– डॉ. सागर पाठक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घटस्फोट घेणे कुणाहीसाठी आनंदाचे नसतेच. ज्या प्रेमाच्या भरोशावर लग्नबंधनात प्रवेश केलेला असतो त्या नात्यालाच संपताना अनुभवणे दु:ख, वेदना देणारेच असते. त्यासाठी संसारात काही तडजोडी, काही बदलही करून पाहिलेही जातात, परंतु जेव्हा आता यापुढे एकमेकांबरोबर राहणे, जगणे अशक्य आहे, याची ठसठशीत जाणीव होते, तेव्हा मात्र वयाच्या कोणत्याही टप्प्यांवर त्या बंधनातून बाहेर पडणे दोघांच्याच नव्हे, तर कुटुंबीयांच्याही भल्याचे ठरते. अशाच वयात, पन्नाशीनंतर किंवा लग्नाच्या १५२० वर्षांनंतर ‘ग्रेडिव्होर्स’ घेतलेले अनेक जण समाजात दिसू लागले आहेत.

आपण जेव्हा लग्न करतो त्या वेळी आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतो. आपल्या नात्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपण एकत्र मिळून सोडवू, त्यांच्यावर मात करू, या विश्वासानेच लोक लग्नबंधन स्वीकारतात. आयुष्याची एकत्र वाटचाल सुरू करतात. बहुतांशी नवरा-बायकोच्या नात्यामध्ये असे बघायला मिळते की, सुरुवातीचा हनिमूनचा कालावधी खूपच पटकन निघून जातो. नव्या नवलाईमध्ये स्वत:लाच विसरलेले ते दोघे एकमेकांमध्ये समरसून जातात. नावीन्याची झळाळी कमी झाल्यावर पुढची काही वर्षे एकमेकांना पारखण्यात जातात. नंतर मुले-बाळे, संसार, करिअर, आर्थिक स्थिरता मिळवणे या सगळ्यांमध्ये ते जोडपे गुरफटून जाते. या संपूर्ण कालावधीमध्ये सगळ्याच जोडप्यांमध्ये थोड्याफार कुरबुरी चालू असतातच, परंतु मुलांसाठी, सामाजिक किंवा आर्थिक असुरक्षिततेमुळे ही जोडपी तडजोडी करत राहतात. काही जणांचे त्यातही छान चालते. वयाची परिपक्वता नात्याला सांभाळायला लागते. आपण एकत्रच आणि एकमेकांसोबतच म्हातारे होणार याची खूणगाठ पक्की बसते आणि असे संसार अव्याहतपणे सुरू राहतात. पण काहींच्या बाबतीत, आयुष्य वेगळ्या वळणावर उभे राहते. मुले मोठी झालेली असतात, बऱ्यापैकी आर्थिक स्थिरता आलेली असते. वाढत्या वयाबरोबर सामाजिक व सांसारिक जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात. अशा वेळी एखाद्या जोडप्याला आपल्या नात्यातील विसंवादाची जाणीव अधिकाधिक ठसठसायला लागते. आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या नात्यामध्ये असलेल्या कमतरता प्रकर्षाने जाणवायला लागतात. यापुढचे आयुष्य एकमेकांबरोबर घालवता येईल का? असा प्रश्न पडायला लागतो. आणि अखेर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला जातो. केसांमध्ये चांदी चमकायला लागलेली असते, अशा पोक्त-चंदेरी वयामध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला जातो, त्यालाच ‘ग्रे डिव्होर्स’ किंवा ‘सिल्व्हर स्प्लिटर्स’ असे संबोधले जाते. थोडक्यात, प्रौढ वयामध्ये म्हणजे साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यावर, लग्नाला १०-१५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतर जो घटस्फोट घेतला जातो त्याला ‘ग्रे डिव्होर्स’ असे म्हटले जाते.

हेही वाचा – आहे जगायचं तरीही…

आज-काल असे अनेकांचे घटस्फोट झाल्याचे कानावर येत आहे. सगळ्यात अलीकडचे उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान आणि त्यांच्या पत्नी सायरा बानू यांच्या घटस्फोटाची बातमी. आणि तोही लग्नाला २९ वर्षे उलटल्यानंतर. आमिर खान, अरबाज खान, कमल हसन, त्याही आधी बिल गेट्स अशी अनेक उदाहरणे आपल्या ऐकिवात आहेतच. असे असले तरी आपल्या देशामध्ये ‘ग्रे डिव्होर्स’चे प्रमाण सध्या तरी फार नाही, परंतु अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये चारपैकी एक घटस्फोट हा ‘ग्रे डिव्होर्स’ असतो. यावरूनच या विभक्तपणाचा सामाजिक आवाका किती आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो.

या ‘ग्रे डिव्होर्स’मध्ये पहिला प्रश्न येतो की, हे जोडपे इतकी वर्षे एकत्र राहिलेच कशाला? ते दोघे सुरुवातीलाच विभक्त का नाही झाले? अर्थात नवरा-बायकोच्या नात्यात नेमके काय होते, किंवा काय बिनसते हे ते दोघेच जास्त चांगले सांगू शकतात, परंतु आजच्या एकूणच वैवाहिक नात्यांतील ताणतणाव लक्षात घेता काही कारणे नक्की सांगता येतात. आणि अर्थातच काय टाळायला हवे हेही लक्षात येते.

लग्नबंधनाची अव्यक्त घुसमट

आपल्या जोडीदाराची काही स्वभाववैशिष्ट्ये आपल्याला खटकत असतात. उदाहरणार्थ, जोडीदाराचा तापट स्वभाव, आपले मत सतत दुसऱ्यावर लादणे, जोडीदारास नेहमी कमी लेखणे, कौटुंबिक हिंसाचार, नको असलेली सामाजिक बंधने लादणे परंतु भिडस्त स्वभावामुळे आपण जोडीदाराला ती कधीच सांगत नाही. आपल्या जोडीदाराला वाईट वाटेल. किंवा कधी तरी बदलेल या आशेवर आपण स्वत:च कुढत राहतो व हे नाते नको असतानाही तसेच चालू ठेवतो.

सामाजिक अप्रतिष्ठा

लग्न हे जितके वैयक्तिक असते तितकेच ते एक सामाजिक बंधन आहे. जोडीदाराबद्दलच्या मतभेदांची जाणीव असूनदेखील समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, आई-वडील काय म्हणतील, मुले काय म्हणतील या भावनेपोटीच पती-पत्नीला विभक्त होण्याचा निर्णय कठीण वाटतो.

कौटुंबिक जबाबदारी

लग्न झाल्यावर आपल्याला काही सांसारिक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. मुलांचे संगोपन करणे, आपल्या आई-वडिलांची, सासू-सासऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेणे. अशा खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वैवाहिक आयुष्यात दोघेही पूर्ण करत असतात. या जबाबदाऱ्यांच्या कसोटीस पूर्ण उतरताना स्वत:च्या त्रासाकडे ‘दुर्लक्ष केले जाते, किंबहुना जबाबदाऱ्यांचे ओझेच इतके जास्त असते की, आपल्या जोडीदाराबरोबरचे मतभेद बाजूला पडतात.

आर्थिक स्थिरता

आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसलेल्या स्त्रिया कायमच आपल्या पतीवर पैशांसाठी अवलंबून असतात. त्यामुळे विभक्त झाल्यावर आपला चरितार्थ कसा चालेल? या विचारापोटी त्या निर्णय घेण्यास धजावत नाहीत. नवरा-बायको नोकरी करणारे असले तरीदेखील आपल्या करिअरचे पुढे कसे होईल, आपल्याला काम करता येईल का, निवृत्तीनंतर आपले आर्थिक नियोजन कोलमडून पडेल का, या विचारानेही एखादे जोडपे विभक्त होण्याचा विचार सतत पुढे ढकलत राहते.

क्लिष्ट प्रक्रिया

आजही आपल्या देशामध्ये कायदेशीररीत्या घटस्फोट घेणे वाटते तितकी सहज, सोपी प्रक्रिया नाही. भावनिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आव्हानांना तर सामोरे जावेच लागते, परंतु जेव्हा न्यायालयीन व कायदेशीर गोष्टी काही वेळा दीर्घ काळापर्यंत हाताळाव्या लागतात, त्या वेळी बरेच जण विभक्त होण्याच्या विचारापासून माघार घेतात.

स्वत:च्या क्षमतेबद्दल साशंकता

मी या वयात घटस्फोट घेतला तर स्वत:ची काळजी घेऊ शकेन का, मला एकटे राहणे जमेल का, सर्व अडचणींचा सामना एकट्याला करता येईल का? याबद्दल नेहमीच अनेकांच्या मनात धाकधूक राहते. जोपर्यंत स्वत:ला स्वत:च्या क्षमतेबद्दल खात्री होत नाही, आत्मविश्वास वाटत नाही तोपर्यंत बराच मोठा कालावधी निघून गेलेला असतो.

मी माझ्या जोडीदाराला बदलू शकेन

आपल्या वैवाहिक आयुष्यात असलेले मतभेद, जोडीदाराच्या स्वभावामध्ये असलेले दोष आपण बदलू शकतो वा भविष्यात ते बदलतील या विश्वासापोटी अनेक जण नात्यांमध्ये टिकून राहतात. कालांतराने जेव्हा तो भ्रमच असल्याचे लक्षात येते तेव्हा मात्र विभक्त होण्याचा विचार गंभीरपणे केला जातो.

अशा अनेक कारणांमुळे हे जोडपे इच्छा नसूनही अनेक वर्षे एकमेकांच्या सहवासात राहतात. त्रास होत आहे, हे समजत असते, पण त्याच्यावर शेवटचा घाव घालायला मन धजावत नसते. मात्र आयुष्यात असा एक टप्पा येतो किंवा अशी एखादी अप्रिय घटना घडते की, यानंतर एकमेकांबरोबर राहणे कठीण व्हायला लागते आणि जोडपे ‘ग्रे डिव्होर्स’साठी अर्ज दाखल करतात.

घटस्फोटाची मानसिक तयारी होईपर्यंत जोडपे एकमेकांना सहन करत राहतात. पण जेव्हा ते असह्य होते तेव्हा मात्र ती मानसिक तयारी पूर्ण झालेली असते. कोणती आहेत ती कारणे –

नात्याला गृहीत धरणे

जेव्हा दोघे जण एकमेकांबरोबर अनेक वर्षे एकत्र राहत असतात, साहजिकच दोघांनाही एकमेकांच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धतींची सवय होते. तसेच एखाद्या परिस्थितीत आपला जोडीदार कसा वागेल याचा अंदाज हळूहळू बांधता येऊ लागतो. वेळीच सावध होऊन खटकणारे स्वभाव बदलले तर ठीक, अन्यथा दोघे जण स्वत:च्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये कुठलाच बदल करत नाहीत. यामुळे नात्यात एकसुरीपणा येत जातो. जसजशी वर्षे जात राहतात, तसे हे गृहीत धरले जाणे खटकायला लागते. बदललेल्या वयानुसार, प्रत्येकाच्या मानसिकतेनुसार जीवन जगण्याची शैली, पद्धती यामध्ये बदल होतो. जर जोडीदाराने आपल्या या बदललेल्या दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष केले, तर आपसूकच जोडीदार एकमेकांपासून मानसिक, भावनिकदृष्ट्या विलग व्हायला लागतात.

हेही वाचा – आला हिवाळा…

बदललेला सामाजिक स्तर

वयानुसार, त्या जोडप्याचा किंवा त्यातल्या एकाचा सामाजिक स्तर बदलतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढते. या बदललेल्या परिस्थितीमध्ये जोडीदारानेही स्वत:मध्ये बदल केले नाहीत तरीही जोडीदाराबद्दलची आपुलकी कमी होते.

शारीरिक दुरावा व लैंगिक सहजीवन

काही जोडपी नोकरीनिमित्त एकमेकांपासून प्रदीर्घ काळासाठी वेगळे राहतात. अशा वेळी त्यांच्यातील अत्यावश्यक असलेली शारीरिक जवळीक ही आपणहूनच कमी होते. तसेच सुरुवातीच्या काळामध्ये लैंगिक सहजीवन हे अतिशय आकर्षक व हवेहवेसे वाटत असते. परंतु जसजशा इतर जबाबदाऱ्या वाढायला लागतात, मुले होतात तसतसे लैंगिक सहजीवन हे एक कार्य म्हणून उरकले जाते. दोघेही एकमेकांत लैंगिकदृष्ट्या जवळीक निर्माण व्हावी यासाठी वेगळे प्रयत्नच करत नाहीत. त्यातून मग लैंगिक सहजीवनाचा गोडवा कमी होतो. अशात जर का त्रयस्थ व्यक्तीबरोबर प्रेमाचे वा लैंगिक संबंध निर्माण झाले, तर हे जोडपे वेगळे व्हायला तयार होते. या वयात भावनिक गरज जर लग्नाबाहेर पूर्ण केली जात असेल तरीही असे लग्न टिकत नाही.

सांसारिक जबाबदाऱ्यांची पूर्तता

मुले मोठी होतात, त्यांच्या त्यांच्या आयुष्यात रममाण होतात. या जोडप्यांचे घरटे रिकामे होते. तोपर्यंत दोघांमधील मुलांभोवती फिरणारा संवाद मुले दूर गेल्यावर कसा साधायचा हेच त्यांना समजत नाही. दुसरे म्हणजे दोघांचेही आई-बाबा त्या वेळी एकतर खूपच वयस्कर झालेले असतात किंवा जिवंत नसतात. त्यामुळे या दोघांना बांधून ठेवणारे सांसारिक पाश अचानकपणे गायब होतात.

वेगवेगळ्या आवडी-निवडी

एखाद्या जोडीदाराला मस्तपैकी वेगवेगळ्या ठिकाणी हिंडण्या-फिरण्यात उर्वरित आयुष्य घालवावेसे वाटते. दुसऱ्या जोडीदाराला अधिक जोमाने काम करावे, आपल्या पुढील पिढीसाठी जास्त कष्ट करावेत, अर्थार्जन करावे, त्यांच्याबरोबर सतत राहावे असे वाटू शकते. मग आयुष्यभर जतन करून ठेवलेल्या ‘बकेट लिस्ट’मधील या गोष्टी डोके वर काढायला लागतात. दोन्ही जोडीदारांची ‘बकेट लिस्ट’ समसमान असली तर उत्तम. पण ती यादी जर वेगळी असली तर नात्यांमध्ये खटके उडायला लागतात. कधी एकत्र जगताना आलेल्या भौतिक अनुभवांमुळे दोन्ही जोडीदार एकमेकांपासून मानसिक, भावनिकदृष्ट्या वेगळे होऊ लागतात. तर कधी दोघांच्या आपल्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा, आपले पुढील आयुष्य कसे जगायचे याबद्दलचे विचार वेगळे असल्यानेही वाटा वेगळ्या होऊ शकतात.

पूर्वीच्या काळी घटस्फोटित व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा सकारात्मक नव्हता. परंतु आजच्या काळामध्ये एखाद्याचा घटस्फोट समजून घेतला जातो. त्यामुळे नको असलेल्या नात्यात कुढत बसण्यापेक्षा घटस्फोट घेतल्यावरदेखील आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा येणार नाही याची जाणीव व्हायला लागली आहे. त्यामुळे असा ‘ग्रे डिव्होर्स’ घेतला जातो, परंतु त्याची इतर घटस्फोटांपेक्षा वेगळी वैशिष्ट्ये असतातच.

बहुतांश वेळा हे घटस्फोट पती-पत्नी दोघांच्याही सहमतीने होतात. दोघांमध्ये असलेल्या मतभेदांची जाणीव एकमेकांना अगोदरच असल्यामुळे दोघेही विभक्त होण्यास संमती देतात.

विभक्त झाल्यानंतरदेखील दोघांमध्ये असलेले मैत्रीचे नाते बऱ्याच वेळा टिकून राहते. प्रेम कमी झाले असले तरी आदर टिकून राहू शकतो.
आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल व त्यांच्या संगोपनाबद्दल दोघेही जागरूक असतात. त्यांच्यासाठी विभक्त होऊनदेखील दोघेही एकमेकांना सहकार्य करण्यास बऱ्याचदा तयार असतात.

घटस्फोट घेतल्यानंतरही सामाजिक कार्यक्रमांमध्ये किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये दोघेही एकमेकांना मदत करतात, एकमेकांना न टाळता एकत्र येतात. मात्र अशी जोडपी आपल्या उर्वरित आयुष्याच्या आर्थिक नियोजनाबद्दल नेहमीच साशंक असतात. त्यामुळेच घटस्फोट घेताना वैवाहिक जीवनात जमा केलेल्या आर्थिक पुंजीची विभागणी करणे हे त्यांच्यासाठी सगळ्यात कठीण काम असते.

विभक्त होणे ही कुणासाठीच आनंददायी गोष्ट नसते. परंतु दुर्दैवाने जर ‘ग्रे डिव्होर्स’ घ्यावा लागलाच, तर काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे –

आपल्या उर्वरित आयुष्यासाठी आर्थिक तरतूद करणे खूपच महत्त्वाचे असते. भावनिकदृष्ट्या आपला कोणी गैरफायदा घेणार नाही, याबाबत कायम जागरूक असणे गरजेचे ठरते. आर्थिक फसवणूक वा शारीरिक, लैंगिक गरजा पूर्ण करताना आपला कोणी ‘वापर’ करत नाही ना याकडे प्रकर्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रौढ वा उतारवयामध्ये विभक्त झाल्यावर सगळ्यात मोठा शत्रू असतो तो म्हणजे एकटेपणा. आपल्या आयुष्यात एकाकीपणाला थारा मिळू नये यासाठी आपले मुलांबरोबरचे, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबरचे नाते टिकवणे, ते अधिक जपणे याला प्राधान्य देता यायला हवे. आपल्या विभक्त जोडीदाराबरोबरही मैत्रीचे नाते ठेवायला काहीच हरकत नाही. अपूर्ण राहिलेल्या काही इच्छा-आकांक्षामुळे जोडपे विभक्त झाले असेल, तर त्या गोष्टींची पूर्तता करण्याकडे लक्ष द्यायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘ग्रे डिव्होर्स’चा निर्णय पूर्ण विचारांतीच घ्यायला हवा, अन्यथा एका त्रासातून सुटण्यासाठी दुसऱ्या मोठ्या संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होऊ शकते.

थोडक्यात, घटस्फोट हा कुठल्याही वयात कधीच सोपा नसतो. एक प्रेमाचे नाते त्यामुळे संपणार असते, परंतु जे नाते आपल्याला आनंद देऊ शकत नाही, ज्यामध्ये स्वत:ची घुसमट होते अशा नात्याला नाइलाजास्तव पकडून फरफटत राहण्यातही काहीच अर्थ नसतो. अशा वेळी विभक्त होण्याचा पर्याय नक्कीच स्वत:साठी चांगला मार्ग असू शकतो. परंतु हा मार्ग निवडताना आणि निवडल्यानंतर पुढच्या आयुष्याची काळजी डोळसपणे घ्यायला हवी. असे झाल्यास आपले ‘चंदेरी दिवस’ नक्कीच ‘सोनेरी’ होऊ शकतील, यात शंका नाही.

drsagarpathak@hotmail.com