भंगारवालीने चालू केलेलं कचऱ्याचं ‘ऑडिट’ पाहून मी हैराण झाले. तिला ‘आक्षेपार्ह’ वाटणारा सर्व कचरा कागदात नीट गुंडाळून टाकू लागले.. हळूहळू घंटागाडीची पद्धत चांगलीच स्थिरावली आणि कचराकुंडी लोकांच्या पार विस्मरणात गेली.
सुमारे पाच वर्षांपूर्वी एका ‘सुमुहूर्ता’वर महापालिकेने जागोजागी सूचनाफलक लावून जाहीर केले की, या महिन्याच्या अखेरीस कोपऱ्याकोपऱ्यांवर असणाऱ्या कचराकुंडय़ा काढून टाकण्यात येणार असून कचरा उचण्याची व्यवस्था ‘घंटागाडी’मार्फत केली जाईल. झालं, लोकांत एकच खळबळ उडाली..
‘म्हणजे आता सकाळच्या प्रहरी आम्ही कामंधामं सोडून घंटागाडीच्या आवाजाकडे कान देऊन बसायचं की काय?’, ‘आणि एखाद् दिवशी घंटागाडी आली नाही की सगळ्या घराची कचराकुंडी होणार!’, ‘आता केर रोज ठरावीक वेळीच टाकायचा म्हणजे घरात पूजा किंवा कार्यक्रम असताना होणारा जादा कचरा कुठे टाकायचा?’, असे नाराजीचे सूर कोणताही बदल स्वीकारण्याची तयारी नसणाऱ्या नागरिकांकडून आळवले जाऊ लागले.
 सांगितल्याप्रमाणे महिनाअखेरीस कचराकुंडय़ा खरंच उचलल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी नियोजित वेळेला अर्धा तास उलटला तरी घंटागाडी येण्याचे चिन्ह दिसेना. ‘घंटागाडी येऊन गेली तर नाही ना?’, ‘मगाशी मागच्या रस्त्याला घंटा वाजल्यासारखी वाटली ब.’ ‘छे!, ती इडलीवाल्याची घंटा होती.’, ‘कशावरून? आपण घंटागाडीची घंटा यापूर्वी कुठे ऐकल्येय?’ असे संवाद सोसायटय़ांमधून झडत असताना शाळेच्या घंटेसारखी खणखणीत घंटा बडवत घंटागाडीचे आगमन झाले. गाडीची वाट पाहणाऱ्या नागरिकांनी लगबगीने जाऊन कचरा टाकला.
‘कचराकुंडी ते घंटागाडी’ हा बदल तेवढा सहजी घडला नाही. सुरुवातीला अनेक मुर्दाड लोक गाडी येण्याची वाट न पाहता आपल्या सोयीच्या वेळी पूर्वी कुंडी होती त्या दिशेने कचरा भिरकावून देत. मग हा कचरा ज्या दुकानासमोर पडे, त्याचा मालक थयथयाट करू लागला. घंटागाडीवरच्या कर्मचाऱ्यांना तो हाताने उचलावा लागत असल्याने त्यांनी अर्वाच्य भाषेत शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यामुळे शेवटी लाजेकाजेस्तव लोक गाडीच्या वेळेवर कचरा टाकू लागले.
 मात्र मोठी पंचाईत झाली ती मोठमोठय़ा हाऊसिंग कॉम्प्लेक्समधून कचरा गोळा करून कुंडीत टाकणाऱ्या सफाई कामगारांची. हे लोक रोज सकाळी घराघरांमधून ६-७ मोठे ड्रम भरून कचरा गोळा करत. त्यासाठी ते एकच ड्रम वापरत. कचरा गोळा करून ड्रम भरला की,  कुंडीत रिकामा करायचा आणि पुढच्या घरांचा कचरा गोळा करायचा. या पद्धतीने त्यांचे काम चाले. आता घंटागाडी एकदाच येऊन काही क्षणांसाठी थांबणार असल्याने त्यांना गाडी येण्याआधी सर्व ड्रम भरून ठेवावे लागणार होते. त्यासाठी अनेक नवे ड्रम विकत घ्यावे लागणार होते, जे त्यांना परवडणे शक्य नव्हते. शेवटी एक दिवस रस्त्यातच गाडीवरचे कर्मचारी आणि हे कामगार यांची ‘मीटिंग’ झाली व प्रचंड बाचाबाचीअंती असे ठरले की, सफाई कामगारांनी आणखी दोन ड्रम विकत घ्यायचे; तीन ड्रम भरून कचरा गाडीत टाकल्यावर उरलेला कचरा गोळा करायचा आणि गाडी परतीच्या फेरीत पुन्हा एकदा थांबेल तेव्हा तो टाकायचा. अशा तऱ्हेने कचरा टाकणाऱ्यांचे प्रश्नही सुटले.
कचरा खाणाऱ्या गायी, कुत्री, डुकरे वगरे प्राण्यांसाठी ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वज्ञानाला अनुसरून नागरिक आणि गाडीवरचे कर्मचारी स्वत:च त्यांना खाण्यासारखा कचरा वेगळा करून रस्त्यावरच्या एका कोपऱ्यात ठेवू लागले. हा कचरा ठेवल्यापासून दुसऱ्या मिनिटाला हे प्राणी फस्त करत असल्याने समोरच्या दुकानदारानेही फारशी खळखळ केली नाही.
आता प्रश्न उरला एकटय़ा भंगारवालीचा. तोही लवकरच सुटला. घंटागाडी सुरू झाल्यापासून पुढच्याच आठवडय़ातच एक दिवस भंगारवाली सिंहासनावर विराजमान झाल्याप्रमाणे कचऱ्याच्या ढिगावर बसून गाडीबरोबर आली. गाडीत एका कोपऱ्यात तिचा ड्रम ठेवला होता. आता लोकांकडून कचरा घेऊन गाडीत टाकण्याचे काम ती करू लागली व एकीकडे त्यातून भंगारही वेचू लागली. तिला वणवण न करता बसल्या जागी भंगार मिळू लागले व गाडीतल्या कर्मचारीवर्गाला (की कंत्राटदाराच्या रोजंदारीवरच्या मजुरांना?) गाडी थांबल्यावर खाली उतरून तंबाखू मळणे, विडय़ा ओढणे, मोबाइल कानाला लावून बसणे अशी महत्त्वाची कामे उरकून घेता येऊ लागली. अशा तऱ्हेने ‘एकमेकां साहाय्य करू’ या तत्त्वाप्रमाणे त्यांचा समझोता झाला असावा.
सुरुवातीला गाडीला विरोध करणाऱ्या लोकांना हळूहळू तिचे फायदे लक्षात येऊ लागले. परिसरातले सर्व लोक कचरा टाकण्याच्या निमित्ताने एकाच वेळी रस्त्यावर उतरत असल्याने शेजारी राहूनही एकमेकांची तोंडे महिन्या महिन्यात न बघणाऱ्या अनेकांच्या रोज भेटी होऊ लागल्या. मुलांचे वाढदिवस, सत्यनारायणाची पूजा, चत्रगौरीचं, संक्रांतीचं हळदीकुंकू, सोसायटीची कोजागरी यांच्या बोलावण्यांसाठी घरोघरी जावे न लागता घंटागाडीशी थोडा वेळ रेंगाळले की, काम होऊ लागले.
‘काकू, परवा दिवसभर पाणी येणार नाहीये; माहित्येय ना? उद्या न विसरता भरून ठेवा’; ‘शनिवारपासून वसंत व्याख्यानमाला सुरू होतेय; जायचं का?’, ‘रूपकलाचा सेल सुरू झाला बरं का.’ अशा माहित्यांची, सूचनांची देवाणघेवाण सुलभरीत्या होऊ लागली. अनेक चौकस, भोचकभवान्यांच्या मेंदूला खाद्य मिळू लागले. कारण नुसतं एखाद्या घरातून कचरा टाकायला कोण येते; कचऱ्यात काय काय असते यावरून त्या घरातील कौटुंबिक घडामोडींबद्दल अंदाज करता येऊ लागला. ‘शेटय़ांची म्हातारी अगदी खाष्ट दिसत्येय, काल लग्न झालेल्या सुनेला लगेच केर टाकायला का पाठवतात?’  ‘साठेकाकूंच्या कचऱ्यात काल केळीच्या पानांचा हा.. मोठा ढीग होता. सुनेची मंगळागौर झालेली दिसते.’, ‘हल्ली सावंतांकडचं कोणी कचरा टाकायला फिरकत नाही, लेकीच्या बाळंतपणाला बंगलोरला गेले वाटतं,’ असे अंदाज धडाधड वर्तवले जाऊ लागले आणि गंमत म्हणजे ते खरेही ठरू लागले.
माझ्या शेजारच्या गुजरातिणीची माझ्या कणकेच्या डब्यापेक्षा स्वच्छ कचऱ्याची बादली पाहून मला स्वच्छतेचा नवा धडा शिकायला मिळाला. वेगवेगळ्या लोकांच्या घरातील कचऱ्याचे आकारमान पाहून; म्हणजे दुमजली बंगल्यात राहणाऱ्या डॉक्टरांकडचा केराचा मोठा ड्रम तर सोसायटय़ांमधल्यांच्या मध्यम आकाराच्या बादल्या आणि चाळीत राहणाऱ्या लोकांचा अध्र्या लीटर दुधाच्या पिशवीत पुरचुंडी केलेला कचरा पाहून माणसाची कचरा निर्माण करण्याची क्षमता त्याच्या आíथक सुबत्तेच्या समप्रमाणात वाढत जाते’ या अर्थशास्त्रीय सिद्धांताचा व्यवहारात पडताळा बघायला मिळाला.
एकदा माझ्या आधी कचरा टाकून गेलेल्या गृहस्थांच्या बादलीत आंब्यांच्या सालीबाठींचा ढीग पाहून भंगारवाली मला म्हणाली, ‘ताई, आंबे लय म्हाग असत्याल न्हाई? तरी येवढे ढिगांनी खात्यात! लई शिरीमंत दिसत्यात.’ एकांकडच्या कचऱ्यांत दिवाळीच्या वेळी मोठे मोठे खोके पाहून, ‘मोठे सरकारी हापीसर दिसत्यात, किती प्रेजेंट आल्येत बगा’, ‘कोणाचा कचरा फारच कमी असेल तर ‘जेवत्यात, खात्यात की न्हाई कोण जाणे!’ अशी लगेच हिची शेरेबाजी! तिने चालू केलेलं हे कचऱ्याचं ‘ऑडिट’ पाहून मी हैराण झाले. विशेषत: आपल्या कचऱ्यावरून आपण काय खातो याचा ही बया अंदाज बांधते आणि त्यावरून तिच्या पोटात दुखतेही हे पाहून मी तिला ‘आक्षेपार्ह’ वाटणारा सर्व कचरा कागदात नीट गुंडाळून टाकू लागले. एकदा तर आंब्याच्या पेटीच्या सगळ्या फळ्या (आम्ही पेटीभर आंबे खाल्ले हे तिला समजू नये म्हणून) नीट सोडवून कागदात गुंडाळून, प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून टाकायला गेले तेव्हा फळ्या सोडवताना एका खिळ्याने हाताला चांगलीच जखम झाली.
पूर्वी कुंडी असलेला रस्त्याचा कोपरा मोकळा झाल्याने वाहनांची कोंडी होईनाशी झाली. रस्ता स्वच्छ राहू लागला. महापालिकेने चालू केलेली ही घंटागाडीची पद्धत चांगलीच स्थिरावली आणि कचराकुंडी लोकांच्या पार विस्मरणात गेली..       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा