तन्मयी तुळशीदास बेहेरे tanmayibehere@gmail.com

गणपतीच्या आगमनाची सगळं घर उत्सुकतेनं वाट पाहात असतं,पण खरी लगबग ‘ती’चीच सुरू असते. बाप्पाच्या आगमनासाठी घराच्या साफसफाईपासून ते अगदी  पाठवणीपर्यंत. घरातल्यांना सोबतीला घेऊन ती हे सारं करत असते खरी, पण तिचा हात सर्वत्र मायेनं फिरत असतो. बाप्पाच्या पूजेत काही कमी पडायला नको म्हणून काळजी करणारी, घरच्यांच्या सुखासाठी मनोभावे प्रार्थना करणारी ती..प्रत्येक घरात एक तरी असतेच.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Premachi Goshta Fame Actress Amruta Bane
सासरे असावेत तर असे! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीची सासरेबुवांसाठी खास पोस्ट; अभिनेता पती कमेंट करत म्हणाला…
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar grahmakh photos viral
लगीनघाई! ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीचा ग्रहमख विधी पार पडला, फोटो आले समोर

प्रत्येक घरात एक ‘ती’ असते. कधी ती आजी असते, कधी आई, कधी काकी, मामी, आत्या, बायको वा मुलगी.. ती यातली कुणीही असू शकते, पण ती असतेच. गणपतीच्या आगमनासोबत प्रत्येकाच्या मनात तिच्या आठवणी जाग्या होतात.. मन मागे मागे जात राहातं..

बहुतांशी घरं आजही मध्यमवर्गीय. खर्चाचा हिशेब मांडणारी, मागणारी. गणपती जवळ आले की तिची लगबग सुरू होते. दैनंदिन खर्चाचा अंदाज घेऊन गणपतीचा खर्च त्या कोष्टकात बसवण्याचा तिचा आटापिटा सुरू होतो. घर सफाईसाठी सज्ज होतं. दरवाजे, खिडक्या, पंखे, भिंती आपणहून तिच्या स्वाधीन होतात. तिच्या हातांनी आपल्यावरची जळमटं नाहीशी होतील आणि आपण पुन्हा झळाळून उठू हा विश्वास त्यांना वर्षांनुवर्षांच्या याच नियमित साफसफाईतून आलेला असतो जणू. अख्खा आठवडा या मंडळींचा कसून कायापालट चाललेला असतो आणि संपूर्ण घर जसं काही कात टाकून लख्ख, टवटवीत होतं.. हसू लागतं.. गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज होतं.

माळ्यावरची वर्षभर गाठोडय़ात बांधून ठेवलेली तांब्या पितळ्याची मोठमोठाली भांडी  खाली उतरतात. ज्यातून तिच्या आजीची समई हाती लागते. पितळीची ती समई तिच्या आजीनं तिला लग्नात आहेर म्हणून दिलेली असते. त्या विचारातच चिंच, कोकम आणि कुठल्या कुठल्या पावडरींनी ती समई पुन्हा पूर्वीचं तेज धारण करते. तिचा हात हळुवारपणे त्या समईवरून फिरतो. आजीचा शांत तेवणारा चेहराच तिला समईमध्ये लख्खपणे दिसायला लागतो. डबडबलेल्या डोळ्यांनी ती मोठा तांब्याचा टोप घासायला घेते. तो तिच्या सासूबाईंचा. आपण या घरात यायच्या आधी गेल्या कित्येक पिढय़ांचा गणपतीच्या नैवेद्याचा स्वयंपाक यात रांधला गेला असेल आणि कदाचित आपल्यानंतरही रांधला जाईल.. तिला वाटून जातं. त्या टोपाच्या रूपानं सासूबाईंचा आशीर्वादच आपल्याबरोबर आजही आहे, असंच तिला वाटायचं. ही तांब्या-पितळ्याची भांडी जरा जास्तच प्रिय असतात तिला. तेवढीच तिजोरीतल्या सोन्याचांदीच्या पारंपरिक दागिन्यांचीसुद्धा काळजीवजा आस्था तिला असते. कारण हे दागिने ती गणपतीच्या अंगावर चढताना पाहते, तेव्हा बाप्पाचा अधिकाधिक खुलत जाणारा तेजस्वी चेहरा पाहून तिचा ऊर दरवर्षी तितकाच भरून येत असतो.

गणपती जेव्हा दोन दिवसांवर आलेले असतात, तेव्हा तर घरातली मुलंही उत्साहानं नव्या नव्या कल्पना आखून गणपतीची सजावट पूर्ण करतात. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ती कधी खाऊ, कधी गारेगार सरबतं, कधी चहा यांचा राबता सुरूच ठेवते. सजावटीचं, मुलांचं जातायेता कौतुक करत, त्यांचे रुसवे फुगवे काढत, ती त्यांच्यात हसून सहभागी होत राहते.

आणि प्रत्यक्ष गणेशचतुर्थीचा दिवस उजाडतो. भल्या पहाटेपासून ती न्हाऊन तयार होते. पूजेच्या तयारीसाठी ती तत्पर असते. पत्री, दूर्वा, जास्वंद, चाफा, शमी, तुळशीपत्र, आंब्याचं डहाळं, विडय़ाची पानं, सुपाऱ्या, नारळ,  हार, कंठी, गंध, अक्षता, हळदीकुंकू, काही काही सुटलं नाही ना, कमी पडलं नाही ना, याकडे तिचं बारकाईनं लक्ष असतं. सगळी तयारी करून देते आणि मग पुढची पूजेची धुरा पुरुष मंडळींकडे सोपवते. या पुरुष मंडळींकडून गणपतीची प्राणप्रतिष्ठापना पार पाडते. सोबतच ती स्वयंपाकाची आघाडीही पुढे नेत असते, तशी तिनं माणसं बांधलेली असतात. लेकी, सुना, जावा असतातच मदतीला, पण तरी तिचा स्पर्श प्रत्येक पदार्थाला होतोच. सगळ्या भाज्या गुण्यागोविंदानं हसत तिच्या हातून चिरायला तयार होतात जणू! त्यांना कल्पना असतेच, की आपण नैवेद्य बनणार आहोतच, पण त्याहीपेक्षा तिच्या हातच्या रुचकर पदार्थाचा आपण भाग होणार. म्हणूनच की काय, तिचेही हात भराभर भाजी चिरायला लागतात, त्यांना खमंग फोडणी  देतात, नाजूकशा मोदकांना कळ्या पडायला लागतात, हलकेच करंज्यांचे काठ नक्षीदारपणे वळतात.

केळीच्या पानात सुबकपणे हा सात्त्विक नैवेद्य वाढेपर्यंत तिच्याही पोटात कावळे ओरडायला लागतात. उपाशी राहिल्यामुळे चक्करही येत असते, तरी ती पंगत वाढायला घेते. आठवणीनं प्रत्येकाला त्याच्या आवडीचा पदार्थ वाढते. पाहुण्यांच्या तृप्त चेहऱ्यांकडे बघून ती आत सुखावत जाते. सगळ्यात शेवटी ती जेवायला बसते. कसेबसे चार घास पोटात ढकलते. खरं तर इतक्या उशिरा आणि एवढय़ा पदार्थामध्ये आपल्या आवडीचाच पदार्थ ती खायला विसरलेली असते.

संध्याकाळी पुन्हा पाव्हण्यारावळ्यांनी घर भरून जातं. माहेरवाशिणींच्या ओटय़ा भरण्यात, चहापाणी करण्यात ती पुन्हा स्वत:ला विसरून जाते. पाहुण्यांची आपुलकीनं चौकशी करण्यात, जावयाचं कोडकौतुक करण्यात, लेकीसुनांचे लाड करण्यात रात्र कधी होते तिला समजतसुद्धा नाही. टाळ-मृदुंगाच्या गजरात आरतीही सुरू होते. आता कु ठे ती देवाकडे निवांतपणे पाहाते. बाप्पा तिच्याकडे हसून पाहात असतो. तिचे डोळे पाणावतात. मन मात्र प्रार्थना म्हणत असतं.. ‘सगळं गोड मानून घे बाबा! अंगात प्राण असेपर्यंत तुझं करेन. माझ्या घरी हक्कानं ये आणि पाहुणचार घेऊन जा.’

शेवटी विसर्जनाचा दिवस येतोच. ‘निरोप घेतो आता. आम्हा आज्ञा असावी,’  निरोपगीतानंतर ती पदर पसरून अख्ख्या घराच्या सुखशांतीसाठी मागणं मागते. जणू काही तिचंच पोर परगावी चाललंय असं समजून दहीपोह्य़ांची शिदोरी बांधून देते. साश्रुनयनांनी बाप्पाला निरोप देते. घर रिकामं होतं. मखर रिकामं होतं. या वर्षीही बाप्पाची व्यवस्थित पाठवणी झाली. त्याच्या सेवेत काही कमतरता आली नाही,

याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतं. एव्हाना वयाप्रमाणे तिचे गुडघे दुखायला लागलेले असतात. त्याचं भान तिला आत्ता येतं. गेले कित्येक दिवस ती बीपीची गोळी घ्यायला विसरलेली असते. पाठ भरून आलेली असते. पण तृप्ततेच्या आणि पूर्ततेच्या आनंदात डोळे कधी झोपेच्या अधीन होतात, तिला समजतसुद्धा नाही.

अशी ती.. तीच घडवते आपला गणपतीशी ऋणानुबंध. तीच जोडते साऱ्या घराला.. तीच समृद्ध करते आपलं अनुभवविश्व, जपते आपलं नातं.. तिच्यामुळेच वाट बघतो आपण गणेशोत्सवाची, टाळ-मृदुंगाच्या गजरात आरती सुरू असताना कुठे तरी कोपऱ्यात उभी असलेली ती.. गणपतीच्या बरोबरीनं आठवत राहते.. बाप्पाचा हात डोक्यावर असावा तसं तिचं ममत्व कायमच आपल्याबरोबर असावं असं वाटत राहतं. कित्येक गणपती उत्सव नंतर येतात आणि जातात.. आता ती काळाच्या पटलाआड गेलेली असते तरी मन तिच्या मायेची ऊब शोधत राहतं..

 

Story img Loader