कितीतरी मधुरा आणि अनिकेत, आर्यन मला रोज भेटत असतात. या सगळ्यांमध्ये मला जाणवणारी समान गोष्ट म्हणजे ‘परफेक्ट पार्टनर’ शोधण्याची अनिवार धडपड. आपल्यापकी कोणीच परफेक्ट नसतो हे माहीत असलं तरी व्यवहारात ते विसरलं जातं. स्वप्नात जगणं चुकीचं नाही, चुकीची असते ती दुसऱ्याला आपल्या ‘परफेक्ट’ किंवा ‘ड्रीम’वाल्या संकल्पनांच्या कोंदणात बसवण्याची धडपड.
मा झ्यासमोर मधुरा बसली होती. लग्न करण्यासाठी आमच्याकडे नाव नोंदवण्याआधी काही गोष्टींबाबत बोलायची तिची इच्छा होती. आणि म्हणून तिच्या व्यापातून आज ती खास वेळ काढून आली होती. ‘‘तसे अकरावीपासून बघायला गेलं तर आत्तापर्यंत माझे आठ बॉयफ्रेंड्स होते. त्यातले पहिले पाच अगदीच कॉलेज लाइफमध्ये मुलांबद्दल वाटणाऱ्या सहज आकर्षणामुळे होते. पण त्यांच्याबाबतीत मी फारशी सीरिअस नव्हते कधी, आणि तेही नव्हते. पण गेल्या तीन रिलेशनशिप्समध्ये मात्र मी अतिशय सीरिअस होते आणि अगदी घरीही सर्व सांगितले होते. पण ते पुढे गेलं नाही. प्रत्येक वेळी फिस्कटलं.’’ सुरुवातीचं अवघडलेपण संपल्यावर ती मोकळं होऊन बोलू लागली. तिच्या बोलण्यात गोंधळलेपण होतं. काय नेमकं चुकलं, या तीन वेळा विचारलेल्या माझ्या प्रश्नावर ती म्हणाली, ‘‘सुरुवातीला वाटणारी ओढ हळूहळू वाटेनाशी झाली. शिवाय काही काही गोष्टी खटकू लागायच्या. आणि मग जाणवायचं की हा तो नव्हेच! he is not the one. पण मी जेव्हा तिला विचारलं की तिच्या ‘द वन’ बाबतच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत तेव्हा ती उत्तरं देऊ शकली नाही. तिचा गोंधळ उडाला. तीनही वेळी आपल्यासोबत असलेला मुलगाच तिला तिच्यासाठी परफेक्ट वाटला होता. पण हळूहळू तो परफेक्ट वाटेनासा कसा झाला? तिला ठोस उत्तर देता येईना.
‘‘मला माझी गर्लफ्रेंड मेधा सुरुवातीला  खूप आवडली होती. वागायला अतिशय गोड, समजूतदार. मी तसा संतापी मनुष्य आहे. अगदी शीघ्रकोपी. पण ती अतिशय शांत. आणि यामुळेच आमचं परफेक्ट जमायचं. तीच एकमेव व्यक्ती आहे, जी मला समजून घेते, असं वाटायचं. तिच्यासोबत मी मोकळा असायचो.’’ आमच्या गट-चच्रेमध्ये अनिकेत आपल्या पूर्वायुष्याबद्दल सांगत होता, ‘‘पण मला असं जाणवायला लागलं की आम्ही जेव्हा ‘नात्यात’ होतो तेव्हा तिचं सगळं आयुष्य माझ्याच भोवती भोवती होतं. तिला स्वत:चे मित्रमत्रिणी नव्हते फारसे, की स्वत:च्या करिअरबाबत स्वत:हून निर्णय घेण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती. हे मला खटकायला लागलं. स्वत:हून धडाडीने निर्णय घेणारी आणि पुढे जाणारी मुलगी मला आवडली असती आणि हेच कारण होतं, आमचं बिनसलं.’’
‘‘सध्या आम्हा तरुण मुला-मुलींना गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असणं अनिवार्य वाटतं. ग्रुपमध्ये जाताना जरा त्यांचा दर्जा जास्त उंचावतो. आणि आम्हालाही छान वाटतं ना! गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असावेतच असं वाटतं मला. आपला असं कुणीतरी असण्याचीही गरज आहे. पण सगळीच रिलेशन्स लग्नापर्यंत पोचतातच असं नाही. ‘ब्रेक’ झालेल्या नात्यांमध्ये त्याचा सल राहतो पण परत दुसरं कुणी मिळालं की तो सल कमी कमी होत जातो.’’ आर्यन सांगत होतं.
असे कितीतरी मधुरा आणि अनिकेत, आर्यन मला रोज भेटत असतात. या सगळ्यांमध्ये मला जाणवणारी समान गोष्ट म्हणजे ‘परफेक्ट पार्टनर’ शोधण्याची अनिवार धडपड. आपल्यापकी कोणीच परफेक्ट नसतो हे माहीत असलं तरी व्यवहारात विसरलं जातं. आणि माझा ‘मिस्टर परफेक्ट’ किंवा माझी ‘ड्रीमगर्ल’ मला नक्की मिळेल या स्वप्नवत जगात जगण्याकडे अनेकांचा कल असतो. स्वप्नात जगण्यातही मला चूक वाटत नाही. चूक वाटते ती दुसऱ्याला आपल्या ‘परफेक्ट’ किंवा ‘ड्रीम’वाल्या संकल्पनांच्या कोंदणात बसवण्याची धडपड.
बहुतांश मुलं-मुली आज एक स्वप्न बाळगून असतात. आपला जोडीदार कसा असावा याचं एक अस्पष्ट असं चित्रं त्यांच्या डोक्यात असतं. त्याची एक पक्की चौकट अनेकांनी आखलेली असते. आणि भेटणारी प्रत्येक व्यक्ती मनातल्या त्या चित्राशी पडताळून बघितली जाते. त्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि दुर्दैवाने बहुतांश वेळा भेटलेली व्यक्ती त्या चित्रासारखी नसते, त्या चौकटीत बसेल अशीही नसते. हे कळतं तेव्हा घडायच्या दोन शक्यता असतात- (१) लग्न झालं असेल तर मग त्या व्यक्तीला बदलायचा प्रयत्न केला जातो. यातून भांडणांना जन्म मिळतो. किंवा (२) लग्न व्हायचं असेल तर दुसरीच व्यक्ती शोधायचा प्रयत्न केला जातो. विवाह संस्थेमार्फत लग्न ठरवताना तर हा दुसरा मुद्दा वारंवार बघायला मिळतो.
यातही मोठी दुर्दैवाची गोष्ट अशी की मुला-मुलींच्या हे मनातलं चित्र अस्पष्ट असतं! त्यामुळे मग कुठेतरी ट्रायल अ‍ॅण्ड एरर पद्धतीने मुलं-मुली पुढे चालत राहतात. बदललेल्या सामाजिक-आíथक परिस्थितीमुळे हे जमतंही. त्यामुळेच मधुराचे एकापाठोपाठ एक आठ बॉयफ्रेंड्स असू शकतात. मधुरा हे टोकाचे उदाहरण असेल कदाचित. पण तरी लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये एकापाठोपाठ एक असे कमीत कमी  १५-२० बघण्याचे कार्यक्रम करणारी कित्येक मुलं-मुली आहेत. आणि त्याहून पुढे जाऊन बघितलेल्या १५-२० मुलांपकी किंवा मुलींपकी एकही पसंत नसणे आणि नेमकी निवड न करता येणे हा तर अगदी नेहमीच येणारा अनुभव.
आमच्या एका गटचच्रेमध्ये एक गोष्ट रोहित सहज बोलून गेला. तो म्हणाला, ‘‘मला वाटतं की मला माझ्या संभाव्य जोडीदाराच्या काय गोष्टी ‘चालणार नाहीत म्हणजे नाहीत’ हे ठरवलं पाहिजे. आणि इतर गोष्टींमध्ये ‘चालतील’, ‘आवडतील’ आणि ‘या गोष्टी हव्या’ असं वर्गीकरण करायला हवं. आणि अर्थातच माझं स्वत:चं लॉजिकल असं कारण पाहिजे हे सगळंच ठरवताना.’’ रोहितने निर्णयप्रक्रियेचा गाभाच सांगितला एका दृष्टीने. उदाहरण द्यायचं तर- सिगरेट-तंबाखू अशी व्यसनं असणारा मुलगा नको म्हणजे नको. एखाद वेळेस िड्रक्स घेणारा चालेल. पण अजिबातच न पिणारा आवडेल. मुलगा व्यसनांपासून दूर असलेला हवा. असं वर्गीकरण करायला हवं. त्यामागे कारणमीमांसा पण असली पाहिजे. आणि कारणमीमांसा द्यायची तर जो विचार करायला लागेल तोही व्यवस्थित वेळ देऊन करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आणि हाच विचार तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे चित्र स्पष्ट करायच्या दिशेने नेईल. लग्न ठरवताना, आपला जोडीदार निवडताना स्वप्नातल्या अस्पष्ट चित्राला बाजूला सारून तर्कशुद्ध  विचारांच्या आधारे रेखाटलेल्या चित्राचा आधार घेणे आवश्यक आहे.
हे करत असतानाच लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे- आपण रेखाटलेले चित्र, मग भले ते तर्कशुद्ध विचार करून असेना का, ते चित्र म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे! आता ठरले म्हणजे ठरले असा विचार न करता लवचीक राहिले पाहिजे. एका मुलांनी मी असं म्हणल्यावर मला विचारलं की एवढा विचार करून गोष्टी ठरवल्या तरी मग लवचीकता का ठेवावी? यावर सोपे उत्तर आहे की मी, तुम्ही आणि आपल्यातला कोणीही अगदी परफेक्ट नाही, जो आपल्याला काय हवंय ते शंभर टक्के परफेक्ट मांडू शकेलच. आपली बुद्धिमत्ता मर्यादित आहे. अनुभवही मर्यादितच असतात. लवचीकता म्हणजे ठाम नसणे नव्हे, तर ठाम राहूनही मेंदूचे दरवाजे उघडे ठेवणे! एखादा निर्णय घेतल्यावरही मेंदूचे दरवाजे उघडे ठेवले तर इतरांचे अनुभव, इतरांचं ज्ञान आपल्याला मदत करू शकतं.
लवचीक नसू तर आपण आपल्याच विचारांच्या चौकटीत अडकून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि लक्षात ठेवायची दुसरी गोष्ट म्हणजे स्वत:वर लक्ष ठेवणं! काही वेळा आपल्याला ‘चालणाऱ्या’ गोष्टी अचानक ‘नाही म्हणजे नाही’ या वर्गात कधी जातात आपल्यालाच कळत नाही. म्हणूनच महत्त्वाचं आहे ते ‘नाही म्हणजे नाही’ या वर्गातल्या गोष्टींची यादी सातत्याने तपासात राहणं, त्यामागची कारणं तपासणं हे आवश्यक आहे. आपण रोज अनेक गोष्टी बघत असतो, वाचत असतो अनुभवत असतो. आणि म्हणूनच आपल्या विचारात आणि मनातल्या ठरलेल्या गोष्टींत बदल करणं म्हणजेच स्वत:च्याच विचारांच्या पुनर्तपासणीचं काम करणं आवश्यक असतं असं मला वाटतं. या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा जोडीदार निवडीचा आणि नंतरच्या सहजीवनाचाही मार्ग अत्यंत सुखाचा होईल, याबद्दल मला शंका नाही.
या सगळ्या वर सांगितलेल्या गोष्टींचं सार थोडक्यात सांगायचं तर तर्कशुद्ध विचार, लवचीकता, स्वत:वर लक्ष आणि जोडीदार निवडल्यावर त्याचा-तिचा विनाअट स्वीकार! मग कधी करताय सुरुवात?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा