलेली असताना चिमुरडीची गट्टी झाली. मे महिन्यात शिकलेली कागदी फुले, आवडलेला वासंतिक योगसंस्कार वर्ग, पहाटे उठून मामाभाच्याच्या डोंगरावर शेजारच्या आजोबांच्या बरोबर पाच-सहा वेळेला केलेली भटकंती हे सगळे पराक्रम तिने आपल्या ताईला पत्र लिहून कळवले, अगदी घरातल्यांनी कोणीही न सांगता आणि तेसुद्धा दोघींच्या वयात बारा-तेरा वर्षांचं अंतर असताना! आजूबाजूला शेजारीपाजारी, शाळेतल्या मैत्रिणी, बाई असतानाही; ताईला कळविण्यात, तिच्याकडून शाबासकी मिळविण्यात, नक्कीच चिमुरडीला जास्त आनंद मिळतो. या नात्याची गरज तिला हवी हवीशी वाटते त्यातूनच त्यांच्यातले स्नेहरज्जू सहजतेने दुणावले, दाट झाले, वाढत गेले.
  ‘दोन डोळे शेजारी, अन् भेट नाही संसारी’ अशी अवस्था होती एकाच गावात राहणाऱ्या चार बहिणींच्या साधारण सारख्या वयाच्या मुलामुलींची. मावश्यांची भेट घेण्यापेक्षा पोरांचा काटा झुकत होता आपापसातल्या गप्पांकडे, काळानुरूप येणाऱ्या जीवनशैलीला कृतीत आणण्याकडे, त्याची चर्चा करण्याकडे. वेळेचं कोष्टक जमविण्यासाठी त्या मावसभावंडांनी एक ठरावच पास केला, महिन्यातून एकदा, दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवारी फक्त कॉफीपानासाठी एखाद्या हॉटेलमधे दहा-पंधरा मिनिटे जमायचे, अगदी धावतपळत. ‘क्वालिटी टाइम’मधल्या त्या ‘लाइव्ह टेलिकास्ट’मध्ये परस्परांमधले ‘बदल’ नेमके लक्षात यायचे. (बारीक, जाड होणं, अभिरुचीतला बदल, केशरचना, पथ्यपाणी) अनेक सल्लामसलती दिल्या-घेतल्या जायच्या. फोन, एसएमएस, ईमेल या संपर्क माध्यमांतून जे ‘अव्यक्त’ राहायचं ते या कॉफीक्लबमधे ‘मोकळं’ व्हायचं. नात्याच्या ‘रेशीमगाठी’ पक्क्या व्हायच्या. एक एक करत सगळे चतुर्भुज झाल्यानंतर हेच लोण पसरलं त्यांच्या चिमण्या पाखरांत. ‘बिस्किट क्लब’ तयार झाला. हळूच एकमेकांकडे राहायला जाण्याचे ‘मनसुबे’ ठरू लागले. सुट्टीतील शिबिराला सामूहिक नोंदणी होऊ लागली. आई-वडिलांकडील एखाद्या वस्तूची ‘मागणी’ ही सार्वजनिक झाली. वाढदिवसाला आपल्या हस्ताक्षरातल्या आणि कुंचल्यातून रेखाटलेल्या भेटकार्डाची देवाणघेवाण नवीन नवीन ‘कल्पना’ पसरवू लागली. नात्याची वर्तुळे एकमेकांना छेदत राहिली आणि मनांत एकमेकांबद्दल ‘जागा’ तयार झाल्या.
या सगळ्या उदाहरणांतील व्यक्तींच्या धमन्यांतून एकच रक्त वाहत आहे. पण तसं नसेल तर.. कळपात राहण्याची प्रवृत्ती स्वस्थ थोडीच बसणार आहे. ‘आपलं’ म्हणता येईल अशा माणसांची गरज थोडय़ा वेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या उद्देशाने भागवली जात आहे, जाणारच आहे, वयाचं परिमाण न ठेवता, फक्त आनंदासाठी, आंतरिक समाधानासाठी चित्पावन कट्टय़ाच्या ‘संक्रमण’ या स्नेहसंमेलनात भेटलेल्या निर्मलाताई अशाच वेगळेपणामुळे कौतुकाला पात्र आहेत. ‘अवघे पाऊणशे वयमान’ असतानाही आपलं दुखलंखुपलं गोंजारण्यात वेळ न घालवता, संसारातील ‘निवृत्ती’ जाणीवपूर्वक स्वीकारून त्या  पुस्तकात रमतात. पुस्तकं तर सगळेच वाचतात पण त्या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया, मत त्या त्या लेखकापर्यंत पोहोचविणाऱ्या निर्मलाताई विरळाच. नुसतंच पत्र पाठवतील तर तसंही नाही. लेखकाचं वास्तव्य जिथे असेल, त्या ठिकाणी स्वत:च्या काही घरगुती कारणाने जायची वेळ ‘साधून’ त्या लेखकाला आवर्जून आग्रहाने त्या फोन करतील, आपल्या मुक्कामाचा तपशील सांगून भेटीचा आग्रह – अंहं – हट्टच धरतील. वयाने लेखक, कर्तृत्ववान व्यक्ती, कितीही मोठी असली तरी निर्मलाताईंचा शब्द ती मोडूच शकत नाही. वेळात वेळ काढून ‘थेट भेट’ घडून येते. कागदोपत्री पुस्तकाला दाद मिळाली असली तरी अशी ‘जिवंत’ दाद लेखकाला आनंद देऊन जाते. ही ओळख इतकी जपली जाते की अमेरिकेत राहणाऱ्या स्मिता भागवत पुण्यात आल्या की निर्मलाताईंना भेटल्याशिवाय राहतच नाहीत. या कौतुक सोहळ्यात सायकलवरून काश्मीर गाठणाऱ्या खांडेकरांबरोबरच चार महिने चालत नर्मदा परिक्रमा करणाऱ्या अनुपमा देवधरचीही भर पडते. निर्मलाताईंच्या सहवासातील दोन-चार सुखद क्षण, पाठीवरची कौतुकाची थाप, आनंदाने ओसंडून वाहणारा बोलका चेहरा आणि पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुढच्या भेटीची ओढ लावत जिव्हाळ्याचं आनंदी बेट निर्माण करतात.
व्यवसायाने इंजिनीयर म्हणून निवृत्त झालेल्या दीपाताईंचा वेगळाच दृष्टिकोन. समवयस्क मैत्रिणींसाठी काही ना काही उपक्रम ठरविण्यात आणि त्याच्यासाठी आपल्या ‘घराचा’ उपयोग करण्यात त्या आघाडीवर. धार्मिक ग्रंथावरील प्रवचन, वाचकमेळा, काहीही असू दे, ‘माझ्या घरी जमू या’ हा आवडता मंत्र. एखाद्या मैत्रिणीला ‘बरं नाही’ असं कळलं की आवर्जून चौकशी, डॉक्टरकडे जा-ये करायला सोबत आणि जेवणाचा डबा घेऊन जाणारच. ठरावीक दिवस वृद्धाश्रमात भेटीला जाण्याचे, तेही ‘देखल्या देवा दंडवत’ अशा नाटकीपणाने नाही, तर तिथे असलेल्या सगळ्यांच्या ‘कुरबुरी’ अगदी आवर्जून ऐकून घ्यायच्या. गप्पा मारता मारता त्यांच्या छोटय़ा मोठय़ा गरजा ओळखायच्या आणि पुढच्या भेटीत त्या पुरवून आश्चर्यचकित करायचे. कोणाला हवा असलेला ब्लाऊज शिवून द्यायचा, कोणाला हवा असलेला खाऊ द्यायचा, एखादीला हवं असलेलं पुस्तक द्यायचं, काही धार्मिक, काही इतर खुसखुशीत विषयांवरचे भाष्य ऐकवायचे, जणू थोडय़ा वेळापुरतं घेतलेलं ‘रिलॅक्सेशन’ शिबीरच. हास्यरंग पसरवत लाघवी दीपाताई मनाने तिथे इतक्या गुंतून जातात की त्यांच्या वाटेकडे डोळे लावून सर्व जणी येरझारा घालत राहतात. ‘आपली कोणी तरी वाट बघतंय’ ही जाणीव दीपाताईंच्या मनाला सुखावतेच आणि ऋणानुबंधाच्या या गाठीत वेळ सत्कारणी लावल्याचा आनंद मिळतो. मैत्रीच्या नात्याला एक वेगळा आयाम मिळतो.
‘मालती’ सहनिवासातील वॉचमनकाकांना लहान मुलांची अतिशय आवड. इमानेइतबारे नोकरी करताना बसल्या जागी आनंद शोधण्याचा स्वभाव. अंगणात बागडणाऱ्या मुलांच्या सुरक्षेकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याबरोबरच ‘सुखसंवाद’ही साधणार. लुटुपुटीच्या क्रिकेटमध्ये कधी चेंडू टाकणार, कधी तो शोधून देणार, कधी भांडणं मिटवणार, हट्ट केला की समजूत घालणार तर कधी भातुकलीतला ‘डबा’पण खाणार. छोटय़ा सवंगडय़ांच्या आज्ञा अगदी शिरसावंद्य मानणार. या गुणांमुळे सगळ्या ‘आईबाबांची’ भिस्त त्यांच्यावर. या नात्याच्या गुंतवणुकीमुळेच काही दहा-बारा वर्षांच्या मुलामुलींना वॉचमनकाकांची वाढदिवसाची तारीख विचारून, लक्षात ठेवून, छोटसं घडय़ाळ त्यांना या ‘आपल्या माणसाला’ भेट द्यावंसं वाटलं आणि आपलं प्रेम व्यक्त करावंसं वाटलं. ‘ते’ हाताला बांधून प्रत्येकाला सांगताना वॉचमन काकांना अगदी भरून येतं. रक्ताच्या नात्यापलीकडचा हा सोहळा वर्णनातीत असतो.
‘‘हे विश्वचि माझे घर’ हे नुसतं वाचू नकोस तर घरामध्ये विश्व सामावून घेण्याचा प्रयत्न कर’’ ही वडिलांची शिकवण शिरोधार्य मानणाऱ्या मीराताईंची ‘संघे शक्ति: कलौ युगे’ यावर नितांत श्रद्धा. ‘बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत्कथा निरंतर, कथित जावी’ हा वसा, त्यातला आनंद त्या एकटय़ापुरता सीमित ठेवू शकल्या असत्या. परंतु ‘जितुके काही आपणास ठावे, तितके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकलजन’ या विचाराने धार्मिक ग्रंथाच्या निरूपणाच्या माध्यमातून जमलेल्या मैत्रिणींसमवेत उत्सवातून उपासना त्यांनी चालू केली. हे करण्यासाठी आवश्यक ते नेतृत्वगुण, महंतपण त्यांच्या ठायी असल्यामुळे, मैत्रीच्या विस्तारलेल्या परिघातून प्रत्येकीचा कल, आवड अजमावत या स्त्रीशक्तीला समाजकार्याच्या विधायक कामांकडे वळविण्यास सुरुवात केली. सामाजिक बांधीलकीच्या ध्यासापोटी हातात हात गुंफून जवळ येत अनेक उपक्रमांचे ठिपके मांडून रेखाटलेल्या या रांगोळीत ‘समर्थ’ रंग भरतांना आनंदाचे केवढे तरी दालन त्यांनी सर्वासाठी खुले केले आहे.
कोणी थंडीपावसात पहाटेपासून दुधाचा रतीब घालणाऱ्याला ‘गरम चहाचा’ कप देऊन त्याच्या मनात ओलावा निर्माण करतात तर कोणी अशिक्षित कामवालीला आपल्या स्कूटरवर मागे बसवून तिच्या आर्थिक, व्यावहारिक कामांत तिच्या ‘मागे’ नव्हे ‘पुढे’ राहतात. सामाजिक बांधीलकीचं नातं जपत समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या किती तरी व्यक्ती आपण बघतोच. ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’ अशी परिस्थिती असतानाही नर्मदामैयावरील श्रद्धेने परिक्रमावासींना प्रेमाने आग्रहाने आपल्या घासातला घास काढून देणारे ‘हात’ नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना भेटतातच. उत्तराखंडातील आपद्ग्रस्तांना जिवावर उदार होऊन मदत करणारे, हजार हजार माणसांच्या पोटपूजेसाठी आपण होऊन कुठल्या तरी ओढीने, ध्येयाने, काळजीने, मायेन पुढे येणारी ही सगळी ‘आपलीच’ माणसं. ज्यांच्या शब्दांनी, आस्तित्वाने, प्रेमळ स्पर्शाने, प्रसंगानुरूप आलेले नैराश्य, जीवनातील कंटाळा किंवा घेरलेलं संकट, त्या संकटाची तीव्रता कमी जाणवण्याची किमया घडते. ‘पुनश्च हरिओम’ म्हणत ‘चार्ज’ झाल्यासारखे वाटते.
 रक्ताच्या नात्यांबरोबरच, त्या पलीकडे जात, परीघ विस्तारत, प्रेमाचे विश्वासाचे माणुसकीचे नाते जपणारी, आनंद व समाधानाने जीवनाचे सार्थक करणारी, हसत हसत जगणारी, ‘मी’च्या वेलांटीचा सुटो सुटो फास, वेढा क्षितिजास पडो त्याचा’ असा आशावाद जाणणारी संपन्न नाती, आपल्या माणसांची नाती!  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा