‘कितना हैं बदनसीब जफर दफ्न के लिए, दो गज जमीन
भी न मिली कू-ए-यार में।’ मुघल बादशाह बहादूर शहा जफर याची ही गझल वेगळ्या संदर्भात अनुभवणारे समूहच्या समूह आपल्याच मातीत आहेत. कालबेलिया या घुमन्तु- विमुक्त समूहातील लोकांना दफनभूमीच नाही. त्यांच्यात मृतदेह घरात पुरण्याचं प्रमाण आजही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र आता या समूहातील समझूदेवी प्रशिक्षण घेऊन समाजाचं स्वरूप पालटण्याच्या प्रयत्नात आहेत. मतीया चिता, चिता-मेहरात-काठात समूहातली. त्यांनाही पाणी, वीज, घरं, शाळा, जातपडताळणी, रोजगार हमी, स्मशानभूमी, प्रत्येक प्रश्नाशी झुंजावं लागतंय. काय आहेत या समूहाचे प्रश्न आणि या स्त्रियांच्या रूपात त्यांना मिळालेलं उत्तर!

मरणाविषयी सहसा आपण किती हळुवार आणि संवेदनशील असतो. मग ते अपरिचिताचं का असेना. जवळचं माणूस असलं, तर अंत्ययात्रेला जातो, शेजारी असू तर त्या कुटुंबासाठी स्वयंपाक करतो, मित्रपरिवारातले असू तर मरणाचा आघात सुसह्य होईल असे वागत राहतो. मृत व्यक्तीबद्दल चांगलंच (जाहीरपणे तरी) बोलण्याचा प्रघात आहे. गेलाबाजार आजच्या डिजिटल काळामध्ये फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर ‘RIP’ तरी नोंदवतोच!

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Loksatta explained What is the exact reason behind the death of ten elephants in Bandhavgarh National Park in Madhya Pradesh
विश्लेषण: एकाच वेळी दहा हत्तींच्या मृत्यूमागे नेमके कारण काय?

हेही वाचा : दिवाळी काल-आज!

मरण हे असं हळुवार गोंजारण्याचं दु:ख आहे. म्हणूनच राजस्थानच्या समझूदेवी ‘घर के लोगोंके मरनेकी इतनी चिंता नहीं रहती, पर उन्हे दफनानेका संकट रहता हैं। उसकी चिंता भारी होती हैं।’ असं म्हणतात, तेव्हा ते अनाकलनीय वाटलं. समझूदेवी राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातल्या. ‘जोगीयोंकी दडी’ ही त्यांची वस्ती. त्या कालबेलिया या घुमन्तु- म्हणजे भटक्या-विमुक्त समूहाच्या आहेत. सर्वच वंचित समूहांसारख्या वेगवेगळय़ा दु:खाच्या, अवहेलनेच्या ओझ्याखाली हाही समाज आहेच; पण आणखीही अमानुष अवहेलना यांच्यावर लादलेली आहे. या समूहाला स्वत:ची ‘शमशानभूमी’ नाही आणि इतर जातीधर्माचे लोक त्यांना आपल्या स्मशान-दफनभूमीत दफन करायला देत नसल्यामुळे ही कुटुंबं मृत व्यक्तीला घरातच किंवा घरासमोर पुरतात किंवा काही वेळा लोकांच्या नजरेआड ३० किलोमीटर लांब जाऊन पुरतात. बहुतेकदा नंतर काही कटकट नको म्हणून घरात पुरण्याचं प्रमाण आजही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. घराच्या तळाशीच त्यांच्या आईवडिलांचे, नातेवाईकांचे, पूर्वजांचे दफन केलेले मृतदेह आहेत. (आजही ८० टक्के घुमन्तु समाज मृतदेहांचं दफन करतो, दहन नाही.) कालबेलियांचं दैवत शंकर. शंकराच्या नंदीमुळे (बैल) समूहाचं नाव कालबेलिया असल्याचं सांगतात. पिढय़ानपिढय़ा भटकणारा हा समूह. भीक मागणं हे उपजीविकेचं मुख्य साधन. त्याबरोबरीनं दुसऱ्यांच्या शेतावर रोजंदारी, साप पकडणं, बांबूच्या टोकऱ्या बनवणं ही जगण्याची आणखी काही साधनं आहेत. जेव्हा आणि जे मिळेल ते काम पोटासाठी करतात. काही स्त्रिया उपजीविकेसाठी नाच करतात. अंगच्या कलेची अशी मदत होते, पण कलेचा सन्मान कधी मिळत नाही. नाचाची बोली लावणाऱ्या दलालाकडून अनेकदा त्यांचं लैंगिक शोषणही होतं; पण जीवन-मरणाच्या, आपण आणि कुटुंब जिवंत राहण्याच्या धडपडीत हे दबूनच राहतात. या समूहातल्या समझूदेवी बारमेर शहरातल्या वस्तीत राहतात. शिक्षण नाही, रोजगार नाही, असं माहेर. पती दगड फोडण्याचं काम करायचा. दगड फोडण्याच्या जोखमीच्या कामामुळे ‘सिलिकोसिस’ या आजारानं त्याचा मृत्यू झाला. (हा जीवघेणा आजार राजस्थानच्या अनेक भागांमध्ये खाणीतल्या कामगारांना होतो.) अशिक्षित समझूदेवींनी आपल्यासारखं जिणं मुलांच्या वाटेला येऊ नये म्हणून त्यांना शाळेत घातलं. डेरा शहरात असल्यानं ते शक्यही झालं. त्यांच्या दोन्ही मुली शिकत आहेत.

हेही वाचा : एक दशकाचा गौरवशाली प्रवास!

दफनभूमी नसल्यामुळे येणारे प्रश्न समझूदेवी, नरुनाथ, त्रिलोकनाथ आणि नारायणनाथ आमच्यासमोर मांडत होते. दफन करायचं, तर गावात ‘जाइंदा’ की ‘आइंदा’ याचे निकष लावतात. जाइंदा म्हणजे पूर्वजांचा जन्म त्या गावात झालेला असणं. आइंदा म्हणजे अलीकडेच गावात आलेले. आता समाजच शेकडो वर्षांपासून ‘घुमन्तु’ आहे तर जाइंदा आहेच कोण? त्यांचे पूर्वज गावकरी असल्याचा दाखला कुठून मिळणार? त्यामुळे यांच्यापैकी कोणालाच, कोणत्याही गावची स्मशानभूमी मिळत नाही.

अनेक वेळा दफनासाठी नेलेले मृतदेह, दफन करायला परवानगी न दिल्यानं घरी परत आणावे लागले आहेत. मग घरातच किंवा कोणीही येत-जात नसलेल्या जागी जाऊन दफन केलं जातं. लांबवरच्या जागा शोधल्या, तरीही त्या ‘अतिक्रमित’ जागा असतात. स्मशानभूमी म्हणून त्यांची रीतसर नोंद नसते. अशा जागेत, एखादी योजना आली की दफन केलेले मृतदेह बाहेर काढून टाकले जातात. बऱ्याच वेळा अशा गुपचूप शोधलेल्या अतिक्रमित जागा वनखात्याच्या अखत्यारीतल्या असतात. कमी वर्दळ, अंधार, प्राण्यांची भीती, यामुळे तिथे फारसं कोणी येत-जात नाही; पण संध्याकाळी वनखात्याचे दरवाजे बंद झाल्यावर तिथे जाणं शक्य नाही. कुलूप तोडून आत जायचा प्रयत्न केलेल्या लोकांवर आजही खटले चालू आहेत. प्रेतयात्रा गावातून, लोकांच्या समोरून न्यायची नाही हा नियम. प्रत्येक वेळी लपतछपत, कडेकपारीच्या रस्त्यातून मृतदेह लांबवर घेऊन जायचं. कालबेलिया व्यक्तीला पुरलं तर गावात पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो, रात्री मृत झालेल्यांचं भूत होतं, असे समज गावात आहेत. समझूदेवी सांगत होत्या, ‘‘रातको कोई मरता हैं तब रो भी नही सकते। गाववालोंको पता चला तो बहुत मुश्किलें आती हैं।’’ नारायणनाथ हे कवस तालुक्याच्या चित्रकपार गावातली घटना सांगत होते. कालबेलिया समूहातील कोणाचा तरी मृतदेह दफन केल्यामुळे पाऊस पडला नाही, असं गावकऱ्यांना वाटल्यामुळे, दफन केलेलं प्रेत खणून बाहेर काढलं गेलं. मृत व्यक्तीच्या पत्नीचे रडून हाल झाले. समूहाच्या लोकांनी खणून बाहेर काढलेल्या मृतदेहासह जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे धरणं धरलं, की ‘दफनासाठी जागा द्या, नाही तर हा मृतदेह तुम्ही तुमच्याकडे घेऊन जा.’ लोकांचा जोर बघून अखेर सातव्या दिवशी समूहाला दफनभूमीसाठी जागा मिळाली. ‘सात दिवस शव कुठे ठेवलं होतं?’ असं विचारल्यावर नारायणनाथ सांगतात, ‘‘उधरही गमछेमे लपेटके रखा था। जिंदगी तो स्ट्रगलभरी हैं ही, लेकिन मरने के बाद भी डिग्निटी नहीं हैं।’’ घरात मृतदेह दफन करावा लागण्याची अमानुषता फक्त राजस्थानच्या घुमन्तु समूहात नाही. भटक्या विमुक्त समूहाचे अभ्यासक-कार्यकर्ते अरुण जाधव सांगतात, की भटक्या विमुक्तांमध्ये महाराष्ट्रात दशनाम-गोसावी हा समूह अजूनही मृतदेह घरात पुरतो. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागांत यांची वस्ती आहे. मसणजोगी समूह तर स्मशानातच किंवा स्मशानालगत राहतो.

कालबेलिया समूहाच्या स्वत:च्या काही समजुती आणि रीतीही त्यांच्या स्मशानभूमी मिळवण्याच्या मार्गात अडसर झाल्या आहेत. समूहात दफनानंतर पुरुषांची समाधी बांधतात. त्यासाठी मोठी जागा लागते. मोठी रक्कम कर्जानं घेतली जाते. समाधीचं काम सुरू होईपर्यंत, खुणेसाठी दगड, झाड वगैरे त्या ठिकाणी ठेवले जातात. प्रत्येक पुरुषासाठी अशा मोठय़ा जागा कशा आणणार, असं विचारून प्रशासन लोकांना निरुत्तर करतं. पिळवटून, ओरबाडून काढलेला आत्मसन्मान हा समूह समाधीच्या माध्यमातून भरून काढत असावा. पुरुषांना बसवून आणि बायकांना आडवं झोपवून दफन करतात. बसण्याचा मान फक्त पुरुषांना किंवा कधीकधी खूप वृद्ध बायकांना मिळतो. आयुष्य संपल्यानंतरही यांच्यात स्त्री-पुरुषांसाठी वेगळे नियम आहेत. स्त्रियांचं दुय्यमत्व केवळ मारहाण, हुंडा, बलात्कार अशा उघड कृतीतच नसतं, हे इथेही समजलं.

हेही वाचा : शोध आठवणीतल्या चवींचा! घनदाट जंगलातील चविष्ट पदार्थ

‘आतापर्यंत चाललं आहे, तसंच पुढेही चालणार,’ अशी मनाशी खूणगाठ बांधलेल्या समझूदेवींना त्यांच्याच समूहातल्या नारायणनाथ या तरुणानं समूहाच्या बदलासाठी सुरू केलेल्या कामामध्ये गुंतवलं. त्यांची समज आणि प्रेरणा बघून स्वत: ‘नेतृत्व विकास प्रक्रिये’तून गेलेल्या नारायणनाथ यांनी समझूदेवींना या प्रक्रियेचा भाग बनवलं. कालबेलिया समूहातल्या स्त्रियांबरोबर संवाद, त्यांना प्रश्न समजावून सांगणं, कृतीसाठी त्यांना एकत्र आणणं, यात सध्या त्या आघाडीवर आहेत. नारायणनाथ यांच्याप्रमाणेच, नरुनाथ, त्रिलोकनाथ हे कालबेलिया तरुण आज आपापल्या गावात बदल घडवण्याचा प्रयास करत आहेत. सगळे एकमेकांना जोडून घेऊन, एकत्रित ताकद जमवत आहेत. सविता चौहान (जोधपूर), संतोषदेवी कालबेलिया आणि आशादेवी कालबेलिया (टोंक), तुलसीदेवी कालबेलिया (बारमेर), छुमरीदेवी कालबेलिया (अजमेर) अशा या समूहातील अनेक स्त्रिया आज आपल्या समाजाचं स्वरूप पालटण्याच्या प्रयत्नात साथीदार आहेत.

मतीया चिता ही २१ वर्षांची तरुण, तडफदार मुलगी चिता-मेहरात-काठात या समूहातली. या समूहातली कुटुंबं हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मातल्या सर्व पद्धती, रीतिरिवाज पाळतात हे त्यांचं वैशिष्टय़. उदाहरणार्थ, घरात पूजाही करतात आणि नमाजही पढतात. संविधान समजून घेऊन आपल्या समूहासाठी काम करणारी मतीया, छुमरीसारख्या कालबेलिया समूहातील स्त्रीला आधार वाटते. या सर्वानी पुढाकार घेऊन कालबेलिया समाजातल्या जवळपास चारशे स्त्रियांचे गट बनवले. दडीमध्ये (वस्तीत) पाणी, वीज, घरं, शाळा, जातपडताळणी, रोजगार हमी किंवा स्मशानभूमी, प्रत्येक प्रश्नासाठी या स्त्रियांची साथ मिळते. या स्त्री साथीदारांना मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. जीवन बदलण्याचा तो आधार वाटतो. गावकुसाबाहेर डेरा करून राहणाऱ्या कुटुंबाच्या मुलांसाठी जवळपास शाळा नसतात. २-३ किलोमीटरचा कडेकपारीचा, निर्जन रस्ता पार करून लहानग्यांना कुठल्या आया शाळेत पाठवतील? तुलसीदेवी सांगत होत्या, की मुलांना बसमध्येही चढू देत नाहीत. ग्रामसभेच्या बैठकांना स्त्रिया गेल्या, तर कपडे चांगले नाहीत म्हणून त्यांना तिथं बसू देत नाहीत. उभं राहावं लागतं. गंमत (?) म्हणजे नागरिकत्वाचा बाकी काही पुरावा यांना मिळत नसला तरी मतदार ओळखपत्र सगळय़ांना पक्ष-कार्यकर्त्यांनी मिळवून दिलेलं आहे.

अलीकडे या सगळय़ा कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना एक जाणवलं, जगण्याच्या प्रश्नाचं एवढं क्रूर ओझं वाहात असूनही, त्यांच्यापैकी प्रत्येक जण बदलाची भाषा करत होता. तीन गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा मिळाली. कुठे वीज आली, कुठे पाणी. कुठे मुलं शाळेत जायला लागली, कुठे कलासंवर्धनासाठी जागा. ‘आमच्या मनातली भीतीच मोठा अडसर होती असं वाटतं,’ असं नरुनाथ सांगतात. ‘जैसेही संविधान क्या हैं ये समझने लगा, तो हमारा डर निकलने लगा,’ ते सांगत होते. अतिवंचित, दडपलेल्या समूहाबरोबर काम करताना हे पुरुषांचे, हे स्त्रियांचे, हे पारिलगींचे प्रश्न, असं वर्गीकरण करता येत नाही. कालबेलिया आणि त्यासारख्या समूहाचे सगळे प्रश्न समूहातल्या सगळय़ांच्याच सन्मानाचे, हक्काचे प्रश्न आहेत. याचा अर्थ या समूहात स्त्रियांवर पुरुषांकडून हिंसा होत नाही, असा अजिबात नाही. ती होते आणि करणाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी; पण इथले प्रश्न संपूर्ण समूहाच्याच पराकोटीच्या अव्हेरलेपणाचे नमुने आहेत. स्त्रियांचे म्हणून काही विशेष प्रश्न असतात हे जाणवायला, समजायला अवधी लागतो. अलीकडे लैंगिक शोषणाची २२ प्रकरणं दाखल झाली आहेत. त्यातली अनेक समूहाच्या पुरुषांच्या विरोधातच आहेत.

हेही वाचा : पाहायलाच हवेत : कहाणी जीवनव्यापी मनोभंगाची

जात, धर्म, लिंग, वर्ग, सगळय़ा भेदभावांचा मिळून असा संयुक्त, एकत्रित भेदभाव. मोठय़ा तुरुंगातले मग छोटे तुरुंग! आतल्या तुरुंगात पोहोचण्यासाठी मोठय़ा तुरुंगाचा दरवाजा सताड उघडावा लागतो. तसं आहे हे. भेदभावांच्या गुंतागुंतीची संकल्पना (Intersectionality) इथे मूर्त दिसते, समजून घेता येते. कालबेलिया समूहातल्या काही स्त्रिया वेगळा विचार करायला लागल्या, समूहाच्या प्रश्नांत सहभागी व्हायला लागल्या, इतर स्त्रियांना संघटित करायला लागल्या, नेतृत्व करायला लागल्या, हे म्हणूनच लक्षणीय आहे.

नारायणनाथ त्यांच्यातल्या संघर्षांच्या प्रेरणेबद्दल म्हणाले, ‘‘हम सब मिलके करंटवाली (वीजप्रवाह असलेली) तार बननेका, बनानेका काम कर रहे हैं। बिना करंटवाली तार को लोग डरते नही। उसपे तुरंत कपडे सुखाने जाते हैं।’’ माणसांच्या आत्मसन्मानाशी क्रूर व्यवहार करणाऱ्यांना यांच्या विजेचा झटका भानावर आणू शकेल? दया पवारांच्या शब्दांत सांगायचं, तर त्यांना ‘आज विषाद वाटतो, कशा वागविल्या मणामणाच्या बेडय़ा,’ असं वाटून ‘कुणी निर्मिला हा कोंडवाडा’ असा प्रश्न पडेल काय?..

(या लेखासाठी ललिता पनवार,
पूजा सिंग यांचे सहकार्य झाले आहे.)
coro.grassrootfeminism@gmail.com