गेल्या लेखात विवाहेच्छूक तरुणींच्या डायरीतील काही पानं वाचली. आज दोन तरुणांच्या मनातले लग्नाविषयीचे हे विचार. ‘घरोघरी मातीच्या चुली’ याचे प्रत्यंतर देणारे..कदाचित यातून प्रत्येकालाच आपलं वागणं नेमकेपणाने तपासता येईल..
अजून चार दिवसांनी माझा वाढदिवस! २६ वर्षे पूर्ण होऊन सत्ताविसावं लागेल. आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना बरं वाटतं. इंजिनिअर झालो. आणि रीतसर जॉबही मिळाला. पण अजून बरंच काही करायचंय. दरवर्षी अशी डायरी लिहायची सवय आईनंच लावली लहानपणापासून. पण आता मात्र ती लग्नासाठी मागे लागली आहे.
माझा मित्र आदित्य सोडला तर कोणत्याही मित्राचं लग्न नाही झालेलं अजून. आदित्यचा लग्नाचा  अनुभव काही फारसा चांगला नाहीये. त्याची बायको तर म्हणे घरात काहीच करत नाही. स्वयंपाक तर तिला येतच नाही. मग आदित्यची चीडचीड. मला मात्र इतक्यात लग्न नाही करायचं. मला अजून सेटल व्हायचं. आईला वाटतं, मी झालो की आता सेटल! पण मला अजून वरचा हुद्दा गाठायचा आहे. मी आत्ता आहे मुंबईत पण उद्या कुठे असेन माहित नाही. कदाचित चेन्नई ,बंगलोर किंवा यू. एस .ए सुद्धा. त्यातून मला माझं घर घ्यायचंय. आईचा स्वभाव पाहता होणाऱ्या माझ्या बायकोचं आणि आईचं कितपत पटेल कुणास ठाऊक. पण हे बोलणं म्हणजे आ बल मुझे मार! त्यातून मी अजून लग्नासाठी प्रगल्भ झालोय, असं वाटत नाही मला.
माझ्या डोळ्यासमोर माझ्या बायकोची मूर्ती तशी स्पष्टपणे येतच नाहीये. एक मूर्ती डोळ्यासमोर येते आहे ती आईला जशी आवडेल, बाबांना काय हवं आहे, अशीच येतेय. आईला ती गोरी, सडपातळ, शिकलेली, घरातलं सगळं येणारी अशी  हवी आहे. तिच्या डोळ्यासमोर सुनेची मूर्ती कितीतरी वर्षांपासून उभी आहे. आणि ही मूर्ती तिनं माझ्यासमोर असंख्य वेळा उभी केली आहे. ती नेहमी म्हणत असते, तिची मत्रीण वैजूची सून आहे ना अगदी तश्शीच पाहिजे. ती घरात किती सगळं काम करते, घरी येणाऱ्या लोकांचं किती आगत स्वागत करते आणि किती नम्र आहे..”
अरे बापरे, पण माझ्या कंपनीतल्या आसपास वावरणाऱ्या मुली, माझ्या मत्रिणी यांना नम्रता हा शब्द तरी माहिती आहे की नाही कुणास ठाऊक! केस कापलेल्या, शर्ट, जीन्स घालून लॅपटॉप आणि स्मार्टफोन घेऊन िहडणाऱ्या या मुली. काíतकी एकादशीला माझ्या डब्यात उपासाचे पदार्थ असतात पण माझी कलीग मीरा, तिच्या डब्यात दुसरंच काहीतरी! अशा प्रकारच्या मुलीचं कसं काय जमायचं आमच्या घरात? अशी मुलगी आईला पसंत पडेल का? मला कशी बायको हवी आहे यापेक्षा त्यांना सून कशी हवी आहे याचाच ते जास्त विचार करतात. त्यांना सून त्यांच्या इभ्रतीला साजेशी हवीय. तिच्या महिला मंडळातल्या सगळ्यांपेक्षा वरचढ ठरणारी सून हवीय. आणि शिवाय म्हणे पत्रिका बघायचीय. माझा तर पत्रिकेवर अजिबातच विश्वास नाही. मी तिला म्हणतो सुद्धा इंजीनिअरींगची अ‍ॅडमिशन घेताना पत्रिका पहिली होती का? नोकरी लागली तेव्हा पाहिली होती का? मग आत्ता बायको निवडताना कशाला पाहिजे पत्रिका पाहायला? पण तिला ते पटत नाही. ती म्हणते,” नाही नाही पत्रिका पाहूनच लग्न करायचं. उगीच विषाची परीक्षा कशाला बघायची?” शब्द पण असे वापरते ना म्हणे विषाची परीक्षा..! बाबांना तर स्वतचं मतच नाही. आईचीच री ओढतात. आमच्या घरात आईचंच राज्य आहे हे निर्वविाद सत्य आहे. त्यामुळे मला वाटतं कशाला इतक्यात लग्नाच्या भानगडीत पडायचं? शिवाय आईला वाटत तिला चष्मा नको. अरे पण मला आहे चष्मा! असला चष्मा तर काय बिघडलं? पण कुठे आईच्या नादी लागायचं? शेवटी एकत्र तर राहायला हवं ना ! आईच्या  पसंतीन ती आली आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे लग्न झालं की कटकट नाही. सध्या तरी काही करून लग्न लांबणीवर टाकायचं हे नक्की..
*  *  *
  किती वेळ गेला आज दवाखान्यात. दोन तास मोडले. रोज रोज ऑफिसमधून लवकर येणं जमणार नाही. ऑफिस मधली कामाची प्रेशर्स वाढत चालली आहेत. दिवसेंदिवस आईचं मधुमेहाचं दुखणं वाढतच चाललं आहे. आणि त्याबरोबर तिची चिडचीड सुद्धा ! तसंही तिला घरातली कामे आता होत नाहीत. तिला सत्तर वर्ष पूर्ण होतील यंदा. तसा मी आईला उशीराच झालो.  त्यामुळे माझं वय सुद्धा आता ३३ झालंय. माझंही लग्न ठरत नाहीये. त्याचंही तिला टेन्शन येत असणार. माझं लग्न सुद्धा का ठरत नाहीये कळतच नाहीये मला.
सध्या मुलींना काय हवंय तेच समजत नाहीये. मी नाहीये इंजिनियर पण कोणत्याही इंजिनियरपेक्षा कमी ज्ञान नाही मला. शिवाय पगारही चांगला आहे. आई बाबांनी घर घेतलेलं आहे, चांगले टू बी. एच के चं. माझ्या ताईचं लग्न झालेलं आहे. ती अमेरिकेत सेटल झालेली आहे. माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही. पण मुली मला नाही म्हणतात. मला सारखे नकार येतात. का? मी आता कंटाळून गेलो आहे. मुलींच्या केव्हढया अपेक्षा आहेत आता. पसे मिळवतात म्हणजे काय समजतात स्वतला कुणास ठाऊक? जवळपास ३०-४० मुलींना भेटलो आजपर्यन्त.( हो आता भेटलो असं म्हणायचं असतं, मुली बघितल्या असं नाही म्हणायचं )” शनिवार रविवारी सुट्टी असते ना मग काय करता  तुम्ही,” हा प्रश्न मी सगळ्या जणींना विचारला. बहुतेक सगळ्यांनी सांगितलं आठवडाभराची झोप राहिलेली असते, ती शनिवार रविवारी भरून काढायची असते. त्यामुळे उशिरा उठतो. मग मत्रिणी सिनेमा. या गोष्टींना एरवी वेळच मिळत नाही. एकीनं सांगितलं ब्युटीपार्लर मध्ये जायचं असतं. आणि अशाच अनेक गोष्टी. पण एकही जण म्हणाली नाही की मी आठवडाभराचे कपडे धुते, किंवा आईला स्वयंपाकघरात मदत करते, घर आवरते. कसं होणार या मुलींचं लग्नानंतर?
हल्ली खूप जास्त घटस्फोट होतायत. आमच्याच आठ जणांच्या ग्रुप मधल्या दोघांचे घटस्फोट झाले. पण लग्न न होणारा मी एकटाच राहिलोय. कधी कधी डिप्रेशन येतं मला. माझ्याच बाबतीत का होतंय, हा प्रश्न सतावतो मला.
कालचा प्रसंग तर डोक्यातून जातच  नाही. काल एका कॉफी शॉपमध्ये एका मुलीला भेटायला गेलो होतो. सुरुवातीला खूप चांगल्या गप्पा झाल्या. ती पण एका कंपनीत काम करणारी होती. शिकलेली होती. बोलता बोलता ती म्हणाली,” सध्या चं माझं काम खूप हेक्टिक आहे. मी संध्याकाळी खूप दमते.  कधी कधी रात्री यायला खूप उशीर होतो. “
मी तिला म्हटलं,” अगं आपल्या गोष्टी पुढे गेल्या तर तू सोडून दे नोकरी. मला खूप पगार आहे. आपलं भागेल त्यात. मस्त घरी बसून आराम कर. कशाला झगझग करतेस? ”
मी असं म्हणता क्षणी तिची कॉफी अर्धवट टाकून उठली आणि म्हणाली, ‘‘ बाय बाय. अशा विचारांचा नवरा नको मला. ”  ज्याअर्थी ती निघून गेली त्या अर्थी माझं काहीतरी चुकलं असणार? पण माझ्या तर काहीच लक्षात येत नाहीये.
माझी आई नोकरी करुन दमून जात असे त्यावेळी बाबा आईला असंच म्हणायचे. ते तिला म्हणायचे, “तुलाच हौस नोकरीची. तसंही तुझ्या पगाराला काही अर्थ नाही.” पण मी तर असं काही बोललो नव्हतो. उलट तिला घरी राहून मी आराम करावा, असंच सुचवलं होतं. पण ती का गेली काय माहित? मी ‘नवरा’ म्हणून मुलींना का आवडत नसेन का?…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा