दया आणि सहसंवेदना (सिंपथी आणि एंपथी) यामधील फरक आईबाबांनी लक्षात घ्यायला हवा. मुलांपर्यंत काय पोहोचवायचंय आणि संवादातून काय पोहोचतंय हे स्पष्ट व्हायला हवं. पालकांनी मुलांना संवादातून नेमक्या भावनांपर्यंत पोहोचवलं तरच सहसंवेदना जागी होऊ शकते. त्यांना दोष देऊन परिणाम मिळणार नाही.
विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. राजाने खांद्यावर घेताच वेताळ म्हणालाच, ‘‘राजा, आज मी तुला दोन घरातल्या मुलांची गोष्ट सांगणार आहे. बघ..’’
 क्षितिजनं कपाट आवरून जुन्या कपडय़ांचा ढीग कोपऱ्यात फेकला. ‘‘आई, मला नको असलेले कपडे तू काढायला सांगितले होतेस ना? इथे ठेवलेत गं.’’ तो ढीग पाहून आई वैतागलीच.
‘‘अरे, हे काय जुने कपडे आहेत का? हे तीन शर्टस तर तू फक्त एकेकदा घातलेयस.’’
‘‘ हो, ते शर्ट घालून पाहिल्यावर नाही आवडले मला. बाकीचे सहा महिने वापरून बोअर झालोय. कामवाल्या बाईंना दे ना. त्यांचा राजू उडय़ा मारत घालेल.’’
‘‘क्षितिज, खरंच तुम्हाला ना, मिळतंय म्हणून मस्ती आल्यासारखं झालंय. आपले देशबांधव उघडे राहतात म्हणून गांधीजी आयुष्यभर पंचा नेसत होते.’’
‘‘गांधीजी गांधीजी होते गं.  मी क्षितिज आहे. मी पंचा घालून राहिलो तर चालेल का तुला?’’ क्षितिज म्हणाला. आई आणखी वैतागली.

क्षितिजची आई मिहीरच्या आईशी बोलत होती. ‘‘..मुलांना खरंच कशाची किंमत नाही गं. मागतील ते आपण आणून देतोय ना, स्वत:पलीकडचं जग माहीतच नाही त्यांना.’’
‘‘अगं, मिहीरच्या बाबांची एका संस्थेच्या संचालकांशी ओळख झाली कुठेशी, त्यांनी संस्था बघायला यायचं आमंत्रण दिलंय. या रविवारी आपण जाऊ या का? मुलांना थोडं जगाचं भान येईल.’’

अनाथ मुलांसाठीची ती संस्था आईबाबांसोबत क्षितिज, मिहीर फिरून पाहात होते. संचालक सांगत होते,
‘‘आम्ही संस्थेमध्ये मुलांना घरासारखं वातावरण देतो. सगळ्या होस्टेल्सची रचना घरांसारखीच ठेवलीय. प्रत्येक घरात हॉल, स्वयंपाकघर आणि मुलांसाठी खोल्या आहेत. एकेका घरात साधारण दहा मुलं आणि संस्थेची एक स्वयंसेविका असे राहतात. मुलं तिला ‘आई’च म्हणतात. वाचनालयच खेळाचं मैदान आहे, अभ्यासिका आहे..’’       संस्था बघताना आईबाबा अतिशय भावूक झाले होते. दोघा मुलांच्या चेहऱ्यावर आधी कुतूहल होतं. संस्थेतल्या अनोळखी मुलांशी अगदीच जुजबी संवाद त्यांना जमला. हळूहळू दोघांचेही चेहरे कंटाळवाणे झाले. घसघशीत देणग्यांचे धनादेश दिल्यानंतर आईबाबांचे चेहरे मात्र समाधानी होते.
परतताना गाडीत क्षितिजचे बाबा म्हणाले, ‘‘बघा, ती बिचारी मुलं कशी राहतात? घर नाही, आई-वडील नाहीत, कुणाच्यातरी देणग्यांच्या आधारानं राहाणं.. किती अवघड.. नाहीतर तुम्ही. तुम्हाला सगळं मिळतंय ना, त्यामुळे किंमत कळत नाही आईबापांची, आणलेल्या वस्तूंची..’’
‘‘असं का म्हणता बाबा? आम्हाला तुम्ही दोघं खूप आवडता. त्या मुलांनासुद्धा काही कमी नव्हतं बरं का, चांगली आनंदात होती. किती छान खोल्या आहेत, अभ्यासिका आहे, खेळायला मोठ्ठं मदान आहे, खूप मुलं आहेत..’’  
‘‘ हो, पण आई-बाबा नाहीत क्षितिज त्यांना..’’
‘‘पाचगणीला नाही का मुलं एकटीच राहतात होस्टेलला शिकायला, तसंच..’’
चौघाही मोठय़ांचे चेहरे अस्वस्थ. ‘‘अरे, अगदीच कशी माणुसकी नाही तुमच्यात? तुमच्याच वयाची मुलं- त्यांच्याबद्दल कळवळा वाटणं दूरच, उलट आनंदात होती म्हणताय. भावनाशून्य वागणं. सामाजिक भान कसं येणार रे तुम्हाला?’’ मिहीरची आई उसळलीच.
‘‘सामाजिक भान म्हणजे काय काकू? मी कामवालीच्या राजूला माझे कपडे दे म्हटलं तरी आई ‘मस्ती आलीय’ म्हणून रागावली.’’ क्षितिज कुरकुरला.
‘‘या दोन गोष्टी वेगळ्या आहेत क्षितिज.. तू कपडय़ांचा कंटाळा आला म्हणून नवे कपडे फेकलेस.’’
‘‘राजूला देतच होतो ना मी? तेही फाटके नाहीतच चांगलेच कपडे..’’
वादावादी वाढत जाऊन शेवटी मुलं गप्प बसली. आपलं काय चुकलं ते न कळलेल्या त्यांच्या संभ्रमित चेहेऱ्यांवर फोकस होत दृश्य फ्रीझ झालं.

वेताळ म्हणाला, ‘‘राजा, या मुलांना सामाजिक भान नाही, का? आपल्याला मिळालेल्या आर्थिक, भावनिक सुरक्षिततेची किंमतच नाही का? आपल्यातले दोन घास दुसऱ्याला द्यायचे असतात हे कळावं म्हणून आईबाबा त्यांना जगाचा अनुभव द्यायला बघताहेत, पण मुलांपर्यंत काही पोहोचतच नाही. संवेदनशीलता कशी येईल त्यांच्यात?’’
राजा म्हणाला, ‘भावनाप्रधानता आणि संवेदनशीलता यात पालकांची थोडी गल्लत होतेय वेताळा. त्यासाठी दया आणि सहसंवेदनेमधला म्हणजे सिंपथी आणि एंपथीमधला फरक आईबाबांनी लक्षात घ्यायला हवा. मिहीरची आई कळवळ्याबद्दल बोलते, क्षितिजचे वडील संस्थेतल्या मुलांना ‘बिचारी’ म्हणतात. त्यातून  पोहोचतेय ती दयाभावना, सहानुभूती. आपल्यातले दोन घास भुकेल्याला द्यावेत ही माणुसकीची भावना पोहोचत नाही. माणूस म्हणून सगळ्यांच्या भावना सारख्याच असतात ही जाणीव पोहोचत नाही. कारण दया करणारा स्वत:ला नेहमी एक पायरी वर समजतो. दयाभावनेत दुसऱ्याचा आत्मसन्मान दुर्लक्षित होतो. ‘ती मुलं बिचारी आहेत आणि तुम्ही मुलं भावनाशून्य आहात’ ही शेरेबाजी मुलांपर्यंत पोहोचते आहे. आई-वडील मुलांच्या सुखसमाधानासाठीच कष्ट करताहेत पण ते पोहोचण्याऐवजी, ‘बघा, त्यांच्याकडे आई-वडील नाहीत आणि तुमच्याकडे आहेत, तुम्हाला मागताक्षणी मिळतं.. तुम्ही किती नशीबवान’ अशी मुलांना निष्कारण अपराधी वाटणारी तुलना अजाणतेपणी पोहोचते आहे. मुलांपर्यंत काय पोहोचवायचंय आणि संवादातून काय पोहोचतंय हे पालकांना स्पष्टपणे दिसायला हवं. एकीकडे ‘तुम्हाला दुसऱ्याची जाणीव नाही’ असं म्हणायचं आणि जुने चांगले कपडे कामवालीच्या मुलांना देताना रागवायचं. संस्थेतली मुलं आनंदी दिसताहेत तरी त्यांना ‘बिचारी’ म्हणायचं. या विरोधाभासातून मुलांपर्यंत योग्य संदेश पोहोचत नाही. ती गोंधळतात. आपलं काय चुकलं? हे मुलांना कळतच नाही.
‘‘मुलांना कळायला नको राजा? पालकांना या वयात कळत होतं.’’
‘‘पालकांच्या काळात जग एवढं संकुचित झालं नव्हतं वेताळा. आर्थिक वर्ग असले तरी तफावत कमी होती. भरपूर नातलग आणि आजूबाजूच्या घरांची उघडी दारं यामुळे अनेक प्रकारच्या परिस्थितींशी जवळून परिचय असायचा. ‘जाणीव’ जागी करावी लागण्याएवढं अंतर बहुतेकांबाबत नसायचं. आता मुलांच्या रोजच्या जगण्यातलं अनुभवविश्व एवढं मर्यादित झालंय वेताळा, की ती सहसंवेदना- म्हणजे दुसऱ्याच्या भावनांपर्यंत पोहोचण्याची क्षमता कमी पडते. हे लक्षात घेऊन पालकांनी मुलांशी योग्य पद्धतीनं संवाद साधला पाहिजे. मुलांच्या अनुभवातल्या भावनांशी संस्थेतल्या मुलांच्या भावनेला जोडता आलं तरच पालकांना हवी असलेली सहसंवेदना जागी होईल.’’
‘‘म्हणजे कसं, राजा?’’
‘‘म्हणजे, उदाहरणार्थ, ‘मागे एकदा आपली चुकामूक होऊन तू तासभर हरवला होतास तेव्हा किती घाबरला होतास मिहीर? किती असहाय्य, आधार सुटल्यासारखं वाटलं होतं ना? आम्हीपण तुला वेडय़ासारखे शोधत होतो. सापडल्यावर माझ्या कुशीत शिरून कधी नव्हे तो ढसाढसा रडला होतास. आठवतंय? या संस्थेतल्या मुलांना प्रेमाच्या माणसापाशी असं रडता येत नसेल. काही मुलांना आई-वडील माहीतच नाहीत. काही मुलं गर्दीत हरवल्यामुळे इथे आलीत. त्यांना कायमच किती एकटं वाटत असेल ना रे?’’ किंवा ‘‘हॉस्टेलच्या मुलांसारखी संस्थेतली मुलंही आनंदात दिसतात ते चांगलंच आहे. आपल्याला तरी कुठे अनोळखी व्यक्तींपाशी आपली वेदना सांगावीशी वाटते? मोकळेपणे बोलावंसं वाटतं? कारण प्रत्येकाला आत्मसन्मान असतो. सतत ‘बिचारं’ दिसायला कुणाला आवडेल रे? त्यामुळे कुटुंब नसल्याची वेदना कायमची सोबत असेल तरी मुलं नॉर्मलच जगायचा प्रयत्न करत असणार. हसतमुखानं त्यांनी परिस्थितीचा स्वीकार केला आहे हे किती मोठं आहे नाही का?
अशा पद्धतीनं बरोबरीच्या नात्यानं मुलांशी भावनांचं- विचारांचं शेअरिंग करता येईल. मात्र इथे कुठल्याही प्रकारानं तुलना होता कामा नये. तुलना झाली की मुलांची स्व-संरक्षण यंत्रणा जागी होते. ‘माझं कसं बरोबरच आहे’ असं समर्थन देण्याच्या मानसिकतेत ती जातात. दुसऱ्याशी नातं जुळणं, सहसंवेदना दूरच राहते.
संस्थेतले लोक करतात तेवढं आपण या मुलांसाठी करू शकत नाही, पण संस्थेला आर्थिक बळ तर देऊ शकतो? म्हणून जमेल तेवढी मदत करत रहायची. अशा पद्धतीनं ‘सामाजिक भान’ हा शब्द न वापरतादेखील सहजसंवादातून सामाजिक भान रूजवता येऊ शकतं.
जुन्या कपडय़ांबाबत आईला क्षितिजची ‘फेकण्याची’ वृत्ती आवडत नाहीये, पण त्या बेचैनीच्या भरात आपली भावना शेअर करण्याऐवजी ती मस्ती, गांधीजी वगैरे भलतंच काही बोलते. खरं तर देणाऱ्याची आपलेपणाची भावना आणि घेणाऱ्याचा आत्मसन्मान याबद्दल आई बोलू शकते. ‘मला नाही आवडली’ म्हणून आपण एखादी वस्तू फेकतोच, तेव्हा त्या वस्तूचा आणि माणसाचा सन्मान राहात नाही. राजूच्या जागी तू स्वत:ला ठेवून बघच म्हणजे तुला त्याची घेतानाची भावना कळेल आणि मग तू त्याला आपुलकीनं कपडे देशील. ‘मला नकोयत’ म्हणून फेकणं आणि त्याची गरज समजून त्याला देणं दोन्हीमध्ये कृती एकच आहे. पण देतानाच्या भावनेत फार फरक आहे बघ.. असं काहीसं..’’
‘‘हं. मला पटतंय राजा, पालकांनी मुलांना संवादातून नेमक्या भावनांपर्यंत पोहोचवलं तरच सहसंवेदना जागी होऊ शकते. त्यांना दोष देऊन परिणाम मिळणार नाही.’’ असं म्हणत वेताळ अदृश्य झाला.    
chaturang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा