‘कृतज्ञता’ ही भावना मनोविकासाच्या मार्गावरची महत्त्वाची देणगी आहे. कृतज्ञतेच्या जाणिवेमुळे किती तरी नकारात्मक विचारांवर- भावनांवर सहज मात करता येते. ते नुसते जीवनमूल्य नाही तर आपली ताकदसुद्धा आहे, नात्यांची वीण पक्की करणारी आणि आपल्याला ‘मी’ पलीकडचं वर्तुळ दाखवणारी!

स्व रदाचा दिवस खूप गडबडीत गेला होता. घरातली कामं उरकून ९.२० ची लोकल गाठता गाठता नाकीनऊ झाले होते. प्रीतीने तिच्यासाठी थोडी जागा मोकळी करून दिली म्हणून निदान टेकता तरी आलं. मुसळधार पाऊस आणि नेमकी छत्री विसरलेली. जेनेटनं तिला भिजताना पाहिलं आणि स्वत:च्या छत्रीला तिरकं करून, लगडून चालत राहिली म्हणून डोकं भिजलं नाही. ऑफिसमध्येही कामाचा हा ढिगारा होता. त्यात साहेबांना हव्या असणाऱ्या दोन डॉक्युमेंट्स सापडत नव्हत्या. कोळकरांनी त्यांचं काम बाजूला ठेवून ती शोधून दिली म्हणून बरं झालं. संध्याकाळी दमून घरी येताना पुन्हा पदर बांधायच्या कल्पनेनं तिला अगदी थकल्यासारखंच झालं. पण घरात पाऊल पडल्याक्षणीच विवेकनं गरमगरम वाफाळलेला कॉफीचा कप समोर धरला आणि पाठोपाठ ईरानं ओरडून सांगतिलं, ‘आई, आज सॅण्डविचेस केलीयेत गं मी आणि पुलिओगर पण!’ स्वरदाचा थकवा कुठल्या कुठे पळाला. रात्री भरल्या मनानं आणि डोळ्यांनी अंथरुणाला पाठ टेकताना ती मनोमन म्हणाली, ‘परमेश्वरा, माझ्यासाठी कुणी तरी कुठे तरी कणकण झिजतंय म्हणून मला ही शांत झोप मिळते आहे. त्या सगळ्यांनाही असेच हात अवतीभवती मिळोत अशी प्रार्थना.’
खरोखरंच ‘कृतज्ञता’ ही भावना मनोविकासाच्या मार्गावरची एक महत्त्वाची देणगी आहे आणि ती फक्त माणसात नाही तर अनेक प्राण्यांमध्येही दिसते, असं संशोधकांनी दाखवून दिलंय. कृतज्ञतेच्या जाणिवेमुळे किती तरी नकारात्मक विचारांवर-भावनांवर सहज मात करता येते. ते नुसते जीवनमूल्य नाही तर आपली ताकदसुद्धा आहे, नात्यांची वीण पक्की करणारी आणि आपल्याला ‘मी’ पलीकडचं वर्तुळ दाखवणारी!
कृतज्ञतेचा स्पर्श आपल्याला आपोआपच लीन करतो. दुसऱ्यांच्या विचार-कृतींचा आदर करायला शिकवतो. रोजच्या जगण्यामध्येसुद्धा किती तरी गोष्टी आपल्याला इतरांकडून न मागता- सहजपणे मिळत असतात तोवर आपण नकळत त्या गृहीत धरलेल्या असतात, त्यामुळे त्यांची किंमत आपल्याला कळत नाही. अगदी रोज मिळणाऱ्या सूर्यप्रकाशापासून ते आपल्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या ओळखीच्या व न ओळखीच्या असंख्य लोकांपर्यंत! शाळेतल्या मुलांशी गप्पा मारायला आलेल्या एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तीने प्रश्न विचारत विचारत हे छान समजावून सांगितलेलं आठवतं. ‘तुमच्या पानात जेव्हा पोळी/भाकरी पडते तेव्हा ती कुठून येते? शेतकरी-व्यापारी- छोटे दुकानदार- गिरणी- तुमची आई- बाबा इतक्या सगळ्यांचा हात लागतो तेव्हा तुम्ही एक घास घेता! तेव्हा त्या पोळीची किंमत फक्त रुपयांत करता येत नाही.’ हे स्मरण ठेवणं म्हणजे कृतज्ञता. भोजनमंत्राच्या नवीन रचनेत म्हटलंय,
‘वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे,
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे!
कृषीवल कृषीकर्मी राबती दिवसरात,
श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात!
स्मरण करूनी त्यांचे अन्न सेवा खुशाल,
उदरभरण आहे चित्र होण्या विशाल!’
कृतज्ञता ही चित्त विशाल करणारी वृत्ती आहे, यात शंका नाही.
जेव्हा निराशेचे ढग दाटून येतात, ‘हरलो की काय’ असं वाटतं, एकटे पडल्याची जाणीव मन पोखरू लागते, तेव्हा आपल्या आयुष्यात कळत-नकळत मिळालेल्या असंख्य आशीर्वादांचं, संधीचं, उपलब्धींचं स्मरण केलं तर ओंजळीत किती शिल्लक आहे ते समजतं.
लहानपणी शाळेत म्हटलेली प्रार्थना आठवते का? ‘देवा तुझे किती सुंदर आकाश- सुंदर प्रकाश सूर्य देतो..!’ कुणी तरी आपल्यासाठी न सांगता न मागता सतत काही तरी देत असतं हे नकळत बिंबवणारी ती कविता सहजपणे ‘कृतज्ञ’ राहण्याची इच्छा जागी करून जाते.
कृतज्ञता म्हणजे नुसती ‘थँक यू’ची कवायत नव्हे किंवा ‘जी जी’ करण्याची लाचारीही नव्हे. कृतज्ञता म्हणजे मनातली भरलेपणाची जाणीव. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर आभाळात ढग दाटून आले आणि दमदार थेंब कोरडय़ा शिवारावर पडले की शेतकऱ्याच्या नजरेत जी दाटते ती कृतज्ञता! रस्त्यावर गाडी घसरून रपक्न आपटल्यावर शेजारचं कुणी तरी गाडी थांबवून आपल्याला उठवतं, बसतं करतं, पाण्याची बाटली पुढे करतं, तेव्हा तोंडातून जे ‘थँक यू/ धन्यवाद’ बाहेर पडतं ती कृतज्ञता! देशाच्या सीमेवर हसत हसत प्राण देऊन आपल्याला ‘सुरक्षित’ ठेवणाऱ्यांबद्दल जे मनात दाटतं ती कृतज्ञता!
ही कृतज्ञता ‘जबाबदार’ बनायला शिकवते. कुणाच्या तरी आस्थेमुळे, पुढाकारामुळे आपल्याला जे सहज, विनासायास मिळालं ते कुणापर्यंत तरी पोचवावं, असं वाटायला लागतं. निसर्गानं मुक्त हस्तानं जी उधळण केलेली आहे तिला निदान आपल्या कृती-वागण्यानं धस लागू नये एवढं भान येतं. जे आपले मानबिंदू जपतात त्यांची उपेक्षा करणं चुकीचं आहे, हे कळून येतं.
काही वर्षांपूर्वी डॉ. अनिल अवचटांचा आपल्या शरीराचं सौंदर्य उलगडून दाखवणारा अत्यंत सुरेख लेख वाचला होता. त्यानंतर शरीराकडे बघण्याची नजरच (पुन्हा शरीर!) बदलली. ‘शरीरामाद्यं खलु साधनंच!’ या ओळीचा खरा अर्थ समजला. शरीराचं कोडकौतुक पुरवणं म्हणजे त्यातल्या सगळ्या यंत्रणांबद्दल नीट समजून घेणं आणि त्या आपल्या ‘मज्जेच्या’ कल्पनांपायी न बिघडण्याची काळजी घेणं, म्हणजेच शरीर ज्या सहनशीलपणे आपल्या लहरी सांभाळतं त्याचा आदर करणं. हीसुद्धा निसर्गाप्रती असलेली कृतज्ञताच!
कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती असू शकतात. काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष. माझ्या परिचयाचे एक उद्योजक खूप अडचणीच्या प्रसंगांमधून जिद्दीनं वर आले. त्यांच्या खडतर प्रवासात ज्यांनी त्यांना मदत केली असे अनेक जण होते. या सगळ्यांच्या आस्थेचं, वेळेवर पुढे केलेल्या हाताचं स्मरण म्हणून ते दरवर्षी पाच उभरत्या, स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या तरुण/ तरुणींना बिनव्याजी प्रत्येकी दोन लाख रुपये कर्ज देतात. (दान/ बक्षीस देत नाहीत कारण तसं दिल्यानं ते पैसे वापरण्यातील, झटझटून पुढे जाण्यातील प्रेरणा मंदावते, असा त्यांचा अनुभवसिद्ध आडाखा आहे.)
हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा कुणी आपल्यासाठी काही करतं, तेव्हा त्या व्यक्तीनं काही तरी किंमत (पैशांची/ वागण्याची/ शब्दांची/ भावनांची) मोजलेली असते हे आपण लक्षात घेतलं तरच त्या ‘करण्याची’ बूज आपण राखू शकतो आणि जे लोक मनात हे जागं ठेवतात ते दुसऱ्यांसाठी स्वत:च्या काही गरजांचा संकोच करायला सहज तयार होतात, असं अभ्यासात दिसून आलंय.
‘कृतज्ञता’ वाटण्यासाठी प्रत्येक वेळी काही तरी चांगलं, आनंददायीच घडायला पाहिजे असं नाही. एखाद्या व्यक्तीला खूप कष्ट/ आव्हानं/ संघर्षांला सामोरं जाऊन जे जीवन शिक्षण मिळालेलं असतं त्याबद्दलही कृतज्ञ वाटू शकतं. मेहेरून्निसा दलवाई यांचं ‘मी भरून पावले आहे’ हे आत्मकथन किंवा ‘माझी कॅन्सर यात्रा’ हे डॉ. अरविंद बावडेकरांचं अनुभवकथन कृतज्ञतेतून मिळालेली साफल्याची भावना व्यक्त करताना दिसतात.
संशोधन असं सांगतं की, ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात मिळणाऱ्या ‘आशीर्वादांची’ लेखी नोंद ठेवतात, त्याबद्दल कुठे तरी, कुणापाशी तरी व्यक्त होतात, ते जास्त आशावादी, उत्साही, निश्चयी असतात इतकंच नाही तर त्यांचं एकूण मानसिक आरोग्यही उच्च प्रतीचं असतं. हे नुसतंच तात्त्विक बोलणं नाही तर यावर वस्तुनिष्ठ नोंदीही झालेल्या आहेत. एका प्रयोगात दोन गटांना त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांबद्दल काही नोंदी करायला सांगितल्या. एका गटाला ‘कृतज्ञता’ वाटू शकणाऱ्या प्रसंगांचे स्मरण (डोळ्यांसमोर आणणे) करायला सांगितलं तर दुसऱ्या गटाला ज्या प्रसंगामुळे निराश वाटेल अशा प्रसंगाचं! ज्या दोन्ही गटांतील सदस्यांच्या मेंदूतील लहरी (ईसीजी) आणि हृदयाचे ठोके या दोन्हींतील एकतानता यंत्राच्या मदतीने तपासली गेली. त्यात पहिल्या गटातील लोक जास्त चांगले आढळले. थोडक्यात कृतज्ञतेची भावना आपल्या शरीराच्या संतुलनालाही मदत करते असं दिसून आलं.
जपानमधील एक ध्यानपद्धत ‘नाईकन’ – मध्येही ‘कृतज्ञता’ हेच सूत्र प्रमुख ठरवण्यात आलंय. विवेकानंद केंद्राच्या प्रार्थनेतील एक श्लोकही हेच व्यक्त करतो. ‘जीवने यावद् आदानम्- स्यात् प्रदानं ततोऽधिकम्’ (आपल्याला जे मिळतं त्यापेक्षा जास्त देण्याची वृत्ती माझ्यात यावी) हे घडतं ते कृतज्ञतेच्या भावनेतून. त्यात उपकारांचं ओझं मानण्याचा भाग नाही. तर त्या व्यक्तीच्या कृतीचं स्मरण करून ती वृत्ती आपल्यात यावी अशी सदिच्छा आहे.
भारतीय/ पौर्वात्य संस्कृतीत शेकडो वर्षे कृतज्ञता प्रतीक म्हणून अनेक विशेष परंपरा/ पद्धती रुजलेल्या आहेत. ‘तर्पण’ किंवा ‘श्राद्ध’ हे त्याचंच एक उदाहरण. त्यात धर्माचारापेक्षा ‘मूल्य’ महत्त्वाचं आहे, पण दुर्दैवानं तो मूळ अर्थ नाहीसा होऊन फक्त उपचारांचं कर्मकाण्ड शिल्लक राहिलं आहे. खरं तर पूर्वजांच्या ज्या कृतींनी आपल्या जगण्याला बळ दिलेलं असतं, त्यासाठी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे श्राद्ध. ते ज्याला वाटेल त्या पद्धतीनं करता यावं आणि ज्याला असं काही वाटतच नाही किंवा ज्यानं आपल्या निकटवर्तीयांचा जाणीवपूर्वक अपमान/ अवहेलना केली असेल त्यांना हा ‘कृतज्ञते’चा देखावा करण्याची गरजच नाही!
शेवटी देश म्हणून आपल्यापैकी प्रत्येकानं ज्यांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहायला हवं- म्हणजेच त्यांच्या जगण्याचा अंश तरी आपल्या आयुष्यात प्रकटावा म्हणून सजग राहायला हवं त्या माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलामांना हा लेख मन:पूर्वक अर्पण करते. > Freedom is never given; it is won. -A. Philip Randolph > If you’re not ready to die for it, put the word ‘freedom’ out of your vocabulary.
-Malcolm X

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Story img Loader