डॉ. सुजाता खांडेकर
गावात खेळली गेलेली एक साधी कबड्डीची स्पर्धा! पण त्याचं वैशिष्टय़ म्हणजे हे कबड्डी सामने होते ‘एकल’ स्त्रियांचे. त्यांच्यासाठी तो फक्त खेळ नव्हता तर मासिक पाळी आल्यानंतर अनेक वर्षांनी प्रथमच घेतलेला मोकळा श्वास होता! केवळ कबड्डी खेळणंच नाही, तर कुठल्याशा चित्रपट गाण्यावर बेभान होऊन नाचणं असो की केसांत साधा गजरा माळणं असो, आजही एकल स्त्रियांना त्याचं अप्रूप वाटतं, कारण अनेक वर्ष त्यांच्यापासून ते दूरच ठेवलं गेलंय आणि तेच असायला हवं, अशी ठाम समजूत करून दिलेली आहे. काय होतं, जेव्हा या बाया ते नाकारून खेळाचा मनसोक्त, बेभान आनंद घेतात तेव्हा?..
गेल्या महिन्यातली गोष्ट, मराठवाडय़ाच्या (खरं म्हणजे सगळीकडच्याच) सांस्कृतिक-सामाजिक वातावरणात लक्षणीय वाटेल अशीच! मराठवाडय़ातल्या ‘एकल महिला संघटने’नं स्त्रियांचे कबड्डी सामने आयोजित केले होते. उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड या चार जिल्ह्यांमधल्या ११ तालुक्यांतून, १७ वर्षांच्या मुलींपासून ७० वर्षांच्या स्त्रियांपर्यंत ८५४ स्त्रिया कबड्डी स्पर्धा खेळल्या. साडी कमरेजवळ खोचून, पंजाबी ड्रेस घालून, टी शर्ट-पॅन्ट घालून स्वच्छंदपणे खेळणाऱ्या स्त्रियांना बघायला मोठय़ा संख्येनं स्त्री-पुरुष जमले होते. तिशीतली आयेशा सास्तूर तर बुरखा घालून खेळली. ‘‘खेळणं महत्त्वाचं. कपडय़ांचं बंधन त्याच्या आड न येता अशा कपडय़ातही आपण खेळू शकतो, हे मुस्लीम मैत्रिणींना समजावण्यासाठी मी खेळले,’’ असं तिचं यावर उत्तर होतं.
सुरुवातीला जेव्हा कबड्डी सामन्यांची चर्चा सुरू झाली, तेव्हा ‘खेळ खेळायचे तुमचे दिवस आहेत का?’, ‘वेड लागलंय का?’, ‘असल्या फालतू खेळाचं काय डोक्यात घेतलंय?’ असं हिणवणाऱ्या घरच्या-दारच्या लोकांनी प्रत्यक्ष सामने सुरू झाले तेव्हा बघायला गर्दी केली. सामन्यासाठी आर्थिक मदत गोळा करायला स्त्रिया बॅनर लावलेल्या रिक्षा, हातगाडय़ा घेऊन गावातून फिरल्या होत्या. जिंकलेल्या अनेक गटांचं कौतुक सरपंच, नगराध्यक्ष यांनी शाल-श्रीफळ देऊन केलं; पण न जिंकलेले गटही कमालीचे आनंदी होते!
अलीकडेच त्यातल्या काही जणींशी गप्पा मारल्या. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ‘खूप धमाल आली!’, ‘शब्दांत व्यक्त करता येणार नाही एवढा आनंद झाला,’ असं सर्व जणी सांगत होत्या. हे सांगतानाची त्यांची देहबोली, उत्साह, चेहऱ्यावरची चमक लिहून सांगता येणार नाही. सामन्यात भाग घेतल्याबद्दल भरभरून बोललेल्या लक्ष्मी बेळगे या सासूबाईंची सून मंदाकिनी भोसलेसुद्धा स्वत:च्या खेळाबद्दल न थकता बोलत होती. सासू-सून एकाच गटातून कबड्डी खेळल्याचं ऐकताना मजा वाटली. सासू-सुनांच्या, आई-मुलींच्या, नणंदा-भावजयींच्या अशा अनेक जोडय़ा एकत्र खेळल्या होत्या. इतकंच कशाला, न राहवून रेखा रोमन ही चार महिन्यांच्या बाळाची आईसुद्धा खेळली.
एवढा आनंद का झाला, यावर गप्पा मारताना अनेकरंगी उत्तरं आली. ‘आमचं लहानपण जिवंत झालं’, ‘सलवार-कमीज घालायला मिळाली,’ अनेकींनी सांगितलं. ‘जिंकलो नाही, पण खूप एन्जॉय केलं,’ असं न जिंकलेल्यांनी सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावर न जिंकल्याचा कणभरही विषाद नव्हता. सत्यभामा वायबट या तब्बल ४५ वर्षांनी मोकळेपणानं खेळल्या, तर अनिता जांभळे २० वर्षांनी. मासिक पाळी सुरू झाल्याबरोबर पंख छाटलेल्या पक्ष्याची अवस्था जशी होते, तशीच अवस्था या स्त्रियांच्या बाबतीत झाली होती. बाहेर जायला मज्जाव, ताबडतोबीनं लग्न झालेलं, हाच अनुभव ऐकायला मिळत होता. लग्न झाल्यावर तर बंधनांची कमतरताच नाही. त्यात अनेक जणी नवऱ्याच्या मृत्यूमुळे किंवा त्यानं घटस्फोट दिल्यानं किंवा काहीच न सांगता सोडून दिल्यामुळे किंवा लग्नच न झाल्यामुळे ‘एकल’ (हा त्यांचाच शब्द. म्हणूनच संघटनेचं नावही ‘एकल महिला संघटना’.) राहिलेल्या, त्यांच्यावरचा अलिखित बहिष्कार सहन केलेल्या. त्यांची अवहेलना, दु:ख ते सहन करणाऱ्यालाच कळू शकतं. ग्रामीण भागात तर याची तीव्रता अधिक बोचरी आहे. एकटेपणाच्या विवरात त्यांना कोंबून कोंबून बसवायचा प्रयास चालू असतो. बाहेर जायचं नाही, कुणाशी आणि त्यातही पुरुषांशी अजिबात बोलायचं नाही, आकर्षक साडी नेसायची नाही, दागिना घालायचा नाही, केसांत फूल-गजरा घालायचा नाही, चांगलं वाटेल-दिसेल असं काही करायचं नाही, अमुक खायचं नाही, तमुक रंग वापरायचे नाहीत, सणा-समारंभात कुणी त्यांना बोलवायचंही नाही किंवा इतर वेळीही त्यांनी समोर येऊन कुणाला अपशकुन करायचा नाही, घरादारात सतत टोमणे ऐकायचे आणि न थकता काम करायचं सगळय़ांसाठी.. एवढय़ा बंधनांतून खेळायचा, मनाप्रमाणे वागण्याचा विचारसुद्धा कुठून येणार?
त्यात सत्यभामा वायबट म्हणतात तसं ‘कबड्डी हा पुरुषांचा खेळ आहे’ असंच लोकांना वाटतं. ग्रामीण भागात तर तसंच वाटतं. त्यामुळे ‘असं खेळ खेळायला लाज वाटत नाही का?’ असं अनेकींना विचारलं गेलं. गंमत म्हणजे, कबड्डी खेळताना त्यांची लाज कशी गळूनच पडली तेच या मैत्रिणी सांगत होत्या. हिरिरीनं खेळताना, ना शरीराचं भान, ना पदराचं भान, ना आपल्याकडे कोण पाहतंय याचं! अनिता जांभळे म्हणाल्या, ‘‘गावात डोक्यावरून पदर घ्यायची पद्धत आहे; पण आम्ही टी-शर्ट, पँट घालून खेळलो आणि तेच घालून घरी आलो! आता भीती नाही वाटत!’’ मंदाकिनी भोसले म्हणाल्या, ‘‘आम्ही एवढय़ा खूश होतो, की घरी आल्यावर जिंकल्याचं ओरडून-ओरडून सांगितलं सगळय़ांना!’’ ‘कबड्डी खेळायला जमेल का? हातपाय मोडून घ्याल,’ अशीही भीती या बायांना घातली गेली. तस्लीम इनामदार म्हणाल्या, ‘‘बाई पाणी शेंदून आणते, मुलांचा भार उचलते, घरातली कामं उरकताना पळापळ करते. मग कबड्डी का नाही खेळू शकणार?’’ आता गप्प बसायचं नाहीच हेच जणू त्यांनी ठरवलेलं.
कुठलाही खेळ माणसाला शारीरिक, मानसिकदृष्टय़ा मोकळं करत असतो. त्यामुळे कबड्डी सामन्यांची कल्पना मांडली गेली; पण बायकांना अवघडल्यासारखं झालं. सहजासहजी कोणीच तयार नाही झालं. कबड्डी खेळण्याची कल्पना मजेची वाटली; पण धैर्य होत नव्हतं. अशक्यच वाटत होतं; पण संघटनेच्या स्त्री कार्यकर्त्यांनी जोर लावला. लक्ष्मी बेळगे म्हणाल्या, ‘‘काय हरकत आहे? बायकांनी, पोरींनी पुढं जायला हवं. असं एकत्र आलं तर बाहेर पडायला मिळेल.’’ पण सामन्यांनी एकूण वातावरणच असं बनवलं, की न सहभागी झालेल्या स्त्रियासुद्धा ‘तुम्ही आपल्या ओळखीच्या लोकांनाच घेऊन गेल्या की खेळायला!’ अशी तक्रार करू लागल्या. पूजा काळे म्हणाल्या, ‘‘स्त्री पिंजऱ्यात अडकलेली आहे. आता मोकळं झाल्यासारखं वाटतं.’’ रुक्मिणी नागपुरे आणि त्यांच्यासारख्या अनेक एकल मैत्रिणी सांगत होत्या, की आयुष्यात कधी आपण मोकळय़ा मैदानावर खेळू असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. दाबून ठेवलेल्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे मोकळं, हलकं वाटतंय.
आता दरवर्षी असे सामने होणार, हे सगळय़ांनी मिळून ठरवलं आहे. पुढच्या वर्षी खेळणाऱ्या स्त्रिया आणि बघणारे प्रेक्षक दसपटीनं वाढतील, असा विश्वास सगळय़ांना वाटतोय. असाच उत्साह, आनंद आणि मोकळेपण मध्यंतरी एकल स्त्रियांच्या एका परिषदेनंतर अनुभवलं होतं. हजारापेक्षा जास्त स्त्रिया जमल्या होत्या. सगळय़ांच्या दिसण्यातला, वागण्यातला बदल अचंबित करणारा होता. सगळय़ांच्या केसांत सुगंधी फुलांचे गजरे होते. अनेक जणींनी तुर्रेबाज फेटा बांधला होता. गावामध्ये खाली मान घालून वावरणाऱ्या या स्त्रिया ‘सैराट’ चित्रपटातल्या ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्यावर बेभान नाचताना पाहिलं होतं. त्यांना समाजानं जे करायला नाकारलं होतं, ते ते करून स्वत:ची, स्वत:साठीची एक नवी ओळख त्या सर्व जणी करून घेत होत्या.
आता एकल स्त्रियांच्या कोणत्याही कार्यक्रमाला गेलं, की दारात पहिल्यांदा हातात मिळतो गजरा. येणाऱ्या प्रत्येकाला कुंकू लावलं जातं. एकल स्त्रियांना कुंकू, गजरा या गोष्टीची मनाई होती, हे लक्षातसुद्धा राहू नये, इतकी ही सवय रूढ झाली आहे. अनिता नवले सांगत होत्या, ‘‘श्रावण आला की मला भीती वाटायची. मी जवळच्या शेतात जाऊन लपायचे. लग्न झालेल्या सवाशीण बायकांचेच सगळे सण! लहानपणच्या मैत्रिणी सणासाठी माहेरी यायच्या. खूप वाईट वाटायचं..’’ आता त्याच अनिता संघटनेचं नेतृत्व करतात, खेळतात, नाचतात, गजरा घालतात, सरकारी कार्यालयातली कामं धडाडीनं करवून घेतात. पूर्वी घरोघरी जाऊन कपडे विकायच्या; पण आता तालुक्याच्या ठिकाणी कपडय़ांचं दुकान थाटलं आहे. श्रावण, संक्रांतीतली हळदीकुंकू करणं ही आता ‘एकल महिला संघटने’ची सर्रास बाब झाली आहे. अनिता कांबळे सांगतात, ‘‘हळदीकुंकवाचं अप्रूप नाही; पण आम्हाला ते नाकारलं आहे ना, म्हणून आम्हाला ते करायचे आहे!’’ एकत्र येऊन बाहेर जेवायला जाणं किंवा संघटनेकडून एखादी सहल काढून कुटुंबाशिवाय, संघटनेतल्या मैत्रिणींबरोबर फिरायला जाणं, सिनेमाला जाणं, हादेखील अनुभव घेण्याचं धाडस त्या करत आहेत.
हे सगळं एवढं सविस्तर लिहिण्याचं कारण काय? या सगळय़ांना जाहीरपणे कबड्डी खेळल्यानंतर किंवा केसांत गजरा माळल्यावर किंवा बेभान नाचल्यावर एवढा आनंद का झाला? तर इच्छा असूनही, एकटं असल्याने जे करण्याची हिंमत नव्हती, ते जाहीरपणे, धीटपणे, उजळ माथ्यानं करता आलं याचा आनंद काय असतो, ते स्त्रियांना वेगळं सांगण्याची गरज नाही. एकमेकींना जोडून राहून, संघटनेमुळे हे धैर्य, हा आनंद या मैत्रिणींना मिळाला आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर एकावर एक कडी-कुलपं कशी बसवली जातात, हे कळलं आणि एखादं कुलूप उघडण्याची किल्ली मिळाली, तर बायका मनापासून कशा मोकळय़ा होतात, याचं प्रत्यंतर या प्रतिक्रियांमधून, कार्यक्रमांमधून दिसतं.
स्त्रीचं दुय्यमत्व पोसण्याचं आणि पसरवण्याचं पक्कं काम स्त्रियांसंबंधीची प्रचलित रेखाटनं, काही ठाम संकल्पना, परंपरागत चालत आलेली गृहीतकं आणि तयार केलेल्या मिथकांतून होते. ते इतकं मनात रुजलेलं असतं, की तेच खरं वा वास्तव वाटायला लागतं आणि त्याच्या विरोधात वागणं शक्य होत नाही. उदाहरणार्थ- स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळावं यासाठी उत्तम कायदा आहे; पण जोपर्यंत आपल्यावरच्या अन्यायाविरोधात दाद मागणं म्हणजे पाप किंवा कलंक आहे, हेच सर्वमान्य आणि सर्वदूर सत्य वाटत असेल तोपर्यंत अशी दाद मागण्याचं धैर्यच स्त्रिया करू शकत नाहीत. म्हणून स्त्रियांसंबंधीची गृहीतकं, संकल्पना बदलण्याची गरज आहे.
कबड्डीच्या सामन्यांनी, ‘सैराट’च्या नाचानं किंवा हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांनी त्यांच्यासाठी अप्रचलित अशी एक नवीन संकल्पना तयार करण्याचा प्रयत्न केला आहे जो पूर्वीच्या प्रचलित स्त्री-प्रतिमेला छेद देणारा आहे. लहानपणी काही गोष्टी करायला मज्जाव केल्याने दडपून टाकलेल्या भावनांना वाट मिळालेली दिसते आहे आणि प्रचलित प्रतिमेला धक्का दिल्याचं समाधान आणि आनंदही दिसतो. आपल्यातल्या आणि अनुषंगाने समाजाच्या बदलाची सुरुवात दिसू लागलेली आहे. आपलं अस्तित्व, आपलं माणूसपण आणि आपला अनिष्ट रीतिरिवाजांना असलेला विरोध अधोरेखित करण्याच्या या काही वाटा त्यांना सापडल्या आहेत. मळलेल्या वाटेनं जाण्याऐवजी नवीन रस्ता असू शकण्याची, असल्याची जाणीव यात आहे.
म्हणूनच अशा कार्यक्रमांचं खूप महत्त्व आहे, कारण ते स्त्रियांच्या मनाचे बंद कप्पे हळुवारपणे उलगडतात. नुसतंच विवेचन आणि केवळ ‘खयाली’ संकल्पनाच्या पलीकडे जाऊन, दैनंदिन जीवनात सोप्या पद्धतीनं बदल घडवतात. स्त्रियांबद्दलच्या प्रचलित समजुतींना आव्हान देतात आणि आशादायक नवी संकल्पना अधोरेखित करतात आणि ती प्रत्यक्षात आणण्याचं धैर्यही देतात. असे कार्यक्रम माणूस म्हणून व्यक्तीचा सन्मान करणारे आहेत. स्त्री-पुरुषविषयक घट्ट समजुतींना बसलेल्या निरगाठी, हळुवारपणे उकलण्याच्या या काही तऱ्हा!
अर्चना चौरे म्हणतात तसं, माणूसपण अनुभवण्यासाठी ‘आम्हाला बंदी नको, संधी हवी!’
(या लेखाकरिता राम शेळके यांची मदत झाली आहे.)