सुजाता खांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वर्षांनुवर्ष पाळल्या जाणाऱ्या अनेक रूढी अजूनही गावोगावच्या स्त्रियांसाठी पायातल्या बेडीचं काम करताहेत. ते बंधन आहे हे लक्षातच न आल्यानं त्याला विरोध करायचा प्रश्नच येत नाही. राजस्थानातल्या सुनीता रावत यांना मात्र ही बेडी काचू लागली आणि त्यांनी आपलं उपजत शहाणपण खुबीनं वापरून ती तोडलीही. आत्मभानातून आलेली बंडखोरीच आपल्याला स्वातंत्र्य देऊ शकेल, हे आता मुख्य प्रवाहाबाहेर असलेल्या स्त्रियांना कळू लागलं आहे.. बंद बाटलीतून बाहेर पडण्याचं धाडस करणाऱ्या सुनीतापासून त्याची सुरुवात नक्कीच झाली आहे!
बहुतेकांना माहिती असलेली एक बोधपर गोष्ट आहे. एका बाटलीत माशीला बंद करून, छिद्र असलेलं झाकण लावून अनेक दिवस ठेवतात. सुरुवातीला उडण्याचा आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करणारी माशी, नंतर आपल्याला उडताच येत नाही असं वाटून उडण्याचा प्रयत्नच सोडून देते. नंतर बाटलीचं झाकण उघडं ठेवलं, तरी माशी एका मर्यादेपलीकडे उडतच नाही, बाटलीच्या बाहेर पडतच नाही. आपल्याकडे स्त्रियांच्या बाबतीत वर्षांनुवर्ष हेच होत आलंय; पण आता त्याला छेद दिला जातोय, त्याची ही गोष्ट. स्वत: बाटलीचं झाकण उघडणाऱ्या आणि बाटलीबाहेर उडून जाणाऱ्या माशीची! राजस्थानच्या सुनीता रावतची. हाताई या प्रथेच्या बंद बाटलीचं झाकण उघडणाऱ्या स्त्रीची. उडायला तर तिला मुळात येतच होतं, फक्त झाकण उघडण्याचा अवकाश होता.
राजस्थानमध्ये खेडेगावांतल्या मध्यवर्ती जागेला हाताई म्हणतात. इथे गावातले पंच, पुरुष न्यायनिवाडा करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी बसतात. स्त्रियांना हाताईच्या क्षेत्रात प्रवेश नसतो. वेगवेगळय़ा नावांनी आणि तपशिलाच्या थोडय़ाफार फरकानं देशात अनेक ठिकाणी ही पद्धत आहे. महाराष्ट्रातील गावात चावडी किंवा पार असतो तसं. महाराष्ट्रातही आजसुद्धा अनेक गावांत चावडीच्या आवारात स्त्रिया दिसत नाहीत. ग्रामीण भागातले सहकारी सांगतात, की अनेक ठिकाणी आजही चावडीपुढून स्त्रिया पायात चप्पल घालून जाऊ शकत नाहीत.
सुनीता रावतचं माहेर दाता या छोटय़ा गावातलं. इतर मागासवर्गीय घरातला जन्म. शिकलेल्या, पण दारूत बुडालेल्या वडिलांनी पैशांसाठी सुनीताचा बालविवाह करून दिला होता. सासर हातीपत्ता गावचं. अजमेर जिल्ह्यापासून २१ किमी दूर. मोजकी घरं वाल्मीकी, मेघवाल समाजांची. गावातल्या स्त्रियांवर प्रचंड बंधनं. लग्न होऊन सुनीता सासरी येत होती त्या दिवशीची गोष्ट. वऱ्हाडी भाडय़ाच्या ट्रकमधून येत होते. गावाची वेस एक किलोमीटर असताना सुनीताला ट्रकमधून खाली उतरवलं गेलं आणि चालत यायला सांगितलं. रात्रीचे ८ वाजलेले. तिला काही कळेना. मग तिला सांगितलं, की रात्र असो, दिवस असो; तरुण मुलगी असो किंवा वृद्ध बाई; धडधाकट असो किंवा गंभीर आजारी; अगदी दोन-जीवांची गरोदर बाई असो; गावात प्रवेश करण्यापूर्वी किंवा गावाबाहेर जाताना एक किलोमीटर चालायचंच. हाताईसमोरून स्त्रियांनी पायीच जायचं. गावात येताना आणि गावाबाहेर जाताना स्त्रीनं पायीच जायला हवं, असा कुण्या धार्मिक बाबांनी शेकडो वर्षांपूर्वी नियम घालून दिला. नंतर गावात बाबांचं मंदिरच झालं. मग नियम आणखी कडक देखरेखीत पाळला जायला लागला. त्याला पाप-पुण्य, कृपा-अवकृपा याची कोंदणं आली. आता लोकांसाठी ही प्रथा आहे आणि ती पाळायची असते. (गंमत म्हणजे याच बाबांच्या आदेशामुळे आजही गावात पशुधन म्हणून दूध, ताक विकलं जात नाही. फक्त तूप विकतात.)
सुनीता सांगते, ‘‘उसी समय मेरी पढमई, सारे सपने और आगे बढम्ने की उम्मीदे छूट गई थी। मैंने भी यही सोचा, की शायद ऐसा होगा भगवानके नाम पर। मैं इस चीजको गलत नहीं समझती थी। मैं खुद अंधविश्वासी सोच से गुजर रही थी। सही-गलत का फर्क नहीं पता था। मेरे पहनावेमें परिवर्तन हो गया और हाव-भाव अलग हुएं थे। ससुरालमें अलगही तरीकेसे रहना पडम, बंदीगत जैसे, किसी जेलमें हूँ, उस प्रकार का जीवन शुरू हुआ।’’
घुसमटीत असलेल्या, दहावी शिकलेल्या (आता बारावी पास) सुनीतानं गावातल्या ‘ग्रामीण महिला विकास केंद्र’ या संस्थेत काम करायला सुरुवात केली. कामातून आर्थिक लाभ होणार असल्यास कामासाठी बाहेर जाण्यास घरच्यांचा विरोध सौम्य होतो हा सार्वत्रिक अनुभव आहे. कामामुळे सुनीताचा बाहेरच्या जगाशी संपर्क आला. त्यामुळेच ‘ग्रासरूट्स नेतृत्वविकास कार्यक्रमा’त ती आली. तिथे तिला संविधान, हक्क, स्त्री-पुरुष समानता वगैरेंचा परिचय झाला. सुनीता सांगते, ‘‘मुझे संवैधानिक मूल्यों का ज्ञान मिला। संविधान क्या हैं ये पता चला। अधिकारोंके प्रति जानकारी मिली। मूल्य क्या हैं? हालांकी मैंने दसवीं कंप्लीट कर ली थी, लेकिन मुझे कभीभी संविधानके बारेमें जानकारी नहीं मिली थी।’’
संविधान, समानता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय अशा मूल्यांच्या चर्चा या कार्यक्रमात होत होत्या. त्यामुळे आपल्या गावात चाललेल्या काही गोष्टी चुकीच्या आहेत, एवढं सुनीताच्या लक्षात आलं. नवऱ्याशी ती याबाबत बोलली, तर त्यांनी तिला कामच सोडायला सांगितलं, त्यांचं नातं संपवण्याची भीती दाखवली. घाबरलेल्या सुनीतानं रडतखडत काम चालू ठेवलं; पण समजलेल्या आणि पटलेल्या गोष्टी तिला स्वस्थ बसू देत नव्हत्या. तिनं गावात हाताईच्या नियमांबद्दल स्त्रियांची बैठक घेण्याचा प्रयत्न केला, पण स्त्रियाच विरोधात गेल्या. सुनीता माथेफिरू आहे, देवाधर्माच्या विरोधात आहे, असा प्रचार झाला. घरापर्यंत तक्रारी गेल्या आणि विरोध वाढला.
आपली चूक लक्षात आलेल्या सुनीतानं गावातल्या लोकांचं पेन्शन, पाणी, रस्ते या संदर्भातली कामं करून घेण्यात पुढाकार घेतला. हळूहळू मदतीसाठी स्त्रिया तिच्याकडे यायला लागल्या, विश्वास ठेवायला लागल्या. हा विश्वास सुनीतानं स्त्रियांबरोबर सविस्तर चर्चा करण्यासाठी वापरला. त्यांचा तिच्यावरचा विश्वास वाढला, तिचं काम वाढलं. चालत सगळीकडे वेळेत पोहोचणं शक्य होईना, तेव्हा सुनीतानं तिला स्कूटी घेऊन देण्याची नवऱ्याला गळ घातली. आधी विरोध, मग हो-ना झालं आणि शेवटी गावाच्या वेशीच्या बाहेर दुचाकी चालवण्याच्या अटीवर ती मिळाली. गावच्या सुनेनं गावात दुचाकी चालवण्याची काय मजाल?
मग सुनीताचं शहाणपण बहरलं. ‘जशास तसं’चा मार्ग तिने अवलंबला. गावाच्या वेशीपासून आत एक किलोमीटरच्या अंतरात स्कूटी हातात धरून चालवत आणताना, धडपडून तिनं ते तिला कसं अवघड जातं आहे, हे दाखवून दिलं. मग नवऱ्यानं त्या एक किलोमीटरमध्ये स्कूटी न्यायला, आणायला यावं असं ठरवलं. जाताना गावाच्या वेशीपर्यंत तिला स्कूटी नेऊन द्यायची आणि परतल्यावर गावाच्या वेशीवर आली की घरी फोन करून स्कूटी न्यायला सुनीता घरातून कुणाला तरी बोलवायला लागली. काही दिवसांतच नवरा आणि घरचे इतर पुरुष या किलोमीटर चालण्याला वैतागले, चिडचिड व्हायला लागली. बायकांना होणाऱ्या त्रासाची चव घरच्यांना दिल्यावर सुनीतानं हाताईवर मोर्चा वळवला. तिथे बसणाऱ्या पुरुषांना गाडी वेशीच्या बाहेर नेण्याचं आणि वेशीतून आणण्याचं काम लावलं. कारण हाताईसमोरूनसुद्धा बायकांनी अनवाणी व पायी चालणंच अपेक्षित होतं. हाताईचा नियम पाळण्यासाठी काही दिवस ते काम हाताईवरच्या पुरुषांनी केलंही, पण तेही वैतागले. म्हणाले, ‘‘आम्ही काय तुझे नोकर आहोत का? तुझी गाडी तू चालव. आम्हाला त्रास देऊ नको.’’ मग काय! गावातल्या सगळय़ा पुरुषांना वैताग दिल्यावर, बायकांना होणाऱ्या त्रासाची चव त्यांना चाखायला दिल्यावर, सुनीता गावातून, हाताईसमोरूनही स्कूटीवर फिरायला लागली. विरोध केला, तर आपल्याच गळय़ात काम पडेल म्हणून सगळे गप्प. हाताईच्या नियमांचं उल्लंघन झालं, तरी सुनीतावर काहीच कोप न झालेला बघून इतर बायकाही आता गाडीवर बसायला लागल्या आहेत. मात्र कुणी बघू नये म्हणून त्या फक्त रात्री बसतात. अर्थात हासुद्धा बदलाचा एक टप्पाच.
बाहेरचे लोक आदर करायला लागले, की घरचेही विरोधाचा पुनर्विचार करायला लागतात. आपल्या माणसातले गुण दिसण्याची शक्यता तयार होते. कामानिमित्तानं सुनीताचा सरकारी कार्यालयांमधला वावर वाढला. सुनीताचा नवरा हळूहळू तिला पाठिंबा द्यायला लागला आणि त्याच्याच मदतीनं तिनं हाताईवर भारतीय संविधानाची उद्देशिका (preamble) लावली. प्रस्थापित स्थानिक राजकीय व्यक्तीकडून विरोध झाला. हे काय आहे? तुम्ही कोणत्या पक्षाचे? कोणत्या धर्माचे? कोणत्या जातीचे? तुम्ही का करता? वगैरे जाब विचारला गेला; पण सुनीता आणि तिच्या नवऱ्यानं हे ‘सरकारी काम’ आहे असं सांगून निभावून नेलं. रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या शेकडो स्त्रियांनी उत्स्फूर्तपणे उद्देशिकेसमोर एकत्र येऊन बैठक घेतली. रोजगार हमीवर काम करण्याचा अधिकारही संविधानामुळे मिळाला आहे, हे सुनीतानं सांगितलेलं त्यांना पटलं होतं.
सुनीता आणि राजस्थानमधल्या तिच्यासारख्या आत्मभान आलेल्या, समानतेच्या पुरस्काराचा विचार आणि कृती करणाऱ्या मित्रमैत्रिणींनी, कार्यकर्त्यांनी ‘छूआ-अछूत मुक्त अभियान’ (अर्थात अस्पृश्यता निर्मूलन अभियान) सुरू केलं आहे. लिंग आणि जात यांच्या भेदाचा चटका बसलेल्यांनी एकत्र येऊन, या दोन्ही आयामांवर काम सुरू केलं आहे. या अभियानाची स्वत:ची गती, आव्हानं, यशापयश असेलच; पण असं अभियान ‘ग्रासरूट्स’मधल्या नवीन, उभरत्या नेतृत्वानं सुरू करण्याचं महत्त्व मोठं आहे.
बदलासाठी वाटाघाटीचा अवकाश (negotiating space) शोधणं आणि चोखाळणं याला स्त्री-चळवळीत फार महत्त्व आहे. सुनीताचं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलेलं होतं. तिचा विचार, शहाणपण हे बाहेरून नव्हे, तर तिच्या जगण्याच्या पद्धतीतून, जीवनानुभवातून आलेलं आहे, म्हणूनच ते खरं आहे. सामूहिक अनुभवाचं, त्यातल्या ताकदीचं आणि उणिवांचं भान या जगण्यात असल्यामुळेच अनेक जणी त्यात सहभागी होण्याचं धाडस दाखवू शकल्या. या गोष्टीकडे केवळ प्रेरणादायी अनुभवाच्या पातळीवर न बघता या शहाणपणाचं नीट विश्लेषण करायला हवं.
सुनीताच्या शहाणपणात बंडखोरी आहे; पण मूळ मुद्दा आहे, तो चावडीवर किंवा हाताईवर बायका का दिसत नाहीत, हा. समाज म्हणून आपणच जीवनातल्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राची पूर्ण फारकत केली आहे आणि स्त्रियांचं कार्यक्षेत्र खासगी व पुरुषांचं कार्यक्षेत्र सार्वजनिक, अशी कडक विभागणी केली आहे. ‘घराच्या चार भिंती हेच बायकांचं जग’ हीच पारंपरिक ठाम समजूत आपण अद्याप कायम ठेवली आहे. चूल आणि मूल सांभाळणं हेच बाईचं जीवन आहे असं आपण मानतो. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांशी जोडलेल्या गोष्टीच फक्त स्त्रियांच्या बाबी होतात. पुरुषांचं कार्यक्षेत्र मात्र घराबाहेर असतं. त्यात सत्ताशक्ती आहे. त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क महत्त्वाचा. गती आणि संचार त्यांच्यासाठी महत्त्वाचं. स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी येण्यास मज्जावच केला, की खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राची ही फारकत टिकवणं सोयीचं होतं. स्त्री-पुरुषांतली असमानतेची वागणूक टिकवता येते. रक्षणाच्या नावाखाली त्याला एक जबाबदारीची झालरही लावता येते. एका प्रशिक्षणातला अनुभव याची साक्ष होता. गावात स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या गटाला गावाचा नकाशा काढण्याचं गटकार्य दिलं होतं. स्त्रियांनी बनवलेल्या नकाशात मुलामुलींची शाळा, पाणी भरण्याच्या जागा, जळणफाटा आणण्याच्या वाटा, आरोग्य केंद्र ही संदर्भ-ठिकाणं (reference points) होते, तर पुरुषांच्या नकाशात ठळकपणे आणि भला मोठा दाखवलेला इतर गावांना जोडणारा रस्ता हे संदर्भ-ठिकाण होतं आणि त्यात होती गावातली चावडी.
या सदरातल्या लेखांमध्ये आपण सतत समाजाचे नियम आणि नियमनं याबद्दल बोलतो. नियमन कसं होतं? ते होतं समाजमान्य रूढी, परंपरा आणि त्यांच्या दृश्य व्यवहारातून. सामाजिक मान्यतांचा धाक असतो, जरब असते. समाजमान्यतांच्या भिंगामधूनच स्त्रियाही स्वत:ला बघायला शिकतात आणि त्यातच अडकतात. सुनीतासारख्या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या अनुभवांतून स्त्रियांना कमी लेखणाऱ्या सार्वत्रिक प्रथा कशा बदलतील, असा प्रश्न निर्माण होणारा.
इथे एका बोधप्रद गोष्टीचीच आठवण देते. जाळय़ात अडकलेल्या कबुतरांची गोष्ट. जाळय़ात अडकलेल्या कबुतरांपैकी एखाद्या कबुतराला (इथे सुनीताला) समाजात काय होतंय, काय होऊ शकतं आणि काय करायला हवं, याचा अंदाज आला. त्या एका कबुतरानं सगळय़ांना समजावून सांगून, भरोसा देऊन एकत्र उडण्याची शक्कल लढवली आणि मग सगळेच जण जाळीसकट उंच उंच आकाशात उडाले!
(या लेखासाठी नागेश जाधव यांचं सहकार्य झालं आहे.)