माझे वडील गुजरात सरकारच्या सेवेत राजपत्रित अधिकारी होते. त्यांनी वापी येथे प्लॉट घेऊन आईच्या नावे बंगला बांधला. २००८ साली आई वारली. वडिलांनी आम्हा दोघा भावंडांच्या नकळत दुसरा विवाह केला होता. आईच्या निधनानंतर वडिलांनी स्वत:हून वकिलासमोर बंगल्यावरचे हक्कसोडत असल्याची तयारी दाखवली व तो बंगला माझ्या व भावाच्या नावे केला. त्याबाबतचे स्टॅम्प पेपर माझ्याकडे आहेत. ७-१२च्या उताऱ्यावरही भावाचे नाव आहे. वडील २०११ साली वारले. आता त्यांच्या दुसऱ्या पत्नीने पेन्शनसाठी अर्ज केला आहे. पेन्शन बुकवर पत्नी म्हणून माझ्या आईचे नाव असताना ‘तिला’ पेन्शन मिळू शकेल का? बंगल्यात ती हिस्सा मागू शकते का? वडिलोपार्जित संपत्तीबाबत आम्ही कोणती दक्षता घ्यावी?
-सौरभ देशपांडे, वापी

उत्तर- तुमच्या आईच्या नावे वडिलांनी प्लॉटची खरेदी केली होती आणि नंतर बंगला बांधला. वडिलांनी स्वेच्छेने बंगल्यावरचे हक्क सोडले व स्टॅम्प पेपरवर तसे लिहून दिले. बंगल्याचे हक्क तुमच्या व तुमच्या भावाच्या नावे केलेले आहेत. वकिलाच्या साक्षीने वडिलांनी हा व्यवहार केल्याने तो नोंदणीकृत असेलच. शिवाय ७/१२च्या उताऱ्यावर भावाचे नाव असल्याचे तुम्ही म्हटले आहे. तसेच वडिलांचा दुसरा विवाह झाला होता, ज्याची तुम्हाला नंतर माहिती झाली. या परिस्थितीत त्यांचा दुसरा विवाह कधी झाला होता, याला फार महत्त्व आहे. हिंदू विवाह कायदा १९५५ नुसार, लग्नाच्यावेळी दोन्ही जोडीदारांपैकी एक जिवंत असेल तर तो विवाह रद्द होतो. मात्र आता हा कायदा रद्दबातल झाला आहे. जर तुमची आई गेल्यावर म्हणजे २००८ सालानंतर वडिलांनी दुसरा विवाह केला असेल तर त्यांची दुसरी पत्नी हीच कायद्याने त्यांची विधवा ठरेल. म्हणूनच ती पेन्शनवरही हक्क सांगू शकते. मात्र बंगल्यामध्ये ती हिस्सा मागेल अशी फार शक्यता नाही. तरीही तुम्ही वकिलांचा सल्ला घ्या व सुरक्षेच्या दृष्टीने काय पावले उचलता येतील याबाबत चर्चा करा.

माझे आई-वडील गेली ४० वर्र्षे सातारा येथे एका चाळीत राहात होते. पाणीपट्टी व वीज बिल वडिलांच्या नावावर आहे. काही वर्षांपूर्वी घराच्या बाथरूमची भिंत पडली तरी ते ताडपत्री लावून वापरत होते. वारंवार सांगितल्यावरही मालकाने दुरूस्तीचे मनावर घेतले नाही. उलट खोली रिकामी करा, असा लकडा लावला.  २०११ साली वडिलांच्या आजारपणामुळे आम्ही त्यांना दुसरीकडे हलवले व या जागेला कुलूप लावले. ही खोली सोडण्याआधी किती रक्कम माझी आई मागू शकते? मालकाने आमच्यावर केस करण्याची धमकी दिलेली आहे. मात्र केलेली नाही. मागे एकदा त्याने केस केली ती वडिलांच्या बाजूने झाली.
मालकाने मागील बाजूला असलेल्या चाळीतील भाडेकरूंना काही न देता जागा खाली करायला लावली व तेथे इमारत बांधली. जुने भाडेकरू म्हणून माझे वडील एकटेच राहिलेत. काय करता येईल ? माझ्या आई-वडिलांना कायद्याची मदत घेता येईल का?
– नेत्रा, ई-मेलवरून

उत्तर – चाळीतील घरे सुस्थितीत ठेवणे व वेळ पडल्यास त्यात दुरुस्ती करणे हे घरमालकाचे कर्तव्य आहे. जर भाडेकरूने दुरुस्तीविषयी घरमालकाला नोटीस देऊनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले तर १५ दिवसांनंतर भाडेवरू स्वत: ती दुरुस्ती करू शकतात व त्या दुरुस्तीच्या खर्चातील काही भाग ते भाडय़ातून वसूल करू शकतात. पर्यायाने मालकाकडून वसुली होते. ही वसुली करण्यासाठी या दुरुस्तीचा खर्च बिले व पावत्या याप्रमाणे लेखी पुरावे जवळ असू द्या. मात्र कुठल्याही कारणाने, जास्त दिवस किंवा महिने भाडय़ाची खोली रिकामी ठेवणे योग्य नव्हे. जर मालकाने तुमच्या वडिलांना वास्तव्याचा वा राहात असल्याचा पुरावे सादर करण्याचे फर्मान सोडले तर ही जागा कुणीही वापरत नसल्याने तुमचा दावा दुबळा ठरण्याची चिन्हे आहेत. तसेच या जागेची किती भरपाई मिळेल, याची रक्कम तुम्ही मालकासह काय बोलणी केली यावर ठरेल. मात्र जर तुम्ही खोली रिकामी ठेवली तर भरपाई मिळेल की नाही याविषयी शंका आहे. ज्या वेळी ही जागा पुनर्विकासासाठी घरमालक देईल, त्या वेळी भाडेतत्त्वासंबंधी तुमच्याकडे कोणती कागदपत्रे आहेत, त्याची मागणी तो तुमच्या वडिलांकडे होईल. या वेळी तुम्ही वडिलांच्या वतीने भरपाईच्या रकमेसाठी तुम्ही बोलणी करू शकता.

तुमचे  कायदेविषयक  प्रश्न थोडक्यात पाठवा या पत्त्यावर – ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. chaturang@expressindia.com

Story img Loader