तळ ढवळताना : नीरजा

आज गणेशाचं खरं रूपच विसरून गेलो आहोत आपण. गणेशाच्या समोरची डोळ्यांत हजारो अपेक्षा घेऊन जाणारी गर्दी पाहते दूरचित्रवाणीच्या पडद्यावर, तेव्हा वाटतं देव मानत असूच आपण तर का नाही सारं निरपेक्षपणे करू शकत? कशासाठी ताटंच्या ताटं घेऊन जातो आणि ओततो त्याच्या पायाशी? त्या शाडूच्या नाही तर ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीला काय कळतंय त्या फुलातलं आणि त्या मोदकातलं आणि पशाअडक्यातलं? खरं तर इतकी सुंदर, जिवंत मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांचं कौतुक आणि सन्मान व्हायला हवा गणेशोत्सवाच्या या काळात..

आमच्या घरी कोणत्याही पूजाअर्चा होताना मी फारसं पाहिलं नाही. आयुष्यात एकदा कधी तरी आईनं सत्यनारायण घातला तर बाबांनी त्यावर बहिष्कारच टाकला. ‘सत्यनारायण ही केवळ कथा आहे आणि त्यात तुम्ही सत्यनारायण नाही केलात तर तुमच्यावर कोणकोणती संकटं येतील आणि तो केलात तर या संकटातून बाहेर पडून तुमचं आयुष्य कसं सुफळ-संपन्न होईल याविषयीच्या लोकांना भय घालणाऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत. देव असलाच तर तो असं भय घालून त्याची पूजा करवून घेणार नाही. उलट तो त्याच्या भक्तांनी पूजा केली किंवा नाही केली तरी त्यांच्या मागे उभा राहील. जसे आपले आईवडील, त्यांच्यासाठी काय केलं आणि काय नाही केलं याचा हिशेब न ठेवता आपल्या लेकरांसाठी जमेल ते आणि चांगलंच करत असतात. तसंच देवाचंही असणारच आणि आपण स्वत:ला त्याची लेकरं समजत असलो तर अशा अटी घालून आपलं नुकसान होईल, असं तो कधीच वागणार नाही याची आपण खात्री बाळगायला हवी,’ असं ते म्हणायचे. बाबांची अशी काही मतं असली तरी आमच्या घरात प्रत्येकाला आपापल्या श्रद्धा जपण्याचं स्वातंत्र्य मात्र होतं.

आमच्या घरात तसे सगळे सण साजरे व्हायचे. म्हणजे त्यानिमित्तानं गोडधोड व्हायचं. पाडव्याला आजी गुढी उभारायची, दसऱ्याला पुस्तकांची पूजा व्हायची, होळीला पुरणपोळी नवेद्य म्हणून नाही तर मुलाबाळांच्या मुखी लागावी म्हणून केली जायची. याव्यतिरिक्त अगदी महत्त्वाचा सण म्हणजे गणेश चतुर्थीचा. बाबा भावंडांत मोठे असल्यानं घरातला गणपती आमच्या घरी यायचा. गौरीबरोबर जाणारा हा पाच-सहा दिवसांचा गणपती असण्याचा काळ म्हणजे नातेवाईकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा काळ असायचा. हे पाच-सहा दिवस वर्षांतले सगळ्यात मजेचे दिवस असायचे आणि ते आम्ही पूर्णपणे उपभोगायचो. बाबा या सणात सामील असायचे, कारण त्यांच्या दृष्टीनं हा साऱ्या कुटुंबाला एकत्र आणणारा सण होता.

मला वाटतं, गणेशचतुर्थी हा सण केवळ कुटुंबालाच नाही तर साऱ्या देशाला एकत्र आणणारा सण वाटल्यामुळेच लोकमान्य टिळकांनी त्याचा उपयोग स्वातंत्र्याची चळवळ उभारण्यासाठी केला होता. लोकांनी एकत्र येऊन चर्चा कराव्यात, चांगली भाषणं ऐकावीत, त्यावर विचारमंथन व्हावं आणि त्यातूनच स्वातंत्र्यलढय़ासाठी काही विचार मिळावा, लोकांची एकजूट व्हावी या हेतूनं त्यांनी या सणाला सार्वजनिक रूप दिलं.

सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले तो प्रबोधनाचा काळ होता. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात राजकीय लढय़ाबरोबरच हे प्रबोधनही सुरू झालं होतं. विशेषत: गोपाळ गणेश आगरकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक सुधारणा लोकांची वैचारिक वाढ करूनच होणं शक्य होतं. प्रबोधनाचा हा सारा काळ अशा माणसांच्या वैचारिक भाषणं आणि लेखनानं भरून गेलेला दिसतो. बाळशास्त्री जांभेकर, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, शाहू महाराज, र.धों. कर्वे, प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अनेक मंडळींनी सुरू केलेली ही वैचारिक घुसळण पुढे स्वातंत्र्योत्तर काळातही होत राहिली.

या साऱ्याचा प्रभाव अगदी आमच्या लहानपणच्या दिवसांतही आम्हाला जाणवत होता. साठ-सत्तरच्या दशकात आमच्या विभागात एकूण दोन सार्वजनिक गणपती यायचे. कार्यक्रम ठरवताना मंडळी विचार करायची. नाटक, चित्रपटांबरोबरच अनेक व्याख्यानांनी समृद्ध असलेली ही कार्यक्रम पत्रिका अत्यंत आकर्षक असायची. या काळात मी अनेक व्याख्यानं ऐकलीत. थोडी ‘मेलोड्रॅमॅटिक’ असली तरी बाळ कोल्हटकरांची ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’सारखी रडवणारी नाटकं पाहिलीत. खळखळून हसवणारी आचार्य अत्रे यांची ‘लग्नाची बेडी’सारखी नाटकंदेखील याच गणेशोत्सवात पाहिलीत. काही जुने हिंदी -मराठी चित्रपट पाहिले आहेत. एक वेगळाच उत्साह असायचा. आमच्या विभागातले कलाकार या गणपतींच्या मागे खूप सुंदर देखावे करायचे. आम्हीही आमच्या घरच्या गणपतीच्या मागे पडद्यावर महालाची, देवालयांची चित्रं काढून आरास करायचो. रंगीबेरंगी कागदांची सायली, फुलं तयार करून छतावर लावायचो. त्या पाच-सहा दिवसांत चाळीतलं वातावरण प्रसन्न असायचं. आमच्या तीन-चार चाळींत आमच्याकडेच गणपती येत असल्यानं घर दिवसभर भरलेलं असायचं. रात्री गणपतीसमोर फेर धरून नाचताना अनेक लोकगीतं म्हणायचो. गणेशजन्माच्या, शंकर-पार्वतीच्या, भक्त प्रल्हादाच्या कहाण्या गुंफलेली ही लोकगीतं खूपच कल्पक होती.

‘शंकर गेले वनवासाला,

शंकर गेले वनवासाला,

पार्वती बसली आंघोळीला,

पार्वती बसली आंघोळीला

आपले अंगाचा मळ काढूनी,

त्याचा बनविला गणपती..’

अशी गणेशजन्माची कथा असो की सार्वजनिक जीवनातील गोष्टी असोत, या गीतांतल्या प्रतिमा, प्रतीकं फारच छान असायची.

‘गायबा चरत भीम्मा तिरी गं, भीम्मा तिरी

तिला राखित इठ्ठल हरी गं इठ्ठल हरी.

कायबा वर्णू गायचं डोलं गं गायचं डोलं

गाईचं डोलं जसं लोणियाचं गोलं रं

क्रिष्णा पंढरी जायबा उला रं.

काय बा वर्णू गायची शेपू गं गायची शेपू

गायीची शेपू जशी नांगीन घेतंय झेपू रं कृष्णा.

कायबा वर्णू गायची शिंगा  गं गायची शिंगा

गायीची शिंगा  जशी म्हादेवाची लिंगा

रं कृष्णा..’

अशा प्रकारे गाईच्या प्रत्येक अवयवाचं वर्णन उपमा, उत्प्रेक्षांच्या साहाय्यानं केलेलं असायचं.

फुगडय़ा, झिम्मा आणि काय-काय असायचं यासोबत आणि रात्री सफेद वाटाण्याची उसळ. गणपतीला एकटं सोडून झोपायचं नसतं म्हणून मग या रात्री अशा तऱ्हेनं जागवायचो आम्ही. एकूण घरातले गणपती आणि बाहेरचेही एकत्र येऊन साजरे होत होते. करमणुकीबरोबरच एक प्रकारचं प्रबोधन करत होते. लोकसंस्कृतीची ओळखही करून देत होते.

कोणतीही सांस्कृतिक गोष्ट ‘इव्हेंट’ होण्याचा काळ येईपर्यंत हे असं छान चाललं होतं; पण हळूहळू हे दिवस गेले. प्रत्येक गल्लीबोळात गणपती आणले जायला लागले. आरत्यांचा कर्कश आवाज घुमायला लागला. भटजी येऊन पूजा करायला लागले आणि सार्वजनिक गणपतीचं रूपच पालटून गेलं. लालबागचा गणपती पाहायला आम्ही जायचो तेव्हा कोणीही नसायचं. निवांत दर्शन व्हायचं. प्रसन्न मूर्ती पाहायला छान वाटायचं. आपल्या सगळ्या देवांतला हा देव कायम एक छोटासा मित्र वाटत आला ते त्याच्या निरागस डोळ्यांमुळे. त्याच्याशी असलेलं नातं हे देव आणि भक्तापेक्षाही बालपणीच्या सवंगडय़ाशी असलेलं नातं असायचं. त्यामुळे त्याला भेटण्याची मजा औरच असायची.

कोणत्याही चौकटीत न बसणारा, कोणत्याही आकारात स्वत:ला ढाळणारा आणि पेन्सिलीच्या नुसत्या रेषांतून आकार घेणारा हा सखा मला अजूनही आवडतो. बुद्धीचं प्रतीक असलेल्या या मित्राकडे कशासाठी कोण काही मागेल? जमलंच तर त्याच्यासारख्या हुशार मुलाकडून काही तरी शिकू शकत होतो आणि त्याला थोडं प्रेम देऊ शकत होतो आपण. अशा या मित्राला जाऊन भेटण्याचं सुख घेत होतो आम्ही तेव्हा. ना कसले नवस ना कसला पसाअडका देऊन ते फेडण्यासाठीची गर्दी होती आजूबाजूला. तो शांतपणे बसलेला असायचा आमची वाट पाहात. एक प्रसन्न मूर्ती मूर्तिकारानं घडवलेली असायची. तिला दाद द्यायला जायचो कधी वाटलं तर. मी तर एकदा-दोनदाच गेले होते. तेव्हा तो नवसाचा म्हणून त्याचा प्रचार नव्हता केला कोणी. कोणतेच गणपती ना नवसाचे होते ना राजे होते. तो बाळ गणेश होता शंकर-पार्वती या दाम्पत्याच्या कहाणीतला.

आज त्याचं हे रूपच विसरून गेलो आहोत आपण. गणेशाच्या समोरची डोळ्यांत हजारो अपेक्षा घेऊन जाणारी गर्दी पाहाते दूरचित्रवाणीच्या पडद्यावर, तेव्हा वाटतं देव मानत असूच आपण तर का नाही सारं निरपेक्षपणे करू शकत? कशासाठी ताटंच्या ताटं घेऊन जातो आणि ओततो त्याच्या पायाशी? त्या शाडूच्या नाही तर ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीला काय कळतंय त्या फुलातलं आणि त्या मोदकातलं आणि पशाअडक्यातलं? खरं तर इतकी सुंदर, जिवंत मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांचं कौतुक आणि सन्मान व्हायला हवा गणेशोत्सवाच्या या काळात; पण ते विसरले जातात आपल्याकडून. खरंच किती वेगवेगळे रंग भरतात ते त्याच्या चेहऱ्यात. एक-एक भाव उमटत जातो गणेशाच्या चेहऱ्यावर. रंगते त्याच्या चेहऱ्यावरची आभा. ती खरं तर मूर्तिकारांच्या बोटांची आणि चित्रकारांच्या कुंचल्याची किमया असते आणि आपल्याला दिसतही नाही ती. आपलं लक्ष नसतं त्या रंगांच्या छटांकडे की त्याच्या त्या रेखीव डोळ्यांकडे.

आपण पाहात असतो त्या अफाट गर्दीकडे, आपला नंबर कधी येईल याकडे, त्या गर्दीत एखादी ‘सेलेब्रिटी’ आली असेल तर तिच्याकडे, रांगेतल्या लोकांना ढकलणाऱ्या कार्यकर्त्यांकडे आणि मूर्तीच्या जवळ आल्यावर हातातलं ताट हिसकावून घेणाऱ्या त्या पुजाऱ्याकडे ज्याला तुमच्या चेहऱ्यावर असलेल्या भावांविषयी, तुमच्या मनात असलेल्या श्रद्धेविषयी काडीची फारशी जाण नसते. त्याला जमा करायचे असतात ते तुम्ही ताटात टाकलेले पसे, नवसाचे दागिने. ताटातले हार-नारळ पाठवून द्यायचे असतात पुन्हा एकदा त्याच लोकांकडे जिथून तुम्ही ते विकत घेतलेले असतात. किती व्यग्र असतात ते या दिवसांत. जेवढा पसा वर्षभर काम करून मिळवू शकणार नाही तेवढा पसा या दिवसांत सगळ्याच मंडळांना मिळतो. छोटी-छोटी मंडळं उडवतात तो पसा कशाकशावर आणि संस्थानांतले विश्वस्तही श्रीमंत होत जातात.

मला अनेकदा वाटतं, गणपती खरोखरच असता तर काय भावना असत्या त्याच्या? त्याला झाला असता का सहन तो दहा दिवस कानठळ्या बसवणारा डीजेचा आवाज? त्याला सहन झालं असतं का ते अचकट-विचकट नाचगाणं त्याच्यासमोर केलेलं? त्याला काय वाटलं असतं एखादी ‘सेलेब्रिटी’ आल्यावर त्याच्याकडे लागलेले लोकांचे डोळे तिच्याकडे वळल्यावर? काय म्हणाला असता तो, दिवसभर त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या कार्यकर्त्यांना

रात्री धुंद झालेलं पाहून? किती प्रेम वाटलं

असतं त्याला मिरवणुकीत नाचणाऱ्या लोकांविषयी? कंटाळला असता का तो चोवीस तास चाललेल्या विसर्जनाच्या मिरवणुकीत ताटकळत राहून? काय अवस्था झाली असती त्याची विसर्जनावेळी त्याला समुद्रात टाकून दिल्यावर? आणि काय भावना असती त्याची विसर्जनानंतर श्रमपरिहार करण्यात गुंतलेल्या आणि दुसऱ्या दिवशी किनाऱ्याला लागलेल्या त्याच्या अवयवांना विसरून गेलेल्या त्याच्या भक्तांविषयी?

कदाचित तो म्हणाला असता, ‘‘बाबांनो, मी साधा मुलगा आहे माझ्या आईवडिलांचा. तुमच्या मुलांसारखाच वाढलो त्यांच्या अंगाखांद्यावर. जरा हुशार म्हणून लाडही झाले माझे; पण तुम्ही जास्त हुशार. माझ्यावरच्या लोकांच्या प्रेमाचा बाजार कसा मांडायचा हे तुम्हाला किती छान कळतंय.’’ कदाचित तो असंही म्हणाला असता, ‘‘या कामासाठी मला सार्वजनिक केलं ते काम १९४७ मध्येच पूर्ण झालंय. तेव्हा आता या आलिशान मांडवातून मला बाहेर काढा आणि प्रतिष्ठापणा करा पुन्हा एकदा तुमच्या घरात. तिथं करा माझा पाहुणचार प्रेमानं पाच-दहा दिवस. मलाही पाहू दे तुमच्या कुटुंबाला फुटलेलं हसू. माझ्या निमित्तानं एकत्र आल्यावर का होईना, पण संपलेले वाद, राग-रुसवे, माझ्या घरी येण्यानं तुमच्या चेहऱ्यावर आलेली प्रसन्नता पाहू देत जरा. ती पाहण्यासाठीच येतोय मी. माझ्यासमोर चर्चा करा, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या, समाजात रुजत चाललेल्या असुरक्षिततेच्या, माणसाच्या मनात उसळून आलेल्या हिंसेचं काय करायचं, असा प्रश्न विचारा मला आणि माझ्या हातात ठेवलेल्या फुलासारखे उमलून या करुणेनं!

मला बुद्धीची देवता समजता तुम्ही, पण बुद्धी म्हणजे शहाण्णव-सत्त्याण्णव टक्के गुण मिळवणं नसतं, तर सारासार विचार करून तर्काच्या कसोटीवर सारं पारखून घेणं असतं हे समजून घ्या माझ्याकडून. क्षण-दोन क्षण बसा माझ्या बाजूला,  गोष्टी करा विज्ञानाच्या, बुद्धिप्रामाण्यवादाच्या. बरं वाटेल मला. कान मोठे आहेत माझे, पण म्हणून नका करू मारा त्या आवाजाचा. बारीक डोळे असले तरी दिसतं सगळं मला. नैसर्गिक आपत्ती आली की किती वेगानं धावून जाता तुम्ही! धर्म, जात, वंशापलीकडे जाऊन हात मोकळे करता दात्याचे. चांगलं वागण्यासाठी अशा आपत्ती येणं खरंच गरजेचं आहे का? त्या न येताही होऊ शकता तुम्ही कोणाचेही मित्र, कोणाचेही सुहृद. इतिहास आणि पुराणाचे दाखले देता, पण त्यातून शिकत काहीच नाही. पुन:पुन्हा हिंसेचाच इतिहास लिहिता आहात. खरं तर तुमच्यात माझ्याहूनही जास्त निरागस माणूस लपला आहे हे माहीत आहे मला. त्याला दुसऱ्या कोणाच्या तरी हातचं बाहुलं बनवण्यापेक्षा स्वत:साठी बाहेर काढा त्याला आणि म्हणा मनापासून, ‘गणपती बाप्पा मोरया!’

neerajan90@yahoo.co.in  chaturang@expressindia.com

Story img Loader