आजच्या इतकी निर्विकार चेहऱ्यानं बसलेली आजी मी गेल्या आठ महिन्यांत कधीच पाहिली नव्हती. धबधब्याचं पाणी कोसळावं तशी आजी अचानक बोलू लागली, ‘मी गेल्या महिन्यात चार दिवस श्रमिकनगरला मुलीकडे मुक्कामी गेले आणि..’
आजी डोक्याला हात लावून बसली होती. ‘आता नाही बिडय़ा वळायच्या. कंटाळा आला रे!’ गंगुबाई नावाच्या या आजीनं तरुणपणात दोन हजार बिडय़ा दिवसाला वळल्याचं ती सांगते. ‘नुसता खोकला येऊन राहिला.’ आजी म्हणाली. आजीला ऐकायला खूप कमी येतं म्हणून मी खाणाखुणा करीत आजीला विचारलं, ‘औषध नाही घेतलं का?’ ‘नाही, आता औषधं घ्यायची इच्छाच नाही राहिली. जाऊ दे कधीतरी मरायचंच.’ आजी थोडंसं थांबून बोलत होती.
या आजीला बिडय़ा वळण्यात व्यस्त असलेलं मी नेहमी पाहत आलो. तिच्या आजच्या हतबल वाक्यांनी डोळ्याची पापणी न मिटता मी एकटक तिच्याकडे बघतच राहिलो. अचानक अंगात शक्ती संचारल्यासारखी आजी उठली. कमरेत वाकलेली गंगुआजी आठ बाय आठच्या खोलीच्या कोपऱ्यात गेली. तेथून तळहाताएवढा आरसा आणि बदामी रंगाचा नक्षीदार कंगवा उचलला. खोबऱ्याच्या तेलाचं भांडं घेतलं. खोलीच्या दरवाजाजवळ आजी पुन्हा येऊन बसली. तळहातावर भरपूर तेल घेतलं. वयाच्या ८० व्या वर्षीही आजीचे डोक्याचे केस पूर्णपणे पांढरे झालेले नाहीत. अजूनही बरेचसे केस काळेभोर आहेत. केसांच्या मुळाशी तेल लावता लावता आजी एका रेषेत बोलली, ‘माझी सासू मला भांडय़ात केस धुवायला सांगायची, माझ्या तरुणपणात. केस धुतल्यानंतर घराबाहेर पडू द्यायची नाही. नजर लागंन म्हणायची. गुडघ्याएवढाले लांब केस होते माझे. आता खूप कमी केस राहिले डोक्याला!..’ आजी भूतकाळात रमली होती.
आजीनं लगबगीनं तीन छोटय़ाशा डब्या एका कापडाखालून काढल्या. एका फडक्याची गुंडाळी घाईघाई उलगडली. त्यातून नागवेलीची पोपटी पानं काढली. त्यातलं एक पान हाती घेत त्याचा देठ खुडला. डबीतला वाळलेला चुना अंगठय़ाजवळच्या बोटावर घेतला. चुना पानावर चिकटत नव्हता. परंतु आजीनं कसाबसा तो रगडला. पानाची एक उभी, एक आडवी घडी मारली. पान तोंडात टाकलं. डबीतला कात पानावर न टाकता आजीनं हातावर घेऊन तोंडात फेकला. अडकित्त्यानं सुपारी कातरत जिभेवर टाकली.
येत्या काही क्षणातच आपल्याला डोक्याला तेल लावायला मिळायचंच नाही. तोंड-जीभ लालेलाल करणारं पान यापुढे जणू खायलाच मिळणार नाही, असेच काहीसे हावभाव आजीच्या सावळ्या चेहऱ्यावरून सरकत गेले. म्हणूनच कदाचित आजी ही सर्व र्कम घाईघाईत उरकत होती. मी आजीच्या पायाला हात लावला. ‘मी दोन दिवसांनी खोली सोडून गेल्यावर कुणाच्या पाया पडशील!’ आजी खोटा राग दाखवत म्हणाली.
विडय़ा वळण्याचं तंबाखू असलेलं प्लॅस्टिकचं हिरवं सूप खोलीत आज दिसलं नाही. विडय़ांची पाण्यात भिजवलेली पानं, विडय़ा बांधण्याचा गुलाबी दोऱ्याचा रीळ आज खोलीत आढळत नव्हता. विडय़ांची पानं कापण्याची कात्री तेवढी नजरेस पडली. आजीचा चॉकलेटी फ्रेमचा चष्मा आजीच्याच बाजूला पडून होता.
‘कालच भांडी घासून ठेवली रे, मला सुनेच्या घरी राहायला जायचंय ना! खराब भांडे बघून ती चिडेल.’ आजी म्हणाली. डाळीसाळी, मसाले ठेवण्याचे अॅल्युमिनिअम स्टीलचे डबे आजीनं घासूनपुसून खोलीबाहेर उपडे करून ठेवले होते.
आजच्याइतकी निर्विकार चेहऱ्यानं बसलेली आजी मी गेल्या आठ महिन्यांत कधीच पाहिली नव्हती. धबधब्याचं पाणी कोसळावं तशी आजी अचानक बोलू लागली, ‘मी गेल्या महिन्यात चार दिवस श्रमिकनगरला मुलीकडे मुक्कामी गेले. एक रात्री तीन वेळा लघवी करण्यासाठी झोपेतून उठले. दरवाजा वाजला. माझ्या पोरीला ते खटकलं. ती डाफरत मला म्हणाली, ‘आई तीन-तीन वेळा कशाला झोपेतून उठतेस गं, दरवाजाचा किती मोठा आवाज होतो. मुलगी माझ्यावर रागावली. मग मी दुसऱ्या दिवशी परत खोलीकडं निघून आले.’ शब्दांतून कोसळणारी आजी अचानक गप्प झाली..
खूप संथ गतीनं आजी बोलू लागली, ‘माझ्या चुलत सुनेनं मला तिच्या घरी राहायला बोलवलंय. मला मुलगा नाही ना!’ आजीला मुलगा नसल्याचं मला आज कळत होतं. आजी पुतण्याच्या घरी राहायला जाणार होती.
‘दोन दिवसानं येईल माझा नातू खोलीतले भांडे घेऊन जायला. आता राहीन सुनेच्याच घरी. कुठंतरी मरायचंच!’ आजीच्या डोळ्यांचे काठ पाण्यानं थबथबले होते..    
chaturang@expressindia.com

Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
an old lady burst firecrackers in hand shocking video goes viral on social media
“आज्जी हे चुकीचं आहे” हातात धरून फोडले फटाके, आज्जीचा प्रताप पाहून… VIDEO होतोय व्हायरल
Hardworking old women Viral Video
‘गरिबी माणसाला जगणं शिकवते…’ भरपावसात आजींनी असं काही केलं; VIDEO पाहून नेटकरीही झाले भावूक
Shocking video Chhattisgarh: Monster Grandson Brutally Thrashes Elderly Grandmother With Cricket Bat In Raipur
“संस्कार कमी पडले” नातवाने आजीला बॅटने मारलं; ‘ती’ फक्त रडत राहिली; काळीज पिळवटून टाकाणारा VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी