डॉ. सुजाता खांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या लेखमालेतला हा शेवटचा लेख लिहिताना समाधान आणि हुरहुर दोन्ही भावना आहेत. सामान्यत: दूरान्वयानेच माहिती असलेल्या वेगवेगळया समूहांतील स्त्रिया, त्यांची जीवनशैली, संघर्ष, आशा-आकांक्षा, बदलाची धडपड आणि नेतृत्वक्षमता, यांचा पट उलगडण्याच्या प्रयत्नांचं समाधान आहे. हुरहुर यासाठी, की अजूनही कित्येकांचे पट उलगडण्याचे राहून गेले. फक्त भटक्या-विमुक्त समूहाच्या महाराष्ट्रात ४२ जाती आहेत. तेवढया जीवनशैली, भाषा, प्रघात, व्यवहार, संघर्ष आणि आशा-आकांक्षांचे धुमारे.
एकात-एक चपखल बसणाऱ्या लाकडी बाहुल्यांचं खेळणं आपल्याला माहिती आहे. वरची बाहुली उघडली की आत दुसरी, दुसरीत तिसरी. शेवटची बाहुली नखाएवढी असते. स्त्रियांबाबतच्या भेदाचंही असंच आहे. लिंगभेदाची वरची बाहुली, त्यात जातीची, मग धर्माची, आर्थिक परिस्थितीची, ‘शहरी-ग्रामीण’ची, शिक्षणाची.. वगैरे वगैरे क्रम
परिस्थितीनुसार बदलतात. जातीत परत पोटजात- उपजात किंवा धर्मात त्याच्या आणखी शाखा, अशीही समीकरणं आहेत. बाहुली जेवढी आत, तेवढी जास्त गुदमरलेली, घुसमटलेली. म्हणूनच ‘ग्रासरूट फेमिनिझम’, त्यातल्या बदलाच्या धुमाऱ्यांची स्वतंत्र मांडणी आणि चर्चा आवश्यक वाटली. ‘ग्रासरूट फेमिनिझम’चा आम्हाला समजलेला अर्थ, अनुभवांच्या आणि त्यांच्या विश्लेषणाच्या मदतीनं मांडण्याचा प्रयत्न लेखमालेतून केला. यानिमित्तानं अशा चर्चेची सुरुवात झाली. वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
लेखमालेतल्या स्त्रियांनी अधोरेखित केलं, ते आत्मभानांचं नवनिर्माण. आत्मभान अनेकार्थी – एका व्यक्तीचं विविध संदर्भात आलेलं आत्मभान आणि अनेकांचं- एकत्रित या दोन्ही अर्थानं. ‘भय माझे संपत आहे,’ असं विनया घेवदेला केव्हा वाटलं? ‘अमृत कावळेची मुलगी म्याडम कधी झाली?’ असा प्रश्न सुषमा मोहिर्लेच्या गाववाल्यांना केव्हा पडला? ‘कुणी निर्मिला हा कोंडवाडा’ असा प्रश्न कालबेलिया समूहातल्या स्त्री-पुरुषांना केव्हा पडला? अनिता कांबळेला ‘मन झिम्माड झालं, हिरव्या बहरात’ असं केव्हा वाटलं? आणि ‘अवघा रंग एक झाला’ अशी सुजाता खांडेकरची भावना केव्हा झाली? सगळयांच्या मुळाशी आत्मभानाचीच प्रक्रिया होती/ आहे.
आणखी वाचा-ग्रासरूट फेमिनिझम: अवघा रंग एक झाला!
लोकांनी आपल्याला आपली दिलेली, रुजवलेली, रुतवलेली समजूत आणि ओळख बाजूला सारून, स्वत:मधली बदल घडवण्याची ताकद स्त्रियांनी ओळखली. सहनशील, आज्ञाधारक अशा बिरुदांत सार्थक न मानता, आपलं माणूसपण ठामपणे अधोरेखित करण्यास सुरुवात केली. त्यांना मदत झाली ‘ग्रासरूट्स नेतृत्वविकास कार्यक्रमा’तल्या ‘स्वत:ला समजून घेण्यासाठी’ उद्युक्त करणाऱ्या प्रक्रियेची.
आत्मभानाच्या आविष्काराची एक गंमत आठवते. दहाएक वर्षांपूर्वी या सत्रात एक ‘एकल’ स्त्री आली होती. खुर्च्यावर गोलाकार बसलेल्या सहभागींमध्ये, विरलेलं कासोटयाचं पातळ, कपाळावर रुपयाएवढं कुंकू, अंग चोरून, जवळपास जमिनीला टेकेपर्यंत वाकलेली मूर्ती. प्रशिक्षण पुढे सरकत होतं, तसतशी आधी संकोचून, ओशाळवाणी बसलेली ही स्त्री बसण्या-बोलण्यात सैल होत गेली. दिवसाच्या शेवटी मुडपलेला पाय खुर्चीवर उभा ठेवून, हातावर हनुवटी टेकवून, ताठ बसलेली ती स्त्री मी विसरू शिकत नाही. आत्मभानाचं असं आहे. ते यायला लागलं, की अंतर्बाह्य खुणा दाखवायला लागतं. आणि स्वत:ला कितीही असहाय्य समजणाऱ्या व्यक्तीला मनासारखं वागण्याचं, विरोध करण्याचं, आपलं आयुष्य बदलण्याचं बळ देतं.
या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट झाली. लहानपणापासून माणूस म्हणून असलेल्या इच्छा, आनंद, स्वातंत्र्य, आकांक्षा मनात विकसित होत असतातच. रीतीरीवाज, समाजमान्यता, दडपणामुळे त्यांच्यावर असहाय्यतेची, सहनशीलतेची राख चढते. पण राखेखाली या भावना जिवंत असतातच. स्त्रियांच्या सक्षमीकरणाची प्रक्रिया सर्वार्थानं सशक्त असावी लागते. स्त्रियांवरचं दडपण, लादलेल्या समजेचे अडथळे पार करून अंतर्मनाला स्पर्श करण्याची ताकद त्यात असावी लागते. पुन्हा अंकुरण्याची वाट बघत असलेल्या माणूसपणाच्या खुणा आणि अवशेषांपर्यंत (ते प्रत्येकात असतातच) ही प्रक्रिया पोहोचू शकली पाहिजे. मग विझत चाललेली पण तळपू शकणारी ताकद दिसते. म्हणूनच सक्षम करण्याची प्रक्रिया वैचारिक- भावनिक, हळुवार, दीर्घकालीन आहे आणि घाऊक प्रयत्नांचं तिला वावडं आहे. स्त्री-चळवळीचा आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा विचार आणि काम करणाऱ्या सर्व मैत्रिणी-मित्रांबरोबर हा धडा ‘शेअर’ करायचा आहे.
स्त्री-चळवळ प्रत्येक स्त्रीच्या मुक्तीचा ध्यास घेतलेली राजकीय चळवळ आहे. हक्कांसाठी, मूल्यांसाठी लढणारी आहे. म्हणूनच लेखमालेतल्या गोष्टींकडे दु:खाचे कढ आणि हुंदके म्हणून बघता कामा नये. त्यातल्या ‘पॉवर’चं समीकरण बदलण्याच्या, सांस्कृतिक आणि राजकीय बदलाच्या प्रक्रियेशी जोडून घेत ते समजून घ्यावं लागेल. तरच लेखमालेतल्या गोष्टी ‘अन्याय सहन केला जाणार नाही,’ हे निर्विवादपणे सांगत असल्याचं लक्षात येईल.
आणखी वाचा-ग्रासरूट फेमिनिझम: मन आभायात बी मायेना!
लेखमालेला वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार. अनेकांनी वेगळया जीवनपद्धतीचं भान आल्याचं सांगितलं. एका सहकारी मैत्रिणीला, डेहराडूनच्या प्रशिक्षणात भेटलेल्या गडचिरोलीच्या दूरस्थ भागातल्या तरुणीनं हे लेख मनाला थेट भिडत असल्याचं सांगितले. अन्वरी खानच्या गोष्टीवरच्या प्रतिसादात ‘दिल, जुबान, दिमाग, बर्ताव’ यातल्या एकतानतेचा ‘अन्वरी फ्रेमवर्क’ असा उल्लेख करून ते स्त्रीवादी चळवळीत मोलाचं योगदान असल्याचं एकाने लिहिलं, तेव्हा खूप बरं वाटलं. एका मानसिक आरोग्याच्या समुपदेशकानं ‘थेरपी’ म्हणून या लेखांचा उपयोग करत असल्याचं कळवलं. लेखांमधून व्यक्त झालेली ‘एकत्रित’ प्रयत्नांची भावना सर्वांनी अधोरेखित केली.
‘ग्रासरूट फेमिनिझम’चा असा पट उलगडण्याचं आणखीही कारण आहे. गेली पंधराएक वर्ष महाराष्ट्र आणि राजस्थानात ‘ग्रासरूट’वरच्या मैत्रिणी-मित्रांबरोबरच्या सहप्रवास आणि सह-अनुभूतीनं एका नव्या वळणावर, एक नवीन प्रश्न घेऊन आम्ही उभे आहोत. हेही आत्मभानाशी निगडित आहे. आत्मभान तुकडया-तुकडयांत मर्यादित न राहता, एकसंध, जैविक अनुभव देत राहण्याची ही पावती.
‘ग्रासरूट’मधल्या लोकांचा ज्ञान निर्मितीतला सहभाग अभावानंच दिसतो. जीवनानुभव, जीवनशैली, जगण्याच्या संघर्षांतून आलेलं शहाणपण आणि ज्ञान, अनेकांचं निसर्गा- बरोबरचं अतूट नातं, त्यातून जपलेलं साहचर्याचं, परस्परविकासाचं आकलन.. हे सगळं उदंड असूनही ज्ञानधारक आणि ज्ञाननिर्मिती करणारे म्हणून ‘ग्रासरूट’वरच्या लोकांना सन्मान का नाही मिळत, हा तो प्रश्न. या अभावाचं कारण क्षमतेत नसून समाज- जाणिवा आणि मान्यतेत आहे. त्यात गर्भित आहेत ते कोणावर विश्वास ठेवावा? कोणाच्या मतांचा आदर करावा? कोणाचे अनुभव, का महत्त्वाचे आहेत? ज्ञाननिर्मितीचा अधिकार कोणाला आहे? हे तत्त्वचिंतनाचे प्रश्न.
आणखी वाचा-ग्रासरूट फेमिनिझम: आज विषाद वाटतो!
‘ग्रासरूट’मधल्या व्यक्तीलाच किंमत नसल्यामुळे, त्यांच्या कौशल्याला, शहाणपणाला, ज्ञानाला, कलेला किंमत नाही. त्यांना सतत माहिती मिळवण्याचं मशीन बनवून त्यांच्या ज्ञानावर औपचारिक ज्ञानाचे इमले इतरजण बांधतात. यात बदल घडवण्याची जाण आणि निर्धार ही यापुढच्या प्रवासाची दिशा आहे. लेखमालेत उल्लेखिलेल्या नेतृत्वविकास कार्यक्रमाच्या परिणामी महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये ‘ग्रासरूट’मधील स्त्रिया अनेक विषयांवर काम करताहेत. एकल महिला संघटना, स्त्रियांचा मालमत्ता अधिकार, वनहक्क, सॅनिटेशन (सार्वजनिक स्वच्छता), दुष्काळग्रस्त गावांतील पाण्याची वंचना, घरेलू कामगार संघटना, आदिवासी स्त्रियांची संघटना, स्त्री-अत्याचाराच्या प्रश्नावर काम करणाऱ्या असंख्य स्त्रिया आणि त्यांच्या संघटना, भटक्या-विमुक्त स्त्रियांच्या संघटना, ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या स्त्रिया, राजस्थानमधील छुआछूत मुक्त अभियान, अशी अनेक उदाहरणं आहेत. या स्त्रिया संघटना बनवून एकत्रित काम करत आहेत. नेतृत्वविकासाची पुढची फळी तयार करत आहेत. कक्षा विस्तारत आहेत.
आनंद केवळ विस्ताराचा नाही. प्रत्येक प्रक्रियेमध्ये सर्व जातींच्या, धर्माच्या, आदिवासी, घुमन्तु, विविध व्यवसायांच्या, शिकलेल्या- बिनशिकलेल्या स्त्रिया एकत्र आहेत, ही विशेष आनंदाची, समाधानाची आणि मूल्याधिष्ठित बाब आहे. जात-धर्माच्या आपणच निर्माण केलेल्या भिती, माणसामाणसांतील स्पर्धा, द्वेष, ईर्षां, वर्चस्वाची इच्छा आणि प्रयत्न, याचं आपल्या देशातच नव्हे, तर जगाच्या पातळीवरही हिंस्त्र दर्शन घडत असताना, सूक्ष्म पातळीवरचा का होईना हा भगिनीभाव लोभस आणि आशादायक वाटतो.
लेखमालेच्या पहिल्याच लेखात म्हटल्याप्रमाणे ही प्रक्रिया वेगळी आणि महत्त्वाची आहे, कारण इथे एकाच्या अस्मितेची जाणीव दुसऱ्याच्या अस्मितेचा कचरा करणारी नाही. एकाचा अधिकार दुसऱ्याच्या अधिकाराचं हनन करण्यासाठी नाही. उलट कोणतंही assertion (आग्रह धरून बदल घडवण्याची प्रक्रिया ) करण्याची एकटीची ताकद तोकडी असल्याच्या समजेतून सहजपणे हा प्रवास एकत्रितपणे होत आहे. अशाच प्रक्रियेतून समानता, न्याय, स्वातंत्र्य, भगिनी/ भ्रातृभाव, या मूल्यांची रुजवात नव्यानं होईल असा विश्वास आहे. सद्यस्थितीत ही निर्णायक गरज आहे.
२०२३ च्या सरत्या संध्याकाळी, नव्या वर्षांत आणि येणाऱ्या वर्षांमध्ये असं घडण्याची मनोमन अपेक्षा आहे. साहीर लुधियानवी यांच्या गीतामधून व्यक्त होणारा ‘एक अनोखी दुनिया की, बुनियाद उठाई जायेगी, वो सुबह कभी तो आयेगी’ असा विश्वास या अपेक्षेच्या आशेचा किरण आहे.
संवादासाठी हा अवकाश उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘लोकसत्ता-चतुरंग’चे आभार मानल्याशिवाय लेखमालेस पूर्णविराम शक्य नाही. नवीन वर्षांच्या शुभेच्छांसह, पुन्हा भेटण्याच्या प्रतीक्षेत..
(सदर समाप्त)
coro.grassrootfeminism@gmail.com