सुजाता खांडेकर
‘मेळघाटागा कुला गंगाबाई’ (मेळघाटची वाघीण गंगाबाई)- कोरकू भाषेतलं हे संबोधन अगदी चपखल जुळतं अशा व्यक्तिमत्त्वाच्या गंगा जावरकर. शिक्षणाचं महत्त्व पटून स्वत: केवळ शिक्षित नव्हे, तर सुजाण झालेली आणि आता तिसऱ्यांदा गावची सरपंच म्हणून निवडून आलेली ही स्त्री. आदिवासींच्या जगण्याचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उत्तरं शोधणारी, त्याही पुढे जाऊन स्त्रियांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून देत कणखर बनवू पाहणारी ही प्रेरणादायी कार्यकर्ती!
विधानसभा आणि संसदेमध्ये महिला-आरक्षणाचं विधेयक अजून मंजूर झालेलं नाही. ‘असं झालं तर केस कापणाऱ्या आणि लिपस्टिक लावणाऱ्या बायकाच तिथे येतील,’ हा विधेयकाच्या विरोधकांचा एक व्यक्तिस्वातंत्र्याविरोधी आणि निरर्थक युक्तिवाद आहे. हा युक्तिवाद मांडणाऱ्या आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना, तळातून उभ्या राहात असलेल्या स्त्रियांच्या सामाजिक-राजकीय नेतृत्वाची कल्पना नाही. ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या गावागावातील मैत्रिणी सक्षमतेची एक वेगळीच कहाणी सांगत आहेत. सुरुवातीला ‘अमक्याची प्रतिनिधी’ म्हणून निवडून आलेल्या मैत्रिणीसुद्धा सत्तेची ताकद आणि महत्व समजल्यावर अंतर्बाह्य बदलल्या. ग्रामीण, वंचित, उपेक्षित स्त्रियांच्या योगदानाचा एक नवीन अध्यायच त्यांनी उलगडला आहे. ‘कोरकू’ या आदिवासी समाजातली गंगा जावरकर ही या अध्यायातली एक कडी. मेळघाटसारख्या दुर्गम आणि कुपोषणग्रस्त भागातली. आताच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा सरपंच म्हणून निवडून आली. पण कोरकू समाजाची जीवनशैली, गंगाची कौटुंबिक परिस्थिती समजल्याशिवाय, तिच्या आणि गावातल्या बदलाचं महत्त्व कळणार नाही. आईबरोबर शेतमजुरीला जाणारी गंगा ‘मेळघाटची वाघीण’ कशी झाली?
कोरकू हा महाराष्ट्रात मुख्यत: विदर्भात मेळघाट परिसरात राहणारा आदिवासी समाज. अतिवंचित. अन्य आदिवासी समाजाप्रमाणे या समाजाची निसर्गाबरोबर राहण्याचीच परंपरा. उपजीविकाही निसर्गावर आधारितच. गंगा सांगते, ‘‘आलेगा जाटोबी सृष्टी गोण जुडाकेन (आमची आडनावं सुद्धा निसर्गाला जोडूनच). हल्लेखोर हल्ला करायचे तेव्हा लोक ठिकठिकाणी लपायचे. जमिनीत लपणारे कासबेकर, गवतात लपणारे जावरकर किंवा बुसुम, पाण्यात लपणारे मावसकर, बिवा झाडात लपणारे भिलावेकर, जामूनच्या झाडात लपणारे जांबेकर वगेरे..’’ पण आता पारंपरिक उपजीविकेचे स्रोत त्यांच्यापासून हिरावून घेतल्यामुळे कंगाल झालेल्या समाजाची किमान स्थैर्य मिळवण्याची धडपडच अजून सुरू आहे.
शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, दळणवळण या बाबतीत एकदम मागास भाग. कमालीची अंधश्रद्धा, भूतखेत यावर विश्वास. ही अंधश्रद्धाच जीवनपद्धतीची बैठक. शिक्षणाबद्दलची पूर्ण अनास्था. गंगालासुद्धा तिच्या वडिलांनी आश्रमशाळेत दोन वेळा जेवायला मिळेल म्हणून पाठवलं. शिक्षण मिळावं हा हेतूच नव्हता. गंगा मुलामुलींच्या शिक्षणावर खूप लक्ष देते. गावातली शंभर टक्के मुलं शाळेत दाखल होतात. शाळेत चांगले शिक्षक, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट, सर्व सुविधा आहेत. गंगा सांगते, ‘‘ही मुलं मला सांगतात, गंगाबाई, फुटबॉल पाहिजे. तेव्हा मी त्यांना सांगते, परीक्षेचे निकाल दाखवा.’’ गंगा स्वत:ही सध्या दूरस्थ शिक्षण घेत ‘बीए’ करत आहे.
अपुऱ्या आरोग्यसेवा आणि त्याही न वापरण्याची पक्की मानसिकता, यामुळे कुपोषण, बालमृत्यू, बाळंतपणात दगावणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण मोठे आहे. मुलींना हुंडा मिळतो त्यामुळे मुलींचं लग्न लवकर करण्याची, अनेकदा करण्याचीही इथली पद्धत आहे. काही तरुण-तरुणी पळून जाऊन लग्न करतात. लहान वयात गर्भारपण इथे सर्रास आढळतं. आईचं अशक्तपण मुलांच्या कुपोषणाचं कारण ठरतं. पिढय़ान्पिढय़ा चालत आलेलं काहीही बदललं तर कोप होणार, बरबादी होणार, ही पक्की मानसिकता. बरबादी फक्त व्यक्तीची नाही, तर गावाची, समाजाची होणार असल्याच्या भीतीमुळे कुठलाही बदल ही व्यक्तिगत बाब राहातच नाही. बायकांनी घरातच बाळंत व्हायचं हा नियम. दवाखान्यात गेलेलं कुटुंब वाळीत पडतं. गंगा सांगते, ‘‘एकदा एका गरोदर बाईचा रक्तदाब खूपच वाढला. तिला आकडी यायला लागली. पण सगळेजण तिच्या अंगात भूत आलं समजून तिलाच मारायला लागले. तिच्या भावाची समजूत घालून तिला दवाखान्यात नेलं. मूल दगावलं, पण बाई वाचली. लोकांशी फार शांतपणे बोलावं लागतं. नुसता विरोध करून चालत नाही. हळूहळू, प्रेमानं आपलं म्हणणं मांडायचं हे आता मला समजलं आहे’’. गंगा अनुभवांची, शहाणपणाची पोतडी उलगडते.
जात पंचायत ही इथे अंतिम न्याय-यंत्रणा. गावाचे वयस्कर, चालीरीतींबद्दल कर्मठ असणारे पुरुष जात पंचायतीचे सदस्य. स्त्रियांनी तिकडे फिरकायचंसुद्धा नाही. बायकांना घरात अत्याचार, मारहाण सहन करावी लागते, हत्याही होतात, पण कुठल्याही स्थितीत पोलीस स्टेशनला जायचं नाही. सगळा निवाडा जात पंचायातीचाच. या वेळच्या निवडणुकीच्या तोंडावरच १५ वर्षांच्या मुलीवर प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या घरातल्या मुलानं बलात्कार केल्याची घटना झाली होती. सगळय़ांचा प्रयत्न हे दडपण्याचाच होता. निवडणुकीच्या तोंडावर गंगानं यात लक्ष घालू नये असं तिच्या समर्थकांनाही वाटत होतं. पण गंगानं ऐकलं नाही. ती सांगते, ‘‘असा गुन्हा करणाऱ्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हिगराएन की चुपारटे सेन्दाराबा (घाबरून कसं चालेल)? पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. मुलीला, घरच्यांना धीर दिला. विरोधकांनी याचा फायदा उठवायचा प्रयत्न केला. या बाईला कशाला सारखं निवडून द्यायचं? ती भीती पसरवते. सारखी पोलीस स्टेशनला जाते. आपली पंचायत आहे ना? असा प्रचार सुरू झाला. पण लोकांनीही त्याकडे लक्ष दिलं नसणार कारण गंगा पुन्हा निवडून आली.
गंगामध्ये एवढा आत्मविश्वास कसा आला होता? ‘‘२०१० मध्ये लीडरशीप कार्यक्रमात निवड झाली आणि इंया जीवन बदलाएन (माझी जिंदगीच बदलली!)’’. गंगा सांगते, ‘‘इस फेलोशिपमे मेरा डरही निकाल गया. पूर्वी प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची. आजूबाजूच्या पॉवरफुल लोकांची भीती, सरकारी अधिकाऱ्यांची भीती, पंचायतीतल्या पुरुषांची भीती.’’ फेलोशिपमध्ये गंगाला स्वत:ची ओळख, आत्मविश्वास मिळाला. सगळे समजतात आणि सांगतात तसे आपण दुर्बल नाही याची खात्री पटली. गावात बदल घडवण्यासाठी काय करायला पाहिजे त्याची माहिती झाली. लोकसंघटन म्हणजे
काय-का-कसं याचं शिक्षण मिळालं आणि एक वेगळी ऊर्जा घेऊन गंगा कामाला भिडली. गावबदलाची वाढलेली प्रेरणा, ते घडवू शकण्याचा आत्मविश्वास, ते सुरू करण्याची माहिती आणि पाठबळाची खात्री असल्यानं आलेलं धाडस, याचा परिपाक गंगाच्या वेगळय़ा अवतारात झाला.
गंगानं गावात रोजगार आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वेगवेगळय़ा योजनांची माहिती, त्या गावात आणण्यासाठी लागणारं कसब, माहितीचा अधिकार वापरण्याची प्रक्रिया, हे सगळं गंगाला समजलं होतं. ती सांगते, ‘‘गाव आदिवासी असल्यामुळे ‘पेसा’ कायद्याच्या अंतर्गत अनेक गोष्टी करणं शक्य होतं. गावात रोजगार नव्हता. केवळ सुगीनुसार शेतमजुरी. मी सतत पाठपुरावा करून गावात ‘नरेगा’, वनीकरण, पिण्याचं पाणी, रस्ताबांधणी, घरकुल, ‘डीप सीसीटी’ यांसारख्या योजना आणल्या. त्या वर्षी ५० लाख रुपयांचा निधी गावासाठी वापरला गेला. लोकांना काम मिळालं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. यामुळे लोकांचा हळूहळू माझ्यावर विश्वास तयार झाला’’. गंगाच्या प्रयत्नामुळे रोजगार जास्त काळ गावात स्थिरावला. आपल्या उपजीविकेचा विचार करणारी गंगा गावाला आपली वाटायला लागली. गंगा नांगर धरून शेती करायला लागली तेव्हा तिचा भाऊही भडकला होता. तोही विरोध तिला मिळणाऱ्या मान्यतेमुळे हळूहळू संपला. आता गावच गंगाचं कुटुंब आहे.
गंगाच्या प्रयत्नांनी गावात पाण्याची टाकी आली, ‘धर्माडे’ (पाणपोई) बांधले, गावातल्या तलावात मत्स्यशेती सुरू झाली, दिव्यांगांचं सर्वेक्षण करून मदत मिळवली. हळूहळू गावाचा खूप विश्वास मिळाला. ‘‘जिंदगीमें मैं गावके लोगोसे कभी झूठ नही बोली,’’ गंगा सांगते. मग गावानंच २०१२ मध्ये गंगाला सरपंच म्हणून निवडून दिलं. तिच्या आकांक्षांना पंख आणि ताकद मिळाली. गावात सभामंडप, शाळेत सुविधा, आरोग्य केंद्रात सुधारणा, शेतीसाठी अवजारं, सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याचं मशीन, बायकांना दवाखान्यात जाण्यासाठी चांगल्या साडय़ा दिल्या. शक्य होती ती सगळी कामं सुरू झाली.
गंगाच्या हातीद गावातच नाही, तर जवळच्या भूलोरी, घोटा आणि रानामालूर या गावांतही गंगाचं काम सहजी वाढलं. हजार-बाराशे लोकवस्तीची ही गावं. ४ कोटींपेक्षा अधिक निधी गावांसाठी खेचून आणला. तिथे स्त्रियांचे गट बांधले. आता त्यांपैकी एका गावात स्त्री सरपंच निवडूनही आली आहे. गंगानं हाती घेतलेले सगळे प्रश्न लोकांच्या गरजेचे आणि जीवनमरणाचे. रूढार्थानं त्यांना स्त्रियांचे प्रश्न मानलं जाणार नाही. जिथे सगळय़ांच्याच जगण्याचीच भ्रांत आहे, तिथे स्त्रियांना भेदभावाबद्दल, अगदी त्यांच्यावरच्या हिंसेच्या प्रश्नावरसुद्धा विचार करायला उसंतच मिळत नाही. अशा वेळी लिंगभावाचे ढळढळीत मुद्दे असले तरी बिनमहत्त्वाचे ठरतात.
स्त्रियांच्या प्रश्नांची जाणीव गंगालाही सुरुवातीला झाली नव्हती. हळूहळू अधिकार समजायला लागले, स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल प्रश्न पडायला लागले, मारहाण, हिंसा जाणवायला लागली आणि स्त्रियांबरोबर एक वेगळा, जिवाभावाचा संवाद सुरू झाला. कौटुंबिक हिंसेबद्दल बायका दबकत का होईना, पण बोलायला लागल्या. म्हणजे सीमित असलं तरी मोकळेपण मिळालं. स्त्रिया ग्रामसभेलाही यायला लागल्या. गंगा सांगते, ‘‘आता कुठे बायकांचं धाडस वाढायला लागलं आहे. अजून खूप काम बाकी आहे’’. गंगा सतत काय करायचं राहिले आहे याचा विचार करते. ती म्हणते, ‘‘स्त्रिया अजून जाहीर ठिकाणी खुर्चीवर बसत नाहीत, लोकांना डोळे भिडवून बोलत नाहीत. मला ते बदलायचं आहे. जास्त बायकांना सरपंच बनायला मदत करायची आहे. मलाही पुढे राजकारणातच राहायचे आहे.’’.
नातेसंबंध हा स्त्री चळवळीचा अनेकार्थानं गाभा राहिला आहे. गंगा बोलताना हा विचार मनात येत होता. किती नाती तिनं विणली होती.. एका रात्री दोन वाजता आजारी नातवासाठी गंगाचा दरवाजा ठोठावणारी आजी. गंगा त्यांना तिच्या फटफटीवरून गावच्या दवाखान्यात, मग तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन गेली. गंगा सांगते, ‘‘त्यांच्या गावात गेले की नातवाला ही आजी घेऊन येतेच. आता तो १०-१२ वर्षांचा असेल. निवडणुकीच्या वेळी बाहेरचे राजकीय पक्षाचे लोक माझ्याविरोधी प्रचार करत होते. पण आजी त्यांना आणि सगळय़ांना सांगत होती, गंगाबाईलाच मत देणार. सगळय़ांनी तिलाच मत द्या.’’ यामुळेच गंगाला विरोधाची भीती नाही वाटत. ती सांगते, ‘‘मी इथलीच आहे ना. इथले लोक माझे आहेत. प्रश्न आमचे आहेत, आम्ही ते सोडवतो आहोत.’’ भक्कम स्थानिक नेतृत्वाचा अर्थ गंगानं किती सहज समजून घेतला आहे. तिच्याबरोबर काम करणारा २५-३० जणांचा गट आहे. त्यात मोठय़ा प्रमाणात बायका आणि तिचा जोडीदार यशवंतही आहे.
गंगासारख्या स्त्रियांना राजकारणात, वेगवेगळय़ा पातळय़ांवर अधिक योगदान द्यायचं आहे, पण निर्णयप्रक्रिया मात्र दुर्दैवानं ‘लिपस्टिकवाल्या आणि केस कापणाऱ्या बाया’ या निरर्थक पिनवर अडकलेली आहे. ही पिन पुढे सरकवण्याची जबाबदारी कुणाची, म्हणजे कुणाकुणाची असायला हवी?..
(या लेखासाठी पूनम बिश्त यांचे सहकार्य झाले आहे.)