डॉ. सुजाता खांडेकर
‘निरक्षर स्त्रियांना शिकायचंच नसतं हो!’ हा समज मोडीत काढणाऱ्या बिजूताई भोसले, शकुंतला जाधव. साक्षरतेचं महत्त्व इतरांपर्यंत पोहोवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले, मात्र रेशनवरच्या धान्यवाटपातील अन्याय दूर करण्यासाठी साक्षरताच उपयोगी पडेल याचा साक्षात्कार त्यांनी जेव्हा त्यांच्यासारख्याच कठीण परिस्थितीत जगणाऱ्या अनेक स्त्रियांना घडवला, तेव्हा चमत्कार घडला आणि तिथली रेशन व्यवस्थाच वठणीवर आली. सामाजिक प्रगतीसाठी एकत्र आलेल्या स्त्रियांची ही गोष्ट.
ही गोष्ट १९९४-९५ ची असेल.
प्रौढ-साक्षरता हा देशाच्या अग्रक्रमातला विषय झाला होता. ईशान्य-मुंबईतल्या बहुसंख्य दलित आणि मुस्लीम वस्त्यांमधून प्रौढांना लिहिणं-वाचणं शिकवणं, त्याचं आकलन करायला मदत करणं, असं आमचं काम सुरू झालं होतं. संपूर्ण वस्ती साक्षर करण्याच्या संकल्पनेमुळे वस्तीतल्या सर्वाचा- विशेषत: स्त्रियांचा सहभाग मिळवण्यावर भर होता.
सगळीकडे स्त्रिया मोठय़ा प्रमाणात निरक्षर; पण लिहा-वाचायला शिकण्याची त्यांना मनापासून गरज वाटत नव्हती. न शिकल्यामुळे इथल्या दैनंदिन आयुष्याचं रहाटगाडं थांबलेलं नव्हतं. त्यामुळे या स्त्रियांच्या भाषेत ‘अर्धी लाकडं मसणात गेल्यावर आता कशाला शिकायचं?’ असा त्यांचा सवाल होता. वरवर पाहता तो खराही होता. या प्रश्नाला उत्तर शोधलं वस्तीतल्या थोडय़ाफार शिकलेल्या स्त्रियांनीच. बिजूताई भोसले या त्यातल्या एक. संगमनेरमधलं कौनची हे त्यांचं मूळ गाव. सातवीपर्यंत शिक्षण झालेलं. १४ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर सात वर्षांनी उपजीविकेच्या शोधात हे कुटुंब मुंबईला आलं. बिजूताई वाशी नाक्यावरच्या मुकुंदनगर वस्तीत राहायच्या. ‘विशाखा महिला मंडळा’च्या त्या अध्यक्षा होत्या. १३ बाय १५ च्या पत्र्याच्या घरात दोन मुली, एक मुलगा आणि नवरा-बायको असा संसार. या वस्तीत पोहोचायला रेल्वेलाइन ओलांडूनच जावं लागायचं. बिजू रोज संध्याकाळी बुद्धविहारात बुद्धवंदना सांगायच्या. मंडळातल्या जवळपास सगळय़ाच स्त्रिया निरक्षर. त्यामुळे साक्षरता वर्ग त्यांनी हिरिरीनं सुरू केला; पण शिकणाऱ्यांना सही करण्यापलीकडे पुढे जाण्यात रस नव्हता. बिजूंना आपल्या दैनंदिन पिचलेल्या, रटाळ आयुष्यात काही करण्याची संधी मिळाली होती; पण यश येत नव्हतं.
शिकण्याचा कार्यक्रम मूळ धरेना, तेव्हा एकेक करून विचाराच्या खिडक्या उघडायला लागल्या. स्त्रियांना शिकायला वेळ कसा मिळेल, त्यांचा सगळय़ात जास्त वेळ कशात जातो, त्यांना कसला त्रास आहे, यावर गप्पा सुरू झाल्या. केवळ वेळ मिळत नाही, म्हणून स्त्रिया शिकत नाहीत, असंच गृहीत धरलेलं होतं. त्याचवेळी रेशिनगचा प्रश्न त्यांच्या मदतीला आला. हा प्रश्न जीवघेणा होता हे लक्षात आलं होतंच. कित्येक कुटुंबांत केवळ रेशिनगच्या धान्यामुळे, घासलेटमुळे अन्न शिजायचं; पण ते मिळवण्यात असंख्य अडचणी होत्या. रेशन दुकानदार, अधिकारी यांचं संगनमत, अधिकाराची, पैशांची आणि गुंडगिरीची सांगड. याला काही उपाय असू शकतो, अशी शंकासुद्धा कुणाच्या मनात येणार नाही. रॉकेलची गाडी येण्याआधी दिवसेंदिवस रांगा लागायच्या. रात्री-अपरात्री स्त्रिया लहान मुलांना घेऊन रांगेतच झोपायच्या. बिजू यांच्या वस्तीमध्ये तर रेशन आणण्यासाठी रेल्वेलाइन ओलांडताना अपघात होऊन लोक दगावलेही होते. असा सगळा प्रकार.
बिजूंसह साक्षरतेचे वर्ग घेणाऱ्या अनेक जणी चर्चा करायला लागल्या, माहिती काढायला लागल्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की प्रत्येक रेशन दुकानात तक्रार वही असते. त्यातल्या पानावर अनुक्रमांक असतात, त्यामुळे पान फाडता येत नाही. त्यात तक्रार नोंदवली की, तातडीनं अधिकाऱ्यानं स्वत: तक्रारदाराला त्याच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली ते सांगायचं, असा नियम आहे. हे कुणाला माहितीच नव्हतं. बिजू म्हणतात, ‘‘माहिती असतं तरीही काय झालं असतं? बलाढय़ लोकांच्या विरोधात तक्रारीचं धैर्य कुणी केलं असतं? आम्हाला रेशन दुकानदाराची अरेरावी सहन करण्याची सवय झाली होती.’’ या चाणाक्ष स्त्रियांच्या हे लक्षात आलं, की अशी तक्रार करायला लिहिण्याचं कौशल्य आणि धैर्य दोन्ही आवश्यक आहे. इथे लिहिता-वाचता न येण्याचा थेट संबंध होता. साक्षरता वर्गात सतत एकत्र आल्यामुळे एकीचं धैर्य गाठीशी जमलं होतं. बसं, मग काय! गहू, साखर, घासलेट, असे शब्द आणि रेशनच्या तक्रारी लिहिण्याची सवय करणं, हेच साक्षरतेचे धडे झाले. इथले साक्षरतेचे वर्ग हे शब्द/ वाक्यं लिहिण्याची सवय करण्यात गजबजून गेले. बघता बघता बिजूंच्या साक्षरता वर्गातल्या स्त्रियांना शब्द लिहिण्याची ताकद कळली.
इतके दिवस बिजू यांनी प्रयत्न करूनही स्त्रियांना शिकण्याची मनापासून ओढ वाटत नव्हती; पण आता त्यांचाच रेटा वाढला. रेशनचं धान्य मिळालं नाही, तेव्हा तक्रारवहीत नोंद केली. दुकानदाराचं आणि अधिकाऱ्यांचंही धाबं दणाणलं. लेखी तक्रार आल्यानं कार्यवाही करणं अनिवार्य होतं. आतापर्यंत या स्त्रिया चिडून शिव्या घालायच्या, मारामारीही करायच्या; पण लिहायच्या नाहीत. त्यामुळे तक्रारवही एकदम कोरी! याचा सोयीस्कर अर्थ व्यवस्था सुरळीत चालू आहे, तक्रार नाही, असा. बिजूंनी पद्धतशीरपणे हे लोण इतर आसपासच्या वस्त्यांमध्ये पोहोचवलं. सगळीकडेच स्त्रिया शिकायलाही लागल्या आणि तक्रार लिहायलाही. आपल्या साम्राज्याला धक्का लागला, हे बघून दुकानदारांकडून बिजूंना धमक्या यायला लागल्या. ‘चालणाऱ्याचे पाय तोडू, उडणाऱ्याचे पंख कापू’ असा धमकीचा निरोप आला. अर्थात दुकानदार, अधिकारी यांच्याविरोधातलं वातावरणच इतकं तापलं होतं, की अशा धमक्यांना कुणी भीक घातली नाही.
रेशिनग साक्षरतेचं लोण ठिकठिकाणच्या वस्तांमध्ये पोहोचलं. जे बिजू वाशी नाक्यात करत होत्या, तेच शकुंतला जाधव गोवंडी येथील लुम्बिनी बागेमध्ये करत होत्या. त्यांचं ‘सिद्धार्थ महिला मंडळ’ होतं. शकुंतला स्वत: १० वी शिकलेल्या. त्यांची दोन मुलं ‘थॅलसेमिया’ या रक्ताच्या आजारानं ग्रस्त होती. आर्थिक स्थितीनं, दु:खाने गांजलेल्या शकुंतला यांना साक्षरता वर्गानं आकर्षित केलं; पण त्यांनाही सुरुवातीला यश आलं नव्हतं. मात्र रेशनची साक्षरता सुरू झाली आणि कामाला वेगळाच वेग आला.
कालपर्यंत स्त्रियांना कस्पटासारखं वागवणारे दुकानदार, अचानक साक्षरतेचं काम करणाऱ्या स्त्रियांच्या घरी जायला लागले. ‘दोन महिन्यांचं धान्य आगाऊ देतो; पण वहीत तक्रार करू नका,’ अशी विनंती करायला लागले. अधिकारीही भेटी द्यायला लागले. ‘तक्रार नाही ना?’ असं विचारत तक्रार न करण्याचा धाक द्यायला लागले.
शकुंतला सांगत होत्या, ‘‘रेशनवर चांगला माल आला, की दुकानदार तो रेशन कार्डधारकांना न देता काळय़ा बाजारात विकायचे. एकदा रेशन दुकानावर चांगला गहू आला आणि दुकानदारानं तो ट्रक दुसरीकडेच उतरवला, काळय़ा बाजारात तो गहू विकण्यासाठी. आम्ही जाऊन तक्रारवही मागितली. दुकानदार द्यायला तयार नव्हताच. ‘आमच्या दुकानात गहू का आले नाहीत?’ हे आम्ही लिहून विचारणार आहोत, असं दुकानदाराला सांगितलं. मग घाबरलेल्या दुकानदारानं गहू आल्याचं मान्य केलं आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकानात नक्की आणतो, हे आश्वासन दिलं, तसं केलंही.’’ आणखी एका प्रसंगात, दुकानदारानं रॉकेलचं माप खालून ठोकून त्याचा आकार लहान केल्याचं लक्षात आलं. त्यामुळे रॉकेल कमी भरायचं. त्याला पकडून दिलं. स्त्रियांनी दुकानावर पाळत ठेवायला सुरुवात केली.
एका दुकानावर लेखी तक्रार करून, अधिकाऱ्यांना कार्यवाही करायला भाग पडून, त्या कार्यवाहीबद्दल त्यांचं अभिनंदन करणारे बोर्ड वस्तीत लागले. कार्यवाही करण्याच्या जबरदस्तीमुळे वैतागलेले अधिकारी बोर्डमुळे अधिकच चिडले. ‘तुम्हाला कुणी परवानगी दिली?’ असं विचारून स्त्रियांना घाबरवायचा प्रयत्न केला. पन्नाशीच्या हंसाबाई खंडागळेंनी खडसावलं, ‘‘रेशन आम्हा गरिबांसाठी आहे. त्याचं वाटप नीट चालतंय की नाही, हे बघायला आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही.’ या सगळय़ा प्रक्रियेत अनेक जणी संघटित झाल्या, शिकायला लागल्या, चांगल्या अर्थानं पुढारी झाल्या.
रेशिनगची साक्षरता ‘ग्रासरूट’मधल्या स्त्रियांचं संघटन आणि नेतृत्व याला वेगळा आकार का देऊन गेली? शिकण्याबद्दल अनास्था असणाऱ्या या अचानक का बदलल्या? कसली जादू होती ही? साधी गोष्ट होती! या अक्षरांमुळे आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष काही बदल घडण्याचा विश्वास आला. आपल्या आयुष्याशी हे निगडित आहे, हे लक्षात आलं, तेव्हा स्त्रिया बदलल्या, सहभागी झाल्या, पुढाकार घ्यायला लागल्या. परिस्थितीचे बळी असण्याच्या (Victimhood) मानसिकतेतून बाहेर आल्या, बदल घडवू शकणाऱ्या झाल्या. शब्दांमधून स्वत:ला, सभोवतालाला बघण्याचं एक नवीन भिंग त्यांना मिळालं.
बऱ्याच वेळा ‘ग्रासरूट’वरच्या स्त्रियांसाठी काम करण्याची मानसिकता असते. त्यांना काय पाहिजे, त्यांनी काय करायला हवे, त्यांच्या फायद्याचं काय, याबद्दल काम सुरू करणाऱ्याचेच आडाखे असतात. आपल्याला वाटतं ते आणि तसं या स्त्रियांनी करावं, हा आग्रह किंबहुना दबावच असतो; पण आपल्याला वाटतं ते त्यांच्या आयुष्यात उपयोगी पडणारं किती आहे, व्यवहार्य कसं आणि केव्हा होईल, याचा विचारच होत नाही. तशी गरजच वाटत नाही. आपल्या शिक्षणातून, सामाजिक स्थितीतून आपल्याला सर्व कळलंच आहे, असा समज काम सुरू करणाऱ्याचा असतो कदाचित. बाहेरून येणाऱ्याला त्याच्या समजुतीनुसार काही घडावं वाटतं म्हणून कुणी का ते मनापासून स्वीकारावं? जेव्हा एखादं काम आपल्या आयुष्याशी जवळून जोडलेलं आहे आणि आपल्या आयुष्यात बदल घडवण्याची क्षमता त्या कामात आहे, हे बिजू, शकुंतलासारख्या स्त्रियांना जाणवलं तेव्हाच त्यांचा सहभाग मिळाला, त्यांना इतरांचा सहभाग मिळाला. हे लक्षात आलं नसतं, तर ‘निरक्षर स्त्रियांना शिकायचंच नसतं, बदलायचं नसतं,’ अशी लोकप्रिय समजूत कुणी करून घेतली असती.
आणखीही एक लक्षात येतं, की या स्त्रियांना तक्रारवहीची फक्त माहिती मिळून उपयोग नव्हता. माहिती वापरण्याची पद्धत (mechanism) महत्त्वाची. ‘गहू’ लिहायला शिकणं हे सोपं आहे पण ते मुजोरी करणाऱ्या दुकानदाराला वठणीवर आणण्याचं साधन आहे हे स्त्रियांना कळलं, तेव्हाच त्यांनी या कामाला आपलं मानलं. हेही समजलं, की एकटीला हे पटून, धैर्य येऊन चालत नाही. या प्रक्रियेत एकत्र जाऊन तक्रार करण्यामुळे एका वेगळय़ाच ताकदीचा, धैर्याचा साक्षात्कार त्यांना झाला.
यामधला हक्क समजून घेऊन स्त्रियांनी स्वत: कृती करण्याचा भाग महत्त्वाचा ठरला. असं घडण्यासाठी ‘स्त्रियांसाठी’ नव्हे तर ‘स्त्रियांबरोबर’ काम करायला लागतं. यामुळे एकत्र सक्षम होण्याची सुरुवात झाली. पुढे शकुंतला स्त्रियांच्या पाठब्यावर, एकही पैसा न खर्च करता, अपक्ष म्हणून निवडणूक लढून नगरसेविका झाल्या. मंगल कात्रे यांच्या पुढाकारानं बिजू यांच्या शेजारच्या ‘शिवशक्ती’ नगरच्या ‘अंबिका महिला मंडळा’नं स्त्रियांनी सुरू केलेलं पहिलं रेशनचं दुकान काढलं, तेही रेल्वेलाइन ओलांडण्याचा धोका टाळून. बिजू यांनी नंतर मुस्लीम स्त्रियांचं मोठं संघटन उभं केलं. रेशन साक्षरतेच्या मोहिमेमधल्या अनेक जणी आजही स्त्रियांच्या प्रश्नांवर हिरिरीनं काम करत आहेत. अनेक जणी महाराष्ट्र पातळीवर नेतृत्व करत आहेत, आपापल्या विभागात वैधानिक समित्यांवर काम करत आहेत, स्थानिक निवडणुका लढवत आहेत, सभा-संमेलनांतून कामाबद्दल मांडणी करत आहेत. एकूण काय, तर अशा प्रक्रियांमधून आलेलं आत्मभान टिकवून ठेवत आहेत आणि त्याचा धडाडीनं आविष्कार करत आहेत. स्वत:ला आणि आपल्या बरोबरीच्या स्त्रियांना वेगळय़ा भिंगातून बघता आल्याचा हा परिणाम आहे. बिजू, शकुंतला यांनी नेतृत्व केलं, तेही प्रक्रिया सामूहिक करण्याचं.
बदलाची प्रक्रिया जेव्हा सामूहिक होते, तेव्हा एक वेगळीच मजा आणि प्रक्रियेला एक वेगळीच धार येते. एका वेगळय़ा प्रकारचं सामूहिक स्वामित्व ( collective ownership)त्यातून तयार होतं. ‘ग्रासरूट’वर हे सामूहिकपणच महत्त्वाचं आहे. ‘नोहे हा एकल्याचा खेळ, म्हणुनी मेळ मेळविला’ असं आहे! कारण केवळ व्यक्तिगत करिश्म्याच्या मर्यादाही असतात आणि धोकेही.
(या लेखासाठी श्री. ज्ञानेश्वर बंडगर-घेरडीकर महाराजांचे सहाय्य झाले आहे.)