ती मुलगी मुलगा ‘बघायला’ त्याच्या घरी आली होती. डोंबिवलीतल्या त्या स्क्वेअर फूटच्या घरात किती ‘डस्टबीन’ आहेत हा प्रश्न तिच्या मैत्रिणीने विचारला आणि..
डोंबिवलीतल्या मुलाच्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला. नियोजित वेळ उलटून गेली तरी मुलीकडल्यांचा पत्ता नाही. सगळे अस्वस्थ झाले. घडय़ाळाचे काटे पुढे पुढे सरकू लागले तसतशी चिडचिड वाढू लागली. आता अगदी अंत पाहणार तोच चमकदार ‘स्विफ्ट डिझायर’ ऐटबाज वळण घेऊन सोसायटीच्या आवारात शिरली. ड्रायव्हरने दरवाजा उघडून दिल्यावर मुलगी व तिचे आई-वडील गाडीतून उतरले.
आगत-स्वागत होत असताना मुलीचे वडील कुरकुरले, ‘‘पुण्याहून येताना हायवेपर्यंत ठीक आहे पण तुमच्या डोंबिवलीत एन्ट्री घेताना फार गोंधळ उडतो. पत्ता विचारत विचारत येताना वेळ वाया जातो.’’ थोडं हसून ते पुढे म्हणाले, ‘‘नाही तरी मूळ खेडेगावच! आता शहर झालं असलं तरी. ‘डोंबिवली’ हे नावच बघा ना. सध्या रुळलं आहे म्हणून लक्षात येत नाही एवढंच.’’
मुलाचे वडील काही बोलले नाहीत. काय बोलणार? ‘डोंबिवली’ नाव काही त्यांनी ठेवलं नव्हतं! नंतर नेहमीची प्रश्नोत्तरं झाली. अशा कार्यक्रमातून हल्ली कांदेपोहे बाद झाले आहेत. जोपर्यंत प्रत्यक्ष लग्नाचं पक्कं होत नाही तोपर्यंत रेडिमेड स्नॅक्स, बिस्किटं, चहा अथवा कॉफी आणि उन्हाळा असला तर शीतपेय ही नवी आवृत्ती असते.
चहा घेतल्यावर मुलीची आई कोचातून उठली व आपली कपबशी उचलून स्वयंपाकघराकडे निघाली.
‘‘अहो राहू द्या. मी ठेवेन नंतर,’’ म्हणत मुलाची आई मागोमाग आली. पण भावी विहीणबाई चपळ असाव्यात. त्या स्वयंपाकघरात घुसल्या. कपबशी सिंकमध्ये ठेवली. मुलाच्या आईने त्यांना ती विसळू दिली नाही. (त्यांना तरी ती कुठे विसळायची होती?)
नंतर त्या इतर खोल्यांतूनही डोकावल्या. त्यांना ब्लॉक नजरेखालून घालायचा होता. कपबशी ठेवण्याचं उगाच निमित्त. उद्या त्यांची मुलगी येथेच येणार होती ना. नांदणार वगैरे नंतरचं.
‘‘जागा फारशी प्रशस्त नाही पण ठीक आहे,’’ त्यांचा न विचारलेला अभिप्राय!
‘‘आता इतपतच असते’’, मुलाची आई संकोचाने म्हणाली.
‘‘खरं आहे. सध्या स्क्वेअर फुटांचं मोजमाप आहे, उद्या स्क्वेअर इंचात होऊ लागेल. जागेचं दुर्भिक्ष आहे ना,’’ विहीणबाई मोठय़ांदा हसल्या.
मुलाची आई नाराजली. मुलाच्या व वडिलांच्या चेहऱ्यावरही नाराजी उमटली. विहीणबाईंचा अगोचरपणा खटकणाराच होता. पण बंगलेवाले आहेत, उद्योगपती आहेत, त्यांची हीच संस्कृती असावी असं मानून त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं.
वरपक्षाचा ब्लॉक बऱ्यापैकी मोठा होता. हवेशीर होता. मध्यवस्तीत होता. दाराशी कार होती. आणखी काय हवं? अर्थात विहीणबाई त्यांच्या पुण्यातील बंगल्याशी तुलना करत असल्यामुळे त्यांना तो लहान वाटत असावा. मुलाकडली परिस्थिती तुल्यबळ नसली तरी उत्तम होती. एकुलता एक मुलगा. कोणाची जबाबदारी नाही. उच्चशिक्षित. मोठय़ा पगाराची नोकरी. मनमिळाऊ, देखणा, निव्र्यसनी, सुसंस्कृत, सुस्वभावी, आई-वडिलांना तो उशिराने झाल्यामुळे त्यांचं वय झालं होतं. पण तब्येती बऱ्या होत्या. पूर्ण स्वावलंबी व कार्यक्षम होते. मनात भरावं असंच स्थळ होतं. तरीही लग्नाचा मात्र योग येत नव्हता. का?. याला उत्तर नव्हतं. मुलींच्या अपेक्षा कमालीच्या उंचावल्या होत्या, गगनाला भिडल्या होत्या ही वस्तुस्थिती होती. तेही कारण असू शकेल. तेच होतं!
‘‘तुम्ही नातेसंबंधाचा तपशील दिला आहे. त्याप्रमाणे मुलाचे काका, म्हणजे तुमचे थोरले बंधू डोंबिवलीतच राहतात का?’’ मुलीच्या वडिलांनी चौकशी केली.
‘‘होय. आमच्या सोसायटीत. चार नंबरच्या इमारतीत. आमच्याएवढाच त्यांचा ब्लॉक आहे.’’
‘‘पण ते आजच्या कार्यक्रमाला आले नाहीत!’’
‘‘त्यांची तब्बेत तेवढी बरी नसते. म्हणाले, तुमचं प्राथमिक ठरू द्या. मग फायनलला आम्ही आहोतच!’’
‘‘कोण कोण असतं त्यांच्याकडे?’’
‘‘दोघेच आहेत. काका व काकू. त्यांना एकच मुलगी. लग्न होऊन नागपूरला असते. चोवीस तासांची बाई असते त्यांच्याकडे कामाला. ती सर्व करते. शिवाय आम्ही आहोतच हाकेच्या अंतरावर. हाही एक आधार आहे त्यांना.’’
एकूण संभाषणात मुलीचा सहभाग अल्प. तेवढय़ात तिचा मोबाइल वाजला. अशा महत्त्वाच्या प्रसंगी तिनं मोबाइल स्विचऑफ करायला हवा होता. पण तशी तिनं दक्षता घेतली नव्हती. कोचातून उठून  मुलगी हॉलच्या खिडकीपाशी गेली. मान आणि खांदा यांमध्ये पंधरा अंश कोनात ते स्वरयंत्र पकडून तिने दोन्ही हात खिडकीच्या कट्टय़ावर ठेवले.
पलीकडून तिची मैत्रीण फोनवर बोलत होती.
‘‘काय करतेस?’’ मैत्रिणीने विचारलं असावं, कारण मुलीने उत्तर दिलं, ‘‘इथे डोंबिवलीत मुलगा पाहण्यासाठी आले आहे.’’
मुलगा व त्याचे आई-वडील चमकले. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता की मुलगा पाहण्याचा? का मुलाच्या घरी ती आली होती म्हणून ती तसं म्हणाली?
‘‘कसा आहे मुलगा?’’ असा प्रतिप्रश्न असावा. कारण तिने म्हटलं,
‘‘ठीक आहे.’’ थोडं थांबून पुटपुटली, ‘‘पण एक प्रॉब्लेम आहे.’’
मग संभाषण फारच हलक्या आवाजात झालं. तिने सांगितला तो प्रॉब्लेम काय ते समजलं नाही.
मोबाइल बंद करून मुलगी कोचात येऊन बसली. मुलाच्या वडिलांना राहवेना. त्यांनी मुलीला विचारलं, ‘‘आपलं अजून ठरायचं आहे. पण तू काही तरी प्रॉब्लेमबद्दल म्हणालीस. कसला प्रॉब्लेम आहे? ’’
सांगावं, न सांगावं अशा संभ्रमातच मुलगी म्हणाली, ‘‘मैत्रीण मला विचारत होती, त्यांच्या घरात डस्टबिन्स किती आहेत?’’
‘‘म्हणजे?’’ मुलाला व त्याच्या आई-वडिलांनाही काही आकलन होईना.
‘डस्टबिन म्हणजे कचराकुंडी,’’ मुलाच्या वडिलांना ही मॉडर्न टर्मिनॉलॉजी परिचयाची असावी, ‘त्या किती आहेत हे तिच्या मैत्रिणीने विचारलं असावं. त्याचा अर्थ म्हणजे.’
पण तेवढय़ात मुलाच्या आईने भाबडेपणाने म्हटलं, ‘‘प्रत्येक घरात एकच डस्टबिन असतं, तसं ते आमच्याही घरात आहे.’’
‘‘तसं नाही, डस्टबिन्स म्हणजे घरात म्हातारी माणसं किती, असं मैत्रीण विचारत होती,’ ’ मुलीनेच स्पष्टीकरण केलं.
मुलाची आई दुखावली. वडीलही चक्रावले. मुलाची स्थिती काही वेगळी नव्हती. तरी संयम राखत त्याने मुलीला विचारलं, ‘‘तू काय उत्तर दिलंस?’’
‘‘मी म्हटलं, ‘सध्या तरी घरात दोन दिसत आहेत. उद्या पलीकडच्या इमारतीतून आणखी दोन येऊ शकतील.’’
मुलाचा चेहरा संतापाने लाल झाला. अंग थरथरू लागलं. मनक्षोभ आवरणं अशक्य झालं. ‘‘माझे आई-वडील डस्टबिन्स? काका -काकू डस्टबिन्स? असं काय? ओके,’’ असं ओरडत तो मुलीच्या दिशेने धावला. त्याने तिच्या दंडाला धरून दरवाजाकडे खेचत नेलं. तिच्याकडे आणि तिच्या आई-वडिलांकडे जळत्या नजरेने पाहत क्षुब्ध स्वरात तो गरजला, ‘‘चला, ऑल थ्री, गेट आऊट. आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून निघा. ताबडतोब. नाही तर धक्के मारून बाहेर काढीन. ’’
आणि ती मंडळी गेल्यावर दरवाजा धाडकन लावून घेत तो कोचात कोलमडून पडला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा