डॉ. सुजाता खांडेकर

शालू कोल्हे, सरिता मेश्राम, कविता मौजे तिघीही ढिवर समूहातल्या. या समूहाची मुख्य उपजीविकाच मासेमारी आहे. पुरुषी वर्चस्व मोडून काढत स्वत: पाण्यात उतरून मासेमारी करणाऱ्या, त्याची विक्री करणाऱ्या आणि तलाव जिवंत करत मस्त्यसंवर्धनाचा विचार आणि व्यवहार करणाऱ्या ढिवर स्त्रियांनी त्यांच्या मासेमारीच्या कामाला वेगळा आयाम तर दिलाच, पण विद्या, मती, गती आणि वित्तही आमचेच, असे ठणकावून सांगत त्यांच्याकडे आणि त्यांच्या समाजाकडे बघण्याच्या लोकांच्या दृष्टिकोनात मोठाच बदल घडवून आणला आहे.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Success Story Of Sandeep Jain
Success Story Of Sandeep Jain :कठीण विषय शिकवला सोप्या भाषेत, ब्लॉगचे झाले ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर; वाचा संदीप जैन यांची गोष्ट
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?

‘‘गावच्या तलावात फक्त माती आणि पाणी होतं, त्याअर्थी तो मृत होता. आम्ही जरा जास्त अभ्यास केला आणि तलाव जिवंत करण्याचं काम सुरू केलं. तलाव जिवंत केला म्हणजे काय? तर तलाव आणि त्यातल्या माशांना घातक ठरणारी ‘बेशरम’ ही वनस्पती काढली. मग त्या तलावात स्थानिक पोषक वनस्पतींची रोपं, बिया लावल्या. माशांचं खाद्य, पक्ष्यांचं खाद्य असणाऱ्या साखऱ्या चिला, शेंबडय़ा चिला, वांडरपुष्टी चिला, गाद, डेहंगो, पांज, पत्तेवाली चीवूल, हरदुली, राजोली, पांढरं कमळ, शिमनी फूल (लहान), खस (उरसुडी), परसुड (देवधान), चौरा, पोवन अशा अनेक वनस्पती लावल्या. हळूहळू तलावातल्या या वनस्पतींच्या बीजसंवर्धनाचं काम आमच्या महिला गटांनी सुरू केलं.’’ अलीकडेच एका ‘झूम’ कॉलवर शालू कोल्हे हे सारं सांगत होत्या. त्यांच्याबरोबर सरिता, कविता आणि सहकारी-मित्र मनीषही कॉलवर होते. तो कॉल म्हणजे, या तीन मैत्रिणींनी केलेल्या मत्स्यसंवर्धनाच्या कामाचा धबधबाच होता. त्या सांगत होत्या, ‘‘पूर्वी फक्त पुरुषच मासेमारी करायचे. ते मुख्यत: जिरा मासे (जिऱ्याएवढे लहान) तलावात सोडायचे. बऱ्याचदा त्यांना मोठे मासे खायचे. तलाव जिवंत नसल्याने मासे नीट पोसले जायचे नाहीत. त्यातच तिथे बंगाली मासे वाढल्यापासून मुलकी माशांचाही नाशच होत होता. बंगाली माशांमुळे दुप्पट पैसे मिळण्याच्या प्रचारामुळे सगळे त्याच्याच मागे असत, खरं तर मुलकी मासे नैसर्गिकरीत्या वाढतात आणि बाराही महिने मिळतात, पण लोकांची वृत्ती आड येत होती. त्यामुळे मासेमारीच हळूहळू कमी होत होती.’’

‘‘जिरा माशांऐवजी आम्ही बोटुकली (मत्स्यबीज) वापरली. गडचिरोली जिल्ह्यातल्या ‘सृष्टी’ आणि ‘मकाम’ या संस्थांच्या मदतीने आम्हीच बांबूचे पिंजरे तयार करून बोटुकली संवर्धनाचं काम जोमात सुरू केलं. जून महिन्यामध्ये बोटुकली तलावात सोडली. त्यांची चोरी होऊ नये म्हणून रोज रात्री सर्वानी तळय़ावर पहारा दिला. पुरुषही बरोबर यायचे, कारण आमच्या जंगलात वाघ, अस्वल वगैरे आहेत. सगळी काळजी घेऊन मत्स्य- संवर्धन केलं. परिणामस्वरूप एकेक मासा एक-दीड किलो वजनाचा व्हायला लागला.’’ ‘‘बायकांना मासेमारी करायला जमणार नाही, असं पूर्वी पुरुषांना वाटायचं. आता तेच आमच्याकडून तलावातल्या वनस्पतीचं बीज आणि बोटुकली मासे घेतात. आम्ही बायका मासे पकडायला तलावात उतरलो की आमच्याकडून ते घ्यायला हे लोक थेट तलावावरच येतात. त्यासाठी पूर्वीसारखं बाजारात जायला लागत नाही. आता पाण्यात उतरून मासे पकडणं, ते कापणं, वजन करणं, पैशांचा व्यवहार सगळं महिला गटाच्या वतीनं आम्ही करतो.’’ ‘‘आता आमच्या तळय़ात मरड, दाडक, वागुर, सिंगूर, बिलोना, बाम, खुनुस, पोष्टी, सवळा, शिंगटा, गहंदी, भुरभूस, करवडी, चाच्या, जल्या काटवा, मजवा काटवा आहेत. (२९ माशांच्या जातींची नावं त्यांनी सांगितली, जी त्यांच्या तळय़ात मिळतात. त्यातले औषधी कोणते, पौष्टिक कोणते, चवदार कोणते, जास्त किमतीचे कोणते, सगळं वर्गवारीसहित सांगितलं!) एखादं सुंदर वारसास्थळ बघताना स्थापत्यविशारदानं त्याच्या तांत्रिक बाजू सांगाव्यात आणि आपल्याला काही कळलं नाही तरी स्थळाचं विलोभनीय स्वरूप लक्षात येऊन आपण अचंबित व्हावं, तसं माझं झालं! त्या तिघीही करत असलेलं काम आणि त्याचा परिणाम मी प्रत्यक्ष पाहिलेला असल्यामुळे ऐकताना स्तिमित होत होते.

शालू कोल्हे, सरिता मेश्राम, कविता मौजे तिघीही ढिवर समूहातल्या. ढिवर म्हणजे मासे पकडणारा. महाराष्ट्रात ढिवर समाज विमुक्त जमातीमध्ये येतो. या समूहाची मुख्य उपजीविकाच मासेमारी आहे. शालू-सरिता-कविता तलाव संवर्धनाबद्दल बोलत होत्या, ते त्या कोणत्याही पुस्तकांमधून शिकल्या नव्हत्या. समूहात वाढतानाच त्यांना याचं बाळकडू मिळालं होतं. समूहातल्या बायकांनी पिढय़ानपिढय़ा निगुतीने काम करून जमवलेला अनुभव, ज्ञान त्यांच्याकडे पोहोचलं आणि त्यातून या तिघी मैत्रिणींनी आपला मार्ग प्रशस्त केला. मुळात ढिवर समूह उपेक्षितांपेक्षा उपेक्षित, त्यात या स्त्रियाचं आयुष्य अधिकच उपेक्षित. पैसा, राजकीय ताकद, मानसन्मान या सर्वापासून वंचित. मानहानी, अवहेलनेचं जीवन कायम वाटय़ाला आलेलं. गावातल्या बचत गटातसुद्धा ढिवर स्त्रियांना कोणी सभासद करून घेत नव्हतं. शालूच्या गावात दलित आणि ढिवर बहुसंख्य असूनही त्यांना महत्त्व नव्हतं. रोजगार नाही, फारसं शिक्षण नाही. इतरांच्या जमिनीवर मजुरी, मासेमारी करायची, त्यात मासेमारीही कमी होत चाललेली. स्त्रियांवर तर आणखीच बंधनं. सार्वजनिक ठिकाणी (गरज पडली तरच) डोक्यावर शेव (पदर) टाकूनच यायचं, बोलायचं नाही. बायकांनी चूल-मूल सांभाळायचं. शालूच्या घरात मत्स्य सोसायटीच्या बैठका व्हायच्या, पण त्यात स्त्रिया नसायच्या. आयुष्य असंच सुरू होतं, त्याच वेळी शालूची गाठ, ‘फीड’ (पूर्वीचं भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ) संस्थेचे संचालक मनीष राजनकर यांच्याशी पडली. तलावांचं पुनरुज्जीवन हा मनीष यांचा ध्यास. त्यांचं वेगळेपण हे, की त्यांना ‘ग्रासरूट्स’च्या लोकांचं शहाणपण, ज्ञान, प्रयत्न यांच्या मदतीने तलाव जिवंत करायचे होते. शालूनं पुढाकार घेतला. ढिवर समाज महिला बचत गटामध्येही नसल्यामुळे त्यांची निर्मिती करून महिलांचं संघटन करायला सुरुवात झाली, पण ढिवर समाजातली सून आम्हाला शिकवते म्हणजे काय? असं म्हणत ग्रामसभेत शालूचं म्हणणं ऐकून घ्यायला कुणी तयार होईना. मनीष यांच्या प्रोत्साहनानं ‘ग्रासरूट्स नेतृत्वविकास’ कार्यक्रमात शालू सहभागी झाली आणि तिचा कायापालटच झाला. बदलाच्या आंतरिक इच्छेला फुंकर मिळाली. स्वत:ची, स्वत:च्या ताकदीची तिला ओळख झाली. सभोवतालाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाली. त्यानंतर तिने ग्रामसभेत योजना, नियम, नियमावली धिटाईनं मांडून रोजगार हमीची कामं गावात सुरू केली. तलावातली ‘बेशरम’ वनस्पती काढण्याच्या कामाला रोजगार हमीच्या कामाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी ग्रामसभेत ठराव घेतले. इतकंच नाही, तर आपल्या गावाबरोबर शेजारच्या गावांतील तलाव जिवंत करण्यासाठी त्या लोकांना संघटित करण्याचं कामही शालू यांनी सुरू केलं आणि सावरटोलाच्या सरिता, कोकणा गावच्या कविता त्यात सामील झाल्या, पुढारी बनल्या. तिघीही ‘ग्रासरूट्स नेतृत्व विकास कार्यक्रमा’च्या प्रक्रियेमधल्या. या तीन कर्तृत्वक्षम स्त्रियांनी आजूबाजूच्या गावचा ढिवर समाज, त्यातल्या स्त्रियांना तलाव आणि मासेमारीच्या कामात लीलया गुंतवलं, ताकद दिली आणि या प्रक्रियेचा एक अनुकरणीय नमुना तयार केला.

शालू सांगत होत्या, ‘‘रोजगार हमीच्या कामात लक्ष घातल्याने, नेहमी उन्हाळय़ात सुरू होणारं काम पहिल्यांदाच गेल्या १ डिसेंबरला सुरू झाले, संपूर्ण गावातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला. लोकांचा विश्वास मिळाला.’’ विरोध होण्याचे आणि नंतर ते मावळण्याचे अनेक अनुभव तिघींनीही घेतले. शालूच्या गावात आरक्षणामुळे दलित समाजाचे सरपंच होते, पण ग्रामपंचायतीत उपसरपंच फिरत्या खुर्चीवर आणि सरपंच प्लास्टिकच्या खुर्चीवर बसायचे. यातला जातिभेद आता समजत होता. तो दूर करायला सरपंचांसाठीसुद्धा फिरती खुर्ची आली. सरिताच्या गावात ढिवर लोकांच्या घरांच्या अंगणात पाटलांचे शेणखताचे खड्डे होते, त्रास होऊनही कोणी बोलत नव्हते, स्त्रियांच्या ग्रामसभा व्हायला लागल्यावर त्यात हा प्रश्न मांडून ६०० लोकांच्या सहभागाने तो सोडवण्यात आला. सुरुवातीला समूहातून, घरातूनही विरोध झाला. पूर्वानुभवातून, अशा धाडसाचे भयंकर परिणाम होतील अशीही भीती त्यामागे असणार. त्यातून एखादी स्त्री असं धाडस करते म्हणजे काय? त्यामुळे घरातूनही काम बंद करण्याचा दबाव आला. त्यावर ‘‘मला फक्त तुमच्या नावे जगायचं नाही, माझी ओळख घेऊन जगायचं आहे,’’ असं सांगून शालूनं वेगळी चूल थाटली. नंतर त्यांच्या कामाचा आवाका आणि परिणाम बघून हळूहळू घरच्यांचा विरोध मावळायला सुरुवात झाली. पूर्वी रोजगार हमीतून अवघे १० दिवस, तेही निर्धारित मजुरीपेक्षा कमी कामं मजुरीवर मिळायची. या तिघींनी केलेल्या रोजगार हमीच्या मजूर संघटनांमुळे आता ९० दिवसांचे काम, वाढीव मजुरीवर मिळायला लागले. गवत-कुरणाच्या जिकिरीच्या कामाची दिवसाची निर्धारित मजुरी ४५८ रुपये एवढी मिळायला लागली. कविता सांगत होत्या, ‘‘अधिकारी तोंडाला नाही, कागदाला घाबरतात. ही समज आल्यामुळे आपले हक्क पदरात पाडून घेणं शक्य झाले.’’

समाजातल्या स्त्रियांना मच्छीमार सोसायटीचे सभासद करून घ्यायलासुद्धा खूप संघर्ष करावा लागला. सरिता सांगतात, ‘‘आमचं काम दिसू लागलं आणि लोक पुढे येऊ लागले. आता इथल्या स्त्रियांनी दोन सोसायटय़ांचं सभासदत्व घेतलं आहे. प्रत्येक गावात साधारणपणे १५-१६ ढिवर स्त्रियांचे गट बनवले आहेत.’’ या कामामुळे समूहाच्या स्थितीत काही बदल झाला आहे का, असं विचारलं तर त्वरित, प्रचंड आत्मविश्वास, उत्साहात शालू म्हणाल्या, ‘‘हंड्रेड टक्के!’’ तलाव संवर्धन, मासेमारी, रोजगार, परसबागा, ग्रामसभा, महिला-ग्रामसभा, स्त्रियांचं संघटन, एकल महिलांची ग्रामपंचायतीत वेगळी नोंद आणि त्यांचे प्रश्न, जैवविविधतेचं रक्षण, अशा किती तरी अंगांनी तिन्ही मैत्रिणींचं काम एकत्रित सुरू आहे. १२८० कुटुंबं आता मजूर संघटनेची सदस्य आहेत. इथले तलाव लीजवर घेऊन जिवंत करणं, उपजीविकेची साधनं निर्माण करणे, अतिशय दुर्गम आदिवासी गावात तलावाच्या माध्यमातून रोजगार तयार करणं अशी अनेक कामं सुरू आहेत. माशांचं लोणचं करणं, कमळकंदाचे चिप्स करणं अशा प्रक्रियाही आकार घ्यायला लागल्या आहेत. गेल्या सहा वर्षांत १२ तलावांमध्ये नैसर्गिक पद्धतीनं मत्स्य उत्पादन वाढीचं काम झालं आहे. १०६ स्त्रियांनी पहिल्यांदाच मासेमारीशी संबंधित कामात सहभाग घेऊन यशस्वीपणे काम करून दाखवलं. एका हंगामात प्रत्येकी १६ जणींच्या गटात साधारणपणे २२-२५ हजार एवढी रक्कम शिल्लक आहे. सगळे पैसे पुढच्या कामासाठी राखून ठेवले आहेत. अपवाद फक्त गटाबाहेरच्याही कोणा स्त्रीची फार नड असेल तर तिच्या मदतीचा. 

आपल्या मुलींचे सलवार कुर्ते वापरून पाण्यात उतरून मासेमारी करणाऱ्या, गावाच्या बाजारात त्याची विक्री करणाऱ्या आणि समर्थपणे मस्त्यसंवर्धनाचा विचार आणि व्यवहार करणाऱ्या ढिवर स्त्रियांनी त्यांच्या मासेमारीच्या कामाला वेगळा आयाम तर दिलाच, पण त्यांच्याकडे आणि त्यांच्या समाजाकडे बघण्याच्या लोकांच्या दृष्टिकोनात मोठाच बदल घडवून आणला आहे. ढिवर स्त्रियांचं नेतृत्व, त्यांची ग्रामसभेत ताकद वाढवून खुर्चीतल्या लोकांकडून आपली कामं करून घेणं, हा सध्या अग्रक्रम ठरवला आहे. बदलाची ही प्रक्रिया साधीसोपी नव्हती. गावांत, कुटुंबात, समाजात सांस्कृतिक, राजकीय घुसळण सुरू झाली आहेच, पण तरीही आज स्वत:ची ओळख, विश्वास, धाडस, आणि कौशल्यामुळे सर्व पातळीवर समन्वय साधून पुढे जाण्याची कला या स्त्रियांना अवगत झाली आहे. यात कौटुंबिक पातळीवरचा मोठा बदल म्हणजे, उशिराची बैठक संपवून घरी गेल्यावर, या बायांना आयतं जेवण मिळतं! विद्येविना मती, गती आणि वित्त जाण्याचा महात्मा फुलेंनी इशारा दिला आहे. शालू-सरिता-कवितासारख्या  मैत्रिणी ज्ञानाची कक्षा विस्तृत करत, ‘विद्या, मती, गती आणि वित्तही आमचंच,’ असं ठणकावत आहेत. त्यांच्या ज्ञानाची ही कक्षा अधिकाधिक रुंदावत जात अनेक गावागावांत पसरायला हवी. त्यातूनच अनेक स्त्रिया आणि अनुषंगानं कुटुंबांची, गावांची, राज्यांची, देशाचीही प्रगती होणार आहे.

(या लेखाकरिता मनीष राजनकर यांनी मदत केली आहे.)

Story img Loader