प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ओम नमोजी आद्या , वेदप्रतिपाद्या, जयजय स्वसंवेद्या, आत्मरूपा’ असं ज्ञानेश्वरांनी ज्याचं यथार्थ वर्णन केलं आहे , त्या बुद्धीची देवता असलेल्या गणेशानं सर्जनशील माणसाला नेहमीच कलानिर्मितीची स्फूर्ती दिली. गणपती असा एकमेव देव असावा जो अगणित आकारांत चितारला गेला. असंख्य माध्यमांत  रेखाटला गेला आणि जात आहे.  कुणाला तो बालगणपतीच्या रूपात, तर कुणाला वक्रतुंड म्हणून. कुणाला रिद्धी-सिद्धींबरोबरचा, तर कुणाला अगदी योद्धा रूपातही तो मोह घालतो. आणि मग कागद, कॅनव्हास, काच, लाकूड, धातू, सिरॅमिक, कापड, अशा अनेकविध माध्यमांतून तो आकाराला येतो.. कधी आपल्याला नतमस्तक व्हायला लावणारा तर कधी बाप्पा म्हणत जवळचा वाटायला लावणारा, तर कधी चेहऱ्यावर उत्स्फू र्त प्रसन्नता निर्माण करणारा हा गणपती. त्या गणेशाची आमच्या चित्रकर्तीनी रेखाटलेली ही रूपं..

या चित्रकर्ती ढोबळमानानं तीन पिढय़ांचं प्रतिनिधित्व करतात. यातल्या काही जणी कलेचं औपचारिक शिक्षण घेऊन आयुष्यभर कलानिर्मितीमध्ये विविध प्रयोग करत आल्या आहेत, तर काही कोणत्याही औपचारिक कलाशिक्षणाशिवाय (उदा. रिंकूबाई बैगा, आरती सिंग) उत्स्फूर्तपणे कलानिर्मिती करत आहेत. काही पारंपरिक शैली आणि लोकचित्रकलेपासून प्रेरित होऊन समकालीन शैलीतही कलानिर्मिती करतात, तर काहींनी आपली स्वतंत्र शैलीच निर्माण केली आहे. व्यवसाय म्हणून कलानिर्मिती करणाऱ्या काही जणी आहेत, तर काहींनी कलामहाविद्यालयात अध्यापन केलं आहे. एक गोष्ट या सगळ्या जणींच्यात विशेष आहे, ती म्हणजे एक व्यक्ती म्हणून आणि त्याही पलीकडे स्त्री म्हणून आयुष्यातले तमाम व्याप सांभाळताना त्यांनी आपल्यातली कला सतत जिवंत ठेवली आहे आणि ती त्यांच्यासह सर्वानाच आनंद देत आहे. राज्यभरातल्या १२ चित्रकर्तीनी गणरायाला वाहिलेली ही खास ‘चित्रपुष्पांजली’ आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्तानं..


प्रदक्षिणा
कुमुद जसानी, मुंबई<br /> माध्यम : हॅण्डमेड मिश्र माध्यम

वयाच्या ८१व्या वर्षीही सुंदर कलानिर्मिती करणाऱ्या ज्येष्ठ चित्रकर्ती कुमुद जसानी या राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांच्या मानकरी आहेत. आपल्या या चित्राबद्दल त्या सांगतात, की गणराया लोकांची सुखदु:खं जाणून घेण्यासाठी मूषकावर स्वार होऊन वेगानं पृथ्वीप्रदक्षिणा करण्यास निघाला आहे. नाजूक ओघवती रेषा, अलंकरण, अस्सल भारतीय रंगसंगतीतलं हे चित्र पूर्ण झाल्यावर त्यावर कवडी घासून चकाकी आणली आहे. त्यामुळे या गणेशाला तेज लाभलं आहे.


गणेश
मंगल पाडेकर, मुंबई
माध्यम : बोर्डवर कापडाचं कोलाज

राज्य पुस्कार आणि अनेक सन्मान मिळवलेल्या मंगल पाडेकर एका वेगळ्याच माध्यमात अतिशय सुंदर काम करतात. त्या म्हणतात, ‘‘गणपतीचं नैसर्गिक स्वयंभू रूप मला आवडतं. शहरी गजबजाटापेक्षा वृक्ष, वेली, डोंगर-कपारीतील, निसर्गातील उपजत गणपती माझ्या चित्रात उतरतो. माझ्या चित्राचं माध्यम कापड आहे. कापडाच्या पोताचा योग्य वापर करून मी चित्रात नैसर्गिक परिसर ग्राफिक पद्धतीनं निर्माण करते. नेत्रसुखद रंगसंगती असलेल्या चित्रात नैसर्गिक वातावरण पावित्र्यात परावर्तित होतं आणि चित्रनिर्मितीचा खरा आनंद मिळतो.’’ कोलाज पद्धतीच्या त्यांच्या या चित्रात विशाल निसर्गातील लघू आकारातला गणेश त्याच्या शेंदूर फासलेल्या रूपामुळे आकर्षित करतो.


तुंदिलतनू
प्रतिमा वैद्य, चौक (रायगड)
माध्यम : सिरॅमिक

१९९५ मध्ये ‘मिनो’ (जपान) इथल्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत निवड झालेल्या प्रतिमा वैद्य यांची सिरॅमिकमधली एक कलाकृती जपानच्या सिरॅमिक म्युझियमच्या संग्रही आहे. या तंत्रात कलाकृती भट्टीत भाजताना ती आतून पोकळ असणं आवश्यक असतं. मातीची भांडी जोडून त्यातून कलात्मक प्राणी, मनुष्याकृती निर्माण करणं हे प्रतिमा यांच्या कामाचं वैशिष्टय़ आहे. गणपतीच्या या कलाकृतीबद्दल त्या म्हणतात, ‘‘एक डिझाइन म्हणून गणपतीचा विचार करताना सुपाएवढे कान, तुंदिलतनू ही वैशिष्टय़ं मी लक्षात घेतली. जानव्याची पोटावरील रेषा पोटाचा घेर उठावदार करते. आकारात एकसंधत्व आणण्यासाठी एकच रंग वापरला आहे.’’ रायगडमधील चौक गावात प्रतिमा वैद्य यांचा स्टुडिओ आहे.


योद्धा गणेश
जयश्री पाटणकर, दापोली
माध्यम : नैसर्गिक रंग आणि जलरंग

जयश्री पाटणकर या महाराष्ट्राची लोकचित्रकला असलेल्या ‘चित्रकथी’पासून प्रेरणा घेऊन, नैसर्गिक रंगाचा वापर करून चित्राकृती निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. राज्य पुरस्कारासहित अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या जयश्री आपल्या चित्रात जलरंग आणि हिरडा, चाफा, पळसाची फुलं, नीळ यांपासून स्वत: तयार केलेले रंग वापरतात. आपल्या ‘योद्धा गणेश’ या चित्राबद्दल त्या म्हणतात, ‘‘आल्हाददायक रूपातला गणेश आपण नेहमीच पाहतो, पण त्याचं सामथ्र्यवान, शक्तिमान योद्धा, असुरनाशक, पालनकर्ता, दुष्टशक्तीचा निर्दालक हे रूप सध्याच्या वातावरणात मला योग्य वाटतं. म्हणूनच मी त्याला या चित्रात योद्धय़ाचा वेष, चिलखत, जिरेटोप यांसह तलवार, खंजीर ही शस्त्रं घेतलेल्या रूपात दाखवलं आहे. तो शस्त्रसज्ज असून एक पाऊल उचलून, प्रत्यंचा खेचून बाण सोडण्याच्या तयारीत आहे. योद्धा गणेश वेगळाच परिणाम देऊन जातो.


गणेशजी
रिंकूबाई बैगा, उमरिया (मध्य प्रदेश)
माध्यम : वाळलेला दुधी भोपळा आणि अ‍ॅक्रेलिक रंग

उमरिया येथील लोढा गावात राहणारी रिंकूबाई बैगा ही आदिवासी तरुणी. त्या सांगतात, की त्यांच्या जमातीत त्यांनी प्रथम वाळलेल्या दुधी भोपळ्यावर गणपती रंगवला. ती त्यांची विकली गेलेली पहिली कलाकृती आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी गणेशाचं विशेष महत्त्व आहे.


कुटुंबश्री
शुभा वैद्य, इंदोर (मध्य प्रदेश)
माध्यम : कागदावर अ‍ॅक्रे लिक रंग

शुभा वैद्य यांनी, आपल्या परिवारासह आनंदाचे क्षण व्यतीत करणारा ‘कुटुंबश्री’ गणेश चित्रित के ला आहे. इंदोरमध्ये विविध कलाविषयक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. आपल्या चित्राविषयी त्या सांगतात, ‘‘बिहारच्या मधुबनी शैलीपासून प्रेरित होऊन मी हे चित्र रंगवलं आहे. मला या शैलीतले भडक रंग, दुहेरी बाह्य़रेषा नेहमीच आकर्षित करते. त्यामुळे त्याचा वापर यात असून अलंकरण हे वैशिष्टय़ माफक प्रमाणात वापरलं आहे.


गौरीनंदन
पूनम परळकर, मुंबई
माध्यम : रेशमी कापडावर बाटिक

वस्त्रविद्येतील जाणकार असलेल्या आणि प्रामुख्यानं याच माध्यमात कलानिर्मिती करणाऱ्या पूनम परळकर म्हणतात, ‘‘महाराष्ट्रात चैत्र गौरीपटावर गणपतीचं चित्र रेखाटलं जातं. त्यापासून स्फूर्ती घेऊन मी रेशमी कापडावर ‘बाटिक’ तंत्र वापरून हा गणपती चित्रित केला आहे. तो नैसर्गिक वाटावा म्हणून मातकट रंगाचा वापर केला आहे. बाटिक तंत्रात कामाच्या तीन पायऱ्या असतात. प्रथम पृष्ठभागावर चित्र रेखाटून घेतलं की  मेण लावणं,  रंग लावणं आणि नंतर मेण काढणं. मेणाला सुकल्यावर तडे गेल्यामुळे मिळणारा परिणाम चित्रात सौंदर्य निर्माण करतो. जागतिक स्तरावरील प्रदर्शनांसाठी चित्रांची निवड झालेल्या पूनम या राज्य पुरस्काराच्याही मानकरी आहेत.


सिद्धी -बुद्धी सह गणेश
अर्पिता रेड्डी,  हैद्राबाद
माध्यम : कॅनव्हासवर अ‍ॅक्रे लिक रंग

राष्ट्रीय पातळीवरील ‘कालिदास पुरस्कार’ मिळालेल्या अर्पिता रेड्डी या केरळच्या भित्तिचित्रांपासून प्रेरणा घेऊन समकालीन शैलीत चित्रनिर्मिती करतात. अर्पिता म्हणतात,‘‘गणपती आणि रिद्धी-सिद्धी यांच्या रूपानं प्रत्येक घरात वैभव, बुद्धिमत्ता असावी असं मला वाटतं. सुंदर अलंकार आणि पुष्पमालांनी सुशोभित असं हे गणपतीचं रूप मला नेहमीच आकर्षित करतं.’’


मोदकप्रिय:
सुमन वाडये, पुणे<br /> माध्यम : स्टेण्ड ग्लास (रंगीत काच चित्र)

‘स्टेण्ड ग्लास’मध्ये चित्राच्या आकारानुसार रंगीत काचांचे तुकडे शिशाच्या पट्टीनं जोडले जातात. सुमन वाडये यांनी २०१२ ते २०१६ या कालावधीत सिंगापूरमधील दोन प्रसिद्ध चर्चच्या स्टेन्ड ग्लासच्या खिडक्यांच्या जीर्णोद्धार प्रकल्पात चित्रकार म्हणून मोलाची कामगिरी केली. या क्षेत्राचा तेरा वर्षांचा अनुभव असलेल्या सुमन म्हणतात, ‘‘गणरायाचं रूप मुळातच इतकं सौंदर्यप्रधान आहे, की कमालीचं सुलभीकरण, नवआकारनिर्मिती, रंगांमध्ये बदलाचं स्वातंत्र्य जरी चित्रकारानं घेतलं, तरी नव्यानं उतरलेलं गणेशरूपही सुंदरच दिसतं.’’
चित्र सौजन्य- ‘द ग्लास स्टुडिओ, मुंबई’


लाडूप्रिय गणेश
कृत्तिका जोशी, राजस्थान
माध्यम : कापडावर नैसर्गिक रंग

वस्त्रविद्येची पदवीधर असलेली कृतिका ही राजस्थानच्या फड चित्रकारांच्या जोशी घराण्यातली तेविसावी पिढी आहे. कृतिका यांनी पारंपरिक पद्धतीनं चित्रनिर्मिती केली आहे. लाडवांचा आस्वाद घेणारा गणपती कायमच मरगळलेल्या मन:स्थितीत उत्साह देतो, असं बावीस वर्षांची कृतिका म्हणते. कापडाला गोंद लावून आणि मैद्याची कांजी करून, ते उन्हात वाळवून, त्यावर ‘मून स्टोन’ घासून गुळगुळीत केल्यानंतर त्यांनी त्यावर रेखाटन करून ते राजस्थानच्या खाणीत मिळणाऱ्या विशिष्ट रंगीत दगडांच्या वस्त्रगाळ भुकटीपासून स्वत: तयार केलेल्या रंगांनी रंगवलं आहे. चित्रात लाल, पिवळा, निळा हे मूळ रंग पांढऱ्या पाश्र्वभूमीवर उठून दिसतात. चित्राची सुंदर नक्षीदार कडा, वस्त्रांवरील नक्षीकाम आणि गणपतीबरोबर लाडवांचा आस्वाद घेणारा उंदीर दिसतो. कृतिका यांचं सूक्ष्म निरीक्षण त्यातून दिसतं. फड चित्रकलेत कायम सपाट रंगलेपन असतं, पण तिनं थोडं स्वातंत्र्य घेऊन वस्त्रांवर आणि रिद्धी-सिद्धीच्या हातातील चवऱ्यांवर छायाप्रकाश वापरला आहे.


गजानना श्री गणराया
भावना सोनावणे, बदलापूर
माध्यम : तांबे धातूवर इनॅमल

२००७ मध्ये पॅरिसमध्ये कलानिवास (‘आर्ट रेसिडन्सी’) आणि कलाप्रदर्शनासाठी निवड झालेल्या भावना या खूप कमी कलावंत काम करत असलेल्या इनॅमल माध्यमातही कलानिर्मिती करतात. हे प्राचीन मीनाकारीचं ‘इनॅमल तंत्र’ आहे. यात रंगीत काचेची पावडर तांब्याच्या पत्र्यावर नक्षीनुसार पसरवून ७३० ते ८१० अंश तापमानात (कधी-कधी तीन ते चार वेळा) गरम करून हवा तो परिणाम साधतात. प्रामुख्यानं सोन्या-चांदीच्या अलंकारांवर मीनाकारी नक्षीकाम आपण नेहमी पाहतो. ही चित्रकर्ती म्हणते, ‘‘गणेश या दैवतासंबंधीच्या भावना सहजतेनं मनात आणि मग कागदावर उमटू लागतात. मर्यादित रंग आणि अखेपर्यंत उत्सुकता वाढवणारं  हे कलातंत्र हाताळताना मला खूप आनंद मिळाला. दोन वेगळ्या तंत्रांनी तीन गणेश साकारले. पांढऱ्या आणि मातकट रंगाचा गणपती हा ‘ग्रॅफिटो’ (Sgrafitto) तंत्रात, तर रंगीत निळ्या-पिवळ्या रंगाचा गणपती ‘क्लोजोने’ (Cloisonne) हे तंत्र वापरून साकारला आहे.’’ सिरॅमिक आणि धातूमधील कलात्मक वस्तूंच्या सजावटीसाठी ही तंत्रं प्राचीन काळापासून वापरली जातात. ‘ग्रॅफिटो’मध्ये रंगाचा सपाट थर असतो, तर ‘क्लोजोने’मध्ये तार वापरून उठाव आणतात.


‘गणेशजी’
आरती सिंग, पाटणा (बिहार)
माध्यम : लाकडावर इनॅमल रंग

‘टिकूली कला’ या बिहारच्या पारंपरिक कलेत चित्रनिर्मिती करणाऱ्या आरती सिंग म्हणतात, ‘‘गणेशजी के बिना कुछ भी नहीं हो सकता. हमे पूजनीय हैं गणेशजी।’’