‘क्वालिटी टाइम’ हा शब्द तेव्हा माहीत नव्हता किंवा बालमानसशास्त्राचीही ओळख नव्हती. पण ‘कुठल्याही’ कामात मुलगा-मुलगी असा भेद न करता ‘सकारात्मक मूल्ये’ देण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व करताना फक्त नजरेचा, क्वचित शब्दांचा धाक पुरेसा असायचा. आज आमची दोन्ही मुलं संधी असूनही परदेशस्थ न होता, पैशांच्या मागे न धावताही, उत्तम प्रगती करत आपापला संसार सुखाने करताहेत. पालकत्व हे खूप डोळस असतं हे नक्की.
बालपण सरतं, तारुण्यात पदार्पण होतं, विवाह होतो आणि आतापर्यंत पालकांच्या उबदार छायेत व्यतीत होत असलेलं मुक्त सुरक्षित, बेफिकीर आयुष्य जबाबदारीची जाणीव मनाशी बाळगत संसारात प्रवेश करतं. नव्या नवलाईचे दिवस सरून बाळाची चाहूल लागते. आता जबाबदारीचं ओझं नव्याने जाणवतं. साहजिकच भूमिका बदलतात आणि पालक बनून छाया देण्याचं कर्तव्य आपोआप आपल्या शिरावर येतं, एवढंच नव्हे तर त्या सावलीत आपल्या मुलांची वाढ खुंटू नये याचं भान बाळगण्याचंही.
मला आधी मुलगी आणि पाठोपाठ मुलगा झाला. हे लहानगे बहीणभाऊ एकमेकांशी खेळत-भांडत वाढत होते. शेजारचा गणगोतही भरपूर होता. त्यामुळे खेळगडय़ांची वानवा नव्हती आणि शेअरिंगचीही जाण होती. मुलांना सहाव्याच वर्षी आणि मराठी माध्यमाच्याच शाळेत घालायचं हे नक्की होतं. तोपर्यंत संध्याकाळी शुभंकरोती सोबत पाढे, अंक-अक्षर ओळख, संस्कृत-मराठी श्लोक, बालगीतं, गोष्टी या साऱ्यांतून मुलांवर आपोआप सुसंस्कार होत गेले. शेजारची मुलंही सामील झाल्यामुळे तो एक संस्कारवर्गच बने.
माझे पती शेतकी अधिकारी होते. त्यामुळे लहान गावातील शेतकरी प्रेमानं आम्हालाही शेतात बोलवायचे. परिणामी मुलांना बालवयातच धान्याच्या कणसांची, भाजीपाल्याची, फुलाफळांची प्रत्यक्षात माहिती झाली. बटाटा, रताळी, भुईमुगाच्या शेंगा जमिनीखाली येतात हे कळले आणि गाई-म्हशी दूध कशा देतात याचे प्रात्यक्षिकही पाहायला मिळाले. एकाच उसापासून गूळ आणि साखर, दोन्ही तयार होतात हे पाहून आश्चर्यही वाटले. रूढार्थाने शाळेचा श्रीगणेशा होण्याआधी या निसर्ग-शाळेत मुलांना खूप काही शिकता आले.
मुलगी पहिलीत आणि मुलगा बालवाडीत जाऊ लागले. पुस्तकी-विद्येचा पाया मी पक्का करून घेतला होताच. आता घरकाम उरकताना कविता म्हणून घेणं, वस्तूंवरून बेरजा-वजाबाक्या शिकवणं, वर्तमानपत्रांतील एखादी बातमी वाचून आणि शुद्धलेखन म्हणून लिहून घेणं याचा सराव केला. त्यामुळे गणित आणि मराठी सहज शिकता आले. मुलगी चौथीत गेल्यावर तिला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवण्याचे ठरवले. सराव होईल म्हणून आम्ही तिचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली. पहाटे पाच ते सहा ही प्रसन्न वेळ त्यासाठी निवडली. या वेळेस तिचे बाबा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करून घ्यायचे आणि मी दुपारी मराठीचा. परिणामी ती तालुक्यातून तिसरी आली. मुलाची वेळ आल्यावर हीच पद्धत अवलंबिली आणि तो जिल्ह्य़ातून पहिला आला. मात्र गाव लहान असल्याने माझी आई शिक्षणासाठी मुलाला नाशिकला घेऊन गेली. साहजिकच आता आमचे सर्व लक्ष मुलीवरच केंद्रित झाले होते. आता अभ्यासाचे विषयही वाढले होते आणि सातवीच्या स्कॉलरशिपचे ध्येय होते. पहाटे उठण्याची सवय कायम होती. त्यामुळे पाठांतर पक्के झाले. शाळेतून आल्यावर जेवण उरकून ती पेपर वाचन, शुद्धलेखन आणि गृहपाठ पूर्ण करून टाकत असे. मग काही वेळ अवांतर वाचन, (त्यासाठी ग्रंथालय उपयोगी पडले.) एखादं हस्तकौशल्याचं काम, मला एखाद्या कामात मदत किंवा एखादा बैठा खेळ खेळत असू. तिची चित्रकला चांगली असल्याने त्या परीक्षांमध्येही ती उत्तीर्ण झाली. संध्याकाळी मैत्रिणींसोबत खेळ, फिरणं आणि जेवण आटोपलं की पुन्हा अभ्यास.
दोन्ही मुलांना मुद्दाम भाजी किंवा दुकानातून एखादी वस्तू विकत आणायला आम्ही पाठवत असू. अंदाजापेक्षा थोडे जास्त देत असल्याने चिल्लर उरत असे आणि बेरीज-वजाबाकीचे प्रात्यक्षिक होई. शिवाय दोघांनाही पिगी-बँक (मातीचा गल्ला) दिलेली होतीच, त्यात उरलेले पैसे जमा करण्याचा शिरस्ता होता त्यामुळे बचतीची सवय लागत होती. ते पैसे त्यांनाच खर्च करण्याची मुभा होती. पण त्या पैशाचा विनियोग एखाद्याला मदत करण्याची जाणीव त्यांच्यात त्याही वयात होती. तेव्हा आम्ही ‘औंढा नागनाथ’ येथे राहात होतो. मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या फुलवालीची मुलगी माझ्या मुलीच्या- स्मिताच्या वर्गात होती. तिच्या बेताच्या परिस्थितीमुळे तिच्याकडे पुस्तके नसत. त्यामुळे दरवर्षी माझी मुलगी स्वत:बरोबरच तिचीही पुस्तके घ्यायला लावायची. मग मुलगा कसा मागे राहील! आमच्या कामवालीचा मुलगा रोज तिच्याबरोबर आमच्या घरी यायचा. माझा मुलगा हेमंत अभ्यास करताना तो आशाळभूतपणे पाहायचा. हेमंत तेव्हा तिसरी-चौथीत असेल. ‘तू का नाही शाळेत जात?’ त्यानं विचारलं. ‘पैसे नाहीत आईजवळ, बाबा नाहीत मला.’ हेमंत न बोलता आत गेला. आतून खळ्ळकन् आवाज आला. ‘फोडलं वाटतं काही तरी’ असं म्हणत मी आत जाणार तोच त्याने एका कपडय़ात भरून ते सर्व पैसे आणून त्याला दिले आणि म्हणाला, ‘हे घे पैसे, उद्यापासून शाळेत ये, हो नं आई,’ मी मानेनेच ‘हो’ म्हटले, माझे मन अभिमानाने भरून आले होते.
मुलगी सातवी आणि स्कॉलरशिप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आणि आम्ही औरंगाबादला राहायला आलो. मुलालाही बोलावून घेतले. लहान गावांतून मोठय़ा शहरात आल्याने आणि वरच्या वर्गात गेल्याने अभ्यासाचा परीघ वाढला होता. संस्कृत विषयाची भर पडली होती. पण लहानपणापासून संस्कृत कानांवर पडल्याने त्याची भीती नव्हती. इंग्रजीत संभाषण करता यावे म्हणून एकमेकांशी इंग्रजीतून बोलायचे सुचवले. प्रज्ञा शोध परीक्षाही द्यायला लावली. अभ्यासाबरोबरच स्नेहसंमेलन, क्रीडास्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा, बुद्धिबळ इतर कलाप्रकार यात भाग घ्यायला लावला आणि त्यांनी त्यातही प्रावीण्य मिळवले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना मुलांना आवर्जून घेऊन गेल्यामुळे मुलं अभिरुची संपन्न झाली. विविध प्रकारची इंग्लिश-मराठी पुस्तके वाचल्याने त्याच्या वैचारिक जाणिवाही समृद्ध झाल्या. वाचन-मनन-चिंतन ही त्रिसूत्री त्यांनी कायम पाळली.
मुलं हुशार होती, पण क्वचित त्यांच्या मर्यादाही माहीत होत्या. एक उदाहरण सांगते. मुलगा सातवीत असताना मराठीत त्याला सढळ हाताने मार्क्स दिलेले दिसले. मला त्याची त्या विषयांतील प्रगती माहीत होती. ‘मी याला असे अवास्तव मार्क्स देऊ नका, नाही तर तो त्याच भ्रमात राहील’ अशी शिक्षकांना विनंती केली आणि कमी मार्क्स दिले म्हणून वाद घालणाऱ्या पालकांऐवजी या कुठल्या जगावेगळय़ा पालक ? अशा आश्चर्यचकित नजरेने ते माझ्याकडे पाहू लागले. आमच्या ध्यानीमनी नसताना स्मिता दहावीला मेरिटमध्ये अकरावी आणि संस्कृत मराठीत बोर्डात पहिली आली. हेमंतच्या शाळेत संस्कृत नसल्याने आम्ही त्याला त्या शाळेतून काढून घेतले. तेव्हापासून हुशार मुलांची गळती होऊ नये म्हणून त्या शाळेत संस्कृत विषय सुरू करण्यात आला आहे. मध्यंतरी मुलाची पहाटे उठायची सवय मोडली होती. म्हणून पुन्हा नव्याने त्याला त्याचं महत्त्व पटवून द्यावे लागले. (या वयात हे पटवणं किती कठीण असतं हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.) त्यासाठी त्या दोघांना घेऊन मी ‘मॉर्निग वॉक’ला जाऊ लागले.
मुले शिकली आणि ती हुशारी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणांपर्यंत टिकविली. स्मिता बी.ई. आणि हेमंत एम.टेक . झाला. कॉलेज दूर पडतं म्हणून मुलांनी कधी गाडीचा हट्ट धरला नाही आणि सायकलने किंवा बसने जाण्यात कमीपणाही मानला नाही. पॉकेटमनी तर नावालाच देत होतो. तरीही कधी तक्रार नव्हती त्यांची.
पण आज आमची दोन्ही मुलं संधी असूनही परदेशस्थ न होता, पैशांच्या मागे न धावताही, उत्तम प्रगती करत आपापला संसार सुखाने करताहेत. सुदैवाने दोघांनाही अनुरूप जोडीदार मिळून तेही पालकाच्या भूमिकेतून आपापल्या मुलांवर सुसंस्कार करताना जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याच संसाराचं प्रतिबिंब पाहिल्यासारखं वाटतं. अर्थात पिढीगणिक बदल स्वीकारावाच लागतो. त्यामुळे लौकिकार्थाने भली-थोरली इस्टेट नसली तरी हीच खरी कमाई असं आम्ही मानतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा