पर्यावरणाचा प्रश्न जटिल होत चालला आहे, त्यात दरवर्षी भर पडते ती गणेशोत्सवात पूजा केली जाणाऱ्या आणि विसर्जनानंतर भग्नावस्थेत पडणाऱ्या असंख्य प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची. म्हणूनच मीनल लेले, सुजाता कदम आणि राजलक्ष्मी पुजारे या मैत्रिणींनी सुरू केली एक वेगळी चळवळ- शाडूच्या मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची आणि त्याद्वारे पर्यावरणविषयक जागृतीची. त्यांच्याच प्रयत्नांची ही कहाणी.. येत्या गणेशोत्सवासाठी प्रत्येकाने बोध घ्यावा अशी.
ग णपती हे या तिघी मैत्रिणींचे अतिशय आवडते दैवत, पण त्याचे स्थान त्यांच्यासाठी केवळ मखरात नाही. जीवनातील प्रत्येक सुख-दु:खाशी हा सुखकर्ता-दु:खहर्ता जोडला गेलेला आहे एखाद्या जिवाभावाच्या मित्रासारखा. म्हणूनच या जिवाभावाच्या दैवताची विसर्जनानंतर होणारी विटंबना बघून त्या अस्वस्थ झाल्या. उत्सवाच्या काळात दहा दिवस मखरात मिरवणारा, सुंदर सुवासिक फुलांनी सजलेला गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारी भग्न अवस्थेत, असहाय्यपणे पडलेला बघून त्या बेचैन झाल्या. गणपती उत्सवाच्या आगे-मागे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा भरणारा बाजार बघताना त्यांना वाटू लागले, आपण फक्त बेचैन व्हायचे की पुढे होऊन काही कृती करायची? आणि मग त्यांनी एक पाऊल उचलले, लहानसे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकू नका, असे सांगत मूर्तिकारांचे मन वळवण्याचे. मूर्तिकारांनी दिलेल्या नकारातून त्यांनी हाती घेतली एक वेगळी चळवळ- शाडूच्या मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची. मीनल लेले, सुजाता कदम आणि राजलक्ष्मी पुजारे या तिघी मैत्रिणींच्या धडपडीची ही गोष्ट आहे.
‘एनव्हायरो व्हिजन’ या स्वयंसेवी संस्थेत या तिघी जणी काम करीत होत्या. पर्यावरणस्नेही सजावट कशी करावी याविषयी त्या प्रशिक्षण शिबीर घेत होत्या. गणपतीच्या सजावटीसाठी घरी मखर बनवणे शक्य होते, पण गणपतीची मूर्ती घरी बनवावी अशी कल्पनाही त्या वेळी कोणाच्या मनात येणे शक्य नव्हते आणि बाजारात ज्या शाडूच्या मूर्ती उपलब्ध होत्या त्याची किंमत सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी नव्हती. मग या मैत्रिणींनी स्वत:च हा प्रयोग करून बघायचा असे ठरवले. मीनल स्वत: कलाकार, शिवाय तिने कॅम्लिन कंपनीतर्फे कागदाच्या लगद्याच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे या तिघींनी आपली नोकरी सोडली आणि कागदाच्या लगद्यात मुलतानी माती, मेथी दाण्याची पूड घालून मूर्ती बनवायला सुरुवात केली, पण बाजारात दिसणाऱ्या मूर्तीची सफाई आणि तकाकी, तेज या मूर्तीना नव्हते, पण निराश न होता कागदाचा लगदा आणि शाडू माती असे मिश्रण त्यांनी करून बघितले, पण मनाचे समाधान होत नव्हते. स्वत:लाच जर मूर्ती पसंत पडत नव्हत्या तर त्या मूर्ती बाजारात कशा विकायच्या?
यापुढील टप्पा होता मूर्तिकारांचे मन वळवण्याचा. त्यांच्यामार्फत बाजारात येणाऱ्या हजारो प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना पूर्णपणे रोखणे शक्य नव्हते, पण त्या आघाडीवर थोडे प्रयत्न करून बघायला काय हरकत होती? मग या तिघींनी मूर्तिकारांची भेट घेणे सुरू केले. ओळखी काढत काढत ठाणे, कल्याण, पेण या भागांतील कमीत कमी २५ ते ३० मूर्तिकारांच्या घरी, कारखान्यात त्या गेल्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिस टाळा हे सांगण्यासाठी. या मूर्तिकारांनी एकच उत्तर दिले, तुमचे म्हणणे योग्य आहे, पण ते मान्य करणे, स्वीकारणे शक्य नाही. त्याची कारणे अर्थातच होती. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची साच्यात केली जाणारी मूर्ती अवघ्या दोन तासांत तयार होते आणि ती वाळायलाही वेळ लागत नाही. शिवाय या मूर्तीवर फिनिशिंगचे फारसे काम करावे लागत नाही. एकदा घसाई पुरेशी असते. एकूण काय, तर एक मूर्ती बनवण्यासाठी लागणारा कालावधी जेमतेम अडीच ते तीन तास आणि खर्च? ५० ते ६० रुपयांच्या आसपास. शाडूच्या मातीच्या मूर्तीचे गणित मात्र याच्या अगदी उलटे. मातीचाच भाव किमान दोनशे रुपये गोणी. शिवाय मूर्ती वाळायला लागणारा वेळ किती तरी जास्त (आणि पावसाळा असेल तर त्यात आणखी भर!) शिवाय मूर्तीचे हात, सोंड, दागिने बाहेरून वेगळे लावावे लागतात आणि फिनिशिंग? तो फार पुढचा टप्पा!
पूर्वी, म्हणजे २५-३० वर्षांपूर्वीपर्यंत एका कुटुंबाचा एक गणपती असायचा. त्यानिमित्ताने सगळी भावंडं आणि त्यांची कुटुंबं एकत्र येत, पण गेल्या काही वर्षांपासून या एका कुटुंबातील प्रत्येक छोटे कुटुंब स्वतंत्रपणे आपल्या घरी गणपती बसवायला लागल्यामुळे मूर्तीची मागणी प्रचंड वाढली आणि शाडूच्या मातीची जागा प्लॅस्टर ऑफ पॅरिसने कधी घेतली हे कळलेही नाही, असे मीनल सांगते. नदीकाठची माती आणून त्याची मूर्ती करून त्याला हळदीकुंकू वाहून पुन्हा ती मूर्ती नदीलाच अर्पण करण्याचे दिवस गेले आणि पर्यावरणाचे अनेक प्रश्न पायांवर धोंडा पाडून घ्यावा तसे आपण ओढवून घेतले. २००५ सालापासून या तिघींनी शाडू मातीच्या मूर्ती बनवून विकायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी केलेल्या २१ मूर्ती सुंदर, सफाईदार नव्हत्या, पण नातलग, मैत्रिणींनी त्या कौतुकाने, प्रेमाने घेतल्या. मग पुढच्या वर्षी त्यांनी दोन-तीन कारागीर मिळवले आणि शंभर मूर्ती केल्या. या प्रयत्नांना मर्यादा आहेत हे त्यांना नक्की जाणवत होते आणि त्यामुळे एक वेगळा प्रयत्न म्हणून त्यांनी प्रज्ञा ठाकूर या मैत्रिणीच्या मदतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे एक प्रस्ताव ठेवला- विविध संस्था, गटांना शाडू माती मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचा. विविध शाळा, महिलांचे बचत गट, जेलमधील कैदी, गतिमंद विद्यार्थी अशा विविध पातळ्यांवर होणाऱ्या या प्रशिक्षणाला प्रदूषण मंडळाने खूप पाठिंबा दिला. वाशी परिसरातील कर्णबधिर, मूकबधिर, गतिमंद आणि सर्वसामान्य मुलांच्या मिळून २५ शाळांमधील मुलांना या तिघींनी मूर्ती बनवण्याचे कौशल्य शिकवले. एकीकडे तळोद्याच्या जेलमधील कैद्यांना, तर दुसरीकडे पुण्यातील किलरेस्कर कमिन्स या कंपनीत कर्मचाऱ्यांच्या एका गटाला त्यांनी हे प्रशिक्षण दिले. हे प्रयत्न समाजातील विविध थरांत अधिक जागृती निर्माण करणारे ठरले. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना खूप वेग आला आणि ठाणे-कल्याणच्या भौगोलिक सीमा ओलांडून नाशिक, पुणे, अमरावती या शहरांतील चित्रकला, हस्तकलेचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यापर्यंत हे प्रशिक्षण पोहोचले.
अर्थात स्वत: मूर्ती बनवण्याचा आनंदही या तिघींना हवा होता. त्यातही विशेषत्वाने कलाकार असलेल्या मीनलला नक्कीच. त्यामुळे मीनलने मूर्ती बनवायच्या आणि प्रसिद्धी, लोकांना त्याविषयी माहिती देण्याचे काम तिच्या दोघी मैत्रिणींचे अशी कामाची विभागणी केली गेली. शाडू माती मूर्ती बनवण्याचे हे काम दिवाळीनंतर सुरू होते आणि जवळजवळ वर्षभर चालते. या तिघी मैत्रिणींचा त्यांच्या कामाच्या व्यस्ततेनुसार सहभाग कमी-अधिक होतो. आता मीनलच्या भावाने तिला माती कालवण्याचे एक यंत्र विकसित करून दिले असल्याने माती कालवण्याचे काम थोडे सोपे झाले आहे. प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे ठाण्यात नुकतेच पर्यावरणस्नेही गणपती मूर्तीचे एक प्रदर्शन भरले होते. त्यात मीनलने केलेल्या ७-८ प्रकारच्या मूर्तीचे नमुने होते. यंदाच्या गणेशोत्सवात कल्याण, ठाणे, डोंबिवलीतील विक्रेत्यांकडे मीनलच्या सहाशे-सातशे मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असतील.
गणेश मूर्ती विकणे हा या मैत्रिणींचा उद्देश कधीच नव्हता आणि नाही. त्यांचा आक्षेप आहे तो या उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या हवा-पाणी प्रदूषणाचा. बुडणाऱ्या जहाजात आणखी वेगाने आपण पाणी भरतोय आणि आपल्याच विनाशाची वेळ आणखी जवळ आणतोय, हे आपल्याला कधी कळणार, असा त्यांचा सवाल आहे. प्रत्येक घराने आपल्या घराच्या सणाची वेगळी चूल मांडण्यापेक्षा आणि प्रत्येक गल्लीत दर दोन पावलांवर वेगळा मंडप घालण्यापेक्षा एकत्रितपणे हा सण साजरा करता येणार नाही का, हा त्यांचा प्रश्न आज लाखमोलाचा आहे.    
vratre@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा