प्रत्येक सणाचं आणि खाद्यपदार्थाचं एक विलक्षण नातं असतं. एखादा सण विशिष्ट खाद्यपदार्थाशिवाय पूर्णत्वाला जातच नाही, हे अगदी ठरूनच गेलेलं असतं. जसं होळी म्हटली की पुरणपोळी आपसूक आठवणारच, गणेश चतुर्थीला गणेशाच्या आगमनाबरोबरच मोदकाला पर्याय नसतोच. राखीपौर्णिमेला खोबऱ्याची वडी किंवा नारळीभात असतोच. संक्रांत म्हटलं की तिळाचे लाडू, गुढी पाडव्याला श्रीखंड आणि कोजागरी म्हटलं की हमखास मसाले दूध हवंच. तसंच दिवाळी म्हटलं की भरगच्च नानाविध तिखट, गोड पदार्थाचा खुसखुशीत, चविष्ट फराळ ठरलेलाच.
 वास्तविक पहाटे लवकर उठल्यावर अभंग्यस्नान करून नवीन कपडे घालून फटाक्याबरोबर दिवाळीच्या फराळाचा यथेच्छ आस्वाद घेणं हे पिढय़ा न् पिढय़ा ठरूनच गेलेलं आहे, किंवा होतं म्हणावं लागेल आता. आताच्या पिढीला यातली गंमत फारशी कळेलच असं नाही कारण दिवाळीच्या फराळातले बरेचसे पदार्थ वर्षभर बाजारात मिळतातच. त्यामुळे घरी फराळ बनवायची परंपरा हळूहळू कमी होत गेली. आजच्या तरुण पिढीला फराळ आवडतो पण त्यात थोडेफार बदल होऊ लागले. पारंपरिक चकली, अनारसे, कारंजी, शंकरपाळी, चिवडा, लाडू हे सर्व कालांतराने बदलत गेले. अनेक जण हेल्थ कॉन्शस झाले. जास्त तळलेले पदार्थ कमी झाले. ते फॅट-फ्री झाले. त्यांची जागा बेक चकली, बेक अनारसे यांनी घेतली. संस्कृती जपून हेच पदार्थ नवीन तऱ्हेने पुढे आले.
पोह्य़ांचा चिवडा तर सगळ्यांचा आवडता. मग तोच मक्याचा झाला, त्यात हिरवे वाटाणे आले, लसूण चिवडा आला, शंकरपाळीमध्ये व्हॅनिला फ्लेवर, दालचिनी फ्लेवर लोकांना आवडायला लागले. याच शंकरपाळीमध्ये मद्याच्या ऐवजी गव्हाचे पीठ, नाचणीचे पीठ, बार्लीचे पीठ नवीन चवीने आवडू लागले. अर्थात आजही मोठय़ा प्रमाणावर भारतात पारंपरिक पदार्थच खाल्ले जातात. परंतु त्यात प्रयोग सुरू झाले आहेत हेही मान्य करायला हवं.
आज भारतात बर्फीपेक्षा चॉकलेट जास्त प्रचलित आहे. त्याचं एक कारण म्हणजे ते जास्त दिवस टिकतं, बर्फी दोन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. त्यामुळे चॉकलेट कॉमन होऊ लागलं. मात्र त्यामध्येही बरेच प्रकार आले. काजू चॉकलेट, मावा चॉकलेट, त्याच प्रमाणे श्रीखंडामध्येही सीताफळ श्रीखंड, अननस श्रीखंड, सफरचंद श्रीखंड. इतकंच नव्हे तर काही केकमध्येही भारतीय फ्लेवरने प्रवेश केला आहे. आताचं पळतं जग आणि वेळेनुसार दिवाळीच्या पदार्थामध्ये वेगळेपण येऊ लागलं आहे. आपली संस्कृती जपून नव्या चवीचे पदार्थ कसे करता येतील त्याच्या या काही नवीन रेसिपी. ज्या पटकन करताही येतात.     
श्रीखंड केक :
व्हॅनिला स्पंज २५० ग्रॅम, १०० ग्रॅम चारोळी, ५० ग्रॅम बदाम-तुकडे, ५० ग्रॅम फ्रेश क्रीम, १०० ग्रॅम साखरेचे पाणी, तयार किंवा घरी तयार केलेले श्रीखंड पण जरा जाडसर हवे.
व्हॅनिला स्पंजचे लेअर करून घ्यावेत, श्रीखंड व क्रीम थोडेसे फेटून घ्यावे, व्हॅनिला स्पंज घेऊन त्यावर थोडेसे सिरप टाकून श्रीखंड व क्रीमचे लेअर करून केक तयार करावा त्यावर श्रीखंड, क्रीमचे आइसिंग करून त्यावर बदाम व चारोळीने सजवावा. आताच्या पिढीला आवडणारा केक. तुमच्या वेळेत होणारा..
बेसन कलाकंद :
१ बेसन वाटी, पाव वाटी तूप, अर्धा वाटी साखर, १ वाटी आटवलेले घट्ट दूध, अर्धा वाटी मिल्कमेड, अर्धा चमचा वेलची पावडर, सजवण्यासाठी काजू-तुकडा आणि बदाम-तुकडा.
गॅसवर एका कढईत तूप टाकून त्यात बेसनाचे पीठ चांगले भाजून घ्यावे. त्यात साखर, दूध व मिल्कमेड टाकून मिसळून घ्यावे. वेलची पावडर टाकून एकदम घट्ट होईपर्यंत हलवत राहावे. चांगले नीट शिजल्यावर बदाम व काजूचे तुकडे टाकून सजवावे.
गाजर हलवा करंजी :
२ वाटी किसलेला गाजर, १ वाटी साखर, २ चमचे तूप, १ चमचा वेलचीपूड,  २ चमचे मिल्क पावडर.
पारीसाठी – २ वाटय़ा मदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी नारळाचे दूध, तूप किंवा तेल (तळण्यासाठी).
एका भांडय़ात गाजर, साखर, तूप, वेलचीपूड टाकून ढवळत राहावे. थोडय़ा वेळाने त्याला पाणी सुटले की, चांगले शिजू द्यावे, नंतर त्यात मिल्क पावडर टाकून नीट मिश्रण सुके करून घ्यावे.     त्यानंतर मदा, रवा, तांदळाचे पीठ आणि नारळाचे दूध टाकून घट्टसर कणीक मळावी. नेहमीप्रमाणे गाजरहलवा भरून करंज्या कराव्यात. रेडीमेड गाजरहलवासुद्धा वापरू शकता मात्र थोडा आचेवर परतून कोरडा करावा.
दुधीभोपळा कतली :
१ मोठा दुधी भोपळा (साधारण ५०० ग्रॅम) अर्धा वाटी तूप, १ वाटी साखर, १ वाटी मिल्क पावडर, १ चमचा वेलचीपावडर,
१ वाटी दूध.
दुधीभोपळ्याची साल काढून आतला गर धुवून किसून घ्यावा. एका भांडय़ात तूप टाकून किसलेला दुधीभोपळा व वेलची पावडर थोडीशी परतवून घ्यावी. त्यात साखर टाकावी, दूध व मिल्क पावडर एकत्र करून त्यात टाकावी. मंद गॅसवर थोडय़ा थोडय़ा वेळाने हलवत राहावे. सर्व शिजून एकजीव झाल्यावर म्हणजे पाणी सर्व आटल्यावर एका पसरट थाळीत पसरवून ठेवावे. थंड झाल्यावर त्याच्या वडय़ा कापाव्यात. डेकोरेशनसाठी त्यावर चांदीचा वर्ख लावावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा