प्रतिभा वाघ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमरिया जिल्ह्यातल्या लोढा गावातील वय वर्ष १४ ते ८४ वयोगटातल्या अनेक ‘बैगानी’ आदिवासी स्त्रिया वाळलेला दुधी भोपळा, भोपळा, बांबूची मुळं, सागाचं लाकूड अशा माध्यमांचा वापर करत पर्यावरणस्नेही गणेश प्रतिमा, गणेश मुखं बनवतात. यंदाच्या गणेश चतुर्थी निमित्तानं या भूमिपुत्रांच्या कलागुणांचा परिचय..

‘इकोफ्रेंडली’ अर्थात ‘पर्यावरणस्नेही’ म्हणजेच निसर्गात मिसळून जाणाऱ्या वस्तू.. ज्यांच्यामुळे निसर्गाला, पर्यावरणाला हानी पोहोचत नाही! याचा प्रत्यय गावाला गेल्यावर प्रकर्षांनं येतो. सतत निसर्गाच्या सहवासात राहणाऱ्या आणि स्वत:ला ‘भूमिपुत्र’ असं अभिमानानं संबोधित करणाऱ्या मध्य प्रदेशातल्या उमरिया जिल्ह्यातल्या ‘बैगा’ या आद्य आदिवासी जमातीला पर्यावरणाचं महत्त्व पुरेपूर समजलेलं आहे. ‘बैद्य’ या हिंदी शब्दावरून हा ‘बैगा’ शब्द आला. कलांमध्ये कुशल असलेले बैगा नृत्यकलेसाठी विशेष प्रसिद्ध आहेतच, पण चित्रकलेतही त्यांची उल्लेखनीय प्रगती आहे.

   उमरिया जिल्ह्यातल्या लोढा गावात २००८ मध्ये ‘कला और कलाकारों का घर’ ही कलाशाळा (आता दिवंगत) आशीष स्वामी या चित्रकारानं सुरू केली आणि ‘बैगानी चित्रकला’ विकसित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता . सध्या त्यांचं हे कार्य त्यांचे पुतणे निमिष स्वामी यशस्वीरीत्या करत आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगचं शिक्षण घेतलेल्या या तरुणाला आदिवासी लोककलेविषयी विलक्षण आस्था असल्यामुळेच ते या कलाकृती जगभरात पोहोचवून ‘बैगानी’ कलापरंपरेची लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या ‘कलाकारों का घर’मध्ये सकाळी ११ पासूनच कामाला  सुरुवात होते. घरची सर्व कामं  आटोपून आपल्या लहान मुलांना बरोबर घेऊन गावांतल्या १४ ते ८४ वयोगटातल्या  तरुण, मध्यवयीन, वृद्ध स्त्रिया.. नव्हे ‘चित्रकर्ती स्त्रिया’ येतात. त्यांना कागद आणि रंग दिले जातात. दुपारी चार वाजेपर्यंत त्या इथे कलानिर्मिती करतात. त्यांच्या चित्राकृती, कलाकृती विक्रीसाठी ठेवल्या जातात आणि त्याचा योग्य मोबदला त्यांना मिळतो. या निसर्गकन्यांनी सुंदर अशा पर्यावरणस्नेही गणेश प्रतिमा, गणेश मुखं बनवली आहेत. यासाठी नैसर्गिक माध्यमाचा फार कौशल्यपूर्ण वापर केला आहे. वाळलेला दुधी भोपळा, भोपळा, बांबूची मुळं, सागाचं लाकूड, कागदी लगदा (पेपरमॅश), अशी माध्यमं वापरली आहेत.

 लाकडावरील गणेशमुख बनवण्यासाठी त्या टिकाऊ  सागाचं लाकूड वापरतात.  त्यावर सोंड, कान, सुळे, मुकुट, डोळे, असे आकार कोरून घेतात. ते झाल्यावर पॉलिश पेपरनं ते घासून गुळगुळीत करतात. त्यावर एक सफेद रंगाचा ‘बेस कोट’ देतात. तो वाळल्यावर प्रत्येक चित्रकर्ती आपल्या कल्पनेनं ते रंगवते. समोर रंगाच्या बाटल्या असतात. पण प्रत्येकीनं रंगवलेलं गणेशमुख विविध रंगसंगतीचं, विविध रंगमिश्रणांतून वैशिष्टय़पूर्ण बनतं. लाकडावर कोरीवकाम पुरुष करतात आणि स्त्रिया रंगकाम करतात. २१ वर्षांची रूपा बैगा आता कोरीवकाम करायला शिकते आहे. दुधी भोपळय़ावर रंगवलेले गणेश तर फारच नावीन्यपूर्ण आहेत. गणपतीच्या सोंडेचा आकार दर्शवणारा दुधी शोधून ते तो वेलीवरच वाळू देतात. पूर्ण वाळला, की तो सडत नाही, टिकतो. त्यानंतर त्याचे दोन भाग करतात. नंतर आतील गराचा भाग काढून पॉलिश पेपरनं घासतात. त्यावर वॉर्निशचा थर देतात. बाहेरील पृष्ठभागावर रंगकाम करतात. कलाशाळेतून पदविका न घेतलेल्या या सगळय़ांना निसर्गात राहिल्यामुळे आपोआपच कलेची मूलतत्त्वं समजू लागतात.  दुसरा एक गोलाकार दुधी भोपळा असतो. त्याला इथल्या बोली भाषेत ‘तुम्मड’ म्हणतात. त्याचा आकार भांडय़ासारखा दिसतो.

या तुम्मडपासून बनविलेला गणेश पूर्णाकृती असून तो नैसर्गिकरीत्या सुकल्यामुळे पिवळसर करडय़ा रंगाचा असतो. हा वेलीवर पूर्णपणे सुकल्यावरच तोडला जातो. पॉलिश पेपरनं पॉलिश, वॉर्निशचा थर या साऱ्या प्रक्रिया करून विशिष्ट अणकुचीदार हत्यारानं त्यावर डोळे वा चेहरा कोरला जातो. एकाच रंगातील हा त्रिमितयुक्त गणेश खूपच आकर्षक वाटतो. बांबूच्या बेटातील जून झालेले बांबू कापून झाल्यावर, जमिनीत असलेली त्यांची मुळं पावसाळय़ात जमीन मऊ झाल्यावर सहज काढता येतात. १५ ते २० मुळांचे गठ्ठे आणले, की त्यातून दोन ते तीन उपयोगी असतात. ती पाण्यात भिजवून ठेवून, माती काढून टाकली जाते. हे पाणी तीन-चार वेळा बदलावं लागतं. नंतर लाकडात जसं कोरीवकाम करतात, तसं त्यावर केलं जातं. शेवटी वॉर्निश लावलं जातं. या कलाकृती फारच कमी प्रमाणात उपलब्ध होतात.  केवळ ‘गणेशजी’च नाही, तर इतरही कलाकृती इथे बनतात, असं निमिष स्वामी सांगतात. वेगवेगळे प्रयोग ही मंडळी करतात. काही जुनी तंत्रं नव्या पद्धतींसाठी वापरतात. लाकडी मूर्तीला ‘टेराकोटा’चा आभास निर्माण करण्यासाठी पालकच्या भाजीची पानं आणि चवळीच्या वेलीची पानं यांचा रस काढून त्यात लाकडाची कलाकृती भिजत ठेवतात आणि तिला टेराकोटाचा रंग चढतो. रामराज आणि चुई या दोन प्रकारच्या मातीचे रंगही यासाठी वापरले जातात.   ‘बैगानी’ कलाकृती जगभर जात आहेत. ७०० रुपयांपासून ३,००० रुपयांपर्यंतच्या किमतीला त्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. मध्य प्रदेश, दिल्ली अशा ठिकाणी कला मेळे होतात, त्यामध्ये या कलाकारांचा सहभाग असतो. संतोषी बैगा (वय ३५), सकूनबाई बैगा (वय ४९) या त्यांच्यामधल्या काही कुशल कलावंत आहेत. या वर्षी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झालेल्या जुधईया बाई ८३ वर्षांच्या आहेत. (त्यांना ‘पद्मश्री’नं सन्मानित केल्यानंतर या कलाप्रवाहाची ओळख जनसामान्यांना झाली होती.) निसर्गात राहणाऱ्या या बैगा आदिवासींनी पर्यावरणाशी मैत्री केली आहे. याची साक्ष त्यांच्या या गणेशाच्या, सुंदर चित्र-शिल्पकृती देत आहेत.