||प्रतिभा वाघ

चित्रकार म्हणून मला अनेक वर्षे बाप्पाने प्रेरणा दिलीय, अजूनही देतोय. भारतीय लघुचित्रशैलीतील गणपती आणि भारतीय लोककलांमधील गणपती यांनी प्रभावित होऊन मी काही गणपतीची चित्रं केलीत. लोककलेतील मुक्त आविष्कार मला कायमच आकर्षित करतो किंबहुना त्याचा प्रभाव हा माझ्या चित्रशैलीचे महत्त्वाचे अंग ठरले आहे. अर्थात, या प्रत्येकातील गणेशाच्या आकाराने, रूपाने, रचनेने मी खूपच प्रेरित झाले. म्हणूनच आम्ही कलाकार ‘आधी वंदू’च्या ऐवजी म्हणतो, सरस्वती, विद्येची देवता तर नटराज, कलेचे दैवत, पण गणपती मात्र विद्या आणि कला दोन्हीचा देव!परंतु ‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता’ अशी प्रार्थना करून आळवताना, त्यात अजून एका शब्दाची भर घालावीशी वाटते. तू सृजनकर्ता!  खरंच गणेश हा सर्व क्षेत्रांतल्या कलावंतांना निर्मितीसाठी सातत्याने प्रेरणा देत असतो. या सृजनकर्त्यांचे रूप किती आकर्षक आहे. कुणालाही त्याचा मोह पडतो. मग ते लहान मूल असो किंवा वृद्ध. सर्वाना सारखाच आवडतो हा देव. मग तो काळ्या पत्थरात कोरलेला असो वा संगमरवरी शुभ्र दगडात, नुसत्या करडय़ा शाडूच्या मातीत असो किंवा तांबडय़ा टेराकोटात; ताम्र, कासे, चांदी, सोने, हिरेजडित असो किंवा रंगीबेरंगी रूपात, त्याचं कोणतंही रूप देखणंच आहे. रंगीत गणपतीचे रंग, केशरी, पिवळा, जांभळा, प्रामुख्याने वस्त्रासाठी वापरलेले दिसतात. हे सारे रंग तेजस्वी असल्यामुळे केवळ गणेशाच्या मूर्तीचे दर्शन, ऊर्जा निर्माण करते. मनाला आलेली मरगळ दूर करते. नवनिर्मितीसाठी प्रेरणा देते. मग तो कोणत्याही क्षेत्रातील सर्जनशील कलावंत असो. त्याला सतत प्रेरणा देणारं हे दैवत आहे. याचा सुंदर प्रत्यय मला आला तो एका चित्रकारांच्या कार्यशाळेत.

‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’च्या वतीने २००६ मध्ये गणपतीपुळे येथे चित्रकारांची एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्या वेळचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अभय यावलकर यांच्या उत्तम प्रोत्साहनामुळे या कार्यशाळेत एकूण एकवीस तरुण आणि ज्येष्ठ चित्रकार आणि कला महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कोकणातील समुद्राजवळचे निसर्गरम्य वातावरण आणि कलावंतांचे प्रेरणास्थान असलेल्या गणेशाचे वात्सल्य असलेले गणपतीपुळे यामुळे ऊर्जा मिळालेल्या एकवीस चित्रकारांनी आपापल्या कल्पनेनुसार गणपतीचे चित्रण केले. त्यात प्रत्येकाची कल्पना वेगळी, रंगसंगती वेगळी, विषय एकच ‘गणेश’ मात्र वेगळा आविष्कार, गणपतीची विविध रूपे थक्क करणारी होती आणि याचे कारणही बाप्पाच.सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या मनातली गणेशाची प्रतिमा, ‘दोन हातांचा गणेश’ नेहमीच्या ताकदीने साकार झाली. पण त्याबरोबर या ठिकाणी मिळणारी ऊर्जा वेगळी असल्याचे त्यांनाही जाणवले. कोल्हापूरच्या संजय शेलार या चित्रकाराने ‘गणपतीने चंद्राला दिलेला शाप’ असा प्रसंग चित्रित केला. चित्रकार रमेश थोरात यांना तर किटलीमध्ये गणपतीची प्रतिमा दिसली आणि सुलेखनकार अच्युत पालव यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत गणपती बाप्पा रेखाटले. चित्रकार नीलेश जाधव यांनी लांब केस वाढवलेला आधुनिक गणेश चित्रित केला. ‘गणपती’ याच विषयावर नेहमीच चित्र काढणारे अरुण दाभोळकर यांनी या सर्व चित्रकारांची कल्पनाशक्ती व गणेशाने दिलेल्या ऊर्जेमुळे आश्चर्यकारक कलानिर्मिती होते आहे हे मान्य केले. चित्रकार दिगंबर चिचकर यांना गणपतीपुळेचा डोंगर म्हणजेच ‘गणेश’ असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी आपल्या कॅनव्हासवर त्यांना भावलेला, तसाच गणपती साकार केला. तरुण चित्रकार, अर्थात त्या वेळचा विद्यार्थी सतेंद्र म्हात्रे याने काढलेल्या गणेशाच्या पायाशी अनेक उंदीर लीन झालेले दाखवले. ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांनी रिद्धी-सिद्धींबरोबर गणपतीचे चित्रण लघुचित्र शैलीत केले. या २१ कलाकारांनी सादर केलेली प्रत्येक कलाकृती उत्कृष्ट दर्जाची होती. या सर्व कलाकृती श्री गणेश चित्रकारांना सृजनशील निर्मितीची प्रेरणा देतो याच्या साक्षीदार आहेत.

चित्रकार म्हणून मला अनेक वर्षे बाप्पाने प्रेरणा दिलीय, अजूनही देतोय. सुरुवातीच्या काळात डहाणू परिसरातील आदिवासींची वारली चित्रकला अभ्यासत असताना लाल मातीच्या, शेणाच्या सारवलेल्या भिंतीवरील गणेश, तांदळाच्या पिठात पाणी घालून चित्रित केलेला गणेश, रेषांमधील चित्रकाराच्या कौशल्याचा ऊर्जास्थान ठरला. त्यानंतर बिहार राज्यातील मधुबनी गावातील, स्त्रियांनी जपलेली, सासर आणि माहेरमधला दुवा सांभाळणारी मधुबनी चित्रकला. यात निसर्गातून, पानाफुलांच्या साहाय्याने रंग बनवून रंगीबेरंगी चित्रे भिंत आणि कागदावर रंगवली जातात. त्यातील गणपतीने माझं मन आकर्षून घेतले. पालखीतून गणपतीची मिरवणूक काढणारे एक चित्र मी काढले होते. ते अजूनही छान आठवते.

कोकणातील कुडाळमध्ये थोडासा तग धरून असलेल्या ‘चित्रकथी’ या लोककलेचा अभ्यास करताना त्यातला गणपतीही मनाला भावला. नाजूक रेषा, मोजकेच पारदर्शक रंग वापरून त्याचं एक चित्र मी काढलं. या गणपतीने खूप ऊर्जा दिली. त्या चित्रशैलीची रेषात्मक वैशिष्टय़े माझ्या चित्रात अजूनही येतात. भारतीय लघुचित्रशैलीतील गणपती आणि भारतीय लोककलांमधील गणपती यांनी प्रभावित होऊन मी काही गणपतीची चित्रं केलीत. लोककलेतील मुक्त आविष्कार मला कायमच आकर्षित करतो किंबहुना त्याचा प्रभाव हा माझ्या चित्रशैलीचे महत्त्वाचे अंग ठरले आहे. अर्थात, या प्रत्येकातील गणेशाच्या आकाराने, रूपाने, रचनेने मी खूपच प्रेरित झाले. वेगवेगळ्या काळांत अभ्यासलेल्या या सर्व लोककला आणि भारतीय चित्रशैलीचा परिपाक माझ्या आताच्या समकालीन चित्रशैलीत आविष्कृत होतो आहे. पण सुरुवात मात्र गणेशापासूनच झालेली आहे.

भारतीय लघुचित्रशैलीतील मूळ रंगाचा वापर, संपूर्ण चित्रात पडलेला लखलखीत सूर्यप्रकाश, तेजस्वी रंगसंगती, नाजूक ओघवती रेषा, यथादर्शनाचा (पस्र्पेक्टिव्ह) अभाव, चित्रातील लांबच्या वस्तू स्पष्ट दाखवण्याचा प्रघात. दूरवरच्या झाडावर बसलेला पक्षी, त्याचे डोळे, चोच, पिसं.. हे सगळं काही रसिकाला दाखवून, चित्राचा पूर्णानंद त्याला मिळाला पाहिजे अशी योजना आणि सृजनशीलतेचा आविष्कार या लघुचित्रशैलीत पाहायला मिळतो. मग त्यात हुबेहूब छायाचित्रण कलेप्रमाणे असलेल्या पाश्चात्त्य कलेतील वास्तवानुसार आविष्कार नाही तर चित्रकाराला त्याच्या मनातील कल्पना आविष्कृत करण्यासाठी मिळालेलं पूर्ण स्वातंत्र्य आहे. मग हे करताना मानवी भावना निसर्गावर आरोपित करून चित्राचा आनंद रसिकाला अधिकाधिक दिला जातो. जसं की, नायिका दु:खी असेल तर वठलेल्या वृक्षाजवळ दिसेल, आनंदी असेल तर बहरलेले वृक्ष, आजूबाजूला रंगीत फुलांचे ताटवे दिसतात.

या सगळ्यापासून प्रेरणा घेत माझ्या चित्रातील बाप्पा मी रंगवलेत. ‘पद्मपाणि बुद्ध’ हे अजिंठय़ातील प्रसिद्ध चित्र. माझा बाप्पा, मला ऊर्जा देणारा गणेश, ‘पद्मपाणि गणेश’. कमळाच्या तळ्याजवळून उंदीरमामावर स्वार होऊन, हातात कमळ घेऊन, मस्त आनंदाने फेरफटका मारणारा हा गणेश. त्याचं वाहन हे नेहमीप्रमाणे छोटा उंदीर नाही. तो आकाराने खूप मोठा आहे. लोककलेतील आकाराशी मिळताजुळता आहे. इथे प्रमाणबद्धता नाही, पण कलावंताला स्वातंत्र्य आहे.

भारतीय लोककलेत आकार, रंग असेच मोकळेपणाने आविष्कृत होतात. भडक रंग, त्यांचे जोमदार फटकारे असतात. या ‘पद्मपाणि गणेशा’ने मला लोककला आणि भारतीय लघुचित्रशैलीचा एकत्रित आविष्कार करण्याची प्रेरणा दिली आहे.

आपले भारतीय रंग हे नेहमीच ताजे, आकर्षक आणि तेजस्वी आहेत. प्रत्येक वेळी या गणेशाच्या ऊर्जेने आपण असेच आनंदी होतो. दुसरा एक सुंदर आकार गणेशाजवळ असतो तो म्हणजे ‘मोदक.’ त्याचा आकार किती आकर्षक आहे. हा गणेश पाककलेतील कौशल्यालाही प्रेरणा देतो, असं वाटतं. इतक्या सुंदर आकाराचा आणि चवीचा नैवेद्य अजून तरी माझ्या पाहण्यात आला नाही. सोबतच्या छायाचित्रातील तिसरा गणेश उभा असून त्याची प्रेरणा ‘चर्मबाहुल्या’ (शॅडो पपेट्स) या लोककलेपासून घेतली आहे. प्रारंभी महाराष्ट्रात असलेला हा कलाप्रकार कर्नाटकात जास्त लोकप्रिय आहे. अजूनही कोणत्याही कलाशाळेत न जाता ही कलावंत मंडळी परंपरेने आलेली कला जोपासत आहेत.

हा गणेश एका हातात पोथी, दुसऱ्या हातात मोदक, इतर दोन हातांत परशू आणि कमळ धारण केलेला आहे. लोककलेचा रांगडेपणा याच्या चित्रणात दिसतो. मुक्ताविष्कार हा  पैलू या गणेशाकडून मिळालेली प्रेरणा आहे.

‘गंजिफा’ हा एक पत्त्यांचा पारंपरिक खेळ. हे पत्ते गोल आणि आयताकृती असतात. त्यावर सुंदर चित्रे ‘चित्रकथी’ शैलीशी मिळतीजुळती असतात. सावंतवाडीला अजूनही हे पत्ते मिळतात. त्यावरून एक गणेशचित्रांची मालिका मी केली होती. पण विषय ‘गणपती’च होता.लघुचित्रशैलीचा प्रभाव दाखवणारा, एका कमळात बसलेल्या गणपतीच्या चित्रांचा मला उल्लेख करावासा वाटतो. या गणपती चित्रांचे केवळ भारतीय नाही तर परदेशी रसिकांनाही आकर्षण आहे. पुण्याचा उत्सव आणि ‘पुणे फेस्टिव्हल’ अनेक कलाकारांना प्रेरणा देतो.    पर्यावरणाचा तोल सांभाळण्यासाठी ‘शाडूच्या मातीचे गणपती’ अनेक बालकलाकार कार्यशाळांतून बनवतात. आपल्या घरी आपणच बनवेलल्या गणपतीची स्थापना करतात. हे गणपती बनवताना त्यांचा आनंद ओसंडताना दिसतो. ही ऊर्जाही त्यांना बाप्पा देतो. यातूनच भविष्यात अनेक कलाकार पुढे येतात.

‘आधी वंदू तुज मोरया’ असे सगळेजण म्हणतात. आम्ही कलाकार मात्र ‘आधी चितारू तुज मोरया’ म्हणतो. या नवनवीन रूपात गणेशाला चित्रित करण्याचा आनंद केवळ कलावंतच जाणू शकतो. हा सृजनकर्ता सर्व कलावंतांना तर निर्मितीची अशीच प्रेरणा देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना!

plwagh55@gmail.com chaturang@expressindia.com

Story img Loader