या आजोबांकडे मला हवं असलेलं एक जुनं पुस्तक संग्रही असण्याची शक्यता त्यांच्या चिरंजीवांनी बोलून दाखवली होती म्हणून मी आले होते. माझ्या सरबराईसाठी त्यांनी जी काही लगबग चालवली होती, तीच मुळामध्ये माझ्या अंगावर आली होती. त्यांना हातात काठी धरल्याशिवाय चालता येत नव्हतं. दोन खोल्यांच्या मध्ये असलेला उंबरठा ओलांडताना त्यांची गडबड उडत होती. बऱ्याच खटपटीनंतर स्वयंपाकघरात पोचल्यावर तिथून आणण्याच्या चार वस्तूंपैकी दोन ते विसरत होते. आणलेल्या दोन त्यांना पसंत पडत नव्हत्या. असल्या सगळ्या भानगडी निस्तरताना त्यांची दमछाक होत होती. या शारीरिक थकव्यात अजून मनातल्या खळबळीची भर पडू नये म्हणून मी विषय बदलत म्हटलं,
‘‘चकली छान आहे!’’
‘‘आहे ना? नक्की? मला दातांमुळे खाता येत नाही तरीही ‘घरामध्ये हवा’ म्हणून आणून ठेवतो असा थोडाफार खाऊ. बायको होती तोवर या घरात आला गेलेला कोणीही खाल्ल्याप्यायल्याशिवाय जात नसे. आता ती नाही म्हणून तिच्या पद्धती पण मोडाव्यात का?’’
‘‘नक्कीच नाही. मात्र या वयात तुम्हाला एकटय़ाला ओढावं लागतं सगळं, एवढीच थोडी गैरसोयीची बाब आहे.’’
‘‘काय करायचं? काहीही झालं तरी मला माझ्या मुलाच्या घरी जाऊन राहणं शक्य नाही हे मी सांगितलं ना मगाशीच?’’ आजोबांची गाडी पुन्हा मूळ पदावर आली. आता त्याचा आवाज चिरकला होता. दोन पिढय़ांनी एकमेकांच्या विरुद्ध बोलण्याला खतपाणी घालणं मला आवडत नाही. बहुतेकदा त्यामध्ये नवीन काही नसतं, हे एक आणि आपण सगळेच सुपापासून जात्यापर्यंतच्या वाटेवर कुठे ना कुठे उभे असतो हे दुसरं. उगाच कशाला कोणाला भडकवा? कारण नसताना मी बचावाचं भाषण सुरू केलं,
‘‘होतं सर काहीचं असं. आताची आधुनिक घरं लहानलहान असतात. श्रेष्ठांना त्यांच्यामध्ये कुचंबल्यासारखं वाटतं.’’
‘‘छे छे! माझ्या मुलाचं घर चांगलं प्रशस्त आहे.’’
‘‘पण सूनबाईंच्या सत्तेखाली, असंच ना?’’
‘‘नाही नाही..ती मुलगी गुणी आहे.’’ उगाच दुसऱ्याची मुलगी आहे, आपली सून आहे, म्हणून खोडय़ा कशाला काढू तिच्यामध्ये?’’ ते ठामपणे म्हणाले. आता मला वाटलं, त्यांची गाडी ‘आपलाच दाम खोटा’ या चरणावर येणार. तरुण मुलगा म्हाताऱ्या बापाला विचारत नाही, त्याचा सगळा ओढा त्याच्या आईकडे होता, आई गेली आणि बापलेकांच्या मधला दुवा संपला ही झिजलेली तबकडी वाजेल असं वाटलं होतं. पण तसंही झालं नाही. आजोबांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा मुलगा ‘ठाकठीक’ होता, त्यांना ‘विचारत होता,’ वेळप्रसंगी त्यांच्यासाठी चार दिडक्या खर्चायला लागल्या तरी मागे हटत नव्हता. मुलाची दोन मुलं घरात होती. तीही ‘ठाकठीक’ होती म्हणे. मग अडचण काय होती? मी मनोमन काहीतरी जुळवाजुळव करणार तोवर ते म्हणाले,
‘‘सुट्टीच्या दिवशी सकाळी ९-९।। वाजता उठतात हो त्यांच्याकडे.’’
‘‘मग उठू देत की, तुम्हाला तुमचं वेळापत्रक पाळायला बंदी तर नाही ना घालत?’’
‘‘नाही घालत. पण आपल्यालाच कानकोंडय़ासारखं वाटायला लागलं. आपला सकाळचा पूजापाठ आटपेपर्यंत ते जांभया देत असतात. आपल्या जेवणाच्या वेळेला ते नाश्ता काय करायचा याचा विचार करतात, पुढे बहुधा ते एखादा मॉल गाठतात. तिथे नाश्ता, खरेदी, सिनेमा पाहाणं, मित्रमंडळींना भेटणं असं एकेक चालतं. रात्री उशिरा कधीतरी ते घरी येतात तोवर वाट बघून, कंटाळून आपण दिवस संपवलेला असतो.’
‘‘एखाद्या दिवशी तुम्ही त्यांना लवकर घरी परत यायला सांगितलंत तर..’’
‘‘येतीलही. पण मग घरी जो तो आपापल्या पी.सी.वर बसेल. ऑनलाइन शॉपिंग काय करतील..ती कुठली करावकेची की कसली प्रॅक्टिस काय करतील..शेकडो रुपयांचे पिझ्झे मागवून काय खातील..त्यात ते सारखं मोबाइलवर कुजबुजणं.. दिवसभर एवढं काय बोलतात हे लोक मोबाइलवर कोण जाणे?’’
‘‘ती त्यांची जीवनशैली आहे असं नाही का म्हणता येणार..’’
‘‘आहे ना! आहेच मुळी. पैसा त्यांचा..वेळ त्यांचा..वळण त्यांचं..तेव्हा त्यांची जीवनशैली झालीच ती. पण तिच्यात मला सामावायला कुठे काही फट दिसत नाही मला. तुम्ही राम मनोहर लोहियांचं काही वाचलंयत?’’
‘‘ते मध्येच म्हणाले तेव्हा मी जरा चमकले. वाटलं, आजोबा वयानं जरा ‘हे’ झाल्येत की काय. पण ते त्यांच्या विचारात गर्क होते. सांगायला लागले,’’
‘‘माझा एक मोठा भाऊ लोहियावादी होता बरं का. तो नेहमी त्यांचे विचार सांगायचा. ते म्हणे म्हणायचे की माणसांना गुण्यागोविंदाने एकत्र नांदायला किमान तीन गोष्टींमध्ये साधम्र्य असावं लागतं. बाकी १०० मुद्दय़ांमध्ये फरक असला तरी बिघडत नाही. पण भाषण, भोजन आणि भक्ती या तीन बाबतीत एकवाक्यता हवी. हे शब्द त्यांचेच बरं का. ‘जिनके भाषण-भोजन और भक्ती में समानता हो वें आसानी से घुलमिल के रह सकते है’ असा मुद्दा असे त्यांचा. त्यांच्याच शब्दात!’’
‘‘भाषण म्हणजे..’’
‘‘संवादाची भाषा हो. एकाच्या सहज बोलण्यातल्या भाषेचे बारकावे, आनंद दुसऱ्याला कळला पाहिजे.’’
‘‘भोजन म्हणजे..’’
‘‘जेवण नाही काही ते. भोजन म्हणजे खाण्यातल्या आवडीनिवडी. खाद्यसंस्कृती! आणि याच प्रकारे भवती म्हणजे एक देव किंवा एक देऊळ नव्हे, तर एकूण श्रद्धास्थान! तुम्ही जी कोणती अंतिम शक्ती मानत असाल तिला सर्वस्वी शरण जाता की नाही वगैरे.’’
आजोबांना बऱ्याच दिवसानंतर बोलायला (म्हणजे ऐकवायला!) कोणी तरी भेटलं असणार म्हणून त्यांची रसवंती वाहात होती. इतक्या वर्षांच्या लेखनवाचनाच्या प्रवासात माझ्या कानावरून यातलं काही ना काही गेलेलं होतंच. त्याला स्मरून चाचपडत म्हणाले,
‘‘पण त्यांचा हा विचार किंवा सिद्धान्त एकूण राष्ट्रीय एकात्मतेबद्दल असणार, नाही का? याचा ज्येष्ठांच्या कुटुंबात सामावण्याशी काय संबंध?’’
‘‘माझ्या वयाच्या झालात की कळेल. फारच जवळचा संबंध आहे हो याचा. किती झालं तरी आपले शेजारी, गल्लीकर, गाववाले किंवा देशवासी यांच्या आणि आपल्यात रक्ताचं नातं तरी नसतं. माझा मुलगा, नातवंडं ही माझी रक्तामासाची माणसं आहेत. परकी नाहीत कोणी. तरीही त्यांच्या माझ्यात कुठेच काहीच धागा उरला नाही म्हटल्यावर मी निराधार नाही का होणार? आधाराशिवायच जगायचं असेल तर मी मुलांबरोबर राहिलो काय आणि घरी एकटा राहिलो काय, काय फरक पडतो?’’
‘‘तुम्ही फारच टोकाचा विचार करताय.’’
‘‘अनुभव आल्येत तसे. गेल्या गणेशचतुर्थीला मी मुलाकडे होतो. मी चारदा म्हटल्यावर त्यानं कुठून तरी उकडीचे मोदक विकत आणून टाकले. मी एकटाच खात बसलो. बाकी कोणालाही त्यांचं अगत्य नव्हतं. दोन-तीन दिवस फ्रीजमध्ये पडले होते ते. बघून बघून मीच हैराण झालो. माझी नातवंडं रोज रात्री आंघोळी करतात. सकाळी उठल्यावर पारोशाने शाळेत जातात. विद्यादेवी वगैरे मानणाऱ्या, शुचिर्भूत झाल्याशिवाय देवळात न जाणाऱ्या मला ते पटत नाही. आता तुम्ही म्हणाल दिवसात एकदा आंघोळ झाली की पुरते ना? तर कायद्याने पुरते! मनानं पुरत नाही. मी एकदा मोठय़ा लडिवाळपणाने नातवाला ‘लडदू’ म्हणालो, तर त्याने ‘व्हॉट इझ इट मीन आजोबा?’ असं विचारलं. मला शेवटपर्यंत ‘लडदू’चा अर्थ सांगता आला नाही त्याला. असे सारखे खडे लागतात एरवीच्या सुग्रास जेवणात! उद्या कोणी ‘व्हॉट डझ सुग्रास मीन?’’ असं विचारलं की पुन्हा आमचीच पंचाईत होणार! सगळं अशुद्ध आणि अवघड आहे बघा!’’
‘‘मग यावर उपाय काय?’’
‘‘काही नाही. मुळामध्ये हा फारसा गंभीर अपायही नाहीये. उपाय कुठून येणार? पण माझा मूळ मुद्दा तोच आणि तसाच राहातो. मी माझ्या मुलाबरोबर कायमचा राहू शकत नाही. मी ते स्वीकारलंय.’’
‘‘तुमचे आईवडील तुमच्याबरोबर राहायचे?’’
‘‘हो तर. वडलांची सत्तरी उलटल्यावर मीच गावाकडून घेऊन आलो त्यांना. नंतरची ५ र्वष आईअण्णा दोघंही माझ्याकडे राहिले. अण्णा गेल्यावर अडीच-तीन र्वष आई एकटी राहिली. पण निभलं सगळं.’’
‘‘कारण तुमच्या मुलापेक्षा तुम्ही जास्त चांगला मुलगा आहात असंच ना?’’
‘‘नाही हो. मला पण कंटाळा यायचा म्हाताऱ्यांचा. अधूनमधून वाद व्हायचे. बायकोची आणि आईची तर पुष्कळदा जुंपायची. नुसतं भांडय़ाला भांडंच काय, पण कपाला कप, ग्लासला ग्लास वगैरे सगळं आपटायचं तरीही आम्ही आणि आमच्या मागचे लोक यांच्यात थोडं तरी साधम्र्य होतं. आमच्या पायाखालची जमीन, आमच्या आनंदाच्या जागा थोडय़ा तरी मिळत्याजुळत्या होत्या. पुढच्या या सगळ्या झंझावाती बदलांनी त्यात गडबड केली. शेवटी राहायला नुसती सामायिक जागा असली म्हणजे पुरेसं असतं का? आनंदाच्या पण सामायिक जागा नकोत? म्हणून तर म्हणतोय..मी माझ्या मुलाबरोबर एकत्र.. शक्य नाही.. नाहीच बहुधा.’’
आजोबांनी पुनश्च ध्रुवपद आळवायला घेतलं. त्यातले करुण सूर मला अस्वस्थ करणारे वाटल्याने मी त्यांच्याकडचं पुस्तक घेऊन जायला निघाले.
‘‘आमचे चिरंजीव भेटले की सांगा त्यांना.. मी पुस्तक दिलंय म्हणून’’ आजोबांनी समारोपाचं भाषण सुरू केलं. मी मान हलवली.
पन्नाशीच्या आसपासचे त्यांचे कॉर्पोरेट बॉस चिरंजीव भेटले की एकच विषय बोलतात. म्हातारे वडील हट्टाहट्टाने एकटे राहतात. म्हणून त्यांना दुरून येऊन-जाऊन वडिलांची खबरबात घ्यावी लागते, त्रासापरी त्रास आणि बाहेरच्यांकडून वाईटपणा पदरात येतो वगैरे वगैरे. त्यांच्या जागी ते बरोबर यांच्या जागी हे बरोबर, ती तेवढी आनंदाच्या जागेची फिर्याद ही आधुनिक जीवनाची देणगी आहे. तिचं काय करायचं हे कोणाला विचारायचं आणि कोण सांगणार?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा