डॉ. सुजाता खांडेकर

आई-मुलीचं नातं अनेक कुटुंबांत मैत्रीचं असतं; पण कौटुंबिक वा सामाजिक दमनाची पार्श्वभूमी असेल, तर आईची फरपट बघता बघता मोठी झालेली मुलगी आईचे आणि एकूणच स्त्रीजातीचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते. काळाबरोबर परिवर्तनासाठीच्या अशा प्रयत्नांत आई-मुलीची मैत्री अधिकच घट्ट होत जाते, कारण समृद्धीची प्रक्रिया ही निरंतर उलगडणारी असते. समाजकार्यात उतरलेल्या अशा मायलेकींच्या अनेक जोडय़ा स्त्रियांना आधार देत आहेत. यातली दोन उदाहरणं- यास्मिन व सायमा शेख आणि शांता व रत्ना माने. त्यांच्या सहप्रवासाविषयी..

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

महिन्याभरापूर्वीची गोष्ट. मुंबईच्या वस्त्यांमधील तरुण मुलीमुलांनी ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या (TISS) मदतीनं केलेल्या प्रत्येकी
६ मिनिटांच्या लघुपटांचं सादरीकरण होतं. त्यातला एक लघुपट सायमा शेख आणि शाहीन या १९ वर्षांच्या मुलींनी केला होता. विषय होता ‘सेक्ससंबंधी मुलींच्या, बायकांच्या अपेक्षा’. त्यात त्यांच्या वस्तीतल्या स्त्रिया लैंगिक क्रियेतल्या आपल्या अपेक्षांबद्दल बोलत होत्या. लघुपट चालू असताना बायकांच्या हसण्या-खिदळण्याचा आवाज येत होता. महत्त्वाच्या अनेक गोष्टी त्यात होत्या. हॉलमधल्या अंधारात हा लघुपट बघताना सर्व जण मोठमोठय़ानं हसत होते. तो संपल्यावर लाइट लागले आणि मग मात्र संकोचलेली शांतता पसरली. मनात दडलेलं असूनही, हवंहवंसं वाटत असूनही या विषयावर उघड बोललेलं ऐकलं, तरी लोक चपापल्यासारखे गप्प होतात. अशा समाजात १९ वर्षांच्या दोन मुस्लीम मुलींनी यावर थेट लघुपटच बनवावा? प्रतिक्रिया काय, कशी द्यायची, असा सगळय़ांचा विचार चालू असणार बहुधा!

असा लघुपट करताना, त्यातून काय आणि का सांगायचं, याची स्पष्टता, जे सांगायचंय त्यासाठी धाडस, वस्तीतल्या स्त्रिया मोकळेपणानं यावर बोलतील इतका कमावलेला विश्वास लागतो. तसंच प्रभावीपणे विषय मांडण्याचं कौशल्य लागतं. पहिल्या सगळय़ा बाबी या मुलींनी आपल्या कामातून कमावल्या होत्या आणि ते मांडण्यासाठी लागणाऱ्या कौशल्याची बाब ‘टीआयएसएस’च्या टीमनं मजबूत सांभाळली होती.सुखद धक्का यापुढचा होता. हॉलमधली संकोचलेली शांतता यास्मिन शेख यांनी- सायमाच्या आईनं तोडली. विषयाचं गांभीर्य त्यांनी ठामपणे सांगितलं. दोन्ही मुलींचं तोंडभरून कौतुक केलं. यास्मिन गेली पाच वर्ष स्त्री-अत्याचाराच्या प्रश्नांवर आमच्या संघटनेबरोबर काम करत आहेत. आईमुळे सायमाचाही या कामाशी परिचय झाला. आईत होणारे बदल तिला दिसत होते. तीही आईबरोबर बैठकांना येऊ लागली. सुरुवातीला मूग गिळून सर्व प्रकारची हिंसा सहन करणाऱ्या यास्मिन सायमाशी कामाबद्दल, त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेबद्दल बोलत होत्या, तिच्यासमोर विनासंकोच रडत होत्या. सायमाला शिक्षण, घराबाहेर जाणं, आवडणारे ड्रेस घालणं यासाठी आईचा पाठिंबा मिळत होता. सायमा आईची सखी-सहेली होती. यास्मिन सांगतात, ‘‘मला लैंगिक हिंसा सतत सहन करावी लागायची. घरात रात्रीच्या अंधाराची भीती वाटायची. दहा बाय दहाचं आमचं घर. त्यात मुलं आणि आम्ही दोघं राहायचो. सायमा आणि माझ्यातल्या संवादामुळे तिला माझी भीती कळायला लागली. रात्री मला त्रास होणार हे लक्षात आलं, की सायमा उठून दिवे लावायची आणि पहाटे ३-४ वाजेपर्यंत अभ्यास करत बसायची. ‘अभ्यास आज संपवायलाच हवा, परीक्षा आहे,’ असं वडिलांना सांगायची.’’

यास्मिन अलाहाबादमध्ये ‘बी.एड.’च्या पहिल्या वर्षांला असताना कुटुंबातल्या पुरुषांच्या दबावामुळे, त्यांच्या आईचा लग्नाला विरोध असूनही यास्मिन यांचं लग्न झालं. सुरुवातीचे मोजके बरे दिवस सोडल्यावर नवऱ्याची मानसिक स्थिती बिघडल्यामुळे फरफट सुरू झाली. नवऱ्याची नोकरी गेली. दोन मुली, एक मुलगा, नवरा-बायको असं कुटुंब २०१५ मध्ये मुंबईच्या गोवंडी-शिवाजीनगरच्या वस्तीत आलं. सर्वात मोठी सायमा अलाहाबादमध्ये शाळेत शिकत होती. अचानक कधीही न अनुभवलेल्या वातावरणात सगळे येऊन पडले. कमालीची आर्थिक परवड होती. त्यातच यास्मिन दररोज नवऱ्यानं केलेली हरतऱ्हेची हिंसा मुकाट सहन करत होत्या. आपण एवढे शिकलेले असूनसुद्धा काही करू शकत नाही, ही बोच होती. मुलांची कुचंबणा यास्मिनना पाहावत नव्हती. पैशांचं आयुष्यातलं महत्त्व समजायला लागलं आणि यास्मिन यांनी मुलांच्या शिक्षणासाठी जमेल ते काम करायचं ठरवलं. कधी शिकवणी, कधी सव्र्हे, अशी कामं करताना वस्तीत स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या अनेक मंडळांशी, संस्थांशी त्या जोडल्या गेल्या. इतके दिवस दाबून ठेवलेल्या भावनांचे, आकांक्षाचे बांध कोसळल्यासारखं त्यांना वाटलं. त्या कामातूनच यास्मिन यांची ‘ग्रासरूट्स नेतृत्व विकास’ कार्यक्रमात निवड झाली. हक्क, सन्मान, समानता, स्वातंत्र्य, या कधीही न ऐकलेल्या शब्दांचे अर्थ कळायला लागले.

कामातून मिळालेल्या विश्वासामुळे सायमाशी यास्मिन यांचा वेगळा संवाद सुरू झाला. यास्मिन स्वत:च्या हक्कांइतक्याच मुलींच्या हक्काबद्दल जागरूक झाल्या होत्या. सायमाही यास्मिन काम करत असलेल्या संस्थेच्या ऑफिसला येत होती, कामात भाग घेत होती. आपल्या वयाच्या मुलामुलींना एकत्र करून चर्चा करत होती. यास्मिन ‘ग्रासरूट नेतृत्व विकासा’च्या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि सायमा ‘युथ लीडरशिप’च्या
(युवा मंथन) कार्यक्रमात. आज दोघीही मायलेकी मैत्रिणी बनून मुख्यत: मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करत आहेत. सायमानं तिच्या आयुष्यातला कोणताही निर्णय स्वत:च घेतला पाहिजे यासाठी यास्मिन यांचा पूर्ण पाठिंबा आहे. आईला घरात किंवा घराबाहेर काम करताना कुठलीही अडचण येणार नाही याची सायमा काळजी घेते.

सायमा सध्या ‘मास्टर्स इन सोशल वर्क’ करते आहे. सुमारे ५०० तरुणी-तरुणांबरोबर सांविधानिक मूल्यं, नेतृत्व-विकास, संघटना बांधणीच्या कामात ती अग्रभागी आहे. सुरुवातीला सायमा जास्त वेळ घराबाहेर राहत होती. तेव्हा ‘आईच मुलीला पैशांसाठी वाईट काम करायला बाहेर पाठवते,’ अशी होत असलेली कुजबुज आता पूर्ण बंद आहे. आता लोक या मायलेकींकडे ‘रोल मॉडेल’ म्हणून बघतात, कौतुक करतात, त्यांची मदत घेतात आणि आपल्या मुलींना त्यांच्याबरोबर पाठवतात.

शांता माने आणि रत्ना माने

शांता माने आणि रत्ना माने ही मायलेकींची आणखी एक अशीच जोडी. शांता माने म्हणजे अख्खा वस्तीच्या ‘मानेबाई’. चार मुली, एक मुलगा. नवऱ्याचं काम बंद झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी शांता यांच्यावर पडली. जगाचे व्यवहार शिकत, छोटे-मोठे व्यवसाय करत त्या संसाराचा गाडा ओढत होत्या. १९९६ मध्ये त्या आमच्या संघटनेत आल्या. उंच्यापुऱ्या, भारदस्त शांताबाई. उत्साह आणि धीटपणाचं भांडार असणाऱ्या. संघटनेच्या कामात त्यांनी जबाबदारी घेतली आणि पुढाकारही. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न समजून घेऊन त्यांना आधार द्यायला मानेबाईंनी सुरुवात केली. हळूहळू स्त्रियांवरच्या हिंसेबाबतीत समुपदेशनाचं काम सुरू केलं. शांता निरक्षर असल्यानं त्यांना कामाची नोंद ठेवता यायची नाही. मग शाळेत जाणाऱ्या मुलीची- रत्नाची त्यांनी लिहिण्यासाठी मदत घेतली.

रत्ना त्यांना सतत ‘तू हे काम का करतेस? यातून काय मिळतं?’ असं विचारायची. एकदा सहनशीलतेचा बांध फुटलेल्या एका शेजारणीच्या तक्रारीचा तपशील रत्ना लिहीत होती. रत्ना सांगते, ‘‘आई नेहमी सांगायची, की हे प्रश्न फक्त त्या स्त्रियांचे नाहीत गं! आपल्या सर्वाचे आहेत. ते कसं, हे मला त्या दिवशी कळलं आणि मग मी वेगळय़ा पद्धतीनं याला जोडली गेले.’’ रत्नाच्या भावाचा तिच्या कामाला असलेला प्रचंड विरोध, प्रसंगी बेदम मारहाण शांता यांनी मुलीला मजबूत पाठिंबा देऊन थोपवली. पुढे रत्ना २००९ मध्ये वस्तीतल्या १०,००० स्त्रिया सभासद असणाऱ्या ‘महिला मंडळ फेडरेशन’ची सचिव म्हणून निवडून आली. ‘ग्रासरूट नेतृत्व विकास’ कार्यक्रमातल्या सहभागामुळे जोमानं काम करायला लागली. लग्न झालं, त्यात बेबनाव झाले. दु:ख होतं, ताण होता, मुलीची जबाबदारी होती. रत्नाला तिच्या कामाचा अनुभव, मिळवलेलं धैर्य आणि आईचा पाठिंबा कामी आला. रत्ना आजही आईची सर्वतोपरी काळजी घेते. सध्या ती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांत चालू असलेल्या स्त्री-हिंसाचारा-संबधित कामाची समन्वयक म्हणून काम करते.

ही दोन्ही उदाहरणं सारखीही आणि वेगळीही. शांता या निरक्षर, तर यास्मिन पदवीधर. यास्मिन मुस्लीम तर शांता मातंग समाजातल्या. यास्मिन यांचं कुटुंब उत्तर प्रदेशमधलं, शांता महाराष्ट्रातल्या. शांता संघटनेच्या सुरुवातीच्या काळात- १९९६ मध्ये या कामात आल्या आणि यास्मिन संघटना स्थिर झाल्यानंतर – त्यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी कामात सहभागी झाल्या; पण स्वत: बदलण्यात आणि त्याचा वारसा सायमा आणि रत्नाला देण्यात यातल्या कुठल्याच फरकाची अडचण झाली नाही. ‘आई संघटनेत आली, बदलली म्हणून आम्ही इथे येऊ शकलो. काम करू शकलो,’ असं सांगणाऱ्या मुलींची तुडुंब उदाहरणं आहेत. एकमेकींचा आधार बनलेल्या अक्षरश: हजारो मायलेकी किंवा मैत्रिणी कामात सहभागी आहेत. त्यांच्या मते यासाठी लागणारा सगळा पाठिंबा त्यांना कामातून मिळतो. प्रश्न आहे कसला, केव्हा आणि किती पाठिंबा लागतो? आणि तो आश्वासक कधी ठरतो?
यास्मिन किंवा शांता यांच्यासारख्या स्त्रिया हिंसाचार हा स्त्रीजन्माचा अपरिहार्य भोग आहे असंच समजतात. आपल्याला मिळणारी वागणूक हिंसा आहे, याचं भान यायला त्यांना इतरांचा पाठिंबा लागतो. या हिंसेविरुद्ध दाद मागता येण्याची शक्यता आहे हे पटायला पाठिंबा लागतो आणि दाद मागणं चुकीचं नाही, हे स्वत:लाच पटवण्यासाठी पाठिंबा लागतो. स्त्रियांच्या सहनशीलतेचे मनात रुतलेले गोडवे मोडून काढायला पाठिंबा लागतो. जुन्या आणि नवीन धारणा तळय़ात-मळय़ात होताना गैरसमज न करून घेता समजुतीचा, प्रेमाचा पाठिंबा लागतो. प्रत्यक्ष दाद मागण्यासाठी पाठिंबा लागतो. दाद मागताना कुटुंबात आणि बाहेरही वाढलेल्या हिंसाचाराचा (backlash) सामना करण्यासाठी पाठिंबा लागतो. स्वातंत्र्य आणि न्याय या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्ष अमलात येऊ शकतात हे पडताळून पाहायला पाठिंबा लागतो. हा पुरावा, ही प्रक्रिया घरातल्यांना समजावून सांगण्यासाठी पाठिंबा लागतो. आणि आपल्या आयुष्यात ही नवजाणीव आपल्या विचारांचा, नात्यांचा आणि व्यवहाराचा भाग बनण्यासाठी पाठिंबा सतत लागतच राहतो.

आजची गोष्ट फक्त सायमा-यास्मिन आणि शांता-रत्ना यांची नाही. ही संघटनेच्या कामाचीही गोष्ट आहे. यास्मिनचा सायमाच्या लघुपटावरचा प्रतिसाद ही आमच्या संघटनेच्या अनेक वर्ष केलेल्या कामाच्या दृष्टिकोनाची पावती आणि एक परिणाम असावा. एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण करणारी यास्मिन-सायमा आणि शांता-रत्ना यांची उदाहरणं या जाणिवांच्या प्रवाहाविषयी काही शक्यता सांगतात. शांता, यास्मिन किंवा इतरही स्त्रिया संघटनेत आल्यापासून आजपर्यंत कोणत्या ना कोणत्या रूपात, नात्यात त्यांचे संघटनेशी नातेसंबंध टिकून आहेत. सर्वानाच जोडून राहण्यातला फायदा, शक्यता आणि गरजही समजते. यामुळेच एकमेकांचा आधार वाटतो. परस्परसंबंधांचं एक जाळं पसरलं आहे. यामुळे रोजच्या रोज आणि तुम्हीच एकमेकाला भेटायची गरज राहत नाही. या जाळय़ाचं असणंच एकमेकांना आश्वस्त करत राहतं. ही ‘ग्रासरूट्स’ची सगळय़ात मोठी ताकद बनत आहे.

मनात पद्धतशीर रुजवलेल्या असमानतेच्या जाणिवा टाकून देण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणार. ‘एक गहू पुढे, चार गहू मागे’ अशाच गतीनं ती चालणार. आव्हानं येणार, नकारात्मक प्रतिक्रियांचा रेटा येणारच. व्यक्तिगत, सामूहिक आणि समष्टीच्या पातळीवरही. एवढी गुंतागुंत तीन-पाच वर्षांच्या, तगडबंद, ताठर, साचेबंद प्रोजेक्टमधून कशी सुटणार? निरंतर उलगडत पुढे जाणारी, समृद्ध होणारी प्रक्रिया म्हणूनच याचा विचार आणि आचार असायला हवा.

(या लेखासाठी राहुल गवारे यांनी सहाय्य केले आहे.)
coro.grassrootfeminism@gmail.ccom

Story img Loader