सुजाता खांडेकर
इतरांकडून थोडा पाठिंबा, सहकार्य, हिंमत मिळाली की एखादी स्त्री काय करू शकत नाही? ‘नवऱ्याचा मार खाणारी य:कश्चित स्त्री’ म्हणून एके काळी वस्तीत तिला ओळखत असत; पण नंतर बदललेल्या दृष्टिकोनामुळे अंगी मुळातच असलेली तिची तडफ जागी झाली आणि हिंसक नवऱ्याला घरातून बाहेर काढण्याइतकी ताकद ती गोळा करू शकली. पुढे तिच्यातल्या नेतृत्वानं वस्तीतल्या स्त्रियांना एकत्र आणत, लोकोपयोगी कामं करत सगळय़ांचा विश्वास संपादन केला. ‘तुम साथ हो तो..’ असं एके काळी ती म्हणत होती. आता तिच्याबद्दल ते बोललं जातंय. तो विश्वास निर्माण करणाऱ्या अंजुम शेख या तरुणीची ही गोष्ट.
अंजुम शेख, मुंबईतल्या गोवंडी इथल्या बैगनवाडी परिसरातली ही आमची मैत्रीण आणि सहकारीही. ‘त्या’ घटनेला आता सात-आठ वर्ष झाली. त्या वेळचा तिचा अनुभव भयानक होता. भेटल्यावर सांगत होती, ‘‘जवळपास रोज रात्री-अपरात्री, अगदी रात्री एक-दीड वाजताही दरवाजावर दस्तक व्हायची. दरवाजा ठोठावणाऱ्या शेजारच्याच बायका असायच्या. ‘बरी आहेस ना’, विचारायच्या, ‘पाणी पाहिजे’,‘लघवीला जायचंय’, असं म्हणत थेट घरातच घुसायच्या आणि माझी ८ बाय ८ ची खोलीसुद्धा तपासून बघायच्या. घरातल्या मोरीचा पडदा बाजूला करून आत कुणी आहे का हे बघायच्या. काही वेळा त्यांच्या घरातले पुरुषही त्यांच्याबरोबर यायचे.’’ सुरुवातीला या प्रसंगामुळे अंजुम घाबरून थरथरायची. रात्री १ वाजता कोण कुणाकडे पाणी मागायला किंवा लघवी
करायला जाईल?
त्या वेळी अंजुमनं, नुकतंच, तिला सातत्यानं मारहाण करून जगणं असह्य करणाऱ्या व्यसनी नवऱ्याला घराबाहेर काढलं होतं. तीन वर्षांचा मुलगा हुझेफा (अर्थ- बुद्धिमान) याला घेऊन राहात होती. शेजारपाजार तसा ओळखीचा; पण संशयीच, नवऱ्याला बाहेर काढण्याचं धाडस ही कुणाच्या जिवावर करते आहे? कुणाबरोबर राहाते आहे? याचा छडा लावण्यासाठी ही वेळी-अवेळीची दस्तक होती! हा कसला पहारा होता? कोण करत होतं? का करत होतं? अंजुमला तिचा नवरा रात्री-अपरात्री बेदम मारायचा, तेव्हा कुणीही दरवाजा का ठोठावला नाही? कुणीही, त्या वेळी येऊन, ‘तू कशी आहेस?’ असं कधीही विचारलं नव्हतं. मग अशा लोकांची पर्वा कशाला करायची? पण दबाव यायचा, प्रश्न पडायचे. सकाळ-संध्याकाळ गप्पा मारायला येणाऱ्या या शेजारणी, तिच्यावरच्या हिंसेकडे दुर्लक्ष करण्यात आणि एकटी राहिल्यावर घाबरवण्यात पुढे का होत्या..
असा दबाव सहन करण्यासाठी किंवा असे प्रश्न पडण्यासाठी नाव ‘अंजुम’ आणि धर्म मुस्लीम असण्याची गरज नाही! त्यासाठी याच वस्तीत राहण्याचीही गरज नाही. हा अनुभव एकटय़ा राहणाऱ्या बायकांना सर्रास येतो. पुरुषप्रधान रचनेचं हे आणखी एक वैशिष्टय़. स्त्रियांच्या संरक्षणाची जबाबदारी इथे पुरुषांवर असते. त्यांनीच घेतलेली. एकदा संरक्षणाचे ‘अधिकार’ आले, की स्त्रियांनी कुठे जायचं? कुणाबरोबर आणि कसं राहायचं? काय घालायचं-खायचं? कितपत हसायचं? (किंवा हसायचं का?) काय विचार करायचा? कोणत्या संवेदना, भावना जोपासायच्या? सगळे नियम आणि नियमनं पक्की.
अंजुम तडफदार तरुणी. तिच्यात गेल्या आठ वर्षांत झालेला अंतर्बाह्य बदल नजरेत भरणारा असाच. तिचा पोशाख, वावर, आयुष्यातले अग्रक्रम बदलले. तिचे बोलण्याचे विषय, पद्धत आणि समजही काळाबरोबर बदलली. आता तिचा आत्मविश्वास ओसंडून वाहतो आहे. अलीकडेच कामाबद्दल गप्पा मारताना म्हणाली, ‘‘अभी कोई चॅलेंज नहीं लगता. हाँ, मुश्किले तो आयेंगी, पर हल निकालनेका कॉन्फिडन्स हैं।’’ २०१५ मध्ये घाबरत-घाबरत येऊन भेटलेली अंजुम हीच का, असा प्रश्न पडावा!
आठ भावंडं आणि गरिबीतलं बालपण. अंजुमला शाळेत शिकायचं होतं; मदरशात नव्हे. पण घरच्यांचा प्रचंड विरोध. शाळेचं मोकळं मैदान, सवंगडी, खेळ, हे तिला सारखं खुणावत होतं. जरीकाम करून फीचे पैसे कमवून ती शाळेत जायला लागली. ‘अनपढ’ म्हणून तिच्या बहिणीनं खूप मार आणि निर्भर्त्सना सहन केली होती. अंजुमच्या शिक्षणाची प्रेरणा यामध्ये होती. दहावीची परीक्षा देण्याआधीच, सोळाव्या वर्षी अंजुमचं बत्तीस वर्षांच्या पुरुषाशी लग्न लावून देण्यात आलं. नवऱ्याचं व्यसन, मारहाण, बाळंतपण या चक्रात ती अडकली. घुसमट सहन न झाल्यामुळे सैरभैर झालेली अंजुम आधाराच्या शोधात होती. वस्तीत सुरू असलेल्या स्त्री केंद्र संघटनेच्या कामात तिनं सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि तिला मोकळा श्वास घेता येऊ लागला. ती या कामात अधिकच गुंतत गेली.
या कामातल्या तिच्या सहकारी, मैत्रिणी, यांच्याकडून मिळणारा पाठिंबा तिच्यासाठी महत्त्वाचा ठरला. पाठिंबा म्हणजे आपल्या मनात जे करायचं असतं ते करण्यासाठी मिळणारा रेटा. वेगळय़ा अर्थानं, संघटना ही अंजुम आणि हुझेफाचं कुटुंब झाली. या कुटुंबातले नातेसंबंध अंजुमनं ‘निवडलेले’ होते, तिच्यावर लादलेले नव्हते. तिला मैत्रिणी मिळाल्या. संघटनेच्या पाठिंब्यानं अंजुमचं काम, पत, विश्वास आणि स्वप्नं विस्तारत होती. ‘मेरे अंदर इतना गुस्सा भरा पडा था!’ असं ती म्हणायची. नव्या कामातून तिच्या रागाला वाट मिळाली; पण हिंसक नाही, सम्यक अशी वाट. ग्रासरूट नेतृत्व विकास प्रक्रियेत हक्क, संविधान, लिंगभाव, भेदाभेद याबद्दल सहज समजतील अशा, जगलेल्या अनुभवांना समजून घेणाऱ्या चर्चा व्हायच्या. त्यातूनच आपल्या आयुष्यात काही तरी ठोस कृती करण्याची जबाबदारी तिला जाणवली. नवी जाणीव, अस्वस्थता आणि विश्वास घेऊन अंजुम प्रशिक्षण पूर्ण करून परत आली, तर नवऱ्यानं तिला बेदम मारलं आणि घराबाहेर काढलं. मग जगण्या-शिकण्यातला विरोधाभास सहन न होऊन अंजुमनंच नवऱ्याला बाहेर काढलं. भाडय़ाच्या घरात राहात असल्यानं आणि घरभाडं अंजुमच भरत असल्यामुळे तिला हे शक्य झालं. शिवाय अंजुमच्या ‘तलाकशुदा’ आईनंही तिला पाठिंबा दिला. दारावरच्या दस्तकीचा अध्याय त्या वेळचा. अंजुम म्हणते, ‘‘मला समजलं होतं, की हिंसा सहन न करण्याचा संबंध शिक्षणाशी नाही, तर स्वत:चे निर्णय घेण्याच्या क्षमतेशी आहे.’’ पुढे २०२१ मध्ये तिनं घटस्फोट घेतला.
पूर्वी अंजुम नकाब घालायची. तिनं नकाब घालणं सोडलं तेव्हा कुटुंबात आणि आजूबाजूला गहजब झाला. अगदी असाच अनुभव राजस्थानातल्या आमच्या मैत्रिणीही सांगतात. तिथेही ग्रासरूट नेतृत्व विकासाचं काम सुरू आहे. राजस्थानच्या या स्त्रिया डोक्यावरून हाताच्या कोपरापर्यंत घुंघट घ्यायच्या. ती पद्धत त्यांनी सोडली, तेव्हाही असाच गहजब झाला होता आणि होतो. नकाब काय, घुंघट काय किंवा अगदी मंगळसूत्रसुद्धा काय, या सगळय़ा पुरुषसत्ताक पद्धतीच्या निशाण्या आहेत हे समजेपर्यंत त्यांचा आदर आणि दरारा वाटतो. एकदा प्रयोजन लक्षात आलं, की पद्धत बदलण्याची, त्याला आव्हान देण्याची ऊर्मी येते. विचार करा, मंगळसूत्र हा केवळदागिना असेल, तर विधवांच्या गळय़ातून अगदी क्रूर पद्धतीनं तो का काढला जातो? असे प्रश्न पडण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी विधवा असण्याची गरज नाही. स्त्री-चळवळीनं सुरुवातीला प्रतीकांचे हे प्रश्न उपस्थित केले होतेच. याचा योग्य/ अयोग्य असा निर्णयात्मक (जजमेंटल) विचार करण्याऐवजी, स्त्रिया पुरुषसत्ताक समजुतीच्या प्रवासात वेगवेगळय़ा टप्प्यांवर असतात एवढंच लक्षात घ्यायला हवं.
अंजुमच्या नकाबचा गहजब शांत कसा झाला? याचं उत्तर तिच्या कामातच आहे. तिची वस्ती बहुसंख्य मुस्लीम कुटुंबांची. शौचालयांची स्थिती दयनीय होती. संघटनेच्या ‘राइट-टू-पी’ या स्त्रियांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत सार्वजनिक मुताऱ्या मिळवण्याच्या निमित्तानं सुरू झालेल्या चळवळीचा अंजुम भाग बनली. मुस्लीम स्त्रिया आणि मुलींमधला तिचा वावर वाढत होता. वस्तीत फक्त मुताऱ्या, शौचालयाच्या कामापुरतं मर्यादित न राहता, हिंसाचार निर्मूलन, मूलभूत सुविधा, रेशन कार्ड, आधार कार्ड मिळवून देणं अशी लोकांना जोडून घेणारी अनेक कामं तिनं केली. करोनाच्या काळात कुटुंबांना शिधा, औषधं पोहोचवण्याचं काम सतत मेहनत घेऊन, स्वत:च्या आरोग्याची जोखीम घेऊन केलं. अंजुम आज मुंबईत सुमारे नऊ लाख लोकवस्तीत असणाऱ्या ५०१ शौचालयांच्या देखरेखीचं काम स्थानिक नेतृत्व तयार करून करत आहे. या देखरेख समित्यांमध्ये अंजुमच्या कामामुळे मुस्लीम स्त्रिया मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्या आहेत.
त्यातच २०२० मध्ये ‘सीआयआय’ (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज) या भारतव्यापी संस्थेकडून अंजुमची निवड लक्षणीय स्त्री-नेतृत्वासाठीच्या पुरस्कारासाठी झाली. पुरस्कारानं आनंदी झालेले अंजुमचे भाऊ तिचं काम समजून घ्यायला लागले. अंजुमच्या लहान बहिणीलाच नव्हे, तर त्यांच्या बायकांनाही मीटिंग्जना पाठवायला लागले. जे घरात घडलं तेच बाहेरही. मुली आणि स्त्रियासुद्धा तिला रोल-मॉडेल म्हणून बघत होत्या; पण व्यक्त व्हायला घाबरत होत्या. पुरुषांचाही तिच्याबद्दलचा दृष्टिकोन थोडा बदलत होता. किमान उघड टीका कमी झाली. मुलींना त्यांच्या आया निर्धास्तपणे अंजुमबरोबर बाहेर, मीटिंगला पाठवायला लागल्या. अलीशा या तरुण मुलीची आई अंजुमला म्हणाली, ‘‘तुम साथ हो तो कोई टेन्शन नहीं!’’
पूर्वी रात्री-अपरात्री दस्तक होणाऱ्या अंजुमच्या घरी आता रात्री उशिरापर्यंत जवळपासच्या मुली आणि बायका निवांत गप्पासाठी जमतात. करोनाच्या काळात सुरू झालेलं हे गप्पासत्र! ‘अजेंडा’ काही नाही. अशाच गप्पांमधून रेहाना, मेहनाज, रुख्सार यांसारख्या मैत्रिणी आता स्त्री-लीडरशिपच्या प्रक्रियेत आल्या. मुंबईमधल्या ‘पिंकेथॉन’ किंवा ‘Invincible women’ या स्त्रियांच्या मॅरेथॉनला अंजुमच्या वस्तीतून दीडशेपेक्षा अधिक मुस्लीम मुली आणि स्त्रिया आल्या आणि धावल्या किंवा चालल्या. अनेक जणींनी ट्रॅकसूट घातला होता. यापूर्वी वस्तीत असं कधी घडलं नव्हतं. रात्री साडेबारा-एक वाजताच या सगळय़ा एकत्र जमल्या होत्या, कारण पहाटे ५ वाजता मॅरेथॉनसाठी निघायचं होतं. अंजुमच्या घरासमोरच्या मोठय़ा मोकळय़ा जागेत सतरंज्या टाकून रात्रभर मनसोक्त खात, गप्पा मारत, कुणी गाणी म्हणत, कुणी नृत्य करत राहिल्या.. मोकळा श्वास घेत राहिल्या. अंजुमवरचा त्यांचा किंवा त्यांच्या आईवडिलांचा विश्वास असा दिसतो.
काही गोष्टी बदलण्यास सुरुवात होत आहे. त्याचा गाजावाजा नाही, प्रदर्शन नाही. हळुवारपणे, शांतपणे समज, आकलन आणि वागण्याच्या पद्धती बदलत आहेत. अंजुमही आपल्या कक्षा विस्तारत आहेच. ती एकटी ३१ तासांचा प्रवास करून-हिमाचल प्रदेशात जाऊन मोबाइल फोटोग्राफीचं प्रशिक्षण घेऊन अलीकडेच परतली. एक वेगळं आणि विस्तीर्ण जग या निमित्तानं अंजुमपुढे उघडतंय.
२००१ मध्ये मी लिंगभाव-हिंसाचार-प्रजनन आरोग्य यांच्या परस्पर संबंधांवर अनेक नागरी वस्त्यांत काम केलं. मुस्लीम स्त्रियांबद्दलचे काही लोकप्रिय आडाखे डोक्यात घेऊन मी काम सुरू केलं होतं. चुकीचे आडाखे कामातून दुरुस्त होताना माणूसपणाचे धडे मिळाले. अंजुमसारख्या मैत्रिणीबरोबर काम करताना ते उपयोगाला आले. अंजुम मुस्लीम असल्यामुळे तिनं मुस्लीम स्त्रियांशी संवाद साधण्याला, त्यांना विश्वास देण्याला एक वेगळा अर्थ येतो. बदलाच्या प्रक्रियेला मदतकारक ठरतो. अंजुमच्या प्रवासातून हेच कळतं, की बदलासाठी संवादाची, प्रेमाची, सहचाराची आवश्यकता असते. हेतू आणि कृती स्वच्छ, नितळ असेल, तर विरोध कमीही होतो आणि हिंसकही राहात नाही.
अंजुम, तिच्या मैत्रिणी आणि त्यांच्यासारख्या अनेक स्त्रियांना मोकळा श्वास घेता यावा, देता यावा, वाढता राहावा, यासाठी आपण सगळय़ांनी सजग राहायला हवं. कुणालाही असुरक्षित वाटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हा प्रश्न फक्त मुंबईतल्या आणि अंजुमसारख्या मुलींचा थोडाच आहे? या सदरात यापूर्वी अहमदनगर, चंद्रपूर, उस्मानाबाद, सातारा अशा ठिकठिकाणच्या तडफदार स्त्रियांबद्दल लिहून आलं आहे. त्यांच्या जातीही वेगवेगळय़ा होत्या. डवरी गोसावी, दलित, माळी, मराठा.. आणि त्यांच्यासारख्या कित्येक जणी हेच आणि असंच सांगत आहेत. स्त्रियांनी आत्मनिर्भर होऊ नये असं वाटणारे सर्व स्तरांतले, धर्मातले, जातींतले, प्रांतांतले स्त्री-पुरुष अशा बदलाच्या प्रक्रियेत अडथळेच निर्माण करणार. हे समजूनच आपला व्यवहार असायला हवा. मनं पेटवून नव्हे, ती शांत करत प्रश्न सोडवावे लागणार आहेत.