फैय्याज
‘‘ पैसे कमावणं भाग असल्यामुळे ‘एसएससी’ झाल्या झाल्या मुंबईत आलेली मी नाटकात रुजू झाले. ‘ही मुलगी चांगली गाते’ ही माझी पहिली ओळख. पण मला सुरुवातीच्या काळातच असे गुरुजन भेटले, ज्यांच्यामुळे माझ्यातली नवीन काहीतरी करून पाहण्याची मूळची ऊर्मी वाढीस लागली. ही ‘गाणारी मुलगी’ एक यशस्वी ‘गायिका-अभिनेत्री’ म्हणून स्थिरावली ती पुढच्या काळातच. मात्र, गद्धेपंचविशीत मला मिळालेलं विद्यार्थीवळण आज वयाच्या ७४ व्या वर्षीही नवीन काही शिकण्याचा उत्साह देतं.’’
‘गद्धेपंचविशी’च्या काळाचं महत्त्व ‘करिअरची सुरुवात’ या अर्थानं अधिक असतं. माझ्या वयाची २० ते ३० ही दहा वर्ष अक्षरश: सुवर्णकाळ जगल्यासारखी होती. माझं करिअर काय असणार आहे, हे घरच्या आर्थिक परिस्थितीनं बरंच आधी- म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षीच ठरवलं होतं. ‘ही मुलगी चांगली गाते, नृत्य करते आणि थोडं अभिनयाचंही अंग आहे,’ अशी गावी प्रशंसा होत असे. घरी कमावतं कु णी नव्हतं, भावंडं लहान होती, म्हणून ‘एसएससी’नंतर माझं पार्सल कामासाठी सोलापूरहून मुंबईला दाखल झालं आणि माझा रंगमंचावर प्रवेश झाला. पण ‘पोटार्थी कलाकार’ अशी सुरुवात झालेल्या मला पैलू पडत गेले ते या पुढच्या काळातच. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसं भेटत गेली आणि मी प्रामाणिक शिष्याप्रमाणे घडत राहिले. ‘गाणारी मुलगी’ ते ‘विविध भूमिका करू शकणारी गायिका अभिनेत्री’ अशी जी माझी ओळख नंतर तयार झाली, त्याला माझा ऐन तरुणपणीचा शिकण्याचा काळच कारणीभूत ठरला.
सोलापुरात अगदी शाळेत असल्यापासून मी क्लबच्या, ‘रेल्वे ड्रामाटिक्स’च्या नाटकांमध्ये काम करायची. गाणं आणि नृत्य मी शिकले होते, त्यामुळे कलापथक आणि मेळ्यांमध्ये मी असेच. एकदा गायिका रोशनबाई (शीला शुक्ल) गाणाऱ्या आणि अभिनय करू शके ल अशा तरुणीच्या शोधात होत्या. त्या स्वत: सोहराब मोदींच्या कं पनीत काम के लेल्या गायिका अभिनेत्री. त्या आमच्या घरी आल्या असताना मी त्यांना संगीतकार मदन मोहन यांचं एक गाणं म्हणून दाखवलं आणि त्यांना ते फारच आवडलं. लगेच मी त्यांच्याबरोबर जावं, असाच त्यांचा आग्रह होता. तेव्हा मी आठवीत शिकत होते. माझ्या डोक्यात शिक्षणाचे विचार होते. माझ्या भाषा उत्तम होत्या, त्यामुळे चांगलं शिकावं आणि कॉलेजमध्ये ‘लेक्चरर’ व्हावं, हे माझं तेव्हाचं स्वप्न. त्यामुळे अर्थातच मी त्यांच्याबरोबर मुंबईला गेले नाही. पुढे मॅट्रिक झाल्यावर मात्र मी पैसे कमावणं गरजेचंच झालं. मग मीच त्यांना मी गायिका आणि अभिनेत्री म्हणून काम करायला तयार असल्याचं सांगणारं पत्र लिहिलं. चार वर्ष मी रोशनबाईंच्या घरी राहिले. तशा आधी मी टायपिंगच्या परीक्षा दिल्या होत्या, ‘एस.टी.’चाही कॉल आला होता. आता वाटतं, की मी नोकरी के ली असती, तर पुढे जाऊन अधिकारी पदापर्यंत पोहोचले असते. पण तेव्हा मला नाटकासाठी बोलावणं आलं. सुमतीबाई धनवटे यांनी लिहिलेलं ‘गीत गायिले आसवांनी’ हे संगीत नाटक. कलाकारांमध्ये दत्ता भट, माई भिडे, कृष्णकांत दळवी आणि मी नायिका! प्रभाकर भालेकरांचं संगीत दिग्दर्शन होतं. या पहिल्याच नाटकात माझं प्रचंड कौतुक झालं. अगदी ‘ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं’ म्हणतात, तसं भरभरून वर्तमानपत्रांतून लिहून आलं आणि मला कामं मिळू लागली. याच काळात रोशनबाईंमुळे माझी मदन मोहन यांच्याशी भेट झाली. ते त्यांचे ‘मुँह बोले भाई’ होते.
त्यानंतर काम केलं ‘अश्रूंची झाली फुले’मध्ये. पण माझी त्यातली ‘नीलम’ची भूमिका अगदीच लहान होती. दारव्हेकर मास्तर (दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर) म्हणाले, की ‘तिसऱ्या अंकात नाटकातल्या प्रभाकरच्या व्यक्तिरेखेला तयार व्हायला वेळ लागणार आहे, तिथे तू एक गाणं गा.’ मी ‘मैंने लाखोंके बोल सहे’ हे गाणं म्हटलं आणि पहिल्याच वेळी त्याला टाळी मिळून ‘वन्समोअर’ही मिळाला! या नाटकाचे मुंबई, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कोलकाता असे भारतभर प्रयोग होत. माझी भूमिका फारशी महत्त्वाची नसली तरी त्या गाण्याचं कौतुक होई. नंतर दारव्हेकरांनी मला ‘कटय़ार काळजात घुसली’मध्ये (१९६७) ‘झरीना’च्या भूमिके त संधी दिली. नंतर मात्र त्यांना ‘अश्रूंची झाली फुले’ मध्ये ‘नीलम’साठी गाणारी मुलगी मिळाली नाही. मला सर्वजण ओळखू लागले ते ‘कटय़ार’मुळेच. माझी भूमिका पं. वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर होती आणि पुढे १६ वर्ष मी त्यांच्याबरोबर ५३५ प्रयोग के ले. मी मुस्लीम समाजातली असल्यानं झरीनाची अदब, तिचा लहेजा मला सहज जमलाही. अजूनही रसिक मला ‘झरीना’ म्हणून ओळखतात, ‘लागी करेजवा कटय़ार’म्हणायचा प्रेमळ आग्रह करतात तेव्हा आनंद वाटतो. याचं श्रेय स्वत:कडे घ्यावं असं मला वाटत नाही, कारण ही नाटकं च संस्मरणीय होती. पण आपण विस्मरणात गेलेलो नाही याचा प्रत्येक कलाकाराला आनंद होतोच.
त्या काळी या मोठय़ा लोकांबरोबर काम करताना मी नकळत शिकत होते, प्रत्येकाची कामाची शैली समजून घेत होते. संगीतकार सी. रामचंद्र यांच्याकडे मला ‘गीत गोपाल’ या कार्यक्रमात गायला मिळालं, तेही १९६८ च्याच सुमारास. दादा कोंडके यांच्याकडे ‘विच्छा माझी पुरी करा’ मध्ये (१९६७-६८) पार्श्र्वगायन केलं. त्यासाठी लावणीचा बाज शिकले. दादांबरोबर ४५० ते ५०० प्रयोग मी गायले. ‘विच्छा’मुळे माझी आणखी ओळख झाली. १९६९ मध्येच ‘पाठराखीण’ या चित्रपटासाठी संगीतकार राम कदम यांच्याकडे लावणी गायले. आपण विविध प्रकारचं काम करत रहायला हवं असा माझा प्रयत्न असायचा आणि मला तशा संधीही मिळत गेल्या.
‘तो मी नव्हेच’ नाटकात प्रभाकर पणशीकरांबरोबर लखोबा लोखंडेच्या कन्नड बोलणाऱ्या खऱ्या बायकोची- चन्नक्काची भूमिका मी करत असे. त्या नाटकात मी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भूमिका के ल्या. सुरुवातीला प्रमिला परांजपे ही भूमिका के ली. सुनंदा दातार ही व्यक्तिरेखाही करत असे. माझी चन्नक्का भाईंनी (पु. ल. देशपांडे) आणि सुनीताबाईंनी बघितली आणि मला भाईंनी ‘वटवट वटवट’मध्ये काम करायला बोलवलं. त्यांच्याबरोबर काम करायची एक वेगळी मजा होती. त्यांनी शिकवलेली गाणी मी उत्तम म्हणत असे. पुण्याचा प्रयोग तर आम्ही अक्षरश: गाजवला होता. लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. भाईंबरोबर मी पुढेही काम के लं. ‘एनसीपीए’साठी (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्टस्) १९८९ मध्ये अशोक रानडे आणि पु.लं.नी बैठकीची लावणी या गीतप्रकारावर संशोधनात्मक कार्यक्रम बसवला होता. त्यात गाण्याची त्यांनी मला संधी दिली. तोपर्यंत प्रामुख्यानं चित्रपटातल्याच लावण्या आम्ही ऐकल्या होत्या. पण या प्रकल्पादरम्यान बैठकीच्या लावणीतल्या बारीक बारीक गोष्टीही शिकायला मिळाल्या. त्या कार्यक्रमात नऊवारी साडी नेसून, साभिनय, लावणीची अदाकारी करत गायचं होतं. तो मला माझ्या करिअरमधला ‘हायलाईट’च वाटतो.
१९६६ मध्ये माझी जी सुरुवात झाली, त्यानंतर १९८९ पर्यंत मी मागे वळून पाहिलंच नाही. जवळपास २५ वर्षांचा हा सुवर्णकाळ. मात्र या काळात मी जी वाटचाल करू शकले, त्याला दिशा अगदी सुरुवातीलाच मिळाली होती. मत्स्यगंधा’मधील सत्यवती, ‘महानंदा’ या कादंबरीवरील ‘गुंतता हृदय हे’मधील कल्याणी या त्यापूर्वी दुसऱ्या अभिनेत्रींनी लोकप्रिय केलेल्या भूमिकाही मी के ल्या. (‘महानंदा’ या चित्रपटात मात्र मी विक्रम गोखले यांच्याबरोबर ‘मानू’ची भूमिका के ली होती.) मी जीव ओतून काम करत असे. माझं असं काही तरी त्यात यावं असा कायम प्रयत्न असे. ‘वीज म्हणाली धरतीला’ मधील जुलेखाची भूमिका मीच करू शके न, असा विश्वास पणशीकरांना होता आणि त्या नाटकाला प्रतिसादही उदंड मिळत असे. या नाटकातील मी गायलेलं ‘चार होत्या पक्षिणी त्या’ हे गाणं फारच लोकप्रिय झालं आणि अजूनही रसिकांना ते आवडतं. ‘अंधार माझा सोबती’ (१९७१) नाटकात जेव्हा मी एका अंध मुलीची व्यक्तिरेखा करणार होते, तेव्हा ‘गाणारी बाई ही भूमिका कशी करणार’ असं म्हणून काही लोकांनी चिरफाडच के ली होती. पण मी ती जबाबदारी यशस्वीपणे निभावू शकले. डोळ्यांना पट्टी बांधूनच त्या तालमी मी करत असे. ठेचकळले, पडले, मारही लागला. पण मी हार मानली नाही. तेव्हाच्या बहुतेक नाटकांचे आता व्हिडीओ उपलब्ध नाहीत याची खंत वाटते, तर काहींचे के वळ ऑडिओ राहिले आहेत.
पं. वसंतराव देशपांडे, प्रभाकर पणशीकर, डॉ. काशीनाथ घाणेकर अशा लोकांबरोबर काम करायला मिळणं ही मोठी गोष्ट असते. पं. जीतेंद्र अभिषेकींच्या समोर बसून शिकणं, पु.ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, चित्तरंजन कोल्हटकर अशा गुरुजनांचा सहवास लाभणं, ज्येष्ठ गायिका बेगम अख्तर यांच्याशी ओळख होणं आणि त्यांच्यासमोर बसून गाणं, हे सर्वाना मिळत नाही. आताच्या मुलांना मोठय़ा व्यक्तींबरोबर असा वेळ घालवता येत नाही, पण ते तेव्हा मला मिळालं. उत्तम नाटय़संस्था, निर्माते आणि सहकलाकारांबरोबर मी घडत गेले. मला विजया मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची खूप इच्छा होती आणि ‘हमीदाबाईची कोठी’मध्ये एका भूमिके ची संधीही चालून आली होती. मात्र ‘गोरा कुंभार’ या संगीत नाटकामुळे ती संधी मी स्वीकारू शकले नाही याचं शल्य वाटतं.
आज वयाच्या ७४ व्या वर्षी वाटतं, की अजून कितीतरी शिकायचं राहून गेलंय. अजून वेगळं काही करून बघावंसं वाटतं. प्रायोगिक, समांतर रंगभूमीवर काम करायचं राहिलंच. आजच्या नव्या मुलांची ऊर्जा वेगळी आहे, ते मांडत असलेला आशय वेगळा आहे. त्यांचं कौतुकच वाटतं.
मी माझा मुद्दाम असा साचा बनवला नाही. वेगळं काहीतरी करायला मला नेहमीच आवडायचं. अजूनही आव्हान हवंसं वाटतं. ‘होनाजी बाळा’, ‘संत तुकाराम’, ‘गोरा कुंभार’, ‘अमृत मोहिनी’, जयवंत दळवी लिखित ‘किनारा’ अशा विविध नाटकांमध्ये काम के लं. अनेक गद्य नाटकं यशस्वीपणे करत ‘गायिका अभिनेत्री’ ही ओळख मी कायम ठेवली. नाहीतर पुढे जाऊन ‘वादळवारं’सारख्या नाटकातली दारूचा अड्डा चालवणारी, शिव्यांचा भडिमार करणारी ‘अम्मी’ची भूमिका मी करूच शकले नसते. अशा विशेष भूमिकांचं कौतुक खूप झालं, पण ‘ऑफबीट’ नाटकांना म्हणावं तसं यश मिळालं नाही याची खंत आहे.
‘पेईंग गेस्ट’सारखं खेळकर नाटक,
डॉ. श्रीराम लागूंबरोबर बरंच नंतर के लेलं आणि देशातच नव्हे तर परदेशातल्या रसिकांनाही आवडलेलं ‘मित्र’ हे नाटक, अशा वेगळ्या भूमिका मी करत गेले त्या या मूळच्या शिकण्याच्या आवडीमुळेच. प्रेक्षक या सगळ्याची दखल घेतात आणि अजूनही भेटल्यावर आवर्जून एखाद्या नाटकाची ओळख देतात तेव्हा समाधान वाटतं. मला वयाच्या ऐन गद्धेपंचविशीत मिळालेल्या विद्यार्थीवळणाचंच हे फळ आहे.
शब्दांकन- संपदा सोवनी
chaturang@expressindia.com