सुजाता खांडेकर

न शिकता, लवकर लग्न होऊन, घराच्या चार भिंतींत हिंसाचार आणि गरिबी सहन करणाऱ्या अन्वरी खान. विवाहित मुलीला घरगुती हिंसेपासून दूर करणं आणि तृतीयपंथीय मुलाला मोकळय़ा मनानं स्वीकारण्यापासून सामाजिक काम करताना त्यांनी अनेक आव्हानं पचवली. दिल, जुबान,दिमाग आणि बर्ताव एकच असणाऱ्या, त्याप्रमाणे वागणाऱ्या अन्वरी यांची ही प्रेरणादायी गोष्ट..

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO

अन्वरी खान म्हणजे उत्साहाचा, धैर्याचा, समंजसपणाचा धबधबाच! विनोद हा या स्त्रीच्या शैलीचा आणि स्त्रियांच्या मनात खोल शिरून त्यांना आपलंसं करणं हा तिच्या कामाच्या पद्धतीचा महत्त्वाचा भाग. अलीकडेच एकदा स्वत:शीच जोरजोरात हसत अन्वरी ऑफिसमध्ये आल्या. काही विचारायच्या आधीच कथाकथन सुरू! प्रचंड उन्हाचे दिवस, अंगाची लाहीलाही व्हायची. त्यात अन्वरींचं घर पत्र्याचं. मुंबईतल्या देवनार डिम्पग ग्राउंडच्या काठावर वसलेलं. घरात चालताना पाय धस धस जमिनीत घुसतात, कारण कचऱ्याच्या भरीवरच वस्ती वसलेली.

अन्वरी सांगत होत्या, आदल्या दिवशी संध्याकाळी उकाडय़ानं घरात जीव गुदमरायला लागला. त्यांचं घर वस्तीतल्या भर रस्त्यावर. बाहेर संध्याकाळच्या वाऱ्याची झुळूक जरा गारवा देत होती. अन्वरी घराबाहेर आल्या. त्यांच्या शेजारच्यांची तीन चाकी हातगाडी रस्त्याच्या कडेला उभी केलेली पाहिली. त्या हातगाडीवर जाऊन मस्त लवंडल्या! वर मोकळं आकाश आणि अन्वरींना वाटणारा सुकून! त्या वेळी रस्त्यावर वस्तीतले पुरुष कामावरून घरी परतण्याची, बायका बाजार घेऊन येण्याची लगबग होती. अन्वरींना तसं पहुडलेलं पाहून येणारे-जाणारे थबकत होते. भुवया वर जात होत्या, चेहरे वेडेवाकडे होत होते. एका ओळखीच्या माणसानं धैर्य करून विचारलंच, ‘‘अन्वरी आपा, ठीक तो हो? क्या हो गया हैं?’’ (म्हणजे ‘डोकं ठिकाणावर आहे ना?’ या अर्थी.) प्रसंगाचं वर्णन करताना चेहऱ्यावर मिश्किल भाव आलेल्या अन्वरी सांगायला लागल्या, ‘‘मैं बोली, अरे तेरेको क्या हुआ हैं? मैं तो आराम कर रही हूँ!’’. अन्वरींच्या गोष्टीवेल्हाळ शैलीमुळे ती वाहत्या रस्त्यावरची हातगाडी आणि त्यावर झोपलेल्या अन्वरींचं चित्र माझ्या डोळय़ापुढे आलं. असं धाडस मी करू शकेन का, असंही वाटून गेलं!

याच वस्तीमध्ये पूर्वी लोकांनी अन्वरींच्या मार खातानाच्या किंकाळय़ा ऐकल्या होत्या. उपाशी मुलांसाठी अन्वरींनी  सर्वाकडे हातही पसरले होते. म्हणूनच त्यांच्या अशा वागण्यातली सहजता अचंबित करणारी आहे. हे धैर्य, हा आत्मविश्वास कुठून आला असेल? स्वत:च, स्वत:च्या सन्मानाची व्याख्या त्यांनी का, कशी केली असेल? उत्तर प्रदेशमधल्या उत्रवला गावच्या अन्वरी. मोठं घर, गाडी असलेल्या सुस्थित मुस्लीम कुटुंबामधल्या. वडिलांच्या लाडक्या, इतक्या, की लहानपणी वडील जवळ घेऊनच जेवायला बसायचे. फक्त पुरुषांनाच मिळणारी भरपूर तुपाची रोटी, घट्ट डाळ या मुलीला मिळायची. बहिणी, वहिनींना याचा राग यायचा. मदरसा किंवा शाळेत मात्र त्यांनी तिला पाठवलं नाही. घरातल्या कुणीच स्त्रिया शिकलेल्या नव्हत्या. पण अतिशय खोडकर अन्वरी मित्र-मैत्रिणींच्या मात्र लीडर होत्या! बंडखोरही. लहानपणी त्या विहिरीच्या काठावर बसल्यामुळे विहीर बाटल्याची तक्रार घेऊन भांडायला येणाऱ्यांना ‘‘मी काठावर बसले, तर विहिरीचं पाणी कसं अशुद्ध होतं?’’ असं विचारत आणखी पाय लांब करून आरामात तिथेच बसायच्या.

   अन्वरी ८-९ वर्षांच्या झाल्या आणि सगळं बदललं. डोक्यावर स्कार्फ आला, ढगळ कपडे आले. आर्थिक सुस्थितीमुळे संचार स्वातंत्र्यावर संपूर्ण गदा आली. घरात संडास-बाथरूम, नळ असल्यामुळे बाहेर जायचं कारणच नाही, असं घरच्यांचं मत. ‘‘गरीब बायकांना इलाज नाही म्हणून बाहेर जावं लागतं. तू जाऊन वडिलांचं नाक कापायचं नाही,’’ हे फर्मान. बांगडीवाला आला, तरी त्यानं बाहेरच्या बाहेर बांगडय़ा पुरुषांकडे द्यायच्या. ‘‘मुलांबरोबर खेळू नको. त्यांनी हात लावला, तर तू गर्भार राहशील,’’ हा वहिनींचा सल्ला आणि जबरदस्ती. मोठय़ांचं न ऐकणाऱ्या अन्वरींना शिक्षा म्हणून मुंबईतल्या भावांकडे पाठवण्यात आलं. १३-१४ जणांचा स्वयंपाक करायला लावून प्रशिक्षित केलं गेलं. मुंबईमध्ये घडय़ाळ घालून, पर्स, पुस्तक घेऊन कॉलेजला जाणाऱ्या मुला-मुलींना खिडकीतून पाहिलं, की ‘आपण स्त्री का आहोत? आपण मुस्लीम स्त्री का आहोत? आपण शिकलो का नाही?’ असे प्रश्न त्यांना पडायचे.

वयाच्या तेराव्या वर्षी ओळखीतल्या तरुणाशी अन्वरींचं लग्न लावलं गेलं. डोक्यावरचा एखादा केससुद्धा कुठल्या पुरुषाला दिसणार नाही, यासाठी ठाकूनठोकून तयार केलेल्या अन्वरींना लग्न म्हणजे काय, हे माहितीसुद्धा नव्हतं. लग्नाच्या रात्री पूर्णपणे अनोळखी पुरुषासमोर सगळी लाज उतरवून टाकायची जबरदस्ती झाली. प्रचंड दडपण आलं. ओरबाडण्याची सुरुवात तिथे झाली आणि ते होतच राहिलं. स्त्रियांच्या शरीर, मन, विचार, व्यवहार यावर तिच्या नवऱ्याचाच अधिकार असतो, या समजुतीवर पोसलेल्या ‘सर्वधर्मीय’ लग्नव्यवस्थांमध्ये अशा व्यवहाराला हिंसा कोण मानतं?   

एकदा माहेरून गादी आणली नाही, म्हणून गर्भवती अन्वरींना एकटीला कडाक्याच्या थंडीत गच्चीवर, बाहेरून कडी लावून, अंथरूण-पांघरुणाशिवाय झोपायला लावलं होतं. सकाळपर्यंत थंडीनं गारठून त्या जांभळय़ा पडल्या होत्या, संवेदनाच गेल्या होत्या. ओळखीच्या रिक्षावाल्याकडून जवळच्या गावी असलेल्या आई-वडिलांना अन्वरींनी निरोप पाठवला. वडील गाद्या, पांघरूण घेऊन अन्वरींच्या आईबरोबर आले. अन्वरींच्या सासूला ते सगळं दिलं, पण ते अन्वरींना भेटलेसुद्धा नाहीत. आई रडत आणि वडील ताठ मानेनं निघून गेले. लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात आईवडिलांनी लुडबुड करायची नाही, हे त्यांचं ठाम मत. लहानपणी अन्वरीला जवळ घेऊन जेवणाऱ्या वडिलांमध्ये  एवढं कोरडेपण कसं आलं असेल? की त्यांना फक्त कर्तव्यपूर्तीचं समाधान वाटत होतं? अगदी अशीच नाही, पण यासारख्या कठोरपणाच्या घटना आपल्या कुणालाच अपरिचित नाहीत. कुठे आणि कसे मिळतात याचे धडे?

  उपजीविकेसाठी अन्वरी खानचं कुटुंब मुंबईत आल्यावरही प्रचंड हिंसा सहन करणाऱ्या, ८ मुलांची आई झालेल्या अन्वरी यांची स्थिती ‘मुकी बिचारी कुणी हाका’ अशीच होती. तेराव्या वर्षीच लग्न लावून दिलेली त्यांची मोठी मुलगीही आपल्यासारखीच हिंसा सहन करत आहे, हे लक्षात आल्यावर मात्र अन्वरी बिथरल्या. मुलीवरच्या हिंसेचा कडेलोट व्हायला लागला, तेव्हा मदतीसाठी त्या दाही दिशा फिरल्या. नात्यातल्या कुणी मदत नाही केली. स्त्री-अत्याचारावर काम करणाऱ्या संघटनेची ओळख झाली. तिथल्या बैठकांना जायला लागल्या, मैत्रिणी मिळू लागल्या. किमान मदतीचा विश्वास आला, तेव्हा स्वभावत: बंडखोरच असलेल्या अन्वरी मैत्रिणीला घेऊन मुलीच्या सासरी गेल्या. ‘‘माझी मुलगी इथे राहणार नाही,’’ असं ठणकावून सांगून, मुलगी आणि लग्नात दिलेल्या सगळय़ा गोष्टी टेम्पो करून घेऊन आल्या. यामुळे संतापलेल्या त्यांच्या नवऱ्याने, नातेवाईकांनी छळ केला, पण अन्वरी बधल्या नाहीत. उलट मुलीला आणताना दाखवलेल्या धैर्यामुळे ‘मेरा बचपनही लौटके आया ऐसा लगा..’ असं त्या म्हणतात.

यानंतर अन्वरींनी मागे वळून बघितलं नाही. ‘ग्रासरूट्स नेतृत्व विकास कार्यक्रमा’त सहभागी झाल्या. बदलाच्या जाणिवेची प्रेरणा आणि बदल घडवण्यासाठी मिळालेला पाठिंबा अन्वरींना वेगळा विचार करायला आणि वेगळं वागायला मदतकारक ठरला. लहानपणापासून दाबून ठेवलेलं, पण अजूनही आत जिवंत असलेलं त्यांचं लहानपण, त्यातलं स्वातंत्र्य, मोकळेपण त्यांनी ओळखलं, गोंजारलं आणि वाढवलं. खरंतर आपल्या सगळय़ांत अशी दबलेली ताकद जिवंत असते. कुणीतरी त्याला फुंकर घालण्याची, विश्वासाचा आणि पाठिंब्याचा हात देण्याची गरज असते. तिथपर्यंत पुन्हा पोहोचण्याचं धाडस मात्र आपल्यालाच करावं लागतं.

व्यक्तिगत आणि सामाजिक अवतारात तफावत नसणं हे अन्वरींचं वैशिष्टय़. स्त्रियांना ‘अन्याय सहन करू नका,’ असं सांगताना, धोके पत्करूनही निकरानं स्वत:च्या, मुलींच्या आयुष्यात त्यांनी अन्याय सहन नाही केला.  लोकांनी आपल्या धारणा बदलायला पाहिजेत, असं कामातून सांगताना, तारुण्यसुलभ प्रेमात पडून मित्राबरोबर बाहेर राहून आलेल्या आपल्या मुलीचा विचार बदलला, तेव्हा सगळय़ांचा विरोध पत्करून अन्वरी मुलीच्या बाजूनं उभ्या राहिल्या. इतकंच नाही, तर या मुलीचं लग्न ठरलं, तेव्हा स्वत:हून त्यांनी तिच्या सासरच्यांना याची कल्पनाही दिली. मुलाच्या बाबतीतला त्यांचा संघर्ष आणखीनच वेगळा आहे. अन्वरींचा एक मुलगा तृतीयपंथीय असून गुरूच्या घरात राहायला गेला. सुरुवातीला मुलाला फूस लावून नेलं, असं वाटून अन्वरी जीवाच्या आकांतानं त्याला परत आणायला गेल्या, या गुरूशी भांडल्या, पण मुलगा मर्जीनं गेला आहे, हे लक्षात आल्यावर अन्वरींनी दु:ख स्वत:जवळ ठेवलं आणि समजूतदारपणा दाखवला. मुलगा आपल्याबरोबर नाही, याचं दु:ख होतं, पण ‘जग काय म्हणेल’ याची धास्ती त्यात नव्हती. या मुलाशी संबंध तोडले नाहीत, म्हणून नातेवाईक आणि जवळच्यांनी बहिष्कारच टाकला, पण अन्वरींच्या व्यवहाराला कुणाच्या मान्यतेची निकड नव्हती. मुलाला घरी येण्याची मोकळीक होती. त्याला त्या घरून जेवणाचा डबा पाठवायच्या. अलीकडेच बोलताना त्या सांगत होत्या, ‘‘मुलाचा उदरनिर्वाह मुख्यत: भीक मागणं आणि शरीरविक्रय यांवर होतो. (असेच तर पर्याय आहेत त्यांच्यापुढे.) तो म्हातारा होईल, थकेल, मी नसेन तेव्हा त्याचं काय होईल, या चिंतेनं त्रास होतो. मी त्याला सांगितलं आहे, की जेव्हा तुला घरी परत यावंस वाटेल, तेव्हा आपलं घर तुला सदैव उघडं आहे.’’ अन्वरींच्या बोलण्यात फक्त काळजी होती. ना अपमानाची, इज्जत गेल्याची भावना, ना जगावेगळं काही केल्याचा आविर्भाव. त्या म्हणतात, की काही वर्षांपूर्वी तृतीयपंथीय म्हणजे निसर्ग आणि इस्लामच्या विरोधात असल्याच्या गैरसमजुतीनं मी माझं आणि मुलाच जगणं असह्य केलं असतं.

अन्यायाचा, हिंसेचा विचार करताना अन्वरींना धर्माचे अडसर आले नाहीत. त्यांच्या वस्तीतल्या लहान मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका मौलवीस अटक करवण्यात अन्वरी जवळपास एकाकी होत्या. ‘धर्माला कलंक लावला’ म्हणून अन्वरींना मारायला लोकांचे जत्थे पोलीस स्टेशनबाहेर जमले होते. कित्येक पीडित मुलांच्या आईदेखील वेगवेगळय़ा दडपणांनी गप्प होत्या. अनेक धर्म-जातींमध्ये अशा घटना घडतात, पण अन्वरींसारखी सम्यक दृष्टी असणं विरळाच. धर्माच्या, जातीच्या, लिंगाच्या, राज्यांच्या निकषावर अत्याचाराबाबत तरतमभाव बाळगणाऱ्या सगळय़ांसाठी हा धडाच आहे. बलात्काराच्या एका घटनेचा पाठपुरावा करताना तर संबंधितांनी त्यांच्या घरावर रॉकेलचे बोळे, मोठे दगड टाकून दहशत निर्माण केली होती.

अन्वरींबद्दल महत्त्वाचं वाटतं, ते त्यांना पटलं ते संचित घेऊन त्यांनी स्वत: कुटुंब, समूह, संघटना, पोलीस-न्यायालय यांसारख्या यंत्रणा आणि धर्माचे नीतिनियम, या सगळय़ा संस्थांसमोर आपल्या परीनं आव्हान उभं केलं. पाठिंबा मिळवून ते निस्तरलं. ‘दिल, जुबान, दिमाग और बर्ताव’ यांमध्ये एकतानता ही विश्वासार्हतेची त्यांची व्याख्या असावी. असं विश्वासार्ह राहण्यासाठी कमालीचा आत्मविश्वास लागतो. मनाचं, विचारांचं हे वाहतेपण, समजूतदारपणा अन्वरींच्या कामातून, जग समजून घेण्याच्या प्रयत्नांतून आलं आहे. स्वत:चं आयुष्य ‘खुली किताब’ बनवून स्त्रियांना संघटित करायचं, हे स्त्री-चळवळीमध्ये ‘personal is political’ (व्यक्तिगत हे राजकीयच आहे) शिकवलं.

 अन्वरी साक्षर नाहीत, पण शहाणपणाला, सुसंस्कृतपणाला लिहिण्या-वाचण्यापेक्षा प्रामाणिक विचार करण्याची तयारी आणि क्षमता लागते. माझ्या ‘पीएच.डी.’च्या (प्रचलित शिक्षणपद्धतीत अधिकृतपणे ‘आमच्या’ म्हणू शकत नाही.) संशोधनात अन्वरी एक सह-संशोधक होत्या. स्त्री-नेतृत्वाबद्दल चर्चा करत असताना अन्वरी म्हणाल्या, ‘‘हमे समंदर जैसा होना चाहिये. जे येईल त्याला सामावून घेण्याची तयारी पाहिजे. आपलं स्वत:चं आयुष्य उघडं करून, लोकांना त्यात येण्याची जागा तयार केली पाहिजे.’’ समावेशकतेसारखी (inclusion) बहुचर्चित संकल्पना उलगडतानाही अन्वरींचं तेच सहज आणि नितळपण दिसतं. चळवळीतल्या कृती कार्यक्रमांनाच नव्हे, तर वैचारिक मांडणीलाही लख्ख करणारं!