– गीता सोनी

‘‘मलापण कधी कधी वाटतं, काय उगीच सगळी धडपड चालल्ये असं, पण नोकरी सोडल्यापासून सतत नवीन काहीतरी करत स्वत:ला व्यस्त ठेवायची सवयच लागलीये, शिवाय कोणी भेटलं ना की लगेच विचारतात, ‘सध्या काय करत्येस? नवीन काय सुरू आहे?’ मग यावर जर माझ्याकडे काही सांगण्यासारखे नसेल तर मला फार निराशाच येते, ताण वाढतो एकदम, त्याचं काय करू?’’

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल

इतक्या टळटळीत उन्हात कोण बरं आलं असेल, असं मनाशी म्हणत कांचनताईंनी घराचा दरवाजा उघडला, तर दारात, लेक अमृता. घामाने डबडबलेली, केस विस्कटलेले, चेहरा ओढलेला, हाताला काहीतरी खरचटल्यासारखंही दिसत होतं. ‘‘अगं अमू तू? इतक्या उन्हाची? किती थकल्यासारखी दिसत्येस.’’ खरंतर उन्हाने रापलेला अमूचा चेहरा पाहून कांचनताई धसकल्याच. ‘‘एवढय़ा उन्हाची कुठं फिरत होतीस गं बाई? आणि कुठे पडली बिडलीस का? खरचटलंय का? ये बस आधी पंख्याखाली.’’ अमूच्या तापल्या डोक्यावर हात ठेवत कांचनताईंनी पाण्याचा तांब्या अमूच्या हातात देत विचारलं.

‘‘अगं आई, काही नाही गं, ट्रेनमधून उतरताना गर्दी किती असते. काहीतरी लागलं जोरात, बरं, मध्यंतरी नाही का मी तो व्हॉइसोव्हर आणि डबिंगचा कोर्स केला होता त्याच्याच ऑडिशनला गेले होते एके ठिकाणी, नेहमीप्रमाणे खूप जण होतेच. बघूया काय होतंय तेवढीच जरा गंमत गं.’’ घटाघटा पाणी पिऊन मनातली निराशा दडवत कसंनुसं हसत अमू म्हणाली. ‘‘शिवाय  थायरॉइड टेस्टचा रिपोर्टपण घ्यायचा होता ना.’’

‘‘धन्य आहेस ग बाई, कुठून कुठून काय काय शोधशील आणि कशाचा ध्यास घेऊन जीव दमवशील तुझं तुलाच माहीत. उमेद होती तेव्हा बरीच वर्षे नोकरी केलीस, मग संसाराकडे लक्ष द्यायचं म्हणून सोडूनही दिलीस, मग काय योगासने शिकून त्याचेच वर्ग घ्यायला जायचीस, नंतर काय तर फ्रीलान्स लेखन सुरू केलंस, मध्यंतरी काय ते धावायचं खूळ शिरलं होतं तुझ्या टाळक्यात, मग त्यासाठी जिम ट्रेनिंग आणि रोजचा धावायचा सराव, मध्येच त्या बोलीभाषा संवर्धनवाल्या ग्रूपमध्ये शिरून काहीतरी करत असतेसच. अधूनमधून त्या कुठच्या एनजीओत जाऊनपण काहीतरी काम करतेस, आता ते सर्व कमी की काय तर हे नवीन शिकून त्याच्याच मागे असतेस, किती ही धावाधाव? आता मुलं चांगली शिकलीत, भरपूर कमावणारा नवरा आहे, तुझी तूही स्वावलंबी आहेस, तरी कशासाठी दहादिशांना हातपाय मारत असतेस गं?’’ कांचनताई न राहवून म्हणाल्या. सत्तरीतल्या कांचनताईंचा जीव आपल्या पन्नाशीकडे झुकलेल्या लेकीची ही ‘मल्टिडायमेन्शनल’ धावपळ पाहून दडपून जात असे.

आईचं बोलणं ऐकून अमूचा चेहरा आणखीनच उतरला, आपल्या पोटातली माया न कळून आता ही नेहमीसारखी चिडेल नाहीतर रडायलाच सुरुवात करेल, असं वाटून कांचनताई विषय बदलत म्हणाल्या, ‘‘अगं, एवढय़ा उत्साहानं सर्व करत असतेस, कौतुकच वाटतं हो, पण तुझ्या तब्येतीची काळजी वाटते गं मला. बरं जाऊ दे ते सगळं, तुझ्यासाठी खायला करते काहीतरी गरम गरम.’’

खिडकीतून शून्यात लावलेली नजर जराही न काढता अमू म्हणाली, ‘‘तुला खरं सांगू का आई, मलापण कधी कधी वाटतं, काय उगीच सगळी धडपड चालल्ये असं, पण नोकरी सोडल्यापासून सतत नवीन काहीतरी करत स्वत:ला व्यस्त ठेवायची सवयच लागलीये, शिवाय कोणी भेटलं ना की लगेच विचारतात, ‘सध्या काय करत्येस? नवीन काय सुरू आहे?’ मग यावर जर माझ्याकडे काही सांगण्यासारखे नसेल तर मला फार निराशाच येते, ताण वाढतो एकदम, त्याचं काय करू? आई तुमच्या वेळी काय असायचं ना, बायका एकमेकींना भेटल्या की स्वत:च्या मुलांबद्दल, नवऱ्याबद्दल बोलायच्या, आता तसं नसतं, आम्ही एकमेकींच्या करिअर, सोशल अ‍ॅक्टिव्हिटीज्बद्दल बोलतो. आमचे शाळा-कॉलेजचे मित्रमैत्रिणींचे ग्रूप्स एकमेकांना भेटतात, चॅट करतात, अशा वेळी आपल्या जवळ एखादी नवीन अ‍ॅक्टिव्हिटी किंवा काहीतरी हॅपनिंग सांगायला नसेल ना तर म्हणतात, ‘अरे ही तर संपल्ये आता.’ मग आपल्यालाही उपेक्षित, टाकाऊ असल्यासारखं वाटायला लागतं. यासाठी कायम अ‍ॅक्टिव्ह राहायलाच लागतं. समजतंय का तुला आई मी काय म्हणत्ये ते?’’

आपल्या या प्रौढ, विचारी मुलीच्या मनातली ही अनाठायी काळजी आणि पुढल्या पिढीच्या आयुष्याबद्दलच्या कल्पना  ऐकून कांचनताईंना काय बोलावे समजेचना, ‘‘अमू अ‍ॅक्टिव्ह असणं केव्हाही चांगलंच की, पण एखाद्या गोष्टीच्या किती आहारी जायचं त्याला काही सीमा? आणि नेहमीच ‘हॅपनिंग’ असायला, आपलं आयुष्य म्हणजे सिनेमा थोडाच आहे? थांब जरा आधी खायला आणते तुला, मग बोलू आपण,’’ असं म्हणत कांचनताई स्वयंपाकघरात गेल्या आणि पोहे करण्याबरोबर त्यांच्या डोक्यातलं विचारचक्रही सुरू झालं.

‘काय म्हणावं या मुलीला, लोक काय म्हणतील हे काय निराश व्हायचं कारण आहे? काल तो समोरचा उदितपण असंच काहीसं म्हणाला, त्याच्या नोकरीचं काही जमत नाहीये आणि पुढे शिकावंसं वाटत नाहीये, कोणी भेटलं की विचारतात, मग सध्या काय सुरू आहे? एकदम नव्‍‌र्हस वाटतं, म्हणाला. बाहेर फारसा पडतच नाही तो हल्ली. खालच्या मजल्यावरच्या बिचकर काका-काकूंचा मुलगा सून वर्षभरापासून असतात अमेरिकेत, त्यांना घोर लागलाय. मुलगा आपल्याला अमेरिकेत केव्हा बोलवेल याचा. कारण सगळेजण मधून मधून विचारत असतात ना त्यांना, ‘सध्या इकडे कसे, अमेरिकेत केव्हा जाताय मुलाकडे?’ नखात रोग नाही दोघांच्या की कशाला कमी नाही, पण उगीच झुरत असतात. मुलगा बोलवेल की नाही या चिंतेनं. कमाल झाली, म्हणजे आपल्या आसपास वावरणाऱ्या लोकांनी विचारलेला साधासा प्रश्न, ‘सध्या काय करता?’ इतका तापदायक असतो? पार मन:शांती बिघडवून टाकण्याइतका? कोणी सांगावं, उद्या आपल्या बाबतीत असं काही झालं तर आपलीही अवस्था अशीच होईल कदाचित, म्हणजे अमूची भीती चुकीची असेल, पण जगावेगळी नक्कीच नाहीये. छे, छे! पण असं झालं तर माणसांचा एकमेकांशी संवादच कठीण होऊन बसेल, लोकांच्या कोणत्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं हे शेवटी ज्याचं त्यानं ठरवायला हवं ना, माणसांना टाळणं हा काही उपाय नाही आणि त्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी स्वत:ला मनस्ताप करून घेणं तर नकोच नको.’ पोहे शेवटचे ढवळून कढईच्या काठावर जोरात झारा आपटत अमूला कसं समजावयाचं ते कांचनताईंनी मनाशी पक्कं ठरवून टाकलं.

‘‘अमू, कशी गं बाई तू अशी? आपल्या ओळखीच्या माणसांनी, ‘‘काय करता आजकाल?’’ इतकी साधी चौकशी केली तर त्यात मनावर दडपण येण्यासारखं काय आहे बरं? लोकं काय, संवाद सुरू ठेवण्यासाठी, उत्सुकता म्हणून विचारतात काहीबाही, त्यांना तरी कुठे वेळ आहे स्वत:च्या विवंचना सोडून तू काय करत्येस हे पाहायला? गोष्टी थोडय़ा हसून खेळून घ्यायला शीक की. स्वत:च्या देहाचं, मनाचं सांगणं ऐकण्याइतकी तरी फुरसत घ्यायला नको का सांग पाहू? असंच स्वत:ला चांगल्या कामात गुंतवून घेत राहा, पण तुझं मन सांगेल तेव्हाच आणि झेपेल तितकंच, कोणत्या तरी दडपणाखाली नको. नाहीतर, एक थायरॉइड आहेच शिवाय आणखी कुठचं तरी दुखणं पाठी लागायचं. मग भलतंच ‘हॅपनिंग’ व्हायचं बाई तुझं ‘लाइफ’.’’ कांचनताईंनी, अमूच्या हातातली रिकामी ताटली उचलताना मनात साचलेलं सगळं, शक्य तेवढय़ा समजुतीच्या स्वरात, बोलून टाकलं.

आईचं बोलणं कानात घेऊन, काहीच न बोलता अमूने पुन्हा खिडकीबाहेर पाहात शून्यात नजर लावली.

‘‘परबकाका आले वाटतं’’, बेलचा आवाज ऐकून कांचनताई उठल्या.

‘‘अरे वा! अमृता आली आहे का आज? काय ग कशी आहेस? मग सध्या काय करतेस, नवीन मोहीम?’’ स्वत:च्या घराची किल्ली न्यायला आलेल्या परबकाकांनी आपुलकीने अमूला विचारले.

त्यांच्या प्रश्नाने भानावर आलेल्या अमृताने एकवार आईकडे पाहिले आणि मनाशी काहीतरी ठरवल्यासारखं तितकंच  मोकळं हसत म्हणाली, ‘‘मजेत आहे काका मी, सध्या सगळ्या मोहिमा थांबवून आराम सुरू आहे.’’

‘‘वा उत्तम, ही मोहीम सर्वात गरजेची. व्हेरी गुड, लगे रहो.’’ परबकाका बाहेर पडताना प्रसन्न हसत म्हणाले. कधी नव्हे ते लेकीने, आपलं बोलणं इतक्या लगेच मनावर घेतल्याचं बघून कांचनताईंना हायसं वाटलं आणि अमूलाही मनावरचं ओझं उतरल्यासारखं!

n geetadsoni1971@gmail.com

n chaturang@expressindia.com

Story img Loader