डॉ. सुजाता खांडेकर
धागे एकमेकांमध्ये मिळवून-पिळवून, मजबूत दोर बनवण्याच्या आजोबांच्या तालमीत तयार झालेल्या विनया घेवदे. मांग कुटुंबातला जन्म आणि त्यातही मुलगी म्हणून लहानपणापासून त्यांनी केवळ भेदभावच अनुभवला. आपल्यातल्या क्षमतांची जाणीव झाल्यावर मात्र भेदाच्या निकषांचा गुंताच आपल्याला दुर्बल बनवतोय हे त्यांना दिसलं. आपल्या भोवतीची चौकट ओलांडून इतर स्त्रियांसाठीही काम करणाऱ्या विनया जेव्हा ‘माझ्यातली जातीची आणि स्त्रीपणाची धास्ती गेली,’ असं म्हणतात, तेव्हा त्याला वेगळं महत्त्व असतं.
आपल्याकडे जातीची समीकरणं पक्की आणि खोलवर रुजलेली आहेत. जाती-उपजाती-पोटजाती, त्यांच्यातले उच्च-नीच मानले जाणारे संबंध आणि त्यानुसार होणारा सामाजिक व्यवहार. या मान्यता, हे व्यवहार लहानपणापासूनच आपली मानसिकता, संवेदना आणि समज बनवतात. जातीची मजबूत पकड बदलू नये असं अनेकांना वाटतं आणि ती बदलणं शक्यच नाही असं इतरांना वाटतं. मांग समाजातल्या विनया जेव्हा म्हणतात, ‘‘माझे भय संपते आहे.. आता मला माझ्या जातीची भीती वाटत नाही,’’ तेव्हा विनयांना जातीची म्हणजे कशाची आणि का भीती वाटत होती, आणि आता ते भय का संपत आहे, असे प्रश्न निर्माण होतात.
विनया घेवदे. सांगलीच्या खानापूरमधल्या अत्यंत गरीब, मांग कुटुंबातला विनया यांचा जन्म. गावातलं हे एकमेव मांगाचं घर! या समाजाची एक खासियत आहे. गावातल्या कला (डफ, ढोलकी) आणि अनेक सांस्कृतिक बाबींमध्ये यांना आवर्जून (सामाजिक-नियम म्हणून) सामील केलं जातं; पण सामाजिक मान्यता, सन्मान मिळत नाही. उदाहरणार्थ, गावात उच्च जातीच्या कुणाचा मृत्यू झाला, तर दहाव्या दिवशी हलगी मांगानी वाजवायची. एखाद्या कुटुंबाचा वाईट काळ चालला असेल, तर मांगाच्या बाईची ओटी भरायची. (असं केल्यानं पीडा हस्तांतरित होते असा समज आहे!) वगैरे.
बलुतेदारीमध्ये या समाजाकडे दोर तयार करण्याचं काम होतं/ आहे. विनयाचे आजोबा सकाळी सगळय़ांना लवकर उठवून दोर वळायला लावायचे. मांगानं बैलपोळय़ाच्या दिवशी अख्ख्या गावात प्रत्येक घराला फुलापानांचं तोरण करून बांधायचं हा नियम. विनया सांगतात, ‘‘पोळय़ाच्या दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये मुलं ‘काल आमच्याकडे तोरण बांधायला आली’ असे हातवारे करून चिडवायची. शाळेतले शिक्षक कधीच नावानं हाक मारायचे नाहीत. जातीचा उल्लेख करून बोलवायचे. दरवर्षी शाळेच्या सुरुवातीला एक गोष्ट त्रास द्यायची. शिक्षक वर्गात सांगायचे, ‘‘मागास वर्गातल्या मुलांनी उभं राहा.’’ मग बाकावर उभं राहायचं आणि फाटून जीर्ण झालेली पुस्तक सरकारी मदत म्हणून दानात मिळायची. गुरुजींचा स्वर, इतरांच्या नजरा, वातावरणातला कुत्सितपणा जाणवायचा. आपणच का? असा प्रश्न विनयांना पडायचा. शाळेतल्या मैत्रिणींच्या कधी घरी गेलं तर त्यांच्या आया ‘‘ए मांगीण, दरवाजातच थांब,’’ असं म्हणायच्या. विनया सांगतात, ‘‘माझ्यात ठासून ठासून जातीबद्दलचा राग भरला आहे.’’
विनया यांच्या रागाचे, चिडचिडीचे असंख्य किस्से आहेत. ‘‘आमच्या गावाला येरळा नदी आहे. त्या नदीवर वरच्या बाजूला ठरावीक लोक आंघोळ करायचे. स्त्रिया कपडे, जनावरं धुवायच्या; पण आम्ही तिकडे जाऊ शकत नव्हतो. त्यांच्या खाली आम्ही कपडे धुवायचे, आंघोळी करायच्या, जनावरं धुवायची. एकदा काही स्त्रिया कपडे धूत होत्या. तिथे माझ्या म्हशी पाण्यात बसल्या. बायका ओरडून, ‘ए मांगे’ अस म्हणत धावून आल्या. ‘मला जातीवरून हाक मारू नका,’ असं मी शिरा ताणून, आक्रस्ताळेपणे ओरडून सांगितलं. ‘मग काय हाक मारायची गं, तुला?’ असं कुत्सितपणे हसत बायकांनी विचारलं. गावात ‘त्यांचा’ मसणवटा (स्मशानभूमी) वेगळा. आमचा रस्तादेखील वेगळा. आजीबरोबर मंदिरात गेल्यावर बाहेर उभं राहायचं. आजी कुणाला तरी बोलावून नारळ फोडायला सांगायची. आजीला मी विचारायचे, ‘असं का?’ ’’
घरात मुलगी म्हणून आणि बाहेर ‘मांगाची मुलगी’ म्हणून अनेक प्रकारची मानहानी. आपल्या मुली जातीचे, स्त्रियांबद्दलचे नियम मोडणार नाहीत याचा घरातून पहारा. विनयांचे वडील रागीट. घरात त्यांच्यासमोर बोलण्याचं कुणाचंही धाडस नव्हतं. आई तर थरथर कापायची. मारहाण, भांडण रोजचं. एकदा, विनया मैत्रिणीबरोबर सिनेमाला गेल्या म्हणून वडिलांनी मारायला हंटर काढला. ‘विहिरीत ढकलून मारूनच टाकतो’ म्हणाले. बैलगाडीत बसायला सांगितलं. रागानं लालभडक झालेल्या त्यांच्या डोळय़ांची जरब विलक्षण होती. विनयांना वाटले, आज नक्की मरणार. विहिरीसमोर गाडी थांबवली. विहीर पाण्यानं काठोकाठ भरलेली. भीतीनं गारठलेल्या विनया यांना तिथेच सोडून वडील कामाला निघून गेले आणि त्या वाचल्या; पण अनुभवलेली ती भीती विनया विसरूच शकत नाहीत.
मासिक पाळी सुरू होईपर्यंत शेतांमधून बिनधास्त खेळणाऱ्या विनया, पाळी सुरू झाल्यावर मात्र पूर्ण बंदिस्त झाल्या. मित्रमैत्रिणींना भेटायला मज्जाव झाला. विनया म्हणतात, ‘‘माझे पंखच छाटले गेले. जीव गुदमरत होता. रोज नियमांचे बाळकडू मिळायचं. ‘मुलीचे जीवन काचेचं भांडं. तडा गेला तर नीट होत नाही.’ आता आठवलं तरी हसू येतं!’’
गावातल्या प्रथेनुसार ‘देवीच्या सुवासिनी’ म्हणून विनयांच्या आईला प्रत्येक घरात बोलावलं जायचं. एकदा गावातल्या प्रतिष्ठित घरात संध्याकाळी उशिरा आईला एकटीलाच बोलावणं आलं. इतर बायका कुणी नाहीत आणि अंधार होता म्हणून आई येणार नाही, असं विनयांनी कळवलं. एवढय़ा प्रतिष्ठित घराण्याला नाही म्हणायची हिंमत केली, म्हणून चिडून त्यांनी विनयांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला. आजही ते शेजारच्या गावातून मांग स्त्रियांना बोलावतात.
काकांच्या घरी मदतीसाठी विनया मुंबईत आल्या. नंतर त्यांचं लग्न लावून दिलं गेलं. आयुष्य नव्यानं सुरू झालं. त्या आगीतून फुफाटय़ात पडल्या. वाटय़ाला आलं ते मुक्या जनावरासारखं सोसलं. सासरी खूप छळ होऊनही माहेरी काही सांगितलं नाही. कसं सांगणार? घरच्यांना त्यांच्या इज्जतीची काळजी होती. विनया नवऱ्याकडे आहेत, यातच त्यांना समाधान होतं. कोणत्या स्थितीमध्ये आहेत याचं देणंघेणं नव्हतं. त्यांची ‘इज्जत’ विनयांनी जपली.
उदरनिर्वाहासाठी काम करणं अत्यावश्यक होतं. विनयांनी बालवाडी चालवली. मग त्यांना स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचारावर काम करायची संधी मिळाली. ‘प्रथम’, ‘स्त्रीमुक्ती संघटना’ अशा संघटनांचा आधार मिळाला. कौटुंबिक त्रास असह्य झाल्यावर काही दिवस विनया आधारगृहातही राहिल्या; पण लोक काय म्हणतील, या भीतीनं घरी परतल्या. हिंसाचार सहन करण्याची मर्यादा संपली तेव्हा घर सोडलं. नात्याच्या लोकांनी मदत केली नाही; पण वस्तीतल्या काही बायकांनी नवीन नातं जोडलं. राहायला छत दिलं, खायला अन्न दिलं आणि मानसिक आधार दिला.
विनया सांगतात, ‘‘या सगळय़ा प्रकारात मी स्वत:ला खूप तुच्छ मानत होते. एकदम कचरा! कुणीच आपलं नाही, असं वाटे. मी घेतलेल्या निर्णयामुळे मला माझा परिवार स्वीकारणार नाही याची भीती होती. सगळय़ात मोठा मनस्ताप व्हायचा, तो हा की, आपण बाहेर स्त्रियांना अत्याचाराविरोधी पावलं उचलायला मदत करायची, प्रयत्न करायचे आणि आपल्या घरात आपण तेच सहन करायचं, या खोटेपणाचा!’’
बालवाडी, बचतगट याचं काम करत विनया ‘ग्रासरूट नेतृत्व विकास कार्यक्रमा’त २००८ मध्ये सहभागी झाल्या. त्या वेळी नुकत्याच आलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याबाबत विनयांना काम करायचं होतं. त्यांच्यावर झालेला पराकोटीचा हिंसाचार हीच त्यांची प्रेरणा होती. या कामानं आणि नेतृत्व विकासाच्या प्रक्रियेनं विनयांना पूर्ण बदललं. त्यांच्यासारखा हिंसाचार इतरांना सहन करावा लागू नये, यासाठी त्यांनी कंबर कसली. वर्षांच्या शेवटी कार्यक्रमाच्या संमेलनामध्ये सर्व सहभागींचे मोठे फोटो सभागृहात लावले होते. विनयांचा माइकवर बोलतानाचा फोटो बघून त्या हरखूनच गेल्या. आपण एवढे महत्त्वाचे आहोत? त्यांचा विश्वास बसेना. स्वत:बद्दल खूप बरं वाटण्याचा तो संस्मरणीय क्षण होता त्यांच्यासाठी.
त्यांच्या निमंत्रणावरून कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश वस्तीतल्या कार्यक्रमाला आले. त्यांनी घर सोडलं, तेव्हा नवऱ्यानं त्याच वस्तीत विनयांचं पुरेपूर चारित्र्यहनन केलं होतं. पूर्वी त्यांच्याबद्दल कुजबुजणाऱ्या स्त्रिया आता मदतीसाठी यायला लागल्या. वस्तीतल्या मुलींना विनयांचा आधार वाटायला लागला. विनयांचा आत्मविश्वास आणखी वाढला. नेतृत्व विकासाच्या फेलोशिपच्या शेवटी विनया म्हणाल्या, ‘‘मला वाटायचं, की मी कचरा आहे, मला काहीच किंमत नाही. आता वाटतं, मी माझ्या वस्तीतल्या बायका आणि मुलींसाठी सुरक्षित वातावरण तयार करते आहे.’’ विनयांच्या राहण्यात, बोलण्यात, वागण्यात फरक पडला. तब्येत सुधारली, चेहऱ्यावर चमक आली. वस्तीतल्या पुरुषांनाच नव्हे, तर अनेक बायकांनाही प्रश्न पडला, मूल नाही-नवरा नाही, मग ही आनंदी कशी? स्त्री स्वत:च्या जिवावर, स्वत:च्या संदर्भात, पुरुषाशिवाय आनंदी राहू शकते हे कसं? ती निर्लज्ज तरी आहे किंवा तिचं काही ‘प्रकरण’ तरी चालू असावं, असा निष्कर्षही काढला जायचा.
आत्मविश्वास आणि तळमळ यामुळे विनया महाराष्ट्रातल्या ४५,००० शाळांमधून चाललेल्या लिंगभाव समानतेच्या कामात अग्रभागी राहिल्या. नववी शिकलेल्या विनयांनी दोनेकशे शिक्षक आणि अधिकारी यांचं प्रशिक्षणही घेतलं. विनयांची क्षमता वाढत होती. नेतृत्व विकासाच्या प्रक्रियेत हक्क, मूल्य, समानता याबद्दल समजलं होतं. विनया पालकांना सांगायच्या, ‘‘समानता म्हणजे फक्त शाळेत मुलगा-मुलगी दोघांना पाठवणं, दोघांना सारखी पुस्तकं घेणं एवढंच नाही. त्यांना समान हक्क आहेत का?’’
कामानिमित्तानं विनया मराठवाडय़ात राहायला गेल्या. शेजारीण आडून आडून विनयांच्या पायात जोडवी आहेत का, मंगळसूत्र कसलं आहे, त्यांना कोण भेटतं, याचा शोध घ्यायची; पण तिला पक्कं अनुमान काही करता येईना. एक दिवस आंघोळ करून बाहेर आलेल्या विनयांच्या कपाळावरचं गोंदण पाहून शेजारीण खूश झाली. ‘‘आता बरं वाटलं, की तुम्ही ‘आमच्याच’ आहात,’’ असं विनयांना सांगितलं.
गेल्या १५ वर्षांत विनयांनी कौटुंबिक हिंसाचार, बलात्कारासारखे गुन्हे, बालविवाह, यासंबंधित अनेक घटनांवर जीव तोडून काम केलं. यंत्रणांच्या पाठपुराव्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटकातही हेलपाटे घातले. विद्यार्थी, पालक, यंत्रणा यांना जोडून घेऊन किंवा प्रसंगी जाब विचारून कामात सहभागी करून घेतलं. मुंबईमध्ये वस्त्यांमधून महिला मंडळ फेडरेशनची बांधणी केली. २०१२ मध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवली; परंतु त्या निवडून आल्या नाहीत. अर्थात त्यातून मोलाचं शिक्षण झालंच. सध्या महाराष्ट्रात स्त्रियांचं नेतृत्व विकसित करण्याच्या विशेष कार्यक्रमात विनयांची महत्त्वाची भूमिका आहे.
आपल्या प्रवासात विनया संघटनेच्या पाठिंब्याचं महत्त्व अधोरेखित करतात. आपल्याला पटलेलं करण्याचं स्वातंत्र्य, चुका करण्याची मुभा, चुका सुधारण्याचा एकत्रित प्रयत्न आणि सतत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन. विनया सांगतात, ‘‘हा पाठिंबा वेगळा विचार करायला, वेगळं वागायला महत्त्वाचा राहिला.’’
‘‘२००७ मध्ये मला वाटत होतं, की माझ्यातला माणूस मेलेला आहे; पण त्यानंतरचा प्रवास माझ्या आयुष्यातला हृद्य टप्पा आहे. सक्षमीकरण ही मनाच्या मुळाशी जाणारी गोष्ट आहे. कुणाचाही गुलाम नसणं, संपूर्ण स्वातंत्र्याचा आस्वाद घेणं म्हणजे सक्षमीकरण. यात विचारांचं पक्केपण आहे. माझ्यामधली धास्ती पूर्ण गेली आहे; जातीचीही आणि स्त्रीपणाचीही! घरात, घराबाहेर मी कुणाशीही सामना करू शकते. ‘कुटुंबाची इज्जत’ वगैरे फक्त पोकळ शब्द वाटतात. पूर्वी आम्ही विचारच करत नव्हतो. आता विचार करतो. त्यामुळे पूर्वीसारखं दु:ख आता सहन करणार नाही. कामानं मला पूर्ण बदललं आहे,’’ असं विनया सांगतात.
विनयांच्या प्रवासातलं सुंदरपण त्यांच्या या समजुतीत आहे. आपणच आपल्या माणूसपणाचा आदर करायला लागलो, आपली आंतरिक ताकद समजून घेतली, तर जात काय, लिंग काय किंवा आणखी कुठल्याही निकषावर होणाऱ्या भेदभावाशी दोन हात करण्याची जिद्द आणि ताकद तयार होते. विनया यांचं दु:ख त्यांच्या जातीशी, बाई असण्याशी, गरीब असण्याशी, ग्रामीण भागात राहात असण्याशी, अशा सगळय़ाशी संबधित होतं हे त्यांना अनुभवातून पटलं, कामातून दिसलं. विनयांचा प्रवास हेच सांगतो, की एक धागा उकलला तर इतर धाग्यांची वीणही कमकुवत होते. ‘ग्रासरूट फेमिनिझम’चं मर्मच आहे हे.