डॉ. सुनीती धारवडकर

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही परिस्थिती वरवर पाहता दिलासादायक वाटते. परंतु याचा अर्थ स्त्रिया विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात येण्यातली आव्हानं संपलीत असं मुळीच नाही. संशोधन आणि नावीन्यपूर्ण शोधांमध्ये लिंगाधारित विषमता खूप मोठी आहे.

Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
increasing rate of unprotected sex among teenagers
पुणे : किशोरवयीन मुलांमध्ये असुरक्षित शारीरिक संबंधांत वाढ! जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील धक्कादायक निष्कर्ष
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
hsc result
HSC Result : इयत्ता बारावीच्या निकालात आता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण समाविष्ट होणार? NCERT चा नवा प्रस्ताव काय?
Mumbai, Capital Markets, Stock Indices, Sensex, Nifty, Federal Reserve, Jerome Powell, Jackson Hole Meeting, Domestic Institutional Investors, Foreign Institutional Investors,
तेजीवाल्यांची पकड घट्ट; ‘सेन्सेक्स’मध्ये शतकी वाढ
Chaturang Feminism in sports Emane Khelief and Angela Carini of Olympic Algeria
स्त्री ‘विशद : क्रीडा क्षेत्रातील ‘स्त्री’त्व
20 percent increase in hernia in youth
तरूणांमध्ये हर्नियाच्या त्रासात २० टक्के वाढ!

मागे वळून पाहता प्रकर्षानं जाणवतं, की पूर्वीपेक्षा आज स्त्रियांच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झालीय. एक काळ असा होता, की स्त्रियांना बाहेरच्या जगात प्रवेशच नव्हता. शिक्षण आणि त्यातही विज्ञान-शिक्षण तर फार दूरची गोष्ट होती. अनेक स्तरांवर बहुविध आव्हानं पेलत स्त्रीनं विज्ञान क्षेत्रात प्रवेश केला. त्यातल्या अनेक स्त्रियांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलत या क्षेत्रात लक्षणीय कामगिरीही केली. अर्थात ही फक्त सुरुवात आहे, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचाय.

या उजळणीला एक निमित्त आहे. वैज्ञानिक माहितीचं विश्लेषण करण्यात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या ‘ऐल्सवेर’ या संस्थेनं लिंग-समानतेच्या दृष्टीनं संशोधन आणि नावीन्यपूर्ण शोध या क्षेत्रात स्त्रियांच्या योगदानाबद्दल नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. (Progress Towards Gender Equality in Research & Innovation 2024). त्यानुसार जागतिक पातळीवर २००१ मध्ये विज्ञान क्षेत्रातला स्त्रियांचा सहभाग २८ टक्के होता. आज तो ४१ टक्क्यांवर पोहोचलाय. तरी भारतात हे प्रमाण ३३ टक्केच आहे. प्रत्येक देशागणिक, तिथल्या सामाजिक परिस्थितीनुसार हे प्रमाण बदलतं. एकीकडे ही प्रगतीच्या दिशेनं वाटचाल दिसत असली, तरी संशोधन आणि नावीन्यपूर्ण शोधांमध्ये लिंगाधारित विषमतेचं आव्हान अजून गंभीर आहे. ही आव्हानं, आताची स्थिती आणि धोरणात्मक गरजा, या गोष्टींचा पट मांडण्याचा हा प्रयत्न!

आणखी वाचा-‘समाजप्रक्रिया’ हिंसेनंतरची आणि पूर्वीचीही

आपल्या देशात एकीकडे लिंग-विषमतेचा प्रश्न असला, तरी दुसऱ्या बाजूस त्यातून मार्ग काढत अनेक स्त्री संशोधक वाटचाल करत आहेत. विज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अनेक संशोधिका आहेत. टेसी थॉमस, रितू श्रीवास्तव (अंतराळ विज्ञान), सुजाथा रामदोराय (गणित), संघमित्रा बंडोपाध्याय (संगणक विज्ञान), वत्सला थिरूमलाई (मेंदू विज्ञान), सुदीप्ता सेनगुप्ता (भूगर्भ विज्ञान) ही त्यातली काही आघाडीची नावं. जीवशास्त्र क्षेत्रातल्या काही संशोधिका म्हणजे- अर्चना शर्मा, संध्या विश्वेश्वरय्या, किरण मुझुमदार शॉ. सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रेणवीय जीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, जैवभौतिकी आणि जैवतंत्रज्ञान अशा मूलभूत आणि उपयोजित विज्ञान शाखांमध्येही आता बऱ्याच स्त्रिया संशोधक म्हणून नावारूपास येत आहेत. वैद्याकीय क्षेत्रात कर्करोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रतिबंधात्मक उपचार तज्ज्ञ, थ्रोम्बोसिस तज्ञ (हृदयविकाराशी संबंधित गुंतागुंत), म्हणून स्त्रिया कार्यरत आहेतच.

विज्ञान क्षेत्रात स्त्रिया प्रामुख्यानं वैद्याकीय आणि आरोग्याच्या क्षेत्रात काम करताना दिसतात. मात्र आता हळूहळू इतर विज्ञान क्षेत्रांतही त्यांची संख्या वाढताना दिसतेय. पण तुलनात्मकरित्या पाहिलं, तर गणित, अभियांत्रिकी, संगणक विज्ञान या विषयांत स्त्रियांची संख्या हळूहळू वाढत असली, तरी ती वाढ अजून खूप कमी आहे.

आणखी वाचा-कारी बदरी जवानी की छटती नहीं…

विज्ञानक्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कमी असण्याला अनेक कारणं आहेत. तरी मुख्य कारण म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचं तत्त्व आपल्या समाजात अजून पुरेसं रुजलेलं नाही. स्त्री पुरुषाइतकीच अनेक क्षेत्रांत आणि तसंच विज्ञानाच्या क्षेत्रातही सक्षमतेनं कार्य करू शकते, यावर विश्वास ठेवणं अजून समाजाला जड जातंय. अजून आपली मानसिकता ही आहे, की स्त्रीनं फार तर घरी बसून वा घरच्या जबाबदाऱ्या पार पाडूनच जमेल तेवढं शिकावं. तिनं अर्थार्जन करून घरखर्चाला हातभार लावावा, इथपर्यंत ठीक आहे, पण तिनं तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठीचे दरवाजे अनेक कुटुंबांत स्त्रीसाठी बंद असतात. विज्ञान क्षेत्रातल्या संशोधनात ज्ञानलालसेबरोबरच चिकाटी, वेळ देण्याची तयारी, संयम, या सगळ्याची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. प्रयोगशाळेत काम करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी लागते. कारण संशोधनाला वेळेची मर्यादा नसते. एखाद्या प्रयोगासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत थांबणं भाग असतं, तो अर्धवट सोडून चालत नाही. त्यामुळे स्त्री संशोधकाला वेळेची जास्त कसरत करावी लागते. त्यासाठी तिला घरच्या लोकांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. याकरिता फारच कमी कुटुंबांची तयारी असते. मूल झाल्यावर तर तिला हवा तेवढा वेळ संशोधनासाठी बाजूला काढता येत नाहीच. कारण अद्याप मूल वाढवणं ही फक्त स्त्रीचीच जबाबदारी समजली जाते. जेव्हा कुटुंबाचं पूर्ण सहकार्य असतं, तेव्हाच स्त्री संशोधनासाठी आवश्यक असलेला वेळ देऊ शकते.

विज्ञान क्षेत्रात स्त्रीचा प्रवेश झाल्यावर तिनं तिथे टिकून राहावं, यासाठीही तिच्याकडे एक माणूस म्हणून बघण्याची नितांत गरज आहे. समाजानं आणि कुटुंबीयांनी समाजाचा एक भाग म्हणून तिला वेगवेगळ्या टप्प्यावर पुरुषाला देतो तेवढी मुभा देणं, सहाय्य करणं, हे लिंगभाव समानतेकडे वाटचाल करणं ठरेल. आपल्याकडे लहान गावांत तर अनेक प्रश्न असतात. संशोधनाच्या विद्यार्थिनींना खूपदा स्त्रीविषयीच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाला सामोरं जावं लागतं. ‘प्रयोगशाळेत ती दिवसभर उभी राहू शकणार का?’, ‘उपकरणं हाताळता येतील का?’, अशी शेरेबाजी आजही सहन करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. या मानसिकतेला तोंड देत स्त्रियांनी आपला आत्मविश्वास न गमावता, ठामपणे आवडीच्या क्षेत्रात वाटचाल करणं महत्त्वाचं ठरतं.

आणखी वाचा- सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!

आपल्याला नेमकं काय करायचंय ते ठरवून आणि वैज्ञानिक दृष्टिकोन व सकारात्मकता अंगी बाणवून आपल्या कार्यात सफल झालेल्या स्त्री वैज्ञानिकांची उदाहरणं डोळ्यांसमोर आहेत. त्याविषयी अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर मुली विज्ञान क्षेत्रात येण्यास कचरणार नाहीत, त्यांना प्रोत्साहन मिळेल. आपल्या देशातल्या स्त्री संशोधकांच्या कार्याची झलक युवा पिढीसमोर वारंवार आणली, तर त्यातून मुलींना विज्ञानाची गोडी निर्माण होईल, युवा संशोधिकांना यातून खाचखळग्यांची कल्पना येईल आणि आपली वाट कशी चोखाळायची याचं ज्ञान मिळेल. आपण एक स्त्री आहोत, हा न्यूनगंड मागे टाकण्यास अशा प्रयत्नांची मदत होते.एक समस्या अशीही आहे, की पुष्कळदा विज्ञान क्षेत्रात स्त्रियांकडे केवळ ‘सहकारी’ किंवा ‘मदतनीस’ म्हणून पाहिलं जातं. त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या म्हणून बघितलं जात नाही. याचं कारण पुन्हा स्त्रियांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आहे. यामुळे विज्ञान क्षेत्रात स्त्री संशोधकांच्या

संशोधनाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा अनुभव अनेक ठिकाणी येतो. एवढंच नाही, तर त्यांच्या संशोधनाकडे खूपदा ‘दुय्यम दर्जाचं’ म्हणून पाहिलं जातं. त्यांना योग्य श्रेय दिलं जात नाही. पाश्चात्त्य देशांमध्येसुद्धा स्त्री संशोधकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ‘लिंगभावदूषित’ असल्याची अनेक उदाहरणं आहेत. संशोधिका रोझालिंड फ्रँकलिन हिनं ‘डीएनए’ या आनुवंशिक रेणूची त्रिमितीय संरचना उलगडण्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं, परंतु तिच्या योगदानाला दुर्लक्षित ठेवलं गेलं. अशा वागणुकीच्या पुढचा टप्पा म्हणजे पुष्कळदा संशोधनात निपुण ठरलेल्या स्त्रिया ‘पेटंट’साठी अर्ज करण्यास पुढाकार घेत नाहीत आणि त्यांना त्यासाठी प्रोत्साहनही दिलं जात नाही. त्यामुळेही त्यांच्या संशोधनाची पुरेशी दखल घेतली जात नाही.

‘नोबेल पुरस्कार’ १९०१ पासून दिला जाऊ लागला. आतापर्यंत विज्ञानातील संशोधक म्हणून एकट्या व्यक्तीला मिळणाऱ्या पुरस्काराच्या मानकरी केवळ तीन स्त्री संशोधक आहेत. ही जागतिक स्तरावरील परिस्थिती आहे. आपल्याकडेही पुरस्कारांच्या बाबतीत वेगळी परिस्थिती नाही. यासाठी एक उपाय असा असू शकतो, की स्त्रियांसाठी निरनिराळी पारितोषिकं ठेवून त्यांना प्रोत्साहन देणं. हीच बाब संशोधन प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या निधीबाबतीत आहे. प्रयोगशाळेतल्या प्रयोगांसाठी रसायनांची आणि उपकरणांची गरज असते. त्यासाठी पुरेशा निधीची आवश्यकता असते. विशेषत: स्त्रियांना तो मिळण्यात अडचणी येतात, असं चित्र आहे. स्त्रियांसाठी वेगळा निधी उपलब्ध झाल्यास जास्त स्त्रिया या क्षेत्राकडे वळतील.

आणखी वाचा-जिंकावे नि जगावेही : मीच लिहिले पत्र मला!

समाजाच्या रथाच्या एक चाकाला अडकवून ठेवून विज्ञानात आणि एकूणच प्रगती होणं अशक्य आहे. स्त्रियांना विज्ञानक्षेत्रात येण्यास प्रवृत्त करून समाजाचं हितच साधलं जाईल. एक तर त्यांचा सहभाग वाढल्यामुळे वैविध्यपूर्ण आकलनात भर पडेल आणि वैज्ञानिक क्षेत्राचं क्षितिज विस्तारेल. वैज्ञानिक घटना समजून घेण्यास हातभार लागेल. आरोग्य आणि पर्यावरणाविषयीचे प्रश्न सोडवण्यास तर स्त्रियांचं मोलाचं सहकार्य लाभेल. अनेक संशोधिका माता आणि नवजात बालकांच्या औषधयोजनेबाबत, प्रजननात्मक विषयांत, स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देतात. त्यामुळे त्यांचं विज्ञानक्षेत्रातलं प्रमाण वाढलं, तर समाजाचं स्वास्थ्य सुधारण्यासाठी त्याची मदत होईल.

एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा, की स्त्रिया प्रयोगशीलतेमध्ये अजिबात कमी नाहीयेत. प्रयोगशीलता ही प्रयोगशाळेपुरती सीमित नसते. स्त्रियांनीच शेतीचा शोध लावला. आज त्या आंतरशाखीय संशोधनात अग्रेसर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या चिरस्थायी विकासाच्या धोरणामध्ये विविध क्षेत्रं आणि विज्ञान यांच्यात स्त्रियांच्या असलेल्या समन्वयकाच्या भूमिकेची दखल घेतली आहे. या चिरस्थायी विकासाचे शिक्षण, पर्यावरण, आर्थिक, असे विविध पैलू आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानाकडे या परिप्रेक्ष्यातून पाहून वैज्ञानिक प्रगतीचं मूल्यमापन केलं, तर स्त्रियांच्या त्यातल्या स्थानाचं मूल्य समजेल.

स्त्रियांचा विज्ञान क्षेत्रातला सहभाग कमी असण्याची संमिश्र आणि एकमेकांत गुंतलेली अशी अनेक कारणं आहेत. पण स्त्रीला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून वागणूक मिळू लागली, तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती विज्ञानक्षेत्रात मुक्तपणे संचार करू शकेल. विज्ञान संशोधिका म्हणून प्रस्थापित होण्यास तिला बळ मिळेल. त्याचबरोबर विज्ञान-तंत्रज्ञानाची सामाजिक भानाशी सांगड घालून एकूणच विज्ञानाची सार्थ प्रगती प्रत्ययास येईल. यातून स्त्रियांची वैज्ञानिक क्षमता प्रकाशात येईल.

आपण स्त्री-पुरुष समतेचे आयाम आणि लोकाभिमुख विज्ञान यांस एकमेकांशी जोडलं, तर पुरुषांबरोबर स्त्रियांचंही या क्षेत्रातलं योगदान उत्तरोत्तर वाढत जाईल. ती परिस्थिती निर्माण करण्यात मात्र आपला- अर्थात समाजाचा मोठा वाटा असेल आणि जबाबदारीही!

sunitidharwadkar@gmail.com

(लेखिका जीवरसायनशास्त्रातील संशोधिका व विज्ञान लेखिका असून सध्या विज्ञानप्रसारात कार्यरत आहेत. ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२’च्या त्या मानकरी आहेत.)